द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -२५)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रॉबर्टच्या बोलण्याने जयश्री खरंतर आतून खूप हादरून गेली होती. हा प्लॅन कितपत काम करणार आहे याबद्दल ती जरा साशंकच होती.

"मला तुमच्या विरोधात बरेच पुरावे मिळालेत." जयश्री हिंमत करून मोठ्याने म्हणाली.

आडव्या पडलेल्या रॉबर्टने फक्त डोळे उघडून बघितलं आणि हसून पुन्हा डोळे मिटले.

"मला ती डायरी सापडली आहे ज्यात ऋषभच्या बाबांनी आणि तुम्ही मिळून अभ्यास केला आहे. तुम्हाला एवढा गर्व वाटतोय ना तुमच्या शिवाय कोणीच माझ्या ऋषभला बरं करू शकणार नाही? तर ऐका! अँटीडोट बनला आहे आणि ऋषभ उद्याच सुखरूप घरी येतोय." जयश्री म्हणाली.

तिच्या या बोलण्याने तो ताडकन उठून बसला.

"ऐकून धक्का बसला ना? कसं आहे ना जगात कोणाचं कोणाही वाचून अडत नसतं. आता मला फक्त एकच गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे, तुम्ही माझ्या ऋषभलाच का वेठीला धरलं?" जयश्री रागाने म्हणाली.

"हे सगळं वदवून घ्यायला आणि माझ्या सोबत नक्की कोण कोण होतं, आम्ही नक्की काय काय केलं हे जाणून घ्यायला तुम्ही सगळे काहीही सांगाल आणि मी विश्वास ठेवेन असं वाटलं ना तुम्हाला? हा.. हा.. हा..." रॉबर्ट हसत हसत म्हणाला.

"जे खरं आहे ते सांगितलं. बाकी तुमची मर्जी! तुम्ही काही बोलला नाहीत तरीही माझा ऋषभ परत येतोय. आज ना उद्या त्याला आठवेलच नक्की काय काय घडत होतं ते." जयश्री रागाने म्हणाली आणि परत जायला वळली.

"हे शक्यच नाहीये. मला तुम्ही सगळे फक्त सत्य जाणून घेण्यासाठी खोटं सांगताय हे काय कळत नाही का!" रॉबर्ट मोठ्याने म्हणाला.

सगळे त्याचं काही ऐकून न घेता बाहेर आले. रॉबर्ट मात्र स्वतःच्याच मनात विचार करत होता.

'खरंच असं असेल का? या लोकांनी त्या डायरीवरून अँटीडोट बनवला असेल? छे! असं कसं शक्य आहे? मी काय एवढी वर्ष दाढ्या करायचं काम नाही केलं. हे काही एवढं सोपं काम नाहीये. मला उगाच काहीही सांगून माझ्याकडून माहिती काढून घ्यायचा प्लॅन असणार हा नक्कीच. मी का विचार करतोय पण? जाऊदे! मी काही यांच्या नाटकाला बळी पडणार नाही.' तो मनात म्हणाला.

वरवर त्याने कितीही दाखवलं तो एकदम शांत असला तरीही त्याच्या मनात काहूर उठलं होतं. त्याचा प्रयोग असा दुसराच व्यक्ती कसा काय फिस्कटेल हाच विचार त्याला सतावत होता आणि त्याचा गर्व त्याला हे कबूलही करून देत नव्हता.

"सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे केलं. पण सर नक्की माझा ऋषभ बरा होईल ना? कुठे ठेवलं आहे त्याला? कधी येईल घरी तो?" जयश्रीने रडत रडत विचारलं.

"शांत व्हा मॅडम. ऋषभ सुखरूप आहे. लवकरच तो बरा होईल. आमचे प्रयत्न सुरू आहेत." सुयश सर म्हणाले.

तिने डोळे पुसले आणि पाणी पिलं.

"अभिषेक! जा मॅडम ना पुन्हा घरी सोडून ये." सुयश सर म्हणाले.

अभिषेक तिला घरी सोडायला निघाला.

"सर या सगळ्याचा रॉबर्टवर काही परिणाम झालेला दिसत नाहीये." विक्रम म्हणाला.

"आपल्याला त्याच्यावरचा परिणाम नाही बघायचाय. त्या लोकांच्या पुढच्या हालचाली बघायच्यात." सुयश सर म्हणाले.

"सर हे बघा बातम्यांमध्ये काय येतंय." गणेश टीव्ही लावून म्हणाला.

प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर शत्रू देशाने त्यांचे प्रमुख गायब झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती त्याबद्दलच सगळ्या चॅनलमध्ये दाखवत होते. त्याला बराच वेळ होऊन गेला होता आणि आता त्या बातम्यांनी वेगळंच वळण घेतलं होतं.

"स्वतःचा बचाव करण्यासाठी आता खालच्या लोकांच्या डोक्यावर उभे राहणार हे लोक." सुयश सर म्हणाले.

बातम्यांमध्ये थोड्याच वेळात खरे प्रमुख जनतेच्या समोर येणार असल्याच्या बातम्या गाजत होत्या. या बातमीमुळे जागतिक पातळीवर मोठी खळबळ माजली होती.

"खरे? नक्की यांना खरा चेहरा दाखवणार आहेत असं म्हणायचं असावं." विक्रम म्हणाला.

काही वेळातच प्रमुख सर्वांच्यासमोर आले. त्यांच्या अंगावर खरचटलेल्या खुणा होत्या शिवाय डोक्याला देखील एक पट्टी लावली होती. त्यांच्या या अश्या अवस्थेमुळे अजूनच लोकांचा गोंधळ होत होता. इंग्लिशमध्ये त्यांचं भाषण सुरू झालं.

"तुम्ही सगळे या बातमीमुळे गोंधळलेले असाल पण तुमचा गोंधळ आता लवकरच दूर होईल. त्यात मगाशी मी व्यवस्थित होतो आणि आता हे काय सगळं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. लवकरच सगळं समजेल." ते म्हणाले आणि काही वेळ गप्प बसले.

ते काहीच बोलत नाहीयेत हे बघून तिथल्या पत्रकारांना देखील प्रश्न पडत होते पण कोणी काही बोलत नव्हतं. एवढ्यात तिथले पोलीस एका माणसाच्या तोंडावर काळा रुमाल टाकून त्याला तिथे घेऊन आले.

"खरंतर मी गेल्या आठ दिवसांपासून इथे नव्हतोच. मला एका बंदिस्त खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं." ते म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने तर अजूनच खळबळ उडाली.

"तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेलच एवढी टाईट सिक्युरिटी असताना हे कसं शक्य आहे? तर याला कारणीभूत हा माणूस आहे!" त्यांनी त्या पकडून आणलेल्या माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून रुमाल बाजूला केला. त्याचा चेहरा बघून सगळेच एकदम चकित झाले. कारण तो माणूस एकदम हुबेहूब प्रमुखांसारखाच दिसत होता.

"हा खूप मोठा कट होता. मला मारून टाकण्याचा प्लॅन जवळ जवळ पूर्णत्वाला जाणार होता पण मी वाचलो. ऑपोझिट पार्टीचं हे कारस्थान वेळीच आपल्या बहादुर सैन्याने ओळखून त्याला सुरुंग लावला म्हणून मी आज इथे आहे. माझ्यासोबत देशातील काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील अडकले होते तेही आता सुखरूप आहेत." ते म्हणाले.

"सर हे सगळं किती खोटं वाटतंय. असं कसं होईल?" ईशा म्हणाली.

"थांब थांब बघूया तरी अजून कितपत खोटं बोलता येतंय यांना." सुयश सर म्हणाले आणि सगळे पुन्हा टीव्ही बघू लागले.

"मला सगळं समजलं आहे. दरम्यानच्या काळात आपल्या शेजारील देश भारत किती मोठ्या संकटात सापडला आहे हेही माहीत आहे. शेजारच्या काही देशांमध्ये असले प्रयोग होणार आहेत याबद्दल आम्हाला खबर मिळाली होती आणि त्याची शहानिशा आम्ही स्वतः करत असताना आमच्या सोबत हे घडलं. याबद्दलची बरीच माहिती आता आमच्या रिसर्च डिपार्टमेंटला आहे. आम्ही भारताला शत्रू मानत नाही. मला येऊन जेमतेम दोन तास झालेत पण मी सगळं समजून घेतलं आहे. या खोट्या प्रमुखांनी भारताबरोबर डील करण्याचे प्लॅन देखील मला समजले आहेत. आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू यासाठी कोणत्याही डीलची आवश्यकता नाही." ते म्हणाले.

"सरडा रंग बदलायला लागला सर." गणेश म्हणाला.

"मी आजच भारताच्या पंतप्रधानांना फोन करून त्यांच्याशी बोलून घेतोय. हे संकट फक्त भारतापुरतं नसून संपूर्ण जगावर आलेलं संकट आहे. या सगळ्या प्रकरणाच्या तळाशी आमचं सैन्य जातच आहे. लवकरच याचा निकाल लागेल. आम्हाला कल्पना आहे हा रिसर्च कश्या पद्धतीने पार पाडला गेला आहे त्यामुळे याचा उपायही आमच्याकडे मिळेलच. आता या वाक्याने पुन्हा काही गैरसमज होऊ नयेत म्हणून एक गोष्ट स्पष्ट करायची आहे; आमचा देश विकसित आहे आणि उद्या जी संकटं येऊ शकतात त्यावर आमचं काम आधीपासून सुरू असतं त्यामुळे आम्हाला हे माहीत आहे. गैरसमज नसावा. सगळ्या जगाला आमची ताकद आणि वैज्ञानिक प्रगती माहीत आहे त्यामुळे आता सगळ्यांच्या शंका दूर झाल्या असतील अशी आशा आहे. भारत देखील यावरचा उपाय शोधत आहे तर मिळून काम करून लवकर हे संकट दूर करुया. थँक्यू." त्यांनी भाषण संपवलं.

गणेशने टीव्ही बंद केला.

"सर हे सगळे प्रयत्न फक्त आणि फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची प्रतिमा निर्मळ करता यावी आणि आपल्याकडे जे पुरावे आहेत ते कसे त्या खोट्या माणसाच्या विरोधातले आहेत हे सिद्ध करण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे आणि हे जे काही उपयाबद्दल बोलणं झालं त्यावरून तरी तुमचा संशय खरा असावा असं वाटतंय." सुशांत म्हणाला.

"हो रे. या माणसाची ताकद फक्त आणि फक्त त्याची विकत घेतलेली माणसं हीच आहे. एकदा आपण ती माणसं फोडली की झालं." विक्रम म्हणाला.

"हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये. सध्या आपल्या हातात फक्त आपल्या देशाची रक्षा करणं, ऋषभला बरं करणं आणि पुन्हा असं काही होऊ नये म्हणून प्रयत्नशील राहणं एवढंच आहे. पुढे ही केस आपल्या हातात नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा शोध घेतला जाईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच आरोपींना शिक्षा होईल. आपण पुढे याबद्दलची कल्पना देऊच. आत्ता जर काही करायला गेलो तर नंतर घोळ नको." सुयश सर म्हणाले.

"हम्म. आपल्या हातात ही केस नसेल. आपण फक्त आपल्याकडे असलेली माहिती, पुरावे पुढे पाठवण्याचे काम करू शकतो. सर! पुराव्यावरून लक्षात आलं, तुम्ही म्हणताय तशी चीप जर रॉबर्टकडे असेल तर त्यालाही याबद्दलची कल्पना नसावी. जर त्याला याबद्दल माहिती असती तर त्याने काहीही बोलताना किंवा वागताना दहा वेळा विचार केला असता." सुशांत म्हणाला.

"बरोबर आहे सर. आपल्याला तो रामसिंग भेटलेला आठवतोय? त्याचा जसा दुर्दैवी अंत झाला तसा एव्हाना रॉबर्टचा व्हायला हवा होता. नक्कीच चीप असेल तर वेगळ्या पद्धतीची असेल." अभिषेक म्हणाला.

"हम्म. ते आता त्याची कस्टडी बदलेल तेव्हा मेडिकल चेकप मध्ये समजेलच. आपलं काम तर झालंय." सुयश सर म्हणाले.

क्रमशः.....
*******************************
केसला आता कसं वळण मिळेल? रॉबर्टने एवढं सगळं कसं जमवून आणलं असेल? ऋषभला बरं व्हायला आता किती वेळ लागणार असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all