द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -२६)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे ऋषभला बरं करण्यासाठी तिघे खूप प्रयत्न करत होते. त्यात नियतीला ऋषभने ईजा केलेली त्याचा परिणाम होऊ नये म्हणून रोज एक इंजेक्शन घ्यावं लागत होतं त्याचे डोस देखील बनवावे लागत होते. कैलास एका अंतिम चाचणीवर काम करत होता ती झाल्यावर त्यांचं बरंच काम हलकं होणार होतं.

"सर! इतके तास आपण जे प्रयत्न केले त्याला यश आलं." कैलास आनंदात म्हणाला.

डॉ. नायर, डॉ. विजय आणि नियती लगेच त्याच्या जवळ गेले. कैलासने पुन्हा बोलायला सुरुवात केली; "मी ऋषभला आत्तापर्यंत जे काही डोस दिलेत त्यामुळे याची पुढची वाढ खुंटली आहे आणि तो पुन्हा माणूस होऊ शकतो याच्या शक्यता वाढल्या आहेत."

"दॅट्स ग्रेट." डॉ. नायर म्हणाले.

"एवढंच नाही तर नियती मॅडमना सुद्धा आता हे इंजेक्शन रोज घ्यायची गरज नाही. दोन दिवसातून एकदा हा डोस त्यांच्या शरीरात गेला पाहिजे एवढंच. एकदा त्यावरचा अँटीडोट बनला की त्याचीही गरज उरणार नाही." कैलास म्हणाला.

"अरे वा! याचाच अर्थ आपल्याला वाटत होता तेवढा गंभीर परिणाम ऋषभमुळे झाला नसता." डॉ. विजय म्हणाले.

"हो! तरीही आपण हे विसरून चालणार नाहीये की, ऋषभ एक प्राणी आहे आणि त्यामुळेच तो अचानक आक्रमक होऊ शकतो. ती एक काळजी आपल्याला घ्यावीच लागेल." कैलास म्हणाला.

"हम्म. आता मी ही एवढी चांगली बातमी लगेच ए.सी.पी. सरांना फोन करून सांगतो. जयश्री मॅडमना एकदा हे समजलं की त्याही खुश होतील." डॉ. विजय म्हणाले.

त्यांनी लगेचच ए.सी.पी. सरांना फोन लावला आणि सगळं सांगितलं. त्यांनी देखील या दरम्यानच्या काळात जे काही घडलं आहे ते त्यांना सांगितलं. त्यांचं बोलणं झालं आणि डॉ. विजय थोडे गंभीर झाले होते.

"काय झालं सर?" कैलासने विचारलं.

त्यांनी लगेचच जे काही घडून गेलं आहे ते बाकी सगळ्यांना सांगितलं.

"सर! रॉबर्ट विरोधात काही पुरावे आमच्या ऑफिसमधून मिळतील. या प्रोजेक्टला रद्द केलं होतं त्याच्या कॉपी आणि अशी बरीच कागदपत्र तिथे उपलब्ध होतील. अर्थात हे पुरावे काही त्याला पूर्णपणे दोषी सिद्ध करायला पुरेसे नसतील पण नक्कीच त्याची काहीतरी मदत होईल." डॉ. नायर म्हणाले.

"ओके. आपलं इथलं काम झाल्यावर तुम्ही ऑफिसर्सना याबद्दल सांगा." डॉ. विजय म्हणाले.

"सर! मगाशी तुम्ही जे फोटो दाखवले होते त्याच्याशी मिळते जुळते कागद माझ्याकडे आहेत. आय मीन ते रॉबर्ट सरांचे होते मी घेऊन आलोय." कैलास म्हणाला आणि त्याने ते सगळे कागदपत्र त्यांना दाखवले.

"यातले अर्धे ऋषभच्या घरी सापडलेत." डॉ. विजय म्हणाले.

"कैलास मला एक सांग हा सगळा फंड रॉबर्ट कसा घेत होता? म्हणजे एवढी मोठी किंमत बँक खात्यात घेतली तर त्यात दिसून येण्याची रिस्क होती. तुला याबद्दल काही माहिती आहे का?" डॉ. विजयनी विचारलं.

कैलास डॉ. विजय जे म्हणाले होते त्यावर विचार करत होता. रॉबर्ट जेव्हाही बाहेरून जाऊन यायचा तेव्हा नक्की काही वेगळं घडलेलं असायचं का? हा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता.

"सर एक गोष्ट आठवली. रॉबर्ट कधीही पैसे वैगरे घेऊन यायचा नाही. बहुतेक ते लोक फंडच्या रुपात त्याला हवे असलेले सामान देत असावेत. कारण दरवेळी तो मीटिंग करून आला की त्याच्याकडे जे काही पुढे लागणार असेल ते आलेलं असायचं." कैलास म्हणाला.

"ओके. त्या लोकांनी खरंतर मागे काही राहणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली आहे." डॉ. विजय म्हणाले.

"अरे हो! एक सांगायचं राहिलं. रॉबर्टने त्या प्रयोग शाळेत डायनासोरच्या अंड्यावर देखील प्रक्रिया करायला ठेवली होती त्यातही मी नंतर फेरफार केले होते पण जेव्हा रॉबर्ट तिथे शेवटचा आला तेव्हा त्याच्या काही सामाना बरोबर ती अंडीही घेऊन गेला." कैलास म्हणाला.

"कसली अंडी?" नियतीने विचारलं.

"डायनासोरची." कैलास म्हणाला.

"पण हे कसं शक्य आहे? या प्रयोगाला जेव्हा बॅन केलं गेलं तेव्हा तर एका म्युझियममध्ये अंडी जप्त करून ठेवण्यात आली होती." डॉ. नायर म्हणाले.

"हो बरोबर आहे. रॉबर्टने केमिकल प्रोसेस करून लॅबमध्ये असलेली अंडी बनवली होती." कैलास म्हणाला.

"रॉबर्टला जेव्हा पकडलं तेव्हा त्याच्याकडे हे काही सापडलं नसावं नाहीतर सी.आय.डी. टीमने आपल्याला याबद्दल माहिती दिली असती. नक्कीच ती अंडी त्या लोकांना सापडली असणार." डॉ. विजय म्हणाले.

"किंवा रॉबर्टने कुठेतरी दुसरीकडे लपवली असू शकतात कारण जर त्या लोकांनी रॉबर्टचा काटा काढायचं ठरवलं तर तो त्याचा वापर करणार होता. त्या लोकांना याने खोटी माहिती दिली होती." कैलास म्हणाला.

"ठीक आहे. मी ऑफिसर्सना तशी कल्पना देऊन ठेवतो. सध्या आपण फक्त आपलं काम करू शकतो." डॉ. विजय म्हणाले.

त्यांनी लगेचच टीमला याबद्दल सांगितलं आणि सगळेच आपापल्या कामाला लागले. ही केस सोडवता सोडवता यातला गुंता अजूनच वाढला होता. देशाच्या सगळ्याच सुरक्षा यंत्रणा यात आपापले योगदान देत होत्या. सी.आय.डी.ने त्यांना असलेला रॉबर्ट बद्दलचा संशय वरच्या लेव्हलवर कळवला होता आणि त्याचा उपयोग डायरेक्ट कोर्टात करून घ्यायचा हेही ठरलं होतं. दरम्यानच्या काळात नागरिक देखील या सगळ्याची जाण ठेवून या यंत्रणांना साथ देत होते. ही केस लोकांसमोर उघड झाल्यापासून सगळेच जबाबदार नागरिक जसा वागेल तसेच वागत होते. या काळात इतर धार्मिक वाद, दंगा या केस अगदी नगण्यच होत्या. या साऱ्याच कौतुक सरकारला देखील होतं. फक्त या बातमीमुळे शत्रू देश अस्वस्थ होत होता. त्या लोकांना वाटलं होतं; ज्या दिवशी एवढं मोठं संकट भारतावर आलं आहे हे इथल्या जनतेला समजेल त्या दिवशी इथे खूप मोठ्या दंगली होतील, सरकार विरुद्ध लोक बंड करतील आणि असंतोष निर्माण होऊन आपलं काम सोपं होईल. पण शत्रू देशाच्या दुर्दैवाने असं काहीच झालं नाही. असेच दिवस पुढे सरकत होते. शत्रू देश अजूनही स्वतःचा वाईट हेतू साध्य करण्यासाठी, विस्तारवादी धोरण भारताला स्वीकारायला लावण्यासाठी जमेल तितके प्रयत्न चांगला मुखवटा घालून करत होता पण त्याचा भारतावर काहीच परिणाम होत नव्हता. कधी कधी अती घाई त्यांच्या विरोधातले पुरावे मिळवून देत होते पण याची जाणीव होताच त्या देशाची लगेच त्यावर सारवा सारव होत होती पण आपल्या देशासाठी जे महत्त्वाचे मुद्दे होते ते सर्व संग्रहित करून ठेवण्यात येत होते. अशीच अडीच वर्ष निघून गेली.

अडीच वर्षानंतर.....

या प्रकरणाला आता एवढा काळ लोटला होता. आता तरी भारतीय जनता सरकार विरोधात नाराजीचे सूर काढेल अशी शत्रू देशाची आशा होती आणि म्हणूनच अप्रत्यक्षपणे भारतात असंतोष निर्माण करण्याचं काम तो करत होता. भारतीय मात्र एकदम शांत होते. येत्या चार दिवसात स्वातंत्र्य दिन होता आणि त्याच मुहूर्तावर सरकार काहीतरी मोठी घोषणा करणार आहे अशी सूचना करण्यात आली. शत्रू देश तर नक्की काय असेल? याच विचारात होता. अखेर स्वातंत्र्य दिनाचा पवित्र दिवस आला. सगळ्या देशात उत्साहाच वातावरण होतं. सगळीकडे झेंडावंदन झालं होतं. या खास दिवशी घोषणा म्हणजे नक्कीच चांगली बातमी असणार हे प्रत्येकाला माहीत होतं. सगळेच टीव्ही समोर बसले होते. पंतप्रधान भाषण करण्यासाठी आले.

"गेल्या काही वर्षांपासून आपण सगळेच खूप मोठ्या संकटाला तोंड देतोय. तुम्हा सर्व देशवासीयांच्या सहकार्याशिवाय आपण इथवर आलो नसतो. आज याचा शेवट होईल." पंतप्रधान म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने तिथे उपस्थित सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. लोक आपापल्या घरातही टाळ्या वाजवत होते.

क्रमशः....
*****************************
ऋषभ आता कसा दिसत असेल? तो कितपत बरा झालेला असेल? रॉबर्टने प्रोसेस करायला ठेवलेल्या अंड्यांचे काय होणार? कैलासने त्याचा विचार केला असेल का? पूजा पुन्हा तिच्या कर्मभूमीत गेली तर तिला तिथे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all