द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -५)

Story About Thriller Experiment.
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सर आणि अभिषेक ब्यूरोमध्ये आत्तापर्यंत जे काही घडत गेलं आहे त्याची पुन्हा उजळणी करत होते. रात्रभर ते दोघं तिथेच होते. आता आपली टीम त्या लोकांच्या ताब्यात आहे म्हणजे लवकर काहीतरी केलं पाहिजे हाच त्यांचा हेतू होता शिवाय ही बातमी आता मीडियामध्ये जायला वेळ लागणार नव्हता. एकदा मीडियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की लोकांच्या मनात दहाशद निर्माण होणार आणि काही अतिउत्साही लोकं नको ते करून बसणार त्याआधी सी.आय.डी.ला याच्या मुळाशी जायचं होतं. अभिषेक व्हाईटबोर्डवर सगळ्या घटना क्रमाने लिहीत होता आणि सुयश सर त्यांच्या सिनिअर्स सोबत याबद्दल फोनवर चर्चा करत होते. त्यांना स्पेशल फोर्सची मदत घ्यावी लागणार होतीच. एवढ्यात निनाद ब्यूरोमध्ये आला. तोवर सरांचं देखील फोनवर बोलून झालं होतं.

"सर! मी फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन आलो. कैलासने मला ऋषभचे सँपल आणि अर्धा प्रोसेस झालेला कोणतातरी फॉर्म्युला दिला होता तो मी नियतीला देऊन आलोय." तो म्हणाला.

"ठीक आहे. ती तिचं काम करेल. तुझ्यात आणि कैलासमध्ये काही बोलणं झालं? अशी कोणती गोष्ट समजली का की ती आपल्याला या केसच्या जवळ घेऊन जाईल?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर. अश्या बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत." निनाद म्हणाला.

"अरे मग लवकर लवकर सगळं सांग. तिथे आपली टीम.." सुयश सर बोलता बोलता थांबले आणि त्यांनी निनादला सुद्धा तो व्हिडिओ दाखवला.

तोवर अभिषेक कोणाला कोणाला फोन लावून सिक्युरिटी चेक करत होता.

काही तासांपूर्वी... (रॉबर्टच्या लॅबमध्ये)
निनाद लॅबच्या बाहेर उभा होता आणि त्या लहान खिडकीतून दोघे बोलत होते. निनादला येताना पाहून कैलासने आधी प्रमाणेच तत्परतेने सी.सी.टीव्ही आणि सिक्युरिटी बंद केली होती.

"कैलास! तिथे त्या रॉबर्टला भेटायला जी माणसं आली आहेत ती नक्कीच चिनी आहेत. ती त्या डायनासोरला स्वतः सोबत घेऊन चालली होती. तुला तर चांगलंच माहितेय ती लोकं आपल्या देशाला किती नुकसान पोहचवू शकतात. जर देशाला वाचवायचं असेल तर आम्हाला तुझी मदत लागेल. तुला याबद्दल जे माहितीये ते प्लीज लवकर सांग. तुझ्याकडे त्या डायनासोरचे सँपल असतील ना? तेही दे." निनादने घाईत त्याला सांगितलं.

"हो सर. मला माहितेय याची तीव्रता म्हणूनच मी माझ्यापरीने काही प्रयत्न करत होतो. रॉबर्ट इथे नसताना मी याचा अँटीडोट देखील बनवायला घेतला आहे. तो अर्ध्या प्रोसेसमध्ये आहे." कैलास म्हणाला.

"ग्रेट. अजून काही करता येईल? तुला रॉबर्टबद्दल अजून काही माहिती आहे का?" निनादने विचारलं.

"ते तर आता पटकन लक्षात येणार नाही. पण हा सर! या रॉबर्टने तर पुढच्या डायनासोरच्या पिढीची देखील सोय केलेली आहे." कैलास म्हणाला.

"म्हणजे?" निनादने विचारलं.

कैलासने लगेचच त्याला त्या रॉबर्टने केमिकल प्रोसेसने बनवलेल्या अंड्यांबद्दल सांगितले. त्याला जे काही आठवत होतं त्याबद्दल तो सगळं व्यवस्थित निनादला सांगत होता. त्यांचं बोलणं झालं आणि निनाद तिथून तो अँटीडोट घेऊन निघाला.

"सर एक मिनिटं!" कैलासने त्याला थाबवलं.

"काय झालं?" त्याने विचारलं.

"सर हा डायनासोर म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून ऋषभ आहे. खूप चांगला मुलगा आहे तो. त्याचे असे हाल आता बघवत नाहीत. प्लीज लवकरात लवकर काहीतरी करा." कैलास हात जोडून म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

निनादने त्याला डोळ्यांनीच आधार देऊन हो सांगितलं आणि तो तिथून निघाला. त्याच्या हातात देखील वेळ कमी होता. रॉबर्ट कोणत्याही क्षणी येऊ शकतो हे ओळखूनच तो तिथून निघाला होता.

'आत्ता कैलासने खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या सगळ्या प्रसंगात तो किती ठामपणे उभा होता. खरंच खूप काही डोकं चालवून त्याने इथवर सगळं आणलं आहे. बिचारा इतकी वर्ष तिथे अडकून तर पडलाच शिवाय त्या रॉबर्टचा जाच देखील सहन केला. कसं एवढं बळ त्याला मिळालं असेल देव जाणे.' निनाद मनातच विचार करत चालत होता.

आता ब्युरीमध्ये.... (वर्तमानकाळ)
निनादने सुयश सरांना जे काही लॅबमध्ये घडलं ते सगळंच सविस्तर सांगितलं.

"म्हणजे कैलासने त्याच्या परीने सगळे प्रयत्न केलेले आहेत. आता फक्त नियतीने तो अँटीडोट बरोबर बनवला की आपण ऋषभला वाचवू शकू. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या टीमला तिथून सोडवलं पाहिजे. एकदा आपली टीम तिथून सुटली की मग आपण आहोत आणि तो रॉबर्ट आहे." सुयश सर म्हणाले.

तोवर अभिषेक तिथे आला.

"सर मी सगळ्या एअरपोर्ट, बंदर आणि टोल नाक्यावर अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. पब्लिकमध्ये आत्ता काहीच कळायला नको म्हणून रूटीन चेक आहे असं सांगायला सांगितलं आहे." अभिषेक म्हणाला.

त्याचं हे बोलणं संपेपर्यंत दारात मीडिया हजर होतीच. काही कळायच्या आतच सगळे ब्यूरोमध्ये आले होते.

"आपण आत्ता सी.आय.डी. ब्यूरोमध्ये आहोत. तुम्ही बघू शकता की, इथे व्हाईट बोर्डवर काही मुद्दे नमूद केलेले आहेत. नक्कीच देशात काहीतरी भयंकर वादळ घोंघावत आहे. चला आपण सविस्तर जाणून घेऊया ए.सी.पी. सुयश सरांकडून." पत्रकार बोलत होत्या.

"मुळात तुम्ही सगळे आत आलाच कसे? अशी परवानगी नाहीये. तुम्ही आधी बाहेर थांबा." निनाद म्हणाला.

तरीही मीडिया बाहेर जायला तयार नव्हतीच. त्यात ब्यूरोमध्ये कोणीही लेडी इन्स्पेक्टर नसल्याने त्याचा फायदा त्या पत्रकार मॅडमना मिळत होता.

"आम्ही कोणीही इथून जाणार नाहीये. सर तुम्हाला आमच्यापासून काहीच लपवता येणार नाहीये. देशात नक्की कोणता कट रचला जातोय? या सरांना बँडेज का केलं आहे?" पुन्हा त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

"मॅडम प्लीज आम्ही आत्ता तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. प्लीज तुम्ही या." अभिषेक त्यांना समजावत म्हणाला.

"सर तुम्ही असा जनतेचा माहिती अधिकार काढून घेऊ शकत नाही. मीडिया जनतेचा आरसा आहे. आमचं कर्तव्य आहे सर सगळी माहिती जनतेपर्यंत घेऊन जायची आणि यात कोणीही अडथळा आणू शकत नाही." दुसरा पत्रकार म्हणाला.

"हे बघा आम्ही समजू शकतो पण ही योग्य वेळ नाही. सगळं काही जनतेला कळेल पण आत्ता नाही. प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या." सुयश सर म्हणाले.

तरीही मीडियाचा गोंधळ सुरूच होता. त्यांना माहिती हवीच होती आणि ते तिथून हटायला काही तयार नव्हते.

"एक मिनिट! बास झालं आता तुमचं. तुम्हा सर्वांना योग्यवेळी गोष्टी समजतील. आत्ता याक्षणी आम्हाला एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रश्नांना आम्ही आत्ता काहीच उत्तरं देऊ शकत नाही." सुयश सर थोडे चिडून म्हणाले.

"सर तुम्ही आमचा आवाज असा दाबू शकत नाही. खरंतर आता सी.आय.डी.वर विश्वास तरी किती ठेवायचा? हाच प्रश्न आहे." त्यातीलच एक पत्रकार म्हणाला आणि त्याच्या मोबाईलमधला एक व्हिडिओ चालू करून सुयश सरांना दाखवू लागला.

सुयश सर व्हिडिओ बघत होते. हा तोच व्हिडिओ होता जो सुयश सरांच्या फोनवर आला होता. सी.आय.डी. टीमला बांधून ठेवलेलाच तो व्हिडिओ होता.

"यावर तुम्हाला आता काय बोलायचं आहे? जिथे सी.आय.डी. स्वतःचं रक्षण करण्यासाठी कमी पडतेय तिथे सामान्य जनतेने कोणाकडे बघायचं?" त्याने विचारलं.

बाकी मीडियावाले आपापसात कुजबुजत होते. असं वाटत होतं की त्यांनीही तो व्हिडिओ पहिलाच नव्हता. मग प्रश्न असा होता की फक्त या एकाच पत्रकाराकडे हा व्हिडिओ आला कुठून?

"सगळ्यात आधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच कसा? दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही सगळे आहोत म्हणूनच जनता बिनधास्त आहे. इथे पुढच्या क्षणी आम्ही असू की नसू हे आम्हाला माहीत नसतं, जनतेसाठी आम्ही काम करतो आणि करत राहू याची जाणीव जनतेला आहे. जनतेचा आमच्यावर किती विश्वास आहे हे तुम्हाला कळेलच. आणि हा जो काही व्हिडिओ तुम्ही दाखवला आहे ना तो आधी खरा आहे की खोटा याची तरी पडताळणी करायची होती." सुयश सर म्हणाले.

त्यांच्या या बोलण्याने तो थोडा चक्रवलाच.

"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचं आहे मी मुद्दाम हे करतोय." तो म्हणाला.

"हो." सुयश सर म्हणाले.

"मग सिध्द करा." तोही गर्वाने म्हणाला.

"सिद्ध करण्याची काय गरज आहे? इथे सगळीच्या सगळी टीम तुमच्या समोर उभी आहे." विक्रम मागून म्हणाला.

त्याच्या आवाजाने त्याने वळुन पाहिले. सगळी टीम ब्यूरोमध्ये हजर होती. आता त्या पत्रकाराचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

"मग सर या व्हिडिओचा अर्थ काय आहे? यात ही शेपटी दिसतेय ती कोणत्या प्राण्याची आहे?" त्याने स्वतःचा मुद्दा उपस्थित केला.

"सर हा सगळा काय प्रकार आहे? हे प्रकरण नक्की काय आहे?" लेडी रिपोर्टरने विचारलं.

"मॅडम ते आम्ही तुम्हाला नंतर सगळं सविस्तर सांगूच. आत्ता आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकत नाहीये. तुम्ही समजून घ्या हा एक प्रोटोकॉल आहे." विक्रम म्हणाला.

"नाही सर असं होऊ शकत नाही. आता आम्हाला खरं काय ते कळायला हवं." पत्रकार म्हणाला.

"हो. हो. आम्हाला कळायला हवंय." सगळे एकदम म्हणाले.

क्रमशः.....
*******************************
कोण असेल हा माणूस ज्याच्याकडे सी.आय.डी.चा व्हिडीओ आला? विक्रम आणि बाकी टीम तिथून कशी सुटली असेल? पत्रकारांना सी.आय.डी. आता काय सांगेल? जनतेत डायनासोरबद्दल समजलं तर काय होईल? ऋषभला वाचवायला आता सी.आय.डी. काय करेल? जनतेची यावर कशी प्रतिक्रिया उमटेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all