द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -२२)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे कैलास पुन्हा जुन्या आठवणीत गेला. त्याने इतकी वर्ष स्वतःचा जीव पणाला लावून जे काही केलं ते तो सगळ्यांना सांगत होता.

"रॉबर्ट कामानिमित्त बाहेर जायचाच. तो नसला तरीही लॅबमध्ये सगळीकडे सी.सी.टीव्ही. कॅमेरे होते. त्याचं फुटेज रॉबर्टकडे जो लॅपटॉप होता त्यावर जायचं. त्यामुळे मला फुटेजमध्ये तरी काहीच फेरफार करता येणार नव्हता. सी.सी.टीव्ही. तोडावे म्हणलं तरीही शक्य नव्हतं कारण ते रॉबर्टला नक्कीच समजलं असतं. मला काय करावं हेच कळत नव्हतं. बरेच दिवस मी यावरच विचार करत होतो. याआधी कधीच माझ्या डोक्यात सी.सी.टीव्ही.ला काहीतरी करावं असे विचार आले नव्हते पण अचानक ते येऊ लागलेत म्हणजे काहीतरी उपाय सुद्धा सापडणार यावर माझा पूर्ण विश्वास होता. एक दिवशी अचानक मला कॉलेजचे दिवस आठवू लागले. आवड म्हणून मी आणि माझ्या काही मित्र - मैत्रिणींनी मिळून हॅकिंगचा एक शॉर्ट कोर्स केला होता. कोर्स झाल्यावर ट्रायल म्हणून आम्ही प्रिन्सिपल चा कॉम्प्युटर हॅक केला आणि आठवडाभर सस्पेंड देखील झालो होतो. ही आठवण अचानक जागरूक झाली आणि मी लगेच रॉबर्ट चा लॅपटॉप हॅक केला. अर्थात त्याचा लॅपटॉप हॅक करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याला किंवा तो ज्या लोकांसोबत काम करत होता त्यांना जरा जरी संशय आला असता तरी माझं काही खरं नव्हतं. पण प्रयत्नांती परमेश्वर! अखेर चार दिवसांनी मला यात यश मिळालं. रॉबर्टच्या लॅपटॉपचा अॅक्सेस आता माझ्याकडे होता. त्यातले काही ठराविक फोल्डरच मला अॅक्सेस करता येत होते त्यात सी.सी.टीव्ही. फुटेज आणि रॉबर्टने अभ्यासलेल्या थेअरीचा समावेश होता." कैलास एवढं बोलून थांबला.

सगळे त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. एवढं सगळं जमवून आणणं आणि बिनधास्त त्यावर काम देखील करणं ही सोपी गोष्ट नव्हती.

"मला जेवढ्या माहितीची गरज होती तेवढी मला मिळाली. सी.सी.टीव्ही. फुटेजमध्ये मी सतत बदल करत होतो. म्हणजे लॅबमध्ये मी जर दुसरी कामं करत असेन तर एक रेकॉर्डेड फुटेज मी तयार केलेलं तेच रॉबर्टच्या लॅपटॉपमध्ये सतत प्ले करून ठेवत होतो त्यामुळे अजूनही रॉबर्टला मी काय केलं आहे हे माहीत नाही. त्याला असंच वाटतंय की त्याच्या हातून काहीतरी निसटलं आहे त्यामुळे ऋषभ पूर्ण डायनासोर झालेला नाही." कैलास म्हणाला.

"अच्छा! खरंच तू तर खूप मोठं काम केलं आहेस. जर तू घाबरून काहीही केलं नसतं तर आज कदाचित वेगळा दिवस आपल्याला बघायला मिळाला असता." डॉ. विजय म्हणाले.

"मी फक्त निमित्त होतो. असो! चला आता पुढच्या कामाला लागू." कैलास म्हणाला.

एवढ्यात ते लोक ज्या ठिकाणी ऋषभला ठेवून रिसर्च करत होते तिथे कोणीतरी आल्याची चाहूल त्यांना लागली. दारावर कोणीतरी टकटक केल्याने सगळेच सावध झाले. या अश्या सिक्रेट जागी कोणीतरी आलं म्हणजे टीम पैकीच कोणीतरी असणार याची त्यांना खात्री होती. तरीही सुरक्षेसाठी त्यांनी खात्री करून घेतली. सुयश सर आणि पूर्ण टीम तिथे आली होती. नियतीने पटकन दार उघडून सगळ्यांना आत घेतलं.

"काय झालं? सगळे अचानक इथे?" डॉ. विजय काळजीत म्हणाले.

"हो! कारण तसंच आहे. सुशांत आणि पूजाने जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्याचा सगळा डेटा लॅपटॉप मधून डिलीट झालाय. पूजाला संशय आहे की लॅपटॉप हॅक झाला असावा. जर असं असेल तर त्या लोकांनी रॉबर्टचा लॅपटॉप देखील हॅक केलेला असावा आणि त्यात ट्रेसिंग बग लावलेलं असल्याची शक्यता पण नाकारता येत नाही. आपल्याला लवकरच ऋषभला इथून हलवावं लागेल." सुयश सर म्हणाले.

"सर नका काळजी करू. मला याची पूर्ण कल्पना होती आणि तुम्ही म्हणताय तसा लॅपटॉप हॅक तर होताच शिवाय त्यात मायक्रोफोन, कॅमेरा सगळ्याचा अॅक्सेस घेतलेला होता पण मी शत्रूला गाफील ठेवण्यासाठी काही ट्रिक्स केल्या आहेत. अर्थात हे फक्त बहात्तर तास चालेल पण तोवर ऋषभची दुसरी सोय होईल." कैलास म्हणाला.

"ओके. नियती जरा पूजा आणि सुशांतला चेक कर. त्यांच्यावर कोणतंही डिव्हाईस नाहीये ना याची खात्री करायची आहे." सुयश सर म्हणाले.

"ओके." नियती म्हणाली.

तिने दोघांनाही नीट चेक केलं पण सुदैवाने असं कोणतंही डिव्हाईस त्यांच्यावर नव्हतं.

"सर आपण या गडबडीत रॉबर्टला विसरलो! जर त्याच्याकडे असं कोणतं डिव्हाईस असेल तर?" विक्रम म्हणाला.

"डॉ. विजय तुम्ही आमच्या सोबत चला. रॉबर्टची तपासणी गरजेची आहे." सुयश सर म्हणाले.

"सर एक मिनिट!" पूजा अचानक म्हणाली.

सगळे तिच्याकडे बघू लागले.

"सर मला तुमच्या निर्णयात हस्तक्षेप करायचा नाहीये पण रॉबर्टवर एखादं डिव्हाईस असेल तर आपण त्याचा फायदा घेऊया. आपण बरीच पावलं पुढे आलो आहोत आणि या एका चेकिंगमुळे शत्रू सावध झाला तर पुन्हा सुरुवात करावी लागेल." पूजा म्हणाली.

"नक्की काय म्हणायचं आहे तुला?" विक्रमने विचारलं.

"एवढंच की रॉबर्टची चेकिंग नको करुया." पूजा म्हणाली.

तिच्या बोलण्याने सुयश सरांच्या डोक्यात चक्र फिरू लागली.

"तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. गेलेले पुरावे पुन्हा गोळा करायची संधी चालून आली आहे." सुयश सर काहीतरी ठरवत म्हणाले.

"थँक्यू सर तुम्ही माझं मत समजून घेतलं." पूजा म्हणाली.

"तुला त्या लोकांबद्दल आणि त्यांच्या प्लॅनबद्दल जास्त माहिती आहे त्यामुळे तुझं मत महत्वाचं आहेच. बरं! आता तुझ्यासाठी अजून एक मोठं काम आहे. सगळ्यांना कामं वाटून देण्यासाठीच आपण इथे आलो आहोत. मला संशय आहे की, ब्यूरोमध्ये कोणीतरी व्हॉईस ट्रॅकर लावला आहे." सुयश सर म्हणाले.

"कोणी आणि कधी?" सोनालीने विचारलं.

"बहुदा पत्रकारांची गर्दी जमली होती तेव्हा. कारण आपण पुरावे नष्ट झाल्याचं बोललो होतो तेव्हा डी.सी.पी. सरांना मेसेज आला होता पुरावे तर गेले आता सी.आय.डी. काय करेल? असा." सुयश सर म्हणाले.

"अच्छा. म्हणून तुम्ही तिथे काहीच न बोलता सगळ्यांना इथे घेऊन आलात?" गणेश म्हणाला.

"हो." डी.सी.पी. सर म्हणाले.

"आता पूजा! तुला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. आपण एक प्रेस कॉन्फरन्स बोलवणार आहोत. तुझी आयडेंटीटी कुठेही लिक होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. सोनाली तुला सांगेल ते तू कॉन्फरन्समध्ये बोलायचं. सगळ्यांचं लक्ष या कॉन्फरन्समध्ये असेल तेव्हाच आपण ऋषभला इथून दुसरीकडे घेऊन जायचं. या कामात निनाद आणि अभिषेक कैलास आणि टीमची मदत करतील. प्रेस कॉनफरन्समध्ये आपण रॉबर्टला पण सामील करून घेणार आहोत." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." पूजा म्हणाली.

"आम्ही पण ऋषभला दुसऱ्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था करतो." कैलास म्हणाला.

सगळेच आपापल्या कामाला लागले. साधारण तासाभरात प्रेस कॉनफरन्स होणार होती. सोनाली आणि ईशाने मिळून पूजाचा पूर्ण गेटअप बदलला. तिचे फक्त डोळे उघडे राहतील याची काळजी त्यांनी घेतली होती. शिवाय डोळे बघून तिची ओळख फुटू नये म्हणून डोळ्यात लेन्स लावून एक गॉगल तिला घालायला दिला होता.

"झालं! पूजा.. सॉरी सॉरी मिस अननोन! तू आता ओळखू देखील येत नाहीये. आम्ही तुझा गेटअप तर बदलला आहे आता फक्त प्रेस समोर बोलताना तुला तुझा आवाज पण बदलायचा आहे हे विसरू नकोस." सोनाली म्हणाली.

"येस." पूजा बदललेल्या आवाजातच म्हणाली.

"ग्रेट!" ईशा म्हणाली.

एवढ्यात तिथे विक्रम आला.

"झालं का सगळं?" त्याने विचारलं.

"हो सर ऑल सेट आहे." ईशा म्हणाली.

"गुड. प्रेसची लोकं आली की नंतर आपण मिस अननोनला बाहेर घेऊन जाणार आहोत. ईशा! तू हिच्या सोबतच इथे थांब. कसलीच गडबड व्हायला नको." विक्रम म्हणाला.

"ओके सर." ईशा म्हणाली.

सोनाली आणि विक्रम पुन्हा बाहेर गेले. सुयश सर आणि गणेश रॉबर्टच्या सेलमध्ये होते. त्याच्या हातात बेड्या घालून आणि पायाला देखील साखळी बांधून त्याला तयार ठेवलं होतं. प्रेसची लोकं आल्यावर जगासमोर रॉबर्टचा चेहरा उघडा करायचा होता म्हणून त्याच्या तोंडावर देखील काळा मास्क टाकला होता.

"तुम्ही हे ठीक करत नाहीयेत. काहीही केलं तरीही आता विनाश अटळ आहे. हा.. हा... हा..." रॉबर्ट कुत्सित हसतच म्हणाला.

"गप रे! लवकरच कळेल काय होतंय ते." सुयश सर त्याला टपलीत मारून म्हणाले.

एवढ्यात बाहेरून कसलासा आवाज आला.

"प्रेसची लोकं आली. गणेश मी सांगेन तेव्हा याला बाहेर घेऊन ये." सुयश सर म्हणाले आणि ते बाहेर गेले.

क्रमशः......
*******************************
प्रेसमध्ये आता नक्की कोणती कोणती माहिती उघड होईल? ऋषभच पुढे काय होणार? नियतीला ऋषभमुळे जी ईजा झाली आहे त्यामुळे तिला तर काही धोका नसेल ना? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all