द डी. एन्. ए. पर्व २ (भाग -२१)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे डॉ. विजय, नियती आणि डॉ. नायर त्यांच्या कामात पूर्णपणे गुंतले होते. अचानक वातावरणातला तणाव वाढला होता.

"कैलास माझा संशय खरा ठरला आहे का?" डॉ. नायर घसा खाकरून म्हणाले.

"काही अंशी." कैलास म्हणाला.

"म्हणजे? नक्की काय झालं?" नियतीने विचारलं.

"मॅडम! खरं सांगायचं तर ऋषभने ज्यांना ज्यांना ईजा केली असेल त्यांना त्याचा फार त्रास होऊ शकतो. साधारण महिन्याभराने तो त्रास जाणवायला सुरुवात होईल." कैलास म्हणाला.

"नक्की काय त्रास असेल? यामुळे इतरांना तर काही हानी होणार नाही ना?" नियतीने काळजीने विचारलं.

"होऊ शकते." कैलास एक उसासा टाकत म्हणाला.

"मी सविस्तर सांगतो." डॉ. नायर म्हणाले.

डॉ. विजय आणि नियती त्यांच्याकडे लक्ष देऊन ते काय सांगतायत हे ऐकू लागले.

"खरंतर हा प्रोजेक्ट सुरू होण्याआधी डॉ. विद्यावर्धन यांना पण हाच संशय आलेला. त्यांनी पूर्णपणे एक महिन्याचा अवधी घेऊन यावर खूप अभ्यास केला. मला ज्याप्रमाणे आठवतंय त्याप्रमाणे त्यांनी हा प्रोजेक्ट रद्द करण्यासाठी त्यांची ही केस स्टडी सादर केली होती. अर्थात त्यांनी त्यांच्या केस स्टडीमध्ये खूप गंभीर परिमाण नमूद केले होते. जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा आता नियती मॅडमना ऋषभमुळे ईजा झाली त्याच्या काही क्षणातच त्यांच्या देखील डी.एन्.ए.मध्ये बदल घडायला सुरुवात होईल, हळूहळू त्या हिंस्र होऊ लागतील आणि कालांतराने त्यांचं पूर्ण रूप डायनासोरसारखं होईल." डॉ. नायर म्हणाले.

"एवढे गंभीर परिणाम? पण आत्ता आपण बघतोय ते तर याच्यापुढे फार सौम्य वाटतायत. शिवाय ऋषभ देखील पूर्णपणे डायनासोर झालेला नाहीये." डॉ. विजय म्हणाले.

"हे कैलासमुळे शक्य झालंय. त्याने मला जो फॉर्म्युला दाखवला त्यानुसार त्याने काम करताना बऱ्याच वेळा केमिकल बदललेत त्यामुळे खूप अनर्थ टळले आहेत." डॉ. नायर म्हणाले.

"हो! मला ज्या क्षणी रॉबर्टने ऋषभला दाखवलं होतं त्या दिवसापासून मी बरेच बदल करत काम केलंय. हा प्रयोग जेव्हा शेवटच्या टप्प्यात होता तेव्हा मी त्याला एक अँटीडोटच इंजेक्शन दिलं होतं. त्यांनतर आत्ता मगाशी आपणच त्याला एक दुसरा डोस दिला आहे. आता आपल्याला तेच तपासून बघायचं आहे त्यामुळेच तर ऋषभवर आपण एवढा कंट्रोल मिळवू शकलो आहोत का? जर तो प्रयोग यशस्वी झाला असेल तर पुढचं काम सोपं होईल पण जर त्यामुळे फक्त त्याच्या परिवर्तन कालावधीत वाढ झाली असेल तर आपल्याला लवकरात लवकर फॉर्म्युला शोधून त्यावर काम करणं गरजेचं आहे." कैलास म्हणाला.

"ठीक आहे. तू सांग काय करायचं आहे." डॉ. विजय म्हणाले.

कैलास त्या सगळ्यांना एक एक गोष्ट एक्स्प्लेन करून सांगत होता.

"कैलास मला एक कळत नाहीये, तू तर रॉबर्टच्या त्या लॅबमध्ये एकदम कडेकोट बंदोबस्तात होतास. तरीही त्याच्या नकळत हे सगळे बदल करणं, त्याचा अभ्यास करणं हे सगळं कसं जमलं तुला?" डॉ. नायरांनी विचारलं.

"तो होता ना माझ्या मदतीला. रॉबर्टने कितीही काहीही केलं असतं तरीही त्याने मला मार्ग दाखवला आणि मी तसा वागत गेलो." कैलास तिथेच ठेवलेल्या देवाच्या प्रतिमेकडे बघत नम्रपणे म्हणाला.

"खरंतर तू एक वैज्ञानिक असूनही एवढा श्रद्धाळू आहेस. कदाचित म्हणूनच एवढी वर्ष तू एका जागी बंदिस्त राहूनही खचला नाहीस. आपण कितीही मोठ्या मोठ्या बाता मारल्या तरीही कुठेतरी एक शक्ती आहे जी सगळी सूत्र चालवत असते. तुझी देवावरची श्रद्धाच तुला खंबीर बनवतेय." डॉ. विजय म्हणाले.

"ही सुद्धा त्याचीच कृपा." कैलास म्हणाला.

"तरीही तुला सगळं कसं सुचलं? काय केलंस तू?" नियतीने विचारलं.
*****************************
इथे मीडियामध्ये पुन्हा चर्चांना उधाण आलं होतं. चीनचे प्रमुख आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात चर्चा सुरू झाली होती आणि त्याचा काय निष्कर्ष असेल? काय चर्चा घडत असेल? याचे अंदाज मीडिया बांधत होती. जनतेला देखील यात सामावून घेण्यासाठी मीडिया जनतेचा कौल देखील घेत होती. सगळ्या बातम्यांमधून मात्र आपल्या जनतेची एकजूट दिसत होती. सगळीच जनता जे काही होईल त्याला एकत्र सामोरे जाऊ पण आपल्या देशाचं स्वातंत्र्य पुन्हा परकीय लोकांच्या हाती जाऊ देणार नाही असंच म्हणत होती.

"बघा ही आपली लोकं! कधी छोट्या छोट्या गोष्टीचा मोठा पर्वत करतील सांगता येत नाही पण अश्या संकटाच्यावेळी मात्र सगळे एकजूट होतात. बघा ना सगळे राजकीय पक्ष सुद्धा सगळे हेवेदावे, सत्ता, आपापसातले मतभेद विसरून एकत्र काम करतायत." गणेश म्हणाला.

"हो. हीच आपल्या भारताची ताकद आहे आणि हेच शत्रूंना कळत नाही. त्यांना वाटतं भारतात काय लोक कशावरूनही भांडतील, वाद होतील आणि एकजूट तुटली की त्यांचं काम सोपं. पण यांना सांगणार कोण असं काही कधीच होणार नाही ते." सोनाली म्हणाली.

सगळ्यांनाच शत्रूच्या डावपेचांची कीव येत होती. थोडावेळ अजून काय घडतंय ते टीमने बघितलं.

"सगळं तर ठरल्याप्रमाणे होतंय. आता फक्त या रॉबर्टने तोंड उघडायला हवं." विक्रम एकदा टीव्ही आणि एकदा आत रॉबर्टकडे बघत म्हणाला.

"त्याने तोंड उघडलं नाही तरी नियतीने जे रेकॉर्डिंग केले आहेत ते आहेतच की." ईशा म्हणाली.

"हा बरं झालं आठवण केलीस. त्या रेकॉर्डिंगची एक सी.डी. बनव." विक्रम म्हणाला.

"येस सर." ईशा म्हणाली आणि ती रेकॉर्डिंग सी.डी.मध्ये कॉपी करायला गेली.

पूजा सी.आय.डी.ची सगळी धावपळ बघत होती.

'किती कष्ट घेतात हे लोक आपल्यासाठी? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचं आयुष्य असं समर्पित करायला खरंच खूप मोठं मन आणि धैर्य लागतं.' पूजा सगळ्यांकडे एकदम कृतज्ञपूर्वक बघत मनातच म्हणाली.

"सर!" ईशाने विक्रमला हाक मारली आणि त्या आवाजाने पूजा देखील भानावर आली.

"काय झालं?" विक्रमने विचारलं.

"सर यात काहीच डेटा नाहीये." ईशा त्याला लॅपटॉप दाखवत म्हणाली.

"असं कसं शक्य आहे? एकदा पुन्हा नीट बघ." विक्रम काळजीने म्हणाला.

"सर मी लॅपटॉप दोन वेळा रिस्टार्ट पण केला. यातला डेटा उडालाय." ईशा म्हणाली.

विक्रमने रागाने बाजूच्या टेबलावर हात आपटला.

"सर मला वाटतंय त्या लोकांनी डिव्हाईस हॅक करून डेटा डिलीट केलाय." पूजा त्यांच्या जवळ येत म्हणाली.

"कसं आणि कधी?" विक्रम म्हणाला.

"सर आपल्याला वाटतंय तेवढीच यांची टीम नाहीये. यासाठी पूर्ण फुल प्रूफ प्लॅन केला गेला होता. सर, माझी ओळख फक्त या केमिकल रीलेटेड टीम सोबत होती पण अश्या अनेक टीम असतील ना ज्यामुळे त्यांना त्यांचं ध्येय साध्य करायला सोपं जाईल." पूजा म्हणाली.

थोडावेळ शांततेत गेला. विक्रम आत्तापर्यंत जे घडलं त्या सगळ्याचा विचार करत होता.

"सर पूजा म्हणते त्यात तथ्य आहे. एवढा मोठा डाव टाकायचा म्हणजे तयारीही तशीच हवी." ईशा म्हणाली.

तोवर सुयश सर आणि डी.सी.पी. सर बाहेर आले. सगळे त्यांच्याभोवती गोळा झाले.

"सर लॅपटॉप मधला डेटा...." विक्रम बोलत होता पण त्याला मध्येच अडवत सुयश सर बोलू लागले; "ऐकलं आहे मी."

"आता काय करायचं?" विक्रमने विचारलं.

"बोलता बोलता रॉबर्टने काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आधार घेऊ. अर्थात आपल्याला ते सबळ पुरावे म्हणून वापरता येणार नाहीये पण आपला देश नक्कीच यातून सुटेल." सुयश सर म्हणाले.

डी.सी.पी. सरांनी तोवर वरिष्ठांना फोन लावला. त्यांचं काहीतरी बोलणं झालं.

"जे करायचं होतं ते करून झालंय. आपले पंतप्रधान आपल्याच इशाऱ्याची वाट बघत होते. आत्तापर्यंत सगळ्या जगाला असं वाटतंय की, आपण शत्रू देशाच्या जाळ्यात अडकतोय पण आता सगळ्यांनाच आपली ताकद कळेल." डी.सी.पी. सर म्हणाले.

सगळ्यांचं लक्ष आता बातम्यांवर होतं. शत्रू देश तर आपण किती पुढारलेले आहोत आणि भारताची सोबतच इतर जगाची सुद्धा मदत करायला तत्पर आहोत हे ओरडून ओरडून सांगण्यात व्यस्त होता. आपल्याला कसा आधीपासूनच या गोष्टींचा अंदाज होता आणि आपले संशोधक कसे यावर काम करत आहेत हे सांगताना तर ते थकत नव्हते. इतकावेळ हे सगळं ऐकून घेणारे पंतप्रधान आता बोलू लागले. त्यांनी एकावर एक असे काही प्रश्न विचारले की शत्रू देशाच्या प्रमुखांनी पाण्याचा ग्लासच तोंडाला लावला.

"सर आता येणार खरी मजा." विक्रम हसत म्हणाला.

"चला आता सगळं मार्गी लागतंय. पुढची कामं करायला घेऊ. काही तासातच पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल." डी.सी.पी. सर म्हणाले.

"येस सर." सगळे एकदम म्हणाले.

"सर मी काय करायचं आहे आता?" पूजाने विचारलं.

"नंतर सांगतो. चला माझ्या सोबत." सुयश सर म्हणाले.

कोणालाही काहीच कळत नव्हतं नक्की कुठे जायचं आहे? आणि काय करायचं आहे ते.

क्रमशः......
******************************
सुयश सर सगळ्यांना घेऊन कुठे गेले असतील? कैलासने त्याचे प्रयत्न तर केलेत पण त्यामुळे ऋषभ बरा होणार असेल की फक्त त्याच्या परिवर्तन कालावधीत वाढ झाली आहे? कैलासने कसं सगळं केलं असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all