द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१५)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
जयश्रीला तो डायनासोर म्हणजेच ऋषभ तिचा मुलगा असल्याचं जाणवू लागल्यावर तिचं मन सैरभैर झालं होतं. तिने लागलीच सुयश सरांना फोन लावला पण सगळीच टीम आता मिशनवर असल्याने त्यांनी फोन उचलला नाही. एक एक करून तिने विक्रम, ईशा, सोनाली यांना देखील फोन लावले पण कोणीही आपला फोन उचलत नाहीये बघून तिला अजूनच कासावीस वाटू लागलं.

"आता मलाच माझ्या ऋषभसाठी लढावं लागणार." ती डोळे पुसत ठामपणे म्हणाली.

एक मिनिट स्तब्ध उभी राहून तिने काहीतरी विचार केला आणि टीव्हीवरची बातमी नीट बघून टीव्ही बंद करून ती घराबाहेर पडली.

'मी बाहेर तर पडलेय पण ऋषभ मला ओळखेल का तरी? जरी तो सामान्य माणसाच्या रुपात असता तरीही एवढ्या वर्षांनी आईला बघताना त्याला गोंधळ निर्माण झालाच असता पण आत्ता तर तो प्राणी आहे. माझा बाहेर पडण्याचा हा निर्णय योग्य आहे ना?' ती मनातच स्वतःशी बोलत होती.

चालता चालता तिच्या मनात असंख्य विचार येत होते आणि ती तिच्याच मनाच्या द्वंद्वात अडकत होती.

'जे होईल ते बघू. माझ्या मुलाच्या हातून काहीही घडता कामा नये एवढंच मला वाटतंय. मी एक आई आहे आणि त्याला असं जीवितहानीच पाप करू देणार नाही. भले आत्ता मलाही त्याच्यापासून धोका आहे तरीही बघू काय होईल ते होईल. आज आता एकतर आईचं प्रेम जिंकेल किंवा विज्ञान.' ती मनातच म्हणाली आणि जवळ जवळ रस्त्याने धावत जात होती.

थोडं अंतर पुढे गेल्यावर सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त होता.

"ओ मॅडम थांबा! कुठे चाललात? सध्या शहरात काय सुरू आहे माहीत नाहीये का तुम्हाला?" एका पोलिस निरीक्षक मॅडमनी जयश्रीला अडवलं.

"सगळं माहितेय. शहरात काही होऊ नये म्हणूनच चालले आहे." जयश्री म्हणाली.

"तुम्ही काय पोलीस आहात? की स्पेशल फोर्समध्ये आहात? काहीही बोलू नका. आम्ही तुमच्या वयाचा मान राखतोय नाहीतर नाईलाजास्तव आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. आधी घरी जा. इथे खूप धोका आहे." त्या मॅडम म्हणाल्या.

"ऐका मॅडम माझं. तो डायनासोर माझा मुलगा आहे. मला जाऊ द्या." जयश्री बोलू लागली.

तिच्या बोलण्याने तिथे असलेले सगळेच गोंधळले आणि काही कळायच्या आत जयश्रीने तिथून पळ काढला.

"अरे पळाली ती." त्या मॅडम म्हणाल्या आणि दोन लेडी कॉन्स्टेबल तिच्या मागे जाऊ लागल्या.

तोवर तिथल्या बाकीच्यांनी पुढच्या नाक्यावरच्या पोलिसांना जयश्रीबद्दल सांगून सावध केलं.

"इथे आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन यांचं रक्षण करायचं आणि हे लोक असे निष्काळजीपणे वागणार." त्या मॅडमचा पारा आता चढला होता.

एवढ्यात त्यांचा फोन वाजला आणि त्यांनी फोन उचलला. त्या मॅडमच्या दोन वर्षांच्या मुलीचा फोन होता.

"आई तू का बाहेल गेली? बाहेल मोठा दायनाशोल आहे. ये ना घली." ती बोबड्या बोलात रडवेली होऊन बोलत होती.

"अरे बाळा त्या डायनासोरने तुला, तुझ्या फ्रेंड्सना काही करू नये म्हणूनच आई बाहेर आलीये ना? असं रडायचं नाही. तू माझी ब्रेव्ह गर्ल आहेस ना? आता मला काम करू दे हा. त्या डायनासोरला लांब सोडून दिलं की मी येणार हा घरी. आता बाबा सोबत कार्टून बघ आणि त्याला त्रास देऊ नकोस." त्या मॅडमनी मुलीला समजावलं आणि फोन ठेवला.

बाकीचे त्यांचे सहकारी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते.

"असे काय बघताय? आपण सगळेच आपलं कुटुंब सोडून आलो आहोत आणि त्या मॅडमसारखे काही लोक ज्यांना काहीच फरक पडत नाही." त्या मॅडम म्हणाल्या.

एवढ्यात त्या दोन्ही कॉन्स्टेबल आल्या आणि जयश्री अचानक त्यांना चकवा देऊन पळून गेल्याचं सांगितलं.

"असुदे. पळून पळून कुठवर जाईल? सगळीकडे नाकाबंदी आहे." त्या म्हणाल्या.
*******************************
इथे सी.आय.डी. टीम परफेक्ट लोकेशनवर पोहोचली होती आणि आता त्यांचं खरं काम सुरु होणार होतं. रॉबर्ट पकडला गेला असल्याने त्यांच्याकडून दुसऱ्या चीपचे डिटेल्स सुशांतच्या टीमने घेऊन सी.आय.डी.ला पाठवले होते आणि तेच ट्रॅक करत सगळे त्याला शोधत होते.

"इथून ऋषभ गेल्याच्या स्पष्ट खुणा दिसतायत. सगळा विध्वंस स्पष्ट दिसतोय." सुयश सर म्हणाले.

"हम्म. आता आपल्याला फक्त त्याला शोधून अँटीडोट द्यायचा आहे. ऋषभ बरा होईल की नाही माहीत नाही पण निदान त्यामुळे इतर कोणाला ही बाधा होणार नाही." डॉ. विजय म्हणाले.

"होप सो सगळं ठीक होईल. सोनाली! पूजाला कॉल कर. खरं मिशन आता सुरू होतंय." सुयश सर म्हणाले.

सोनालीने लगेच तिला फोन लावला. पूजाला सोनालीचा फोन येतोय हे बघून काय करायचं आहे हे समजलं. तिने लगेचच कॉल उचलून ठेवला आणि सुशांत आणि तिच्यात खाणाखुणा झाल्या. मुद्दाम ती सुशांत सोबत बोलताना काय काय तयारी केली आहे हे सांगत होती आणि त्या माणसांकडून देखील असंच करायचं होतं ना? याबद्दल वधवून घेत होती. सी.आय.डी.ला तर त्यांचा प्लॅन आणि त्यांच्या विरोधी पुरावे तर मिळाले होते फक्त त्यांच्या बोलण्यातून त्यांच्याकडे तरी याचा अँटीडोट आहे का? याची खात्री करून घ्यायची होती. त्यांचं ठरल्या प्रमाणे काम झाल्यावर सगळे टीमची विभागणी करून वेगवेगळ्या दिशेला जायला तयार झाले. त्यांना डायनासोरची दिशा माहीत असली तरीही त्याला चारही बाजूंनी घेरा घालण्यासाठी सगळे वेगवेगळे जाणार होते. त्यांच्या मदतीला तिथे वनाधिकारी, पोलीस आणि एन.डी.आर.एफ.चे जवान देखील आलेले होते. ठरल्याप्रमाणे त्यांच्या तुकड्या झाल्या आणि सगळे निघतच होते एवढ्यात कोणीतरी पळत त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसलं.
*******************************
इथे लॅबमध्ये कैलासने सगळी लॅब शोधून काढली आणि त्याला एक संशयास्पद बटन दिसलं. ऋषभला ज्या अंडा सेलमध्ये ठेवलं होतं त्याच्या खाली एक कार्पेट होतं आणि त्याच्या मागच्या भिंतीच्या कोपऱ्यात सहज दिसणार नाही असं एक बटण होतं.

"सर इथे एक बटण आहे खरं पण कसलं आहे माहीत नाही." कैलासने निनादला सांगितलं.

"तुला काय वाटतंय? एकदा ते चेक कर आणि मग आपण ठरवू ते प्रेस करायचं की नाही ते." निनाद म्हणाला.

"सर एक सांगू? मी इथे राहिलो तरीही मरणार आहेच. त्यापेक्षा मी ते बटण प्रेस करून बघतो. फायदा झालाच तर आपलाच आहे. निदान मला बाहेर पडता येईल. आत्तापर्यंत तरी सगळं ठीक झालं आहे. जर त्यानेच माझी निवड या कामासाठी केली असेल ना तर माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही थोड्या लांब अंतरावर जाऊन उभे रहा." कैलास म्हणाला.

"नाही. मी पण इथेच उभा आहे. जे व्हायचं ते एकत्र होऊ दे. तू बघ ते बटण कसलं आहे ते. हा फक्त आधी तुझा लॅपटॉप आणि जे काही सामान आवश्यक आहे ते हातात घेऊनच तिथे जा." निनाद म्हणाला.

"हो सर." कैलास म्हणाला आणि त्याने त्याला आवश्यक असलेलं सामान तिथे पडलेल्या एका रॉबर्टच्या बॅगेत भरलं.

'देवा! तूच हा मार्ग दाखवला आहेस. सगळं काही आता तुझ्या हातात आहे सावरुन घे.' मनोमन प्रार्थना करून त्याने त्याच्या डेस्कवरची प्रतिमा एका हातात धरली आणि तो त्या अंडा सेलजवळ गेला.

एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा एकदा देवाला सोबतीला बोलावून त्याने ते बटण प्रेस केलं. दोन क्षण काहीच झालं नाही पण नंतर अचानक सगळी लॅब भूकंप आल्यासारखी हलू लागली.

"कैलास तू ठीक आहेस ना? काय होतंय हे?" निनादने गोंधळून त्याला विचारलं.

"सर मी ठीक आहे. तुम्ही आधी लांब व्हा. नक्की काय होतंय मला कळत नाहीये." कैलास स्वतःचा तोल सावरत बोलू लागला.

साधारण अर्ध्या मिनिटातच तो कंप थांबला आणि धरणी विभक्त व्हावी तशी लॅबची खालची फरशी विभक्त होऊ लागली. कैलासचा निर्णय योग्य ठरला होता. त्याला आता त्या रस्त्याने बाहेर पडता येणार होतं. तो हे सगळं बघतच होता पण एवढ्यात पुन्हा ते दार बंद होऊ लागलं म्हणताना कैलासने कसलाच विचार न करता त्यात उडी मारली.

'हा रस्ता नक्की आहे कुठला? भुयारी रस्ता असला तरी बाहेर कुठून पडू?' तो मनातच म्हणाला.

निनादला कैलास सोबत नक्की काय घडलं आहे हेच कळत नव्हतं. त्याला कैलास नक्की गेला कुठे हेही दिसलं नव्हतं. तो त्याला हाका मारून शोधण्याचा प्रयत्न करत होता तर त्याच्या मागून कैलास आला.

"तू बाहेर आलास?" निनादने त्याला विचारलं.

"हो. फक्त इथून आपल्याला लगेच लांब व्हावं लागेल. चला पटकन." तो म्हणाला आणि जवळजवळ निनादला ओढून त्याने लांब केलं.

ते दोघं लांब होतात न होतात तोवर लॅबचा ब्लास्ट झाला आणि दोघं त्या धक्याने खाली पडले.

"कैलास उठ. ठीक आहेस ना? लागलं नाही ना?" त्याने त्याला नीट उठवत विचारलं.

"नाही सर. ठीक आहे. आता कित्येक वर्षात बाहेर चालण्याची सवय नाही राहिली त्यामुळे." कैलास म्हणाला.

दोघंही आता बाहेर पडायला निघाले. निनादने ही आनंदाची बातमी सुयश सरांना देण्यासाठी स्वतःचा फोन काढला तर आधीच ईशाचा व्हॉईस मेसेज आलेला होता.

क्रमशः....
*****************************
सी.आय.डी. टीम जिथे आहे तिथे कोण आलं असेल? ऋषभ बरा होईल का? त्याने कोणाला इजा तर केली नसेल ना? सुशांत आणि पूजा आता काय करतील? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all