द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१४)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे त्या लहान हॉटेलमध्ये त्या लोकांच्या हालचाली आता वाढल्या होत्या. आत्ता कुठे त्यांचा खरा खेळ सुरू होणार होता आणि त्यानुसार त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली होती.

"ऑल सेट?" त्यातल्या एका माणसाने विचारलं.

दुसऱ्याने लगेचच सगळी तयारी झाल्याचं आणि चीनचे प्रमुख पुढच्या दोन मिनिटात भारताच्या पंतप्रधानांना धीर देण्यासाठी अर्ध्या मिनिटाचा फोन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा आपल्याला व्हिडिओ कॉल येणार असून दोन मिनिटांची वेळ मिळाली असल्याचं चायनीज मधून सांगितलं.

'तुम्ही काय आम्हाला धीर देणार? आधाराची गरज तर आता तुम्हाला पडणार आहे.' सुशांत त्यांचं बोलणं ऐकून मनातच म्हणाला.

"पूजा! डू अवर नेक्स्ट स्टेप." त्या माणसाने पूजाला सांगितलं.

तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि सुशांतला घेऊन ती बाजूच्या खोलीत आली.

"इथे त्या लोकांच्या मीटिंगसाठी सेटअप करायचा आहे. आता आपलंही खरं मिशन इथूनच सुरू होईल. त्या लोकांना आत्तापर्यंत सगळा विध्वंस झाला असेल याची आशा असेल पण त्यांच्या या स्वप्नावर पाणी फेरणं हे आपल्या हातात आहे." पूजाने हळू आवजात सुशांतला सांगितलं.

"हम्म. जास्त काही बोलायला नको. भिंतींना पण कान असतात." सुशांत देखील काम करता करताच बोलला.

सगळं सेट करून होईपर्यंत ते लोक तिथे आलेच. आता प्रमुखांचा कॉल यायला मोजून एखाद मिनिट राहिला होता. त्या लोकांच्या चेहऱ्यावर तर जेव्हापासून देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हापासून खूप आनंद फाकला होता आणि तेच बघून सुशांतची धुसफूस होत होती.
*****************************
सी.आय.डी. ऑफिसर्स त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचत आले होते सोबतच त्यांना अजून एक आशेचा किरण देखील लाभला होता. विक्रमला जो फोन आलेला त्यावरून तरी सगळं काही आता कंट्रोलमध्ये येईल असं वाटत होतं.

"सर आपण जी सगळीकडे नाकाबंदी केली त्याचा फायदा झाला. तो रॉबर्ट एअरपोर्टवर पकडला गेला आहे. पूर्ण गेटअप बदलून आणि खोट्या आयडीने तो भारत सोडण्याच्या तयारीत होता पण आता सापडला आहे. स्पेशल फॉर्सने त्याला त्यांच्या ताब्यात घेतलं आहे." विक्रम म्हणाला.

"ग्रेट." सुयश सर म्हणाले.

"सर रॉबर्ट पकडला गेला हे चांगलंच आहे पण या मागचा खरा सूत्रधार नक्कीच कोणीतरी तिसरं आहे आणि तेच यात आहे. ऐका..." नियती म्हणाली आणि तिने पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केले.

त्यांच्यातल्या बोलण्याने या सगळ्याला चीन मधल्या काही महत्त्वाच्या माणसांची फुस आहे हे स्पष्ट होत होतं.

"हे लोक सुधारणार नाहीत. सतत काही ना काही कुरापती करत असतात आणि आपल्या बाजूने मात्र त्यांना कायम सामंजस्य अपेक्षित असतं. आता भारत पूर्वीसारखा राहिला नाहीये याची आता चांगलीच जाणीव त्यांना होईल. भारत आता महासत्ता म्हणून नावारूपाला येणार आणि असल्या पाठीमागून घाण्यारडी कारस्थानं करण्यांना चांगलाच धडा शिकवणार हे आता सगळ्या जगालाच दिसून येईल. घोडं मैदान आता लांब नाही." सुयश सर म्हणाले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आग जाणवत होती.
*********************************
इथे कैलासच्या बोलण्याने निनाद पुरता गोंधळून गेला होता. कोणाच्यातरी आयुष्यातून दिवस कसे डिलीट होतील हेच त्याला कळत नव्हतं.

"सर नक्कीच या चार दिवसात लॅबमध्ये काहीतरी वेगळं घडलं असावं." कैलास म्हणाला.

"मला काहीच कळत नाहीये. कैलास तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्या डायरीत तू अजून काही लिहून ठेवलं आहेस का बघ ना जरा. असंही होऊ शकतं ना तू त्या दिवसात खूप बिझी असशील आणि तुला डायरी लिहायचं डोक्यात पण आलं नसेल." निनाद म्हणाला.

"नाही सर. असं काहीच झालं नव्हतं. मला चांगलं आठवतंय तेव्हा मला एवढं जास्त काम नव्हतं की मी डायरी स्किप करेन. अगदी असं धरून चाललं तरीही एक दिवस असं होईल, दोन दिवस होईल, तीन दिवस होईल पण सर चार दिवस? नाही. नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि सर तुम्ही बघा ना अगदी एक ओळ लिहिली आहे मी. ही एक ओळ लिहायला मला असा कितीसा वेळ लागेल?" कैलास म्हणाला.

त्याच्या बोलण्यात पण तथ्य होतं. माणसाला जेव्हा मनाविरुद्ध काहीतरी करावं लागतं तेव्हा त्याचा राग बाहेर काढण्यासाठी माणसाने जे साधन शोधलं असेल त्याचा उपयोग केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही आणि त्याशिवाय कामात मन देखील लागत नाही. निनादला कैलासची अवस्था कळत होती पण हे नक्की काय घडलं आहे हेच त्याच्या लक्षात येत नव्हतं. कैलास पण याबद्दल विचार करत होता.

"सर माझ्या सगळं लक्षात आलंय. समजा मी तुम्हाला इथे बांधून ठेवलं आणि तुम्हाला शुद्ध येऊच दिली नाही तर तुम्हाला समजेल का, की किती दिवस तुम्ही इथे होतात?" कैलास एकदम म्हणाला.

"नाही. तारीख बघितल्या शिवाय किंवा कोणी सांगितल्या शिवाय हे शक्य नाहीये." निनाद म्हणाला.

"हेच झालंय सर माझ्या बाबतीत. नक्कीच त्या रॉबर्टने काहीतरी करून मला बेशुध्द केलं असणार आणि त्या दरम्यान त्याने लॅबमध्ये काम केलं असेल." कैलास म्हणाला.

"ठीक आहे असं धरून चाललं तरीही तुला पुन्हा काम करताना तारीख, वेळ याबद्दल काही संशय नाही आला? म्हणजे तुझं काम तर सगळं वेळेशी आणि तारखेशी संबंधित आहे. मग?" निनादने विचारलं.

"सर नसेल एवढं लक्षात आलं. अशी खूप प्रकारची औषधं आहेत ज्यामुळे माणसाच्या मेंदूवर त्याचा परिमाण होतो. माणसाला असंच वाटत राहतं की सगळं काही पूर्ववत आहे. अगदी काल परवा घडलेली घटना देखील कधी कधी आठवत नाही." कैलास म्हणाला.

"म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की, तुला औषध किंवा इंजेक्शन दिलं असेल त्यामुळे तुला हा चार दिवसांचा गॅप समजलाच नाही?" निनादने विचारलं.

"हो. असू शकतं." कैलास म्हणाला.

"मग आता तू बाहेर कसा येणार आहेस? कसं समजेल इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे ते?" निनादने विचारलं.

"मी बघतो सर." कैलास म्हणाला आणि सगळ्या लॅबमध्ये शोधू लागला.
******************************
त्या डायनासोरचा इथे सगळीकडे कहर सुरू झाला होता. आधीच भारतीय यंत्रणांनी सगळ्यांना सावध केलं असल्याने सुदैवाने अजून तरी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती. सगळे लोक आपापल्या घरात स्वतःला कोंडून बसले होते. सगळ्या टीव्ही चॅनलवर हीच बातमी दिसत होती आणि जयश्री देखील तीच बातमी बघत होती.

"देवा! आजच्या या कलियुगात काहीही शक्य आहे. कोणीतरी यांच्या प्रयोगाचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर करतंय." ती स्वतःशी पुटपुटली.

तिने बाजूलाच असलेला ऋषभ आणि त्याच्या बाबांचा फोटो हातात घेतला.

"आज तुम्ही हवे होतात. या संकटापासून तुम्हीच सगळ्यांना वाचवू शकला असतात. आता सगळ्या यंत्रणा या मागे लागल्या आहेत. आपला ऋषभ आता कधी सापडेल काय माहीत. देव करो आणि हे संकट लवकर टळो." ती फोटोवर हात फिरवत म्हणाली.

एवढ्यात तिचं लक्ष टीव्हीकडे गेलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे सगळेच हावभाव बदलू लागले. अचानक डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.

"नाही! हे शक्य नाहीये. असं कसं होईल? असं असूच शकत नाही." ती बोलू लागली.

टीव्हीवर त्या डायनासोरचे काही क्लोजअप फोटो दाखवले जात होते तेच तिने बघितले होते आणि तिला तो ऋषभ आहे असं वाटू लागलं होतं. ऋषभ डायनासोर रुपात ओळखू येत नसला तरीही जयश्रीने त्याला ओळखलं होतं. तो एक मानव डायनासोर आहे हे सगळ्यांना माहीत असलं तरीही आत्ता पहिल्यांदाच मीडियाने क्लोजअप फोटो शेअर केले होते.

"हे खोटं असुदे. मी आत्तापर्यंत ऋषभ लवकर सापडावा असं म्हणत होते पण अश्या अवस्थेत नाही. नाही! नाही! हे खोटं असुदे. माझा अंदाज यावेळी खोटा ठरला तर खूप बरं होईल." जयश्री रडत रडतच बोलत होती.

कोणीही त्याला ओळखलं नाही किंवा त्याच्यात कितीही बदल झालेले असले तरीही ती एक आई होती आणि एवढ्या वर्षांनी देखील तिने तिच्या मुलाला या अवस्थेत सुद्धा बरोबर ओळखलं होतं.

क्रमशः.....
******************************
जयश्री आता काय करणार असेल? कैलासला बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल? अजूनतरी देशात जीवितहानी झालेली नाही पण ती होईल का? जनता या सगळ्याला कशी सामोरी जाईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all