द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -२३)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सर बाहेर आले तेव्हा सगळे आपापसात कुजबुजत होते. मागच्यावेळी डी.सी.पी. सरांनी काहीच माहिती दिली नव्हती आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स बोलावून सगळं सांगू असं सांगितलं होतं त्यामुळे प्रत्येकाची उत्सुकता वाढली होती. सुयश सरांना येताना पाहून त्यांची कुजबुज अजूनच वाढली.

"सर आज नक्की या मागचा सूत्रधार जगासमोर येणार आहे का?"

"तिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळीच चर्चा रंगलेली आहे त्याला आता आळा बसणार का?"

"सर खरंच आपला देश आता सुरक्षित आहे का?"

सगळेच पत्रकार प्रश्नांचा भडीमार करु लागले.

"हे सगळं सांगायलाच ही कॉन्फरन्स बोलावली आहे ना? जरा अजून काही वेळ थांबा. डी.सी.पी. सर स्वतः तुम्हाला उत्तरं देतील." सुयश सर म्हणाले.

सगळे शांत बसले तोवर डी.सी.पी. सर आलेच. सर्व स्थानापन्न झाल्यावर सगळेच डी.सी.पी. सरांकडे बघत होते.

"मागच्यावेळी तुम्हाला सुरक्षेच्या कारणास्तव जास्त माहिती देता आली नाही पण आता तुम्हाला पुढची माहिती आम्ही देतोय. आपल्याला माहीतच आहे सध्या काय सुरू आहे ते आणि त्यावरच गेले कित्येक दिवस आमचा तपास सुरू होता. या तपासात आम्हाला वेळोवेळी पुरावे मिळाले आणि त्याआधारे आम्ही एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीला आम्ही जगासमोर आणणार आहोतच पण त्याआधी या केसची एक महत्त्वाची साक्षीदार व्यक्ती आम्ही तुमच्या समोर आणतोय." डी.सी.पी. सर म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने सगळे आपापसात कोण असेल? आणि काय माहिती मिळणार असेल याची कुजबुज करू लागले. एवढ्यात सोनाली जाऊन पूजाला घेऊन आली.

"कोण आहे हे? काय माहित आहे यांना या केसबद्दल?" पत्रकारांनी विचारलं.

"सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही यांची ओळख तुम्हाला करून देऊ शकत नाही. मिस अननोन म्हणून तुम्ही यांना संबोधू शकता. या चिनी भाषेत बोलतील त्यामुळे त्याचा अनुवाद आपण नंतर ऐकूच." सुयश सर म्हणाले.

"ओके. मिस अननोन तुम्हाला काय सांगायचं आहे?" पत्रकारांनी विचारलं.

"सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की, हे काम कोणा एकट्या किंवा दहा - बारा लोकांचं नाही. यामागे खूप मोठी टीम आहे. आता तुम्ही म्हणाल मला एवढं कसं माहीत? तर त्या टीमच्या सगळ्यात वरच्या लेव्हलवर मी काम करत होते. मला या कामाचे जेवढे सिक्रेट माहीत आहेत तेवढे कोणालाही माहीत नसतील. आता तुम्हाला वाटत असेल ही माहिती मी माझ्याच टीम विरोधात जाऊन का देतेय? याचं एकच कारण आहे ते म्हणजे सर सलामत तो पगडी पचास. मला माझ्या कामाचा मोबदला मिळत होता पण जेव्हा हे काम अंतिम टप्प्यात आलं तेव्हा तर एवढी मेहनत घेऊनही मला तांदळातल्या एखाद्या खड्याप्रमाणे बाजूला फेकलं. त्यांना कुठे अंदाज होता मी काय करू शकते ते. माझे सोर्स कुठवर आहेत याची जराही कल्पना त्यांना नव्हती. मी माझे सगळे सोर्स वापरले आणि चक्र फिरवली. आधी मी माझी मान वाचवली आणि आता त्यांच्यापैकी कोणालाच मी सोडणार नाहीये." पूजा सगळं चिनी भाषेत बदललेल्या आवाजात म्हणाली.

सी.आय.डी.ने आधीच तिथे एका व्यक्तीला भाषांतर करायला बोलावले होते त्यामुळे ती बोलत असतानाच भाषांतर झाले. सगळे तिच्या या बोलण्याने खूप मोठ्या धक्क्यात होते. यामागे खरंच त्या देशाचा हात आहे का? हाच मोठा प्रश्न होता आणि असेल तरी एवढ्या मोठ्या महासत्ता म्हणून नाव असलेल्या देशाला शिक्षा कशी मिळवून द्यायची? हा मोठा प्रश्न होताच.

"मिस अननोन तुम्हाला तर त्यांचा प्लॅन माहीत आहे मग तुम्ही वाट कसली बघताय? या प्लॅनमध्ये नक्कीच त्या डायनासोरला कोणता अँटीडोट द्यायचा हेही सामील असेलच ना? ते तुम्ही लवकरात लवकर योग्य व्यक्तींना सांगा." एक पत्रकार म्हणाला.

"हो माहीत आहे आणि माझं काम मी केलं आहे. कोणीही मला मी काय करावं हे सांगायचं नाही! नाहीतर मी यापुढे तुम्हाला कोणतंच सहाय्य करणार नाही." पूजा म्हणाली.

तिचं बोलणं भाषांतर करून ऐकलं तेव्हा सगळेच गप्प बसले. देशाला वाचवण्यासाठी ही एवढं करतेय तर आपण तिलाच काय अक्कल शिकवतो आहोत या विचाराने प्रश्न विचारलेल्या पत्रकरालाच खजील झाल्यासारखे वाटले.

"सर तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे. म्हणजे बघा गैरसमज नसावा. या मिस आपल्या देशासाठी एवढी मदत करतायत हे ठीक आहे. पण तुम्हाला यांच्यावर संशय आला नाही का? आपल्याला माहीतच आहे या ज्या देशातून आल्या आहेत तिथे स्व देशाबद्दल एक जरी अपमानास्पद शब्द काढला तरी कठोर शिक्षा होते, जिथे न्याय व्यवस्थेवर किंवा तिथल्या लोकांवर जराही आरोप केले तरी त्याची खैर नसते तिथे या मॅडम तर मीडियासमोर लाईव्ह असं बोलतायत. आपल्याला वेगळ्याच कामात अडकवून स्वतः मात्र प्लॅन पूर्ण करणे हा तर त्यांचा हेतू नसेल?" दुसऱ्या एका पत्रकाराने विचारलं.

"हो सर पॉइंट आहे. शिवाय इथे तर फक्त सी.आय.डी. टीम दिसतेय. एवढी मोठी केस जी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतेय, ज्या केसवर सगळ्याच जगाचे भवितव्य आहे या केसमध्ये फक्त सी.आय.डी. कशी?" दुसऱ्या एक पत्रकार मॅडम म्हणाल्या.

त्यांच्या या बोलण्याने सगळ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली.

"एक मिनिट आधी शांत व्हा. आमच्या टीममध्ये कोण कोण सामील आहे हे तुम्हाला आम्ही सांगूच शकत नाही. पत्रकार आहात ना? ही मोठ्या लेव्हलची कामं किती गुप्तपणे चालतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोय. राहिला प्रश्न या मॅडमवर आम्ही विश्वास ठेवला आहे त्याचा. तर तुम्हाला आम्ही काय इथे चोर पोलीस खेळणारे ऑफिसर्स वाटतो का? हा प्रश्न आमच्या डोक्यात आला नसेल? आम्ही यांची शहानिशा केली नसेल असं वाटतंय? उगाच जनतेला संभ्रमात टाकून एकच बातमी मीठ मसाला लावून लावून सांगायची याला काय अर्थ आहे?" सुयश सर जरा रागातच म्हणाले.

"सॉरी सर पण इथे हे एवढ्या मोठ्या लेव्हलवर होतंय तर खूपसे असे प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत." त्या पत्रकार मॅडम म्हणाल्या.

"सगळं काही वेळ आली की कळणार आहेच. आम्हाला देशवासीयांना अजून एका इसमाची भेट घडवायची आहे." डी.सी.पी. सर म्हणाले.

त्यांनी डोळ्यांनीच ईशाला खूण केली आणि ती पूजाला घेऊन तिथून गेली. त्याबरोबर गणेश रॉबर्टला घेऊन बाहेर आला. त्याला येताना बघून आणि त्याच्या हातात असलेल्या बेड्या, पायातल्या साखळ्या बघून सगळे कॅमेरे त्याच्याकडे झाले. सगळेच पत्रकार त्याचे फोटो काढत होते. अर्थात रॉबर्टच्या चेहऱ्यावर मास्क होता तरीही त्यांना जे बाईट्स मिळतील ते घ्यायचे होते.

"आत्ताच मिस अननोन ज्या टीमबद्दल म्हणाल्या त्या टीमचा हा महत्त्वाचा माणूस आमच्या हाती लागलाय. आपल्या देशात हा प्रयोग फक्त आणि फक्त या माणसामुळे झालाय." सुयश सर म्हणाले.

आणि लगेचच त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला. सगळे पत्रकार त्याचे फोटो, व्हिडिओ घेत होती. आपापसात कुजबुज सुरू होती आणि हा माणूस पकडला गेलाय तर बाकी टीमचं काय? हा प्रश्न तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात होता.

"हा रॉबर्ट! याचाच हा प्रयोग होता. या प्रयोगाला लागणारा सगळा फंड दुसऱ्या देशाकडून आला आणि आजची परिस्थिती आपण बघतोय. याला जगासमोर आणायचं हेच कारण आहे की, जनतेने आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर असलेला विश्वास कायम ठेवावा. लवकरच ही केस संपेल आणि हो रॉबर्ट तुझ्यासाठी एक वाईट बातमी आणि आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे याने जे काही उद्योग करून ठेवलेत त्यावरचा अँटीडोट आपण शोधलाय. आता कोणालाच घाबरायची गरज नाहीये." डी.सी.पी. सर म्हणाले.

"शक्यच नाही. जनतेला फक्त भुरळ घाला तुम्ही! यावरचा अँटीडोट माझ्याशिवाय कोणीच तयार करू शकत नाही." रॉबर्ट ओरडून ओरडून बोलत होता. पण त्याला गणेशने पुन्हा कस्टडीमध्ये नेलं.

"आजची प्रेस कॉन्फरन्स ही फक्त एवढ्याचसाठी होती. आता तो डायनासोर नक्की कोण होता, त्याचं काय झालं हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल फक्त आपल्या देशात शांतता नांदेल आणि आंतरिक वाद होणार नाहीत याची जनतेने काळजी घ्यावी. सर्व सुरक्षा व्यवस्था या विचित्र केसमध्ये अडकली असताना आपल्यामुळे या व्यवस्थेवर ताण येऊ नये ही प्रत्येक सुज्ञ नागरिकांची जबाबदारी नव्हे तर कर्तव्य आहे हे लक्षात असू द्या." डी.सी.पी. सर म्हणाले आणि ते तिथून गेले.

विक्रम आणि बाकी लोकांनी पत्रकारांना देखील मार्गी लावलं आणि सगळे पुन्हा आपापल्या कामाला लागले.
******************************
इथे शत्रू देशात भारतीय वाहिन्यांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या बघून जो परिणाम व्हायला हवा होता तो व्हायला सुरुवात झाली होती. प्लॅनमध्ये सामील असलेली व्यक्ती तेही वरच्या लेव्हलची? कोण असेल नक्की? का माहिती उघड केली यावर तिथे चर्चा होत होती. नक्की असं काही घडलं आहे की, आपल्याला संभ्रमात टाकायला प्लॅन केला जातोय यावर वाद सुरू होते पण थोड्याचवेळात याला आळा बसला. कारण रॉबर्टच्याच लॅपटॉपवरून त्यांना काही व्हिडिओ क्लिप्स मेल केल्या गेल्या होत्या ज्यात त्यांचीच आपापसातील भांडणं दिसत होती.

क्रमशः.......
*******************************
सी.आय.डी.ने जसं ठरवलं आहे तसंच सगळं जुळून येईल का? रॉबर्टच्या लॅपटॉप वरून कसल्या क्लिप्स मेल केल्या गेल्या असतील? कुठून आला असतील त्या क्लिप्स? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all