द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -२७) अंतिम

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळेच अगदी मन लावून हे भाषण ऐकत होते.

"ज्या संकटाला आपण घाबरत होतो ते आता पूर्णपणे टळलं असं नाही म्हणणार पण आता काहीच धोका उरलेला नाही." पंतप्रधान म्हणाले.

तिथे उपस्थित सगळेच शांतपणे फक्त ऐकत होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला खास जयश्री मॅडम, कैलास, डॉ. विजय, नियती, सी.आय.डी. टीम आणि डॉ. नायर यांना बोलावलं होतं. या प्रकरणाची पुढची माहिती आता कैलास आणि डॉ. नायर देणार होते.

"आपल्याला वेळीच या संकटातून सी.आय.डी. तसेच बाकी सुरक्षा यंत्रणांनी वाचवलं असलं तरीही याची सुरुवात कैलासने केली. आता हा कैलास कोण? आणि त्याने एवढं काय केलं असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. कैलास हा रॉबर्टचा असिस्टंट. ज्याने हे दुष्टचक्र सुरू केलं त्याचा असिस्टंट. रॉबर्टने तर शत्रू देशाशी हातमिळवणी करून त्याचा डाव साधायचा प्रयत्न करत होता पण कैलाससारखे सतर्क नागरिक असल्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. कैलास त्या रॉबर्टच्या कचाट्यात इतकी वर्ष अडकून देखील जराही न घाबरता, जराही नैराश्य न येऊ देता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अँटीडोटवर काम करत राहिला. या त्याच्या शौऱ्यासाठी त्याला आपण नोबेल पारितोषिक जाहीर करतोय." पंतप्रधान म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सगळेच कैलासकडे कौतुकाने पाहत होते. सगळे कॅमेरे त्याच्याकडे वळले होते. त्याच्या चेहऱ्यावर मात्र फक्त एक शांत स्मित होतं. तो आता बोलायला उभा राहिला.

"सगळ्यात आधी मी माननीय पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो. नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून मी हे केलेलं नाही. हा पुरस्कार फक्त मलाच नाही तर माझ्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आपण सगळे आता सुरक्षित आहोत. सगळ्यांच्या अफाट कष्टाने आणि "त्याच्या" साथीने आपण वाचलो." कैलास देवाचे स्मरण करत म्हणाला.

एवढा मोठा पुरस्कार प्राप्त होऊनही त्याच्या चेहऱ्यावर जराही मी पणाची भावना नव्हती. जास्त उत्साह नव्हता तर उलट एक तृप्ती होती तीही त्याने केलेली मेहनत फळाला आली म्हणून.

"सर तुम्ही हे सगळं कसं केलं? ऋषभचं पुढे काय होणार आहे? तो पुन्हा माणूस बनला का?" पत्रकारांनी विचारलं.

"विशेष काही नाही. आपल्या समोर हे काहीतरी चुकीचं घडत आहे हे मला दिसत होतं. "त्याने" मला मार्ग दाखवला आणि मी त्याप्रमाणे करत गेलो. रॉबर्ट सर! हो मी त्यांना आत्ता सर म्हणेन कारण त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो पण फरक एवढाच त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर वाईट कामासाठी केला मी तसं केलं नाही. हे जे काही घडलं ती खूप मोठी प्रोसेस होती. असं म्हणतात काहीवेळा अज्ञानात सुख असतं. नक्की मी काय काय केलं हे न सांगण्याचा माझा फक्त हाच उद्देश आहे की, या माहितीचा वापर करून शत्रू देशाने आपल्यावर पलटवार करायला नको. राहिला प्रश्न ऋषभचा! तर ऋषभ आता बरा आहे. लवकरच तो माणसात येईल. अजूनही त्याच्या शरीराची रचना डायनासोरसारखी असली तरीही त्याच्यापासून कोणालाही धोका नाही. उलट मी तुम्हा सर्व जनतेला आवाहन करतोय, ऋषभसोबत आपण सगळेच जितके मिळून मिसळून वागू तो लवकर बरा होईल म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे की, ऋषभ आता त्याच्या आईसोबत त्याच्या घरी राहील. सगळ्या लोकांमध्ये अगदी नॉर्मल मुलासारखा मिसळेल. माझेही अजून काही प्रयोग सुरू आहेतच त्यामुळे तो अगदी पूर्ववत होईल." कैलास म्हणाला आणि त्याने त्याचं बोलणं थांबवलं.

त्याच्या या वक्तव्यानंतर न्यूज चॅनल वाल्यांनी लगेचच ऋषभला साथ देणार की नाही? यावर जनतेचा कौल घेतला आणि सकारात्मक रिझल्ट पाहून जयश्रीचं उर भरून आलं. तिला वाटणारी ऋषभची काळजी आणि समाज आता त्या दोघांना कोणत्या नजरेने बघेल ही भीती तिच्या मनातून आता पूर्णपणे गेली होती. सगळा कार्यक्रम संपला आणि सगळे फॉर्मालिटी पूर्ण करायला ब्यूरोमध्ये आले.

"थँक्यू सर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ही चौदा वर्ष जुनी केस ओपन केलीत म्हणून आज मला माझा मुलगा परत मिळतोय." जयश्री मनापासून आभार मानत म्हणाली.

"ते आमचं कर्तव्यच होतं. तुम्हाला आभार मानायचे असतील तर कैलास आणि पूजाचे माना. पूजाने वेळीच आपल्याला शत्रू देशाचे डाव सांगितले त्यामुळे ऋषभ सोबत आपला देशही वाचला आहे." सुयश सर म्हणाले.

जयश्रीने पुन्हा पुन्हा सगळ्यांचे आभार मानले.

"मॅडम तुम्ही आभार मानू नका. मी हे काम केल्यामुळे आज माझ्या पणजोबांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल." पूजा म्हणाली.

सगळेच आता ऋषभची वाट बघत होते. जयश्रीला कधी एकदा आपल्या मुलाला बघते असं झालं होतं. ती याच विचारात राहिलेल्या फॉर्मेलिटी पूर्ण करत होती. तोवर गणेश आणि डॉ. नायर ऋषभला घेऊन आले. तो अजूनही डायनासोर रुपात असला तरी आता त्याचं ते रूप सौम्य वाटत होतं. डोळे माणसाच्या डोळ्यासारखे झाले होते आणि त्यात प्रेम आणि निरागसता दिसत होती.

"मॅडम तुम्ही ऋषभला घरी घेऊन जाऊ शकता. त्याच्याशी आपण लहान मुलांशी जसे वागतो, बोलतो तसेच वागा. त्याला पूर्ण बरं व्हायला अंदाजे पाच ते सात वर्ष तरी लागतील पण तो पूर्ण बरा नक्कीच होईल. त्याच्या मेंदूने आता काही जुन्या आठवणी पुन्हा जागृत करायला सुरुवात केली आहे. या गेल्या काही वर्षात मी त्याचं निरीक्षण केलं आहे. त्याच्या नखांची वाढ खुंटली आहे. त्याचे डोळेही बघा माणसाच्या डोळ्यांसारखे झाले आहेत. या सगळ्या गोष्टी तो आता पुन्हा माणूस होऊ शकतो याचे संकेत देतायत. फक्त... फक्त... मॅडम ऋषभ आत्ता तेवीस ते चोवीस वर्षांचा असायला हवा होता तेवढी समज त्याला येणार नाही. शेवटी त्याच्या मानवी मेंदूची वाढ तिथेच खुंटली गेली आहे. जिथून त्याचा हा प्रवास सुरू झाला त्याच वयात तो पुढचं आयुष्य जगेल." कैलास म्हणाला.

"चालेल. माझा मुलगा मला परत मिळाला हेच खूप आहे. लोक आयुष्यभर पुन्हा लहान होता आलं तर? असा विचार करतात पण माझ्या मुलाला पुन्हा लहान व्हायची संधी मिळाली आहे. तो त्यातूनही बरा होईल याची मला खात्री आहे." जयश्री डोळे पुसत म्हणाली.

"हो काकू! मी पण येत जाईन ना ऋषभ सोबत खेळायला अगदी पूर्वीसारखाच." साहिल त्याचा मित्र आत येत म्हणाला.

त्याला पाहून ऋषभने त्याच्याकडे झेप घेतली. त्याला मिठी मारून त्याने त्याच्या डोक्याला पंजाने कुरवाळलं आणि तो छान हसला. साहिलमध्ये बरेच बदल झालेले असले तरीही तो ऋषभचा बेस्ट फ्रेंड होता त्यामुळे त्याच्या रुपापेक्षा त्याच्या भावनेनेच त्याने त्याला ओळखलं होतं.

"थँक्यू कैलास. जर ऋषभ पुढच्या काही वर्षात पूर्णपणे पूर्ववत झाला तर त्याला मी तुझाच असिस्टंट होण्याचा सल्ला देणार. माझ्या मुलाला मोठा वैज्ञानिक करण्याची जबाबदारी तुझ्यावर." जयश्री दाटलेल्या कंठाने म्हणाली.

सगळ्यांसाठीच हा क्षण खूप भावूक होता. ऋषभ अजूनही प्राणी असल्याने त्याला स्पर्श, बोलण्याची भावना आणि त्यातली आपुलकी कळत होती. थोडावेळ ऋषभला काही गोष्टी सांगून, त्याला कोणाला त्रास नाही द्यायचा हे समजावून सांगून झाल्यावर जयश्री आणि ऋषभ निघाले.

"सर मला रॉबर्टला भेटायचं आहे." कैलास म्हणाला.

"ठीक आहे. तसंही त्याची कस्टडी आता वरच्या लेव्हलवर जाणार आहे. आजच्या दिवसच तो तुला इथे भेटेल. पुन्हा त्याला कोणालाही भेटायची परवानगी नसेल." सुयश सर म्हणाले.

कैलास लगेचच त्याला भेटायला गेला.

"रॉबर्ट सर! सॉरी सॉरी रॉबर्ट! तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही स्वार्थासाठी हे करताय ते फळेल? अहो अजूनही आपल्या देशात चांगुलपणा शिल्लक आहे. तुम्ही ज्या देशाची यात मदत केली त्याने तर स्वतःची कातडी वाचवली. आता तुम्हीच अडकला आहात. अजूनही वेळ गेली नाही. जे काही घडलं ते खरं सांगून सगळे पुरावे कोर्टात सादर करा." कैलास म्हणाला.

"माझ्याकडे कोणतेच पुरावे नाहीत. मी इथे अडकलो म्हणजे बाहेर सगळं शांत होईल असं वाटलं का तुला? तू विसरत असशील मी डायनासोरची फौज उभी करणार होतो. त्यातल्या एका डायनासोरला बरं करून काय होणार आहे? लवकरच पूर्ण फौज तुला दिसेलच आणि तू काहीच करू शकणार नाहीस." रॉबर्ट अजूनही गर्वाने म्हणाला.

"तेही बघून घेऊ आम्ही. अजूनही वाईटाचा विनाश करायला तो सहाय्य करतोच. मला चांगलंच कळतंय तुम्ही त्या केमिकल प्रोसेसने बनवलेल्या अंड्यांबद्दल बोलत आहात. आत्ता जरी आम्हाला त्याबद्दल काही समजलं नसलं ना तरी त्यावर योग्य प्रक्रिया झाल्याशिवाय त्याचं काहीच होऊ शकत नाही हे मला चांगलंच माहीत आहे. त्यात ती केमिकलची असल्याने त्यांची किती काळजी घ्यावी लागते हेही मला माहित आहे. तुम्ही तर इथे अडकला आहात मग कोण करणार त्यावर प्रक्रिया? ती अंडी एव्हाना सडून देखील गेली असतील." कैलास म्हणाला आणि बाहेर आला.

"सर! आत्ता रॉबर्ट सोबत बोलणं झालं तेव्हा लक्षात आलं त्याने प्रोसेस करायला घेतलेल्या अंड्यांचं तुम्हाला काही समजलं का?" कैलासने विचारलं.

"नाही. ती एक टांगती तलवार आहेच." सुयश सर म्हणाले.

"तेच सांगतोय त्याची काळजी करू नका. मी माझ्यापरीने त्याचा शोध घेतो. माझ्या मते तरी एव्हाना ती अंडी सडून गेली असतील. केमिकलची असल्याने त्याची जास्त काळजी घेणं भाग होतं त्यामुळे काळजी नसावी." कैलास म्हणाला.

"ठीक आहे. आम्हीही आमच्या परीने शोध घेऊच. आता हे प्रकरण वरच्या लेव्हलवर जाईल तेव्हा रॉबर्टच कबुली देईल." सुयश सर म्हणाले.

"ठीक आहे. आता येतो. इतकी वर्ष देवळात जाता आलं नाही त्याचे आभार मानायलाच हवेत. आज फक्त आणि फक्त त्याच्यामुळे मी वाचलो नाहीतर मला कधीच नैराश्य आलं असतं." कैलास म्हणाला आणि तिथून निघाला देखील.

"सर मला एक विचारायचं होतं." पूजा म्हणाली.

"बोल ना." सुयश सर म्हणाले.

"आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे तो गुप्त रस्ता कसा होता? तुम्ही सगळा प्लॅन आधीच कसा बनवला होता?" पूजाने विचारलं.

"केसचा तपास करताना आमच्या हाती काही बातम्या लागल्या होत्या. त्या गुप्त रस्त्याचं म्हणशील तर ते हॉटेल दिसताना लहान दिसत असलं तरीही तिथे गैरव्यवहार चालायचे हे आम्ही शोधून काढलं होतं आणि त्या बळावरच त्या हॉटेल मालकाला आधीच धाकात घेतलं होतं." विक्रम म्हणाला.

"अच्छा. पण पुन्हा एकदा थँक्यू सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्या देशाची रहिवासी असूनही मला इथे मानानेच वागणूक मिळाली शिवाय माझी ओळखही कुठे येऊ दिली नाहीत." पूजा म्हणाली.

"तुझ्या सुरक्षेसाठी ते गरजेचं होतंच. असो! तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तू आता पुन्हा भारतीयच झाली आहेस." सुयश सर म्हणाले.

"म्हणजे?" पूजाने गोंधळून विचारलं.

"म्हणजे तुला आम्ही आमच्या रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी देतोय." डॉ. नायर म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने पूजा देखील खुश झाली. तीही आता पुन्हा भारतीय म्हणून जगणार होती.

समाप्त.
*************************
तुम्हा सर्व वाचकांचे मनापासून आभार. तुम्ही या वेगळ्या विषयाच्या कथेला देखील छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवाय या दुसऱ्या पर्वासाठी तुम्ही एवढी वाट बघितली त्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एखाद्या नवीन विषया सोबत. तोवर ही "द डी.एन्.ए." ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all