द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१७)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी.कडे आता फक्त अर्धा तास होता आणि त्यात ऋषभ त्यांच्या हाती लागणं महत्त्वाचं होतं. सी.आय.डी.कडे अँटीडोट आहे ही बातमी अजून फक्त काही ठराविक लोकांनाच माहीत होती आणि शत्रूला बेसावध ठेवण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला होता.

'देवा! सगळं काही आता तूच सांभाळ. इतकी वर्ष या माऊलीने यातना सहन केल्यात आता तरी तिला तिचा मुलगा मिळू दे. मला खात्री आहे तू कधीही वाईटाचा विजय होऊ देणार नाहीस आणि जे काही घडवून आणशील तेही चांगलंच असेल. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. तुझी साथ असुदे.' कैलास मनोमन प्रार्थना करत म्हणाला.

सगळे ऋषभ ट्रॅक करत करत त्या लोकेशनवर पोहोचले. समोर ऋषभ एकदम सैरभैर अवस्थेत सगळीकडे फिरत होता.

"ऋषभ! काय झालंय हे तुझं?" जयश्री रडत रडत त्याच्या दिशेने जात होती पण सोनालीने पटकन तिला मागे ओढलं.

"मॅडम ही ती वेळ नाही. तुम्ही गाडीतच बसा." ती म्हणाली.

ऋषभला असं मानवी डायनासोरच्या रुपात पाहून जयश्रीला त्रास होणं हे साहजिकच होतं. कोणत्याही आईला आपल्या मुलांच्या बाबतीत काही वाईट घडलं की त्याचा त्रास त्या मुलापेक्षाही जास्त होतो. इथे तर ऋषभवर जगावेगळं जीवघेणं संकट आलं होतं त्यामुळे जयश्रीला वाटणारी काळजी, तिला होणारा त्रास आणि यातना अगदी नैसर्गिक होतं. तिला कसंबसं समजावून कैलास आणि जयश्रीला गाडीतच बसवून टीम हळूहळू ऋषभच्या दिशेने कूच करत होती. डॉ. विजय अँटीडोटच इंजेक्शन घेऊन तयारच होते. आत्तापर्यंत तरी सगळं ठीक सुरू होतं. सगळे ऋषभच्या मागे होते आणि आता डॉ. विजय त्याला इंजेक्शन देणार एवढ्यात एक किंकाळी ऐकू आली.

"सरऽ" नियती ओरडली.

ऋषभ अचानक मागे फिरल्याने सुयश सरांना त्याच्या शेपटीचा जबर फटका बसला होता. निनादने जाऊन त्यांना सावरलं पण तोवर सगळी धावपळ सुरू झाली होती.

"सर ऋषभ आता प्राणी आहे त्यामुळे त्याची वास घेण्याची क्षमता वाढली आहे. त्याला नक्कीच तुमची चाहूल लागली असणार." कैलास गाडीतून त्यांच्या जवळ येत म्हणाला.

"तू का बाहेर आलास? जा जयश्री मॅडम ना सुरक्षित स्थळी घेऊन जा." सुयश सर त्याला म्हणाले.

"नाही सर. आता हे होणे नाही. आपल्याला एकत्र काम करावं लागेल. माझ्याकडे द्या ते इंजेक्शन." कैलास म्हणाला.

सगळे पळता पळताच बोलत होते. ऋषभला काहीही खायला न मिळाल्याने तोही त्यांच्या मागे लागला होता. डॉ. विजयकडून इंजेक्शन घेऊन कैलास अचानक पाठमोरा होऊन ऋषभच्या दिशेने धावू लागला. कोणालाही काहीच कळत नव्हतं हे अचानक काय झालं.

"कैलासऽ काय करतोयस तू?" सुयश सरांनी विचारलं.

"सर तुम्ही मी सांगतो ते करा. सगळे सुरक्षित अंतरावर जाऊन ऋषभला घेरा घालून उभे रहा. माझी काळजी करू नका." कैलास म्हणाला.

सगळ्यांनी लगेच आपापल्या पोजिशन घेतल्या. सी.आय.डी.ची गाडी अजून थोड्या दूर अंतरावर होती पण गाडीतून जयश्रीला हे सगळं दिसत होतं.
******************************
इथे त्या लोकांना त्यांचा पुढचा सिग्नल मिळाला होता आणि आता ते त्यांच्या कामाला लागले होते. त्यातल्या एका माणसाने त्याच्याकडचा लॅपटॉप ओपन केला आणि काही व्हिडिओ क्लिप्स कोणालातरी मेल करू लागला हे सुशांतने बघितलं. त्याने हळूच पूजाला याबद्दल खुणेने विचारलं. तिलाही याबद्दल काही माहीत नसल्याने तिने चलाखीने त्या लोकांकडूनच याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही.

अचानक त्यातल्या दोन माणसांनी सुशांत आणि नियतीवर गन रोखली. सुशांत घाबरल्याचे नाटक करून "काय झालं?" म्हणून विचारू लागला. पूजाने देखील चायनीज भाषेत त्यांना तेच विचारलं. त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली आणि त्या दोघांना एका बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलं. सुशांत काहीच बोलत नव्हता.

"सुशांत सर त्या लोकांना आपल्यावर संशय आलाय आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला..." पूजा बोलत होती पण तिला मध्येच तोडत सुशांत बोलू लागला; "माहितेय मला. ते लोक असंच म्हणाले ना की, त्यांचा प्लॅन बाहेर जातोय आणि त्याला कारणीभूत आपण दोघं आहोत? आत्तापर्यंत आपल्या देशाने त्यांच्यासमोर गुडघे टेकायला हवे होते पण चक्क त्यांच्या करारावर सही करता करताच अजून वेळ मागून घेतला म्हणून हे सगळं झालं. त्यात त्यांना मी सी.आय.डी.साठी काम करतोय हे समजलं आहे आणि म्हणूनच त्यांनी तुझ्यावर देखील अविश्वास दाखवला."

"हो पण तुम्हाला कसं समजलं?" पूजाने विचारलं.

यावर सुशांत हसला आणि म्हणाला; "कदाचित तू विसरलीस मी एक अंडर कव्हर कॉप आहे. मला जवळजवळ सगळ्या देशांच्या भाषा येतात."

"ओह! लक्षातच नाही आलं. पण आता पुढे काय? आपण इथून सुटणार कसं?" तिने काळजीने विचारलं.

"त्याची काळजी तू नको करुस. हाही आपल्याच प्लॅनचा भाग आहे." सुशांत म्हणाला आणि तो त्या चारही बाजूंनी बंद असलेल्या खोलीत काहीतरी शोधू लागला.

पूजा काही बोलणार तोच सुशांतने तिला फक्त गप्प राहण्याची खूण केली आणि खुणेनेच बाहेर कोणीतरी आहे असं सांगितलं. दाराच्या खालच्या फटीतून त्याला कोणाचीतरी सावली दिसली होती आणि म्हणूनच त्याने पूजाला काही बोलू दिलं नाही.

"हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी तुझ्यावर विश्वास ठेवायलाच नको होता." सुशांत मुद्दाम तिच्यावर ओरडून काहीही बोलत होता. आणि तिला हळूच डोळा मारून मुद्दाम हे नाटक करण्यासाठी त्याने तिला खुणावलं होतं.

तीही त्याच्याशी त्याच भाषेत आणि आवाजाची पट्टी उंचावून बोलत होती. थोडावेळ भांडण झाल्यावर सुशांतने तिथून ती सावली गेल्याचं बघितलं. दाराला कान लावून तो माणूस तिथून गेल्याची पूर्ण खात्री करून तो पूजा जवळ आला. ती अजुनही गोंधळलेल्या अवस्थेत होती.

"मला माहितेय तुझ्या मनात काय सुरु आहे पण सगळी उत्तरं देत बसायला आत्ता वेळ नाहीये. ये पटकन माझी मदत कर." सुशांत हळू आवाजात बोलला आणि पूजा त्याच्या मागे गेली.

दोघं त्या रूममध्ये ठेवलेल्या एका शोकेस जवळ आले. पूजाने खुणेनेच काय करायचं आहे? म्हणून विचारलं. सुशांतने हलकेच शोकेस ओढून दाखवलं. पूजाला समजलं ते शोकेस बाजूला करायचं आहे. तिनेही काहीही न बोलता किंवा विचारता शोकेस बाजूला करायला मदत केली. ते बाजूला झाल्यावर त्यांच्यासमोर एक दार होतं.

"हे?" पूजाने हळू आवाजात विचारलं.

सुशांतने फक्त खुणेनेच तिला तिथे यायला सांगितलं. दार आतल्या बाजूला उघडून सुशांतने तिला आत उभं राहायला सांगितलं. तिने तिची पोजिशन घेतल्यावर ते शोकेस पुन्हा पूर्ववत करत तोही आत आला आणि पुन्हा दोघांनी मिळून ते शोकेस भिंतीला चिकटवून उभं केलं आणि आतून दार लावून दोघं त्या गुप्त मार्गाने जाऊ लागले. यादरम्यान कोणीही काहीच बोलत नव्हतं. दोन एक मिनिटं चालल्यावर ते दोघं हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला निघाले.

"सर आता तरी सांगा हे नक्की काय होतं? आपल्या प्लॅनमध्ये तर वेगळं होतं ना? आपण तिथून निघालो आहोत हे त्यांना कळेल तेव्हा?" पूजा ने विचारलं.

"नको काळजी करुस. तू फक्त चल. सगळं काही वेळ आल्यावर तुला समजेल." सुशांत म्हणाला आणि तो तिला घेऊन जाऊ लागला.

पूजा नक्कीच खरं बोलतेय याची खात्री तर त्याला पटली होती पण तिला आता बाकीचा प्लॅन समजावत बसायला वेळ नव्हता म्हणून तो काही बोलला नव्हता. आता त्याच्या प्लॅननुसार पटकन त्याला त्याच्या माणसांना तिथे बोलावून घ्यायचं होतं पण त्याआधी त्या दोघांना सुरक्षित ठिकाणी जाणं गरजेचं होतं.
******************************
इथे सगळे ऋषभला अडवयचा प्रयत्न करत होते आणि कैलास त्याला इंजेक्शन देण्यासाठी तयार होता पण काही कळायच्या आतच ऋषभने त्याला भिरकावून दिलं.

"कैलासऽ" डॉ. विजय ओरडले.

तो साधारण दीड फुटावर जाऊन पडला पण तरी त्याने इंजेक्शन वाचवलं. इंजेक्शन फुटू नये म्हणून त्याने पडताना तो हात अंगाखाली घेतला आणि त्यामुळे त्याला त्याचा जास्त त्रास झाला. नियती तिथेच होती म्हणून तिने पटकन जाऊन त्याची मदत केली पण अंगाखाली हात आल्याने आणि जोरात मार बसल्याने त्याचा हात सुजू लागला होता हे बघून नियतीने त्याच्या हातातून इंजेक्शन घेतलं आणि बेसावध ऋषभच्या दिशेने ती जाऊ लागली. ती मागून येतेय हे बघून बाकी लोक त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी तो एक प्राणी होता आणि त्यामुळेच त्याला तिचीही चाहूल लागली. त्याने एका क्षणात मागे फिरून एका हातात तिला उचलून धरलं त्यामुळे तिचे दोन्ही हात खालीच अडकले आणि इंजेक्शन द्यायला तिला हात उंचावत येत नव्हते. आता काय होणार? आणि नियतीला कसं वाचवायचं हा विचार सुरू असतानाच अचानक विक्रमने हवेत गोळी झाडली. त्या आवाजाने ऋषभने त्याच्याकडे चमकुन बघितले आणि पूर्ण ताकदीनिशी तो त्याच्याजवळ येऊ लागला.

क्रमशः.....
******************************
ऋषभ नियती आणि विक्रमला काही इजा करेल का? ऋषभ नक्की बरा होईल? त्याला ते इंजेक्शन देण्याची संधी सी.आय.डी. ऑफिसर्सना मिळेल की तो अँटीडोटच वाया जाईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all