द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१८)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळेच ऑफिसर्स आपापल्यापरीने ऋषभवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि जयश्रीला मात्र या सगळ्याचा त्रास होत होता. तिला आता ऋषभची अवस्था बघवत नव्हती. विक्रमने अचानक हवेत गोळी झाडली त्यामुळे तो चवताळला होता. नियतीला हातात धरुनच तो विक्रमच्या दिशेने जोरात येऊ लागला.

"सर तुम्ही माझी काळजी करू नका. मला संधी मिळताच मी माझं काम करेन प्लीज तुम्ही जा." नियती म्हणाली.

पण तिला असं संकटात सोडून सी.आय.डी. टीम थोडीच जाणार होती. विक्रमने हवेत शूट केलं तेव्हाच सुयश सरांनी डोक्यात काहीतरी प्लॅन केला होता.

"विक्रम! तू आणि ईशा एकत्र ऋषभला भरकटवा. सोनाली आणि मी दुसरीकडून त्याचं लक्ष विचलित करतो आणि तसंच निनाद, अभिषेक करतील. गणेश! तू पटकन कैलास ला गाडीत नेऊन बसव आणि नियती तुला संधी मिळाली की हातातून इंजेक्शन खाली सोड. डॉ. विजय तुम्ही नियतीने इंजेक्शन खाली सोडलं की ते पकडा आणि ऋषभला द्या." सुयश सरांनी पटकन सगळ्यांना कामं वाटून दिली आणि सगळे आपापली कामं करू लागले.

त्यांचा उद्देश फक्त ऋषभला थकवून जरा संथ करणं एवढाच होता. त्यानुसार सगळेच ऋषभला आपल्याकडे लक्ष देऊन मागे येण्यासाठी डिवचत होते. हे करताना मात्र त्यांना नियतीची काळजी घ्यायची होती कारण नियती त्याच्या हातात होती आणि त्याने पटकन तिला ईजा केली तर कोणी काही करू शकलं नसतं. हे सगळं थरार नाट्य जवळजवळ दहा मिनिटं झाली तरी सुरूच होतं. ना ऋषभ थकत होता ना नियतीला इंजेक्शन सोडून देण्यासाठी संधी मिळत होती.

'मला आता रिस्क घ्यावीच लागेल. भले मला नंतर कायद्याने शिक्षा दिली तरी चालेल पण आता नाही.' जयश्रीने मनातच विचार केला.

अचानक तिने खोकायला सुरुवात केली आणि खोकत खोकतच तिने गणेशकडे पाणी मागितलं. तो तिला पाणी द्यायला मागच्या सिटकडे वळला तोवर हीच संधी साधून जयश्री कारमधून बाहेर पळू लागली. कोणाला काही कळायच्या आतच हे घडलं आणि बाकी सी.आय.डी. ऑफिसर्स त्यांच्या कामात व्यस्त असल्याने त्याचंही याकडे लक्ष गेलं नव्हतं. गणेश तिला असं पळताना बघून तिच्या मागे गेला होता. तोवर ऋषभ नियतीला भक्ष्य बनवायच्या तयारीत होताच. सगळे नियतीला वाचवायचे प्रयत्न करत होते पण हातातून वाळू निसटावी असं सगळं निसटून चाललं आहे असंच जाणवत होतं. सगळे ऋषभला नाईलाजाने गोळी घालण्याचा प्रयत्न करत होते पण ते प्रयत्न व्यर्थ जात होते. ऋषभच्या जाड्या कातडीवर गोळ्यांचा काहीच परिणाम होत नव्हता.

"नियतीऽ" डॉ. विजय आक्रोश करत होते.

नियतीला ऋषभच्या एका दाताचा स्पर्श झाला होता आणि त्याची घट्टसर लाळ तिच्या खांद्यावर पडली होती. तिनेही आता सगळं संपलं आहे असं समजून घट्ट डोळे मिटले होते. एवढ्यात "ऋषभ थांब" असा जोरात आवाज ऐकू आला.

त्या आवाजात एक वात्सल्य भाव होता. काही क्षण सगळेच स्तब्ध झाले आणि ऋषभ देखील अचानक थांबला. तोवर कैलास आणि गणेश देखील तिच्या जवळ पोहोचले होते. इतका वेळ अक्राळ विक्राळ रूप धारण करून सगळ्यांना पळता भुई थोडी करणारा ऋषभ शांत कसा उभा राहिला हे सगळे बघत होते. त्याची पकड सुद्धा थोडी सैल पडली होती आणि हीच संधी आहे हे ओळखून नियतीने तिच्या हातातील इंजेक्शन खाली सोडलं. डॉ. विजयनी ते बरोबर झेलून एका ट्रिगरमध्ये घालून ऋषभच्या पायावर त्याचा नेम धरला आणि ते जोरात त्याच्या पायात घुसलं. इंजेक्शनमधलं औषध जस जसं त्याच्या शरीरात जात होतं तसा तो थोडा होलपडू लागला आणि त्याची मुठ सुटून नियतीची सुटका झाली.

"नियती तू ठीक आहेस ना?" डॉ. विजय तिच्या जवळ येत म्हणाले.

"हो." ती उठून बसत म्हणाली.

तोवर ऋषभ जमिनीवर आडवा झाला होता. कैलास, जयश्री आणि बाकी सगळेच पटकन त्याच्या जवळ गेले. कैलास त्याला चेक करत होता.

"ऋषभ उठ ना.. काय झालंय तुला हे?" जयश्री रडत रडत त्याला हलवत होती. तिचे अश्रू त्याच्या पंज्यांवर पडत होते आणि तो फक्त त्याची धारधार नखं असलेले पंजे हलवत होता.

"मॅडम नका काळजी करू ऋषभ शांत झालाय आता. फक्त तो उठल्यावर आपल्याला त्याला काहीतरी पोटभर खायला द्यावं लागेल नाहीतर पुन्हा अनर्थ होऊ शकतो." कैलास म्हणाला.

"ते ठीक आहे पण हा अचानक कसा शांत झाला?" डॉ. विजयनी विचारलं.

"जयश्री मॅडममुळे हे शक्य झालं. सगळे बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी आपल्याला ऋषभला अश्या जागी घेऊन जावं लागेल जिथे तो सुरक्षित राहील आणि आपण त्याच्यावर उपचार करू शकू." कैलास म्हणाला.

"माझा ऋषभ बरा होईल ना?" जयश्रीने रडत रडत विचारलं.

"हो मॅडम. ज्या अर्थी त्याने तुमचा आवाज ऐकला आणि तो शांत होऊ लागला त्या अर्थी अजूनही त्याच्यात मानवी भावना आहेत. मी पुढच्या टेस्ट करून लवकरात लवकर काहीतरी करेन. विश्वास ठेवा." कैलास एकदम सौम्यपणे आत्मविश्वासाने म्हणाला.

त्यांनतर कैलासच्या सांगण्यानुसार त्याला तिथून घेऊन जाण्यासाठी एक क्रेन बोलावण्यात आली आणि त्याच्याच मार्गदर्शनाने त्याला एका पूर्ण बंदिस्त खोलीत ठेवलं.

"कैलास आपण त्याला इथे ठेवलं आहे पण काही रिस्क नाहीये ना?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही सर. मी त्याच्या समोरच त्याला पुरून उरेल एवढं अन्न ठेवलं आहे त्यामुळे तो ते खाऊन पुन्हा झोपेल." कैलास म्हणाला.

"ठीक आहे. चल आता आधी तुझा हात डॉक्टरांना दाखवू म्हणजे पुढे तुलाच ऋषभला बरं करण्याचं काम करायचं आहे. तोवर आम्ही या मागच्या सूत्रधारांना गजाआड करतो." सुयश सर म्हणाले.

गणेश कैलासला घेऊन डॉक्टर कडे गेला आणि ईशा जयश्रीला घेऊन तिच्या घरी सोडायला गेली.

"निनाद! सुशांतने काही अपडेट्स दिलेत का?" सुयश सरांनी विचारलं.

"तेच चेक करतोय सर. सर! सुशांत सरांनी ग्रीन सिग्नल दिला आहे म्हणजे सगळं ठरल्याप्रमाणे होतंय. कदाचित आता प्लॅन शेवटच्या टप्प्यात असावा." निनाद म्हणाला.

"ओके गूड. आता आपलं काम सुरू होईल." सुयश सर म्हणाले.

त्यांनी लगेच एक नंबर फिरवला आणि फोनवर बोलून घेतलं.
******************************
इथे सुशांत पूजाला घेऊन एका सुरक्षित ठिकाणी पोहोचला होता आणि त्याची बाकी टीम ऑन द वे होती. त्यांच्या प्लॅननुसार तो त्यांच्या ठरलेल्या जागेवर आला होता.

"सर आता तरी सांगा ना हे सगळं नक्की काय आहे?" पूजा ने पुन्हा विचारलं.

"हो सांगतो. हा आपलाच प्लॅन आहे. त्या लोकांना आपल्याबद्दल जो काही संशय आला तो मी मुद्दाम मागे ठेवलेल्या काही पुरव्यांमुळे." सुशांत म्हणाला.

"सर खरं सांगू तर मला काहीच कळत नाहीये." पूजा म्हणाली.

"हो हो कळेल. ही स्टोरी जरा मोठी आहे आणि आत्ता आपल्याकडे वेळ नाही. ती बघ आपली बाकी टीम आली आता पुढच्या कामाला लागू. मी सांगतो तसं करत जा. सगळं कळेल तुला." सुशांत म्हणाला आणि लगेचच टीमला लीड करत तो कामाला देखील लागला.

'हे तर प्लॅनमध्ये नव्हतं. अचानक असं काय झालं असेल?' पूजा मनातच विचार करत होती.

"पूजा चल." सुशांतने तिला हाक मारली आणि ती भानावर आली.

सगळे पुन्हा त्या हॉटेलच्या दिशेने जाऊ लागले. सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं. सुशांतच्या टीमने सगळ्या हॉटेलला घेरा घातला होता आणि त्यांची एक तुकडी आत जायच्या तयारीत होती.

क्रमशः.....
*******************************
ऋषभ आता कधी बरा होईल? कैलास त्याला बरं करू शकेल का? यामागे जो सूत्रधार आहे तो सगळ्यांना माहीत आहेच पण एवढ्या मोठ्या आसामीला शिक्षा मिळवून देणं हे काम सोपं नाही. काय होईल पुढे? सुयश सरांनी काय ठरवलं असेल आता? सुशांतच्या जीवाला तर धोका निर्माण होणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all