द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१६)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
नक्कीच मिशन संबंधी काहीतरी मेसेज असणार हे जाणून निनादने तो ओपन केला.

"निनाद आम्ही सगळे ठरल्याप्रमाणे मिशनवर आहोत. तुला मी लोकेशन देखील पाठवत आहे. कैलास जर लॅबमधून बाहेर पडू शकला असेल तर इथेच ये. नाहीतर रॉबर्ट पकडला गेला आहे त्याच्या मदतीने तू लॅब ओपन करू शकतोस." ईशा मेसेजमध्ये बोलली होती.

निनादने मेसेज ऐकून फोन ठेवला आणि आता त्याची चालण्याची गती वाढली होती पण त्यामुळे कैलास मागे राहत होता.

"सॉरी अरे कैलास. तू नक्की ठीक आहेस ना? एक काम करू तू आधी काहीतरी खा मग आपण पुढे जाऊ. तुला सध्या ताकदीची गरज आहे." निनाद म्हणाला.

"नाही सर मी ठीक आहे. आत्ता मला माझ्यापेक्षा ऋषभ आणि देशाची काळजी आहे. आपण जाऊया." तो ठामपणे म्हणाला.

त्या दोघांना फक्त हा जंगलाचा रस्ताच चालत जायचा होता पुढे मग निनादच्या गाडीवरून दोघं जाणार होते पण यातही कैलासचा कस लागणार होता. इतक्या वर्षात एवढ्या तीव्र उन्हात आणि तेही जंगलाच्या वाटेने चालायचं म्हणजे त्याला भरपूर अडखळायला होत होतं. निनाद त्याला सावरुन घेत घेऊन चालला होता. कैलासच्या हातात असलेली बॅग देखील निनादने धरली होती.

"बरं कैलास तू माझ्या मागून कसा आलास? म्हणजे तू लॅब मधून बाहेर कसा पडलास?" त्याने मुद्दाम त्याला बोलण्यात गुंतवण्याची विचारलं.

"ते बटण प्रेस केल्यावर लॅबची जमीन दुभंगली गेली होती आणि त्या खड्ड्यात मी उडी मारली. मला नव्हतं माहीत नक्की काय होईल ते पण त्या खड्ड्यात गेल्यावर अचानक वरची जमीन अजूनच जोरात हलत आहे हे मला जाणवलं. काही सेकंद झाल्यावर धक्के थांबले आणि पुन्हा ती जमीन दुभंगली गेली आणि मला काही कळेच ना मी आता बाहेर कसा पडू ते. मग मला त्या भुयारी रस्त्यातच एक लहान जागा असलेली दिसली आणि मी तिथे गेलो तर तो रस्ताच मला बाहेर घेऊन आला." कैलासने सांगितलं.

"काय डोकं लावलं आहे या रॉबर्टने! म्हणजे जर तू पुन्हा जमीन दुभंगली गेली होती तेव्हा लॅबमध्ये गेला असतास तर नक्कीच पुन्हा बाहेर पडता आलं नसतं ना?" निनादने विचारलं.

"हो. रॉबर्टने तसाच ट्रॅप केला होता." कैलास म्हणाला.

रॉबर्टकडे खरंतर खूप हुशारी होती आणि तो काहीही करू शकत होता पण त्याने त्याचं डोकं चुकीच्या कामात लावल्याने या सगळ्याचा आता काहीच उपयोग होणार नव्हता.
********************************
इथे सी.आय.डी. टीम वेगवेगळ्या दिशेने जात असतानाच तिथे जयश्री आली होती.

"मॅडम तुम्ही इथे काय करताय? का घराबाहेर पडलात तुम्ही? ईशा! जा यांना सुरक्षितपणे घरी सोडून ये." सुयश म्हणाले.

"नाही सर. मी कुठेही जाणार नाहीये. मला कळलंय तो डायनासोर दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ आहे." जयश्री म्हणाली.

"मॅडम आत्ता ही ती वेळ नाहीये. आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्हाला आम्ही इथे नाही थांबू देऊ शकत." सुयश सर म्हणाले.

"तुम्ही माझ्यावर नंतर कारवाई केलीत तरीही चालेल पण मी इथून जाणार नाही." जयश्री देखील तिच्या निर्णयावर ठाम होती.

एवढ्यात तिथे निनाद आणि कैलास आले.

"सर मॅडम ना इथे थांबू द्या. अँटीडोट सोबत ऋषभला त्याची आई दिसली तरीही बराच फरक पडेल." कैलास म्हणाला.

त्याच्या बोलण्याने सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. कैलास ऋषभच्या घरी काहीवेळा येऊन गेला होता आणि त्यामुळे जयश्री त्याला ओळखत होती. निदान कोणीतरी आपली बाजू समजून घेत आहे म्हणून तिला बरं वाटत होतं.

"ठीक आहे पण मॅडम तुम्ही आमच्या कामात व्यत्यय आणयचा नाही आणि सुरक्षित अंतरावरच थांबायचं." सुयश सरांनी तिला बजावलं.

जयश्रीने देखील होकार देऊन डोळे पुसले. तिला आता कसंही करून तिचा मुलगा परत हवा होता. सगळे आता पुन्हा मेन मुद्द्यावर आले. कैलासला सगळं समजावून सांगून सगळे त्यांच्या कामाला लागले.
**************************
इथे त्या हॉटेल रूममध्ये त्या लोकांचा व्हिडिओ कॉल होऊन गेला होता आणि त्यांचं लक्ष आता बातम्यांवर होतं. सगळ्या चॅनलमध्ये ऋषभ कसा फिरतोय आणि पुढे जाऊन हे संकट कसं मोठं होत जाणार आहे याचं मीठ मसाला लावून वर्णन चालू होतं. ही बातमी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत होती आणि बरेच अभ्यासक आपापली मतं मांडत असताना चीनचे अभ्यासक मात्र आपल्याला याची कल्पना होती आणि म्हणूनच आमच्याकडे याचा उपाय असल्याचा दावा करत होते. सगळ्या जगासाठी हा एक ट्विस्ट होता. ते अभ्यासक अर्थातच चीनच्या काही प्रमुख समजल्या जाणाऱ्या लोकांच्याच हातातले बाहुले असल्याने त्यांना जे हवं तेच घडत होतं. सगळ्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ते लोक कसे पुढचा विचार करून सावध होते आणि कसे त्यांना यातले ज्ञान आहे हेच सांगण्यात व्यस्त होते.

"डोळे तरी नीट उघडे ठेवता येतायत का चाललेत गाढा अभ्यास करायला." सुशांत हळूच पुटपुटला.

पूजाने त्याचं हे बोलणं ऐकलं आणि हळूच स्वतःचं हसू दाबलं. त्या बातमीमध्ये त्या अभ्यासकांनी बोलता बोलता जरा चार शब्द जास्तच बोलले आणि आता त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे पूजा आणि सुशांतला चांगलंच माहीत होतं. हे सगळं सेशन झाल्यावर चीनचे प्रमुख भारताशी जवळ जवळ डील करण्याच्या हेतूने संभाषण करणार होते.

'प्लॅन चांगलाच वर्क होतोय. शत्रू बेसावध आहे आणि आपणच किती ग्रेट आहोत याच धुंदीत आहे.' सुशांतने सांकेतिक खुणांनी पूजाला याबद्दल सांगितलं.

तिलाही जे कळायचं ते समजलं आणि ती तिच्या कामाला लागली.

"सर कॅन वी प्रोसिड फरदर?" पूजाने त्या लोकांना विचारलं.

तिच्या अचानक बोलण्याने त्या लोकांची तंद्री तुटली.

"येस. जस्ट वेट फॉर फर्दर सिग्नल." त्यातला माणूस म्हणाला.

त्या लोकांना वेळोवेळी काय आणि कसं करायचं हे सांगणारे सिग्नल मिळत होते आणि त्याप्रमाणेच सगळे वागत होते. रॉबर्ट पकडला गेला असल्याचं देखील त्यांना त्यांच्या सूत्रांकडून समजलं होतं पण त्याचा काही फारसा फरक त्यांना पडणार नव्हता. त्यांनी पुढचा सिग्नल काय असेल हे ओळखण्यासाठी डार्क वेब ओपन करून ठेवलं.
******************************
सी.आय.डी. मात्र आता जीव ओतून काम करत होती. त्यात मिशन बरोबरच त्यांना आता जयश्री आणि कैलासची सुरक्षा देखील महत्त्वाची होती. मिशन चालू असतानाच डॉ. विजय आणि कैलासमध्ये अँटीडोट बद्दल चर्चा झाली आणि त्याची प्रोसेस बरोबर झाली आहे याची खात्री करून घेऊनच ऋषभ दिसला की त्याला तो द्यायचा या निर्णयावर ते ठाम झाले होते.

"सर एक मोठा प्रॉब्लेम झालाय. ऋषभ ट्रॅक होत नाहीये शिवाय हे बघा." ईशा अचानक सुयश सरांना टॅब दाखवत म्हणाली.

सगळ्या न्यूज चॅनलमध्ये चीनचे प्रमुख आणि भारतीय पंतप्रधानांची चर्चा दाखवली जात होती ज्यात आपल्या देशावर बरीच दडपणे आणली जात आहेत हे स्पष्ट होत होतं. भारताच्या बाजूने बोलणारे बरेच देश होते पण चीनच्या हातात आता हुकमी एक्का होता. ते म्हणतात ना सर सलामत तो पगडी पचास यामुळे चीनवर बाकीच्यांच्या दबावाचा काहीही परिणाम होत नव्हता. सुयश सरांनी ते सगळं बघितलं आणि ईशाकडे पुन्हा टॅब दिला. लगेचच त्यांनी स्वतःचा मोबाईल काढला आणि बाजूला जाऊन दोन मिनिटात ते परत आले.

"आपल्याकडे आता खूप कमी वेळ आहे. लवकरात लवकर आपल्याला मिशन पूर्ण करावं लागेल. आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ आता आपल्याला फक्त अर्ध्या तासात हे काम पूर्ण करायचं आहे नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो." सुयश सरांनी सगळ्यांना समजावलं.

आता आधीपेक्षा जास्त वेगाने सगळे कामाला लागले होते. ऋषभ ट्रेस व्हायचा बंद झाला होता तो पुन्हा ट्रॅक झाला. लगेचच सगळे पूर्ण तयारीनिशी त्या दिशेने जाऊ लागले. साधारण अजून पाच मिनिटांच्या अंतरावर ऋषभ ट्रॅक झाला होता आणि त्याचा इतरत्र भटकण्याचा वेग पाहता त्याला अजूनही शिकार मिळालेली नाही हे स्पष्ट होत होतं.

क्रमशः......
**********************************
ऋषभ काय करेल? तो पुन्हा पूर्ववत होईल का? भारताच्या रक्षणाचा दिखावा करणारा चीन नक्की कोणता हेतू मनात धरून आहे? जयश्री ऋषभला बघून कशी रिअॅक्ट होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all