द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१९)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी. टीम आता ब्यूरोमध्ये पोहोचली होती आणि त्याआधीच ब्यूरोमध्ये बरीच लोकं जमा झाली होती. सगळे ऑफिसर्स आत येतात न येतात तोवर त्या लोकांनी त्यांना गराडा घातला. ती लोकं म्हणजे प्रेसची लोकं होती.

"सर आता तरी सांगा हे काय सुरू आहे? खरंच आता आपली जनता सुखरूप आहे का?" सगळे एकदम बोलू लागले.

"हो हो सगळं सांगणार. सगळं काही सांगायचं आहे म्हणूनच तर ही प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे ना? सगळ्यांनी शांत व्हा आणि बसून घ्या." सुयश सर म्हणाले.

सगळे आपापसात कुजबुजत बसले होते एवढ्यात ब्यूरोमध्ये डी.सी.पी. सर आले.

"सर!" सगळ्या ऑफिसर्सनी त्यांना सलामी दिली आणि सगळे पत्रकार उठून उभे राहिले.

डी.सी.पी. सरांनी सगळ्यांना बसण्याची खूण केली आणि सगळे बसले परंतु आता सगळ्या पत्रकारांची कुजबुज अजूनच वाढली. सरांनी सगळ्यांना शांत केलं आणि बोलायला सुरुवात केली.

"तुम्हाला माहीत आहेच ही पत्रकार परिषद का बोलावण्यात आली आहे ते. जास्त वेळ न घालवता आपण सरळ मुद्द्यावर येऊ. खरंतर हे जे संकट आलं आहे त्याची तीव्रता आपण सगळ्यांनी बघितली, अनुभवली पण आता कोणालाही घाबरायची गरज नाही आता सगळं सुरळीत झालं आहे." ते बोलत होते एवढ्यात एका पत्रकाराने त्यांना टोकलं.

"म्हणजे? आता डायनासोरचं संकट संपलं का? काय झालं त्याचं? कोण हे सगळं करत होतं?" त्याने विचारलं.

"हो आता संकट तर टळलं आहे पण बाकीचे डिटेल्स आम्ही आत्ता देऊ शकणार नाही." डी.सी.पी. सर म्हणाले.

"का? जनतेला हे सगळं जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला सांगावं तर लागेलच. सगळी जनता आपला जीव मुठीत घेऊन बसली होती आणि तुम्ही काहीही सांगत नाही आहात हे कसं चालेल?" दुसरा पत्रकार म्हणाला.

"सगळं काही कळणार आहे पण अजून थोड्यावेळाने. आत्ताची ही पत्रकार परिषद आम्ही फक्त एवढ्यासाठीच बोलावली आहे की, आम्हाला जनतेला सांगायचंय आता कसलीच भीती बाळगू नका पण सावध रहा. सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरत आहेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू देखील नका. आता आज संध्याकाळनंतर सगळं काही पूर्ववत होईल त्यामुळे तुम्ही तुमची नेहमीची कामं करू शकता, मुलं शाळेत जाऊ शकतात. फक्त हे सगळं करत असताना जर काहीही संशयास्पद आढळलं तर न घाबरता पोलिसांना सांगा." डी.सी.पी. सर म्हणाले.

"सर पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय त्या डायनासोरचं काय झालं? तो जिवंत आहे की?" पत्रकारांनी विचारलं.

"ते तुम्हाला उच्च स्तरीय बैठक झाल्यानंतर सांगण्यात येईल. आत्ता जेवढी माहिती तुम्हाला देणे आवश्यक होते तेवढी दिली आहे." डी.सी.पी. सर म्हणाले आणि तिथून गेले.

"सर तुम्ही सांगा. तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती असणार." सगळ्यांनी आता सुयश सरांकडे मोर्चा वळवला.

"डी.सी.पी. सरांनी सांगितलं ना उच्च स्तरीय बैठक झाल्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. या आता." ते म्हणाले.

कसंबसं पत्रकारांना मार्गी लावून सगळे पुन्हा त्यांच्या कामाला लागले. पत्रकार गेल्यावर थोड्यावेळाने डी.सी.पी. सर पुन्हा आले.

"सगळं काही ठरल्याप्रमाणे झालंय. गुड जॉब." ते सुयश सरांना हस्तांदोलन करून म्हणाले.

"येस. आता थोड्यावेळात कैलासकडून ऋषभचा रिपोर्ट समजला की शत्रूचा डाव त्यांच्यावरच उलटेल." सुयश सर म्हणाले.
***************************
इथे सुशांत आणि त्याची टीम शेवटच्या टप्प्यातील काम करत होते. त्यांची एक तुकडी आत गेली आणि त्यांच्या ठरलेल्या सांकेतिक भाषेतून त्यांचा पुढचा प्लॅन रचला गेला. सगळं काही ठीक आहे याची खात्री करून आता सुशांत त्याच्या खऱ्या कामाला लागला.

"पूजा तू पटकन माझ्या मागे ये." तो तिला म्हणाला.

पूजा पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या मागे गेली. सुशांतने आधीच तिच्या सुरक्षेसाठी एक जागा बघून ठेवली होती आणि तिथेच तो तिला घेऊन गेला. एका मोठ्या झाडाच्या मागच्या बाजूने एक गुप्त रस्ता जात होता आणि तिथेच पूजाला लपवण्याची व्यवस्था झाली होती.

"सर मीही तुमच्या सोबत येते." पूजा म्हणाली.

"नाही! तुला वाटतंय तेवढं हे काम सोपं नाही. एकतर तू त्यांच्याच देशाची आहेस त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे हे लक्षात घे. मी स्वतः इथे तुला घ्यायला आल्याशिवाय बाहेर पडायचं नाही." सुशांत म्हणाला आणि तिथून निघूनही गेला.

सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं. एव्हाना त्याच्या टीमने संपूर्ण हॉटेलला घेरा घातला होता आणि सुशांत सोबत त्याचे अजून काही साथीदार तो आणि पूजा ज्या रस्त्याने हॉटेलमधून बाहेर पडले होते त्याच रस्त्याने पुन्हा आत गेले. जसा सुशांतने विचार केला होता त्याप्रमाणे शत्रू लोकांमधील दोन लोकं त्याच खोलीत होते. तिथे त्यांची झटापट झाली. अखेर सुशांत आणि त्याच्या साथीदारांना यश आले आणि ते सगळे तिथून संपूर्ण हॉटेलमध्ये बाकीच्या लोकांना शोधू लागले. सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं.
******************************
इथे कैलास त्याच्या सगळ्या टेस्ट करून ब्यूरोमध्ये आला.

"सर माझ्याकडे दोन बातम्या आहेत. एक चांगली आणि एक वाईट." कैलास म्हणाला.

"ऋषभ पुन्हा पूर्ववत होईल ना?" सुयश सरांनी जरा बिचकत विचारलं.

"हो पण वेळ लागेल." कैलास म्हणाला.

सगळ्यांना जरा हायसं वाटलं पण आता कैलास कोणत्या बातम्या घेऊन आलाय हे ऐकायला सगळेच उत्सुक होते.

"सर ऋषभला बरं करण्याची जबाबदारी माझी पण...." कैलास बोलता बोलता जरा थांबला.

"पण काय? त्याच्या जीवाला काही धोका वैगरे...?" डी.सी.पी. सर म्हणाले.

"नाही तसं काहीही नाही. मी आत्ता ज्या टेस्ट केल्यात त्यानुसार ऋषभला जेव्हा लॅबमधून घेऊन जाण्यात आलं त्यांनतर त्याला एक केमिकल देण्यात आलं होतं. त्यामुळे त्याने ज्यांना ज्यांना इजा पोहोचवली असेल त्यांना देखील थोडा त्रास होऊ शकतो. एकदम काही होणार नाही पण कालांतराने त्यांच्यात जनावरांचे गुण येऊ शकतात." कैलास चिंतेच्या सुरात म्हणाला.

"नक्की तुझा रिपोर्ट बरोबर आहे ना? तू पुन्हा चेक केलंय का?" डॉ. विजय काळजीने म्हणाले.

"हो सर. दोनदा नाही तर चार चार वेळा बघितलं. म्हणूनच मी लगेच इथे आलो. नियती मॅडमना ऋषभने जास्त इजा पोहोचवली होती त्यामुळे मला त्यांचे ब्लड सँपल हवेत." कैलास म्हणाला.

बोलता बोलताच त्याने सँपल घेण्यासाठी सिरिंज काढली. सोनालीने नियतीला तिथल्या खुर्चीवर बसवलं.

"मॅडम तुम्हाला काही त्रास जाणवत नाहीये ना? जराही काही वेगळं वाटत असेल तर लगेच सांगा." कैलास सँपल घेता घेता म्हणाला.

"विशेष नाही पण माझे डोळे खूप दुकतायत आणि खांद्यावर ऋषभची लाळ पडली होती तिथे थोडे पुरळ आलेत." नियती म्हणाली.

कैलासने तेही चेक केलं.

"मॅडम तुम्ही हे आधी का नाही सांगितलं?" कैलासने विचारलं.

"अरे यापेक्षा देश महत्त्वाचा आहे म्हणून काही सांगितलं नाही. तसंही आजच हे प्रकरण मार्गी लागेल तर रात्री डॉक्टरकडे जाणारच होते." नियती म्हणाली.

कैलासने तिचं ऐकून घेतलं पण त्याचा चेहरा आता गंभीर झाला होता.

"काही सिरियस आहे का कैलास?" डॉ. विजयनी विचारलं.

"खरंतर हो! नियती मॅडमवर रिऍक्शन व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल. मी सध्या एक इंजेक्शन घेऊन आलोय ते यांना देऊया. मला अजून यावरचा कायमस्वरूपी डोस शोधून करावा लागेल तोवर हे काम करेल." कैलास म्हणाला.

"म्हणजे? नक्की काय झालंय नियतीला?" डी.सी.पी. सरांनी विचारलं.

"सर नियती मॅडमना ऋषभचा दात थोडा लागला आहे. शेवटी तो एक मानवीय डायनासोर आहे आणि त्याचाच परिणाम यांच्यावर होऊ शकतो. अगदी लगेच नाही पण काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी यांच्यात देखील डायनासोरसारखे बदल होऊ शकतात असं प्रथमदर्शनी तरी वाटतंय. मला यांच्या रक्ताचे नमुने तपासल्यावर थोडा अंदाज येईलच. आत्तातरी मी हे इंजेक्शन आणलं आहे ते यांना देतोय. हा याच्यावरचा उपाय नक्कीच नाहीये पण मला कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी यामुळे वेळ मिळेल एवढं नक्की." कैलास म्हणाला.

"कैलास एक खरं सांग, माझी नियती बरी होईल ना? हे खूप सिरियस आहे." डॉ. विजय भावूक होत म्हणाले.

"हो सर नक्कीच. आत्तापर्यंत सगळं ठीक झालंय ना? पुढे देखील होईल. तुम्ही असे हताश होऊ नका उलट मला तुमची आणि नियती मॅडमची देखील यात मदत हवी आहे." कैलास त्यांना आश्वस्थ करत म्हणाला.

"आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कैलास! तुला जे योग्य वाटेल ते कर." सुयश सर म्हणाले.

कैलासने लगेचच नियतीला त्याने आणलेलं इंजेक्शन दिलं.

क्रमशः.....
********************************
कैलास तरी म्हणाला की, नियती बरी होईल पण नक्की असंच होईल ना? तिला भविष्यात या गोष्टीचा त्रास तर होणार नसेल ना? ऋषभ कधी पूर्ववत होईल? शत्रू पकडला गेला तरी त्याला शिक्षा होईल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all