द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -३)

Thriller Marathi Story.
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे जंगलात आता चांगलंच अंधारून आलं होतं. ती लोकं सी.आय.डी. टीम होती त्याच्या विरुध्द दिशेने डायनासोरला कंट्रोल करत घेऊन जात होते. रॉबर्ट तिथेच होता. त्याला त्याचा वाटा मिळाला होता आणि आता तो फक्त सगळा विध्वंस घडण्याची वाट बघत होता. सी.आय.डी. टीम त्या सगळ्यांच्या हालचालींवर व्यवस्थित लक्ष ठेवून होती.

"निनाद तू त्या लॅबजवळ जा. तिथे तो कैलास आहे त्याला याबद्दल सांग. जर त्याला खरंच आपली मदत करायची असेल तर माझ्या पेक्षा तोच याचा अँटीडोट लवकर बनवून देऊ शकतो. त्याने एवढी हिंमत केलीच आहे तर हेही काम तो नक्कीच करेल." डॉ. विजय हळू आवाजात म्हणाले.

"डॉक्टर बरोबर बोलतायत. त्याच्याकडे नक्कीच याचे सँपलसुद्धा असतील. लवकर जा. आणि हो पुन्हा इथे येत नको बसू. डायरेक्ट ब्युरोमध्ये जाऊन सुयश सरांना याबद्दल सगळी कल्पना दे. आपल्याला स्पेशल फोर्सची मदत लागू शकते." विक्रम म्हणाला.

लगेचच निनाद आजूबाजूच्या झाडांचा आडोसा घेत माघारी वळला. त्याला शक्य तितक्या लवकर लॅबमध्ये जाणं भाग होतं. रॉबर्ट आत्ता जरी इथेच असला तरीही तो पुन्हा लॅबमध्ये कोणत्याही क्षणी जाऊ शकतो याची सगळ्यांना खात्री होती. निनाद तिथून गेला होता. साधारण पाच मिनिटं झाली असावीत. आता तर जवळ जवळ पूर्णच अंधारून आलं होतं. रॉबर्ट पुन्हा माघारी जायला वळला होता. ज्यांनी डायनासोर स्वतः सोबत नेला आहे ते अचानक आहे त्याच जागी थांबले. त्यांच्या हातातल्या टॉर्चमुळे सी.आय.डी.च्या हे लक्षात आलं होतं.

"सर अचानक काय झालं असेल?" सोनाली हळूच म्हणाली.

कोणी काही बोलणार किंवा काही लक्षात येणार त्याच्या आधीच तो डायनासोर वाऱ्याच्या वेगाने मागे येऊ लागला. अंधारात त्याचे चमकणारे हिरवे डोळे अजूनच भयानक दिसत होते. नेमकी डायनासोरची दिशा आणि सी.आय.डी. लपून बसलेली दिशा एकच होती. आता काही खरं नाही असंच सगळ्यांना वाटत होतं. तो डायनासोर ज्या आवेशात तिथे आला होता हे पाहता आपण बहुदा आज शिकार होणारच असंच सगळ्यांना वाटत होतं. काही क्षण असेच गेले. अचानक किंचाळण्याच्या आवाजाने टीमने आजूबाजूला बघितलं. त्या डायनासोरने रॉबर्टलाच हातात उचलून धरलं होतं. सगळे आश्चर्याने बघत होते. रॉबर्ट जिवाच्या आकांताने ओरडत होता पण लगेचच त्या डायनासोरने त्याला खाली सोडलं. मागून त्याचा रिमोट कंट्रोल घेऊन ती लोकं पुन्हा तिथे आली.

"सॉरी. वी जस्ट चेकिंग." ते लोक हसत हसत म्हणाले.

अंधार असल्याने सी.आय.डी.ला त्यांचा कोणाचाही चेहरा नीट दिसत नव्हता. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि रॉबर्ट पुन्हा माघारी जाणार एवढ्यात त्याच लोकांनी त्याला थांबवलं. काही कळायच्या आतच त्या डायनासोरने सी.आय.डी. ज्या झाडांच्या आड लपली होती ती झाडं, झुडपे मुळासकट उखडून टाकली. आता तर दोन हात करण्याशिवाय पर्याय नव्हता.

"रॉबर्ट तू हे चांगलं केलं नाहीयेस." विक्रम म्हणाला आणि फायरिंग करणार एवढ्यात त्या डायनासोरने त्याच्या शेपटीने त्याच्या हातातली गन उडवून लावली. त्या धक्क्याने विक्रम देखील खाली पडला.

"सरऽ" ईशा काळजीने ओरडली.

सोनाली आणि ईशाची देखील गन अशीच पाडली आणि त्यामुळे कोणीच काहीच करू शकलं नाही. काही कळायच्या आत त्या सगळ्यांनी मिळून सी.आय.डी. टीमला एका झाडाला बांधलं.

"याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आपल्याच देशात राहून तू बाहेरच्यांना विकला गेलास काय?" विक्रम रागात रॉबर्टला म्हणाला.

"काय दिलंय मला या देशाने? आता माझं नाव होईल ते बघा. बघा हा माझा जगावेगळा प्रयोग.." रॉबर्ट गर्वाने म्हणाला.

तो अजून काही बोलायला जाणार एवढ्यात त्या लोकांनी त्याला बाजूला घेतलं आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं सुरु होतं.

"सर आता काय करायचं? आपल्या प्लॅनवर तर आता पाणी फिरेल." सोनाली म्हणाली.

"नाही. उलट आता खरी मजा येईल. मला माहित होतं असंच काहीतरी घडणार आहे." विक्रम हळू आवाजात म्हणाला.

"म्हणजे?" ईशाने गोंधळून विचारलं.

"नंतर सांगतो. आता मी सांगतो तसं करा. ऐका..." विक्रम म्हणाला आणि त्याने सगळ्यांना काहीतरी प्लॅन सांगितला.
**********************************
इथे लॅबमध्ये नियतीच्या टेस्ट पूर्ण झाल्या होत्या. त्या रामसिंगचा जीव कसा गेला असेल? याचा तिला पूर्ण अंदाज आला होता.

"नियती अगं लवकर सांग काय ते. आपल्याला अजून अँटीडोटवर पण काम करायचं आहे." सुयश सर म्हणाले.

"हो सर. हे बघा या माणसाचा मृत्यू या चीपमुळे झाला हे आपण शोधलं आहे पण सर हा मृत्यू याच्या इच्छेने आलेला नाही." नियती म्हणाली.

"म्हणजे?" अभिषेकने विचारलं.

"म्हणजे ही चीप कोणीतरी दुसऱ्याने ऑपरेट केल्याने याचा मृत्यू झाला." नियती म्हणाली.

"अगं नियती जरा समजेल असं सविस्तर सांग." सुयश सर म्हणाले.

"सांगते! सर बघा हा माणूस जेव्हा तुम्हाला सापडला तेव्हा नक्कीच हातापायी झाली असणार, याला तुम्ही प्रश्न विचारले असणार बरोबर?" नियती म्हणाली.

"हो. मी तर हा काहीच बोलत नव्हता म्हणून याला गाडीला बांधलं होतं आणि दरीत फेकण्याची धमकीसुद्धा दिली होती तरीही हा काहीच बोलायला तयार नव्हता. म्हणजे याच्यात एवढा कॉन्फिडन्स होता की अगदी जीव गेला तरीही त्याच्या तोंडून काहीच निघणार नाहीये." अभिषेक म्हणाला.

"बरोबर. तो कॉन्फिडन्स या चीपमुळेच होता. आपल्या शरीरात आपण घाबरलो किंवा आनंदी असू, दुःखी असू किंवा इतर कोणतीही भावना असो आपला मेंदू प्रत्येकवेळी एक रसायन सोडत असतो. ही चीप एका अश्या पद्धतीने डिझाईन केली गेली आहे जी असे रसायन डिटेक्ट करून मेसेज पाठवत राहते. मेसेज म्हणजे कदाचित हे लाईटच्या स्वरूपात असावेत किंवा बिपच्या स्वरूपात. ही चीप ज्याला सिग्नल पाठवत होती त्यानेच याचा शेवट केला आहे. खरंतर हे तंत्रच नवीन आहे. त्यामुळे नक्की हे कोणी बनवलं, कुठून ही चीप ऑपरेट झाली हे सांगणं सध्यातरी शक्य नाहीये." नियतीने सगळं सविस्तर सांगितलं.

"हीच डोकी चांगल्या कामासाठी लावली तर सगळेच आनंदात जगू! पण नाही! या लोकांना हे असलेच धंदे सुचणार." अभिषेक रागाने म्हणाला.

"हम्म. अभिषेक खरंतर ही टेक्नॉलॉजी खूप पुढची आहे. मला तरी असा पूर्ण डाऊट आहे की, ज्या लोकांना तो रॉबर्ट विकला गेला असेल त्यांचंच हे काम असावं." नियती म्हणाली.

"नियती बोलतेय त्यात पॉइंट आहे. हे सगळं करायला खर्च काही कमी नाही. चीप बनवण्यापासून ते ती शरीरात तेही हृदयाच्या जवळ फिट करणं म्हणजे जोखीम तर आहेच शिवाय फार आधी पासूनच केलेला प्लॅन आहे." सुयश सर म्हणाले.

"हो सर. मला तरी वाटतंय की जेव्हापासून हे डायनासोर प्रकरण सुरू झालं तेव्हापासूनच या सगळ्या तयारीला सुरुवात झाली असावी." अभिषेक म्हणाला.

"हम्म. बरं नियती गडबडीत अँटीडोटबद्दल बोलणं अर्धवटच राहिलं. काय प्रोग्रेस आहे?" सुयश सरांनी विचारलं.

"सर तेव्हा तर काहीच प्रोग्रेस नव्हती पण त्यानंतर मला सरांचा एक मेसेज आला. त्यात फॉर्म्युला आहे पण बहुदा नेटवर्क इश्यूमुळे त्यातला एकच फोटो माझ्यापर्यंत आला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्याकडे आता अर्धा फॉर्म्युला आहे." नियती म्हणाली.

"अगं मग आता लगेच कामाला लाग. काही नसण्यापेक्षा हे बरं ना?" सुयश सर म्हणाले.

त्यांना जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर देशाला या संकटातून वाचवायचं होतं. या रामसिंगच्या रूपाने त्यांनी याची तीव्रता आणि स्वरूप बघितलं होतंच म्हणूनच ते नियतीला सतत जितक्या लवकर होऊ शकतं तितक्या लवकर अँटीडोट बनव म्हणून सांगत होते. त्यांना देखील माहीत होतं हे काम सोपं नाही किंवा असं कर, कर म्हणून मागे लागलं की होणार देखील नाहीये तरीही देशाप्रती असलेली काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

"हो सर मी माझे पूर्ण प्रयत्न करतेय. अर्धा फॉर्म्युला मिळाला असला तरीही आपण त्याच्या आधाराने अगदी डोळेझाकपणे पुढे नाही जाऊ शकत कारण शेवटी कोणाच्यातरी जीवाचा प्रश्न आहे." नियती म्हणाली.

"हो नियती माहीत आहे. अॅक्च्युअली आय एम सॉरी. मलाही देशाची काळजी वाटतेय म्हणून..." सुयश सर बोलत होते पण त्यांना मध्येच तोडत नियती बोलू लागली; "सर मी समजू शकते. सॉरी नका म्हणू. उलट मी अजून जोमाने काम करेन. आपल्याला सगळ्यात महत्वाचा देश आहे."

एवढ्यात सुयश सरांचा फोन वाजला. निनादचा फोन आला होता.

"हॅलो निनाद कुठे आहात तुम्ही सगळे? सगळं ठीक आहे ना?" त्यांनी विचारलं.

"सर मी ब्यूरोमध्ये येऊन सगळं सविस्तर सांगतो. आत्ता मी रॉबर्टच्या लॅबमध्ये आहे. मी फॉर्म्युला आणि सोबत अर्धा प्रोसेस केलेला अँटीडोट घेऊन येतोय." तो म्हणाला.

"ओके. लवकर ये पण आपले बाकी टीम मेंबर्स कुठे आहेत? सगळे एकत्रच आहात ना?" सरांनी विचारलं.

"नाही सर. बाकीचे तिकडेच आहेत. मी आल्यावर बोलतो." निनाद म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

त्याच्या या बोलण्याने सुयश सरांना बाकीच्या टीमची काळजी वाटू लागली. सगळी टीम रक्ताच्या नात्याने बांधलेली नसली तरीही त्यांच्यात एका कुटुंबासारखं नातं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

"काय झालं सर?" अभिषेकने विचारलं.

"निनाद येतोय पण आपले बाकी मेंबर्स अजूनही जंगलात आहेत. आता तर एवढी रात्र झाली आहे." ते म्हणाले.

"काही नाही होणार सर त्यांना. विक्रम सर आहेत ना. हवंतर मी जाऊ का तिथे?" अभिषेक म्हणाला.

"नको. विक्रमचा जर काही प्लॅन असेल तर सगळं उलट व्हायचं." सर म्हणाले.

एवढ्यात सरांच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आले. सरांनी मोबाईल काढून बघितला तर प्रायव्हेट नंबरवरून एक एम.एम.एस. आला होता.

क्रमशः....
*********************************
विक्रमने काय प्लॅन केला असेल? निनाद आणि कैलासमध्ये काय बोलणं झालं असेल? सुयश सरांना कसला एम.एम.एस. आला असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all