द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -२०)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलासने नियतीला इंजेक्शन दिलं असलं तरीही सगळ्यांना तिची काळजी वाटत होती. कोणी तसं दाखवत नसलं तरी सगळेच मनातून बिथरले होते.

"कैलास! नियतीला आराम करायला घरी जाऊ दे का?" डॉ. विजय म्हणाले.

"तशी काही गरज नाहीये पण तुम्हाला तसं वाटत असेल तर जाऊ दे." कैलास म्हणाला.

"नाही सर. मी कुठेही जात नाहीये. नका काळजी करू मला काहीही होत नाहीये." नियती म्हणाली.

एवढ्यात ब्यूरोमध्ये पूजा, सुशांत आणि त्याची बाकी टीम आली.

"सुशांत! अरे काय हे? काय लागलं आहे तुला एवढं? तू ठीक आहेस ना?" नियतीने त्याला काळजीने विचारलं.

सगळेच त्याच्याभोवती जमा झाले होते. त्याच्या हातावर भाजल्यासारख्या खुणा होत्या आणि कपडे देखील फाटले होते. फक्त त्याच्याच नाही तर त्याच्या टीम मधल्या अजूनही चार - पाच जणांना तशीच दुखापत झाली होती.

"त्या लोकांनी स्वतःला संपवलं त्यात या जखमा झाल्या आहेत. सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं पण अचानक सगळी धावपळ थांबली आणि शत्रूने हत्यारं टाकली. ते लोक सरेंडर व्हायला तयार होते. त्यांनी आमच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि ते लोक काही फुटांवर असतानाच अचानक ब्लास्ट झाला. सुदैवाने आम्ही सगळे एक इंच मागे होतो म्हणून वाचलो नाहीतर आज..." सुशांत बोलत होता.

त्याला मध्येच अडवत नियती म्हणाली; "नको पुढचं बोलू."

सुशांतने तिचे डोळे पुसले. तिने आणि डॉ. विजयनी मिळून पटकन त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर प्राथमिक उपचार करायला सुरुवात केली.

"सॉरी सर. आपण एवढी मेहनत घेतली पण आपल्या हाता तोंडाशी आलेला घास गेला." सुशांत म्हणाला.

"नाही! तसं काहीच झालेलं नाहीये. आपल्याकडे पूजाला लावलेल्या डिव्हाईस मधून मिळालेली रेकॉर्डिंग आहेत." नियती म्हणाली.

"अगं पण...." सुशांत बोलत होता पण त्याला मध्येच अडवत सुयश सर म्हणाले; "तू त्याचा विचार करू नकोस. आपण बघूया काय करता येईल ते. त्यांनी आपल्या देशाशी पंगा घेऊन घोडचूक केली आहे. तुम्ही सगळे आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन या तोवर आम्ही बघतो."

सुशांत आणि त्याच्या जखमी सहकार्यांना घेऊन गणेश हॉस्पिटलमध्ये गेला.

"पूजा तू सांग तिथे असं काही घडलं का की, आपण त्याचा वापर पुरावा म्हणून करू शकतो?" डी.सी.पी. सरांनी विचारलं.

"सर मला सुशांत सरांनी एका गुप्त ढोलीत ठेवलं होतं. सर आणि त्यांची टीम आत गेली. बराच वेळ झाला तरी कोणी आलं नाही. मला तिथे राहून बाहेर सतत कोणीतरी पहारा देतंय हे जाणवत होतं. बराचवेळ चकमक सुरू होती आणि अचानक सगळा आवाज थांबला. मला वाटलं शत्रू अडकला. मी तिथून बाहेर निघणारच होते पण सुशांत सरांनी मी स्वतः येत नाही तोवर बाहेर यायचं नाही हे सांगितलं होतं ते आठवलं म्हणून मी पुन्हा तिथेच थांबले पण लपून लपून बाहेर बघण्याचा प्रयत्न करत होते. तिथे खरंतर कोणीच नव्हतं. मोजून दोन ते पाच मिनिटं झाली असतील की अचानक आम्ही ज्या खोलीत होतो तिथून मोठा ब्लास्ट झाल्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकूनच मी सुशांत सरांनी मला ज्या गुप्त मार्गाने हॉटेलच्या बाहेर आणलं होतं त्या मार्गाने गेले तर तिथे आपल्या टीमला दुखापत झालेली दिसली. बाकी शत्रू लोकांपैकी तिथे कोणीच नव्हतं. सगळीकडे रक्त सांडलं होतं आणि शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. मला एवढंच आठवतंय सर." पूजा घाबरून म्हणाली.

"तू आधी शांत हो. हा सगळा प्रसंग बघून तुला भीती वाटणं साहजिक आहे पण आता सावर स्वतःला." डी.सी.पी. सर म्हणाले.

"पण आता पुढे काय सर?" पूजाने विचारलं.

"मला माहितेय." विक्रम अचानक म्हणाला.

"काय?" सुयश सरांनी विचारलं.

"सर आम्ही जेव्हा ऋषभला पहिल्यांदा जंगलात बघितलं होतं तेव्हा त्याला कोणीतरी कंट्रोल करत होतं. तशीच चीप या लोकांना लावली असण्याची शक्यता आहे." विक्रम म्हणाला.

"सर ते तर असणारच होतं. आपल्या सगळ्यांना सूत्रधार कोण आहे हे माहीत आहे पण पुराव्या अभावी आपण ते सिद्ध करू नये म्हणूनच हे सुरू आहे." कैलास म्हणाला.

"हम्म." विक्रम म्हणाला.

"अरे हो या सगळ्याचा आपण फायदा घेऊ शकतो. माझ्याकडे एक प्लॅन आहे." कैलास म्हणाला आणि त्याने त्याचा प्लॅन सगळ्यांना सांगितला.

"ठीक आहे. असंच करूया." डी.सी.पी. सर म्हणाले.

त्यांनी लगेच उच्च अधिकाऱ्यांना फोन लावला आणि सगळे बातम्या लावून बसले. फोन होऊन दोन मिनिटं होत नाहीत तोवर त्यांच्या प्लॅनचे पडसाद समोर होते.

"चला आता शत्रू चांगलाच बेसावध आहे. कैलास! तू ऋषभला लवकरात लवकर बरं कर." सुयश सर म्हणाले.

त्यांचं काम तर झालं होतं आता हा जो नवीन खेळ सुरू केला होता त्यातून फक्त त्यांना वेळ काढून घ्यायचा होता. नियती, डॉ. विजय, कैलास आणि विद्यावर्धन यांचे सहकारी डॉ. नायर देखील या मिशनमध्ये सहभागी झाले होते.

"थँक्यू डॉ. नायर! तुम्ही आज देशासाठी एवढा मोठा धोका पत्करून आमची साथ देताय खरंच! सगळ्यांनी तुमच्यासारखा विचार करायला हवा." डॉ. विजय म्हणाले.

"मी फक्त माझं कर्तव्य करतोय." डॉ. नायर कृतज्ञतेने म्हणाले.

"चला कामाला सुरुवात करुया. फक्त ही बातमी आपल्या चौघांना सोडून कोणालाच कळता कामा नये याची काळजी घ्या." कैलास म्हणाला.

"हो." सगळेच म्हणाले.

शत्रूचा डाव तर फार मोठा होता तरीही आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सगळीच टीम रक्ताचं पाणी करत होती. डॉ. नायर यांना त्यावेळी नक्की काय काय घडत होतं आणि प्रोजेक्टचे नेमके खाच खळगे कुठे आहेत हे माहीत असल्याने ऐनवेळी कैलासने डॉ. विजयना त्यांची मदत घेऊया म्हणून सुचवलं होतं. यामुळेच सध्यातरी या चौघांशिवाय कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. ते चौघे त्यांच्या कामाला लागले. थोडावेळ असाच गेला आणि कसलीतरी प्रोसेस पूर्ण झाल्यावर कैलासच्या चेहऱ्यावर थोडी चिंतेची लकेर दिसत होती.
**********************************
इथे ब्यूरोमध्ये सगळी टीम आता रॉबर्टचं स्टेटमेंट घेत होती. त्याच्या तोंडून सगळं वधवून घेतल्यावर खूप मोठा पुरावा हाती लागणार हे त्यांना माहीत होतं. रॉबर्टला एका बंद खोलीत खुर्चीवर बसवलं होतं आणि सुयश सर व डी.सी.पी. सर त्याच्यासोबत आत होते. तिथे कॅमेरे, रेकॉर्डर याची व्यवस्था होती आणि बाकी टीम रूमला असलेल्या काचेतून बघत होते. बाहेर देखील स्पीकर असल्याने सगळ्यांना आत काय सुरू आहे हेही ऐकायला येणार होतं.

"तर रॉबर्ट बोल का केलंस हे सगळं?" सुयश सरांनी एकदम शांतपणे सुरुवात केली.

"का म्हणजे? आज हे जे काही केलं आहे त्यामुळे माझं नाव मोठं होणार आहे, मला पैसा मिळाला आहे अजून काय हवं?" रॉबर्ट कुत्सित पणे म्हणाला.

"हुं! याला तू नाव मोठं होणं म्हणतोस? आणि आता तुरुंगात तुला पैसा काय कामाचा?" सुयश सर म्हणाले.

"तुमच्याचमुळे झालं ना. नाहीतर माझा प्लॅन परफेक्ट झाला होता. अर्थात तुम्ही कोणीही मला अजून एकही दिवस इथे ठेवू शकणार नाही. कारण या रॉबर्ट शिवाय कोणालाच त्या डायनासोरचा अभ्यास करता येणं शक्य नाहीये." तो एकदम गर्वाने म्हणाला.

"ए गप! आजपर्यंत कोणाचंही कोणावाचून अडलं नाहीये. तुझ्यामुळे सुद्धा काही अडणार नाही हे बघशील. आत्ता फक्त जे विचारलं जातंय त्याची उत्तरं दे." सुयश सर त्याच्या खुर्चीवर दोन्ही हात ठेवून रागाने म्हणाले.

क्रमशः.....
********************************
काय होईल आता पुढे? कैलासला कसली काळजी वाटत असेल? जर खरंच रॉबर्ट शिवाय कोणीही काही करू शकणार नसेल तर त्याच्या अटी काय असतील? शत्रू देशाला मीडिया कितीवेळ दुसरीकडे गुंतवू शकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all