द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१३)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे सी.आय.डी. ऑफिसर्स ऋषभला शोधायला जात असतानाच विक्रमच्या मोबाईलवर सुशांतने जो सिक्रेट मेसेज पाठवला होता तो आला होता. विक्रम गाडी चालवत असल्याने सुयश सर तो मेसेज डी कोड करत होते. एकंदर त्या लोकांनी आत्तापर्यंत जे काही केलं आहे आणि त्यांचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे हे त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. सुयश सरांनी तो मेसेज डी कोड करून सगळ्यांना याची कल्पना दिली.

"सर अजूनही डिटेल माहिती आपल्याला समजेल. एक मिनिट." नियती म्हणाली.

"म्हणजे?" सुयश सरांनी गोंधळून विचारलं.

"म्हणजे सर सुशांतने जेव्हा पूजा ब्युरोमध्ये आली होती तेव्हा मला कल्पना दिली होती आणि तुम्ही मला जे ट्रेसिंग डिव्हाईस आणायला सांगितलं होतं त्याऐवजी मी थोडं वेगळं डिव्हाईस आणलं होतं." नियती म्हणाली.

"म्हणजे? नीट सांग ना." विक्रम म्हणाला.

"म्हणजे आपण पूजाला जे डिव्हाईस लावलं आहे त्यातून तिचं लोकेशन तर आपल्याला समजत राहीलच पण त्यात ऑडियो रेकॉर्डर पण आहे. त्यातून आपण ते लोक जे काही बोलले आहेत हे ऐकू शकतो." नियती म्हणाली.

"अगं पण त्यांचं बोलणं चायनीजमध्ये असेल तर?" ईशाने विचारलं.

"त्याचीही सोय केलेली आहे त्यामुळे काहीच टेंशन नाही. दोन मिनिटं थांब." नियती म्हणाली आणि तिने तिचा टॅब काढला.

सगळे नियती काय करतेय हे बघत होते. विक्रमने गाडीचा वेग वाढवला होता. लवकरात लवकर त्यांना ऋषभला पकडणं भाग होतं.

"हे बघा सर जे काही रेकॉर्ड झालंय ते माझ्या टॅबमध्ये सेव्ह आहे. आता आपण ते ऐकूया." नियती म्हणाली आणि तिने ऑडियो सुरू केला.

सुशांत आणि पूजा तिथे पोहोचल्या पासून त्यांच्यात जे काही बोलणं झालं होतं ते सगळं त्यात रेकॉर्ड झालं होतं आणि नियतीने आधीच तिच्या टॅबमध्ये एक सॉफ्टवेअर टाकून ठेवल्याने ते चायनीज टू मराठी रूपांतरित करूनच ऐकू येत होतं. फक्त त्यात असलेल्या टेक्निकल इश्यूमुळे काही वाक्य समजून घ्यावी लागत होती. सगळे अगदी काळजीपूर्वक त्यांचं बोलणं ऐकत होते. एवढ्यात विक्रमला कोणाचा तरी फोन आला म्हणून नियतीने रेकॉर्डिंग पॉज केलं.
******************************
इथे लॅबमध्ये कैलासने अगदी मनोभावे देवाला त्याच्या मदतीसाठी बोलावलं होतं आणि निनादच्या बोलण्यामुळे त्याची तंद्री तुटली होती.

"आठवतंय का काही?" निनादने पुन्हा विचारलं.

"नाही सर. मला थोडा वेळ द्या." कैलास म्हणाला आणि काहीच न बोलता पुन्हा डोळे मिटून विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर आता इतकी वर्ष तिथे जे काही घडत होतं ते एखाद्या चित्रफितीसारखं फिरत होतं.

'देवा! काहीतरी मार्ग दाखव. मला माहितेय आत्तापर्यंत तूच सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या आहेस आणि पुढेही तू तुला हवं तसंच काम करून घेणार आहेस. फक्त आता तू जे संकेत देत आहेस ते ओळखण्याची क्षमता सुद्धा तूच दे.' कैलास मनोमन म्हणाला.

त्याला सतत डोळ्या समोर लॅबमध्ये असलेले वॉशरूम दिसत होते. रोजच्या रूटीनमध्ये त्याला तिथे काहीतरी वेगळं आहे हे जाणवू लागलं होतं आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं.

"सर एक गोष्ट आठवली." कैलास उत्साहात म्हणाला.

"काय? बोल पटकन." निनाद म्हणाला.

"सर इथे जे वॉशरूम आहे तिथे काहीतरी वेगळं आहे." कैलास म्हणाला.

"म्हणजे? काय वेगळं आहे?" निनादने विचारलं.

"सर म्हणजे मला एकदम परफेक्ट आठवत नाहीये पण जेवढं आठवतंय त्यानुसार मी वॉश बेसिनच्या खाली एक बटण बघितल्यासारखं वाटतंय. काही वर्षांपूर्वी म्हणजे मला इथे आणलं त्याच्या काही महिन्यातच असावं बहुदा; जेव्हा तिथे लिकेजचा प्रॉब्लेम झालेला तेव्हा ते रिपेअर करत असताना मला ते दिसलं होतं पण एवढ्यात रॉबर्ट तिथे आलेला आणि काम झालं का म्हणून विचारलं त्यामुळे ते राहिलं आणि नंतर माझ्या डोक्यात पुन्हा तो विचार आलाच नाही." कैलास म्हणाला.

"ग्रेट. जा बघ ते कसलं बटण आहे ते." निनाद म्हणाला.

कैलास लगेचच जाऊ लागला पण तेवढ्यात निनादनेच त्याला थांबवलं.

"कैलास! एक मिनिट थांब. ते बटण नक्की कसलं आहे याची खात्री करून घ्यावी लागेल. रॉबर्ट इतका मूर्ख नाहीये की इमर्जन्सी एक्झिट बटण असं तुला सहज दिसेल असं लावून ठेवेल." निनादने त्याची शंका बोलून दाखवली.

"हो बरोबर आहे सर तुमचं मी आधी पूर्ण खात्री करून घेतो. माझं मन मला नक्की बरोबर काय ते सांगेल. तो बघा तो बसलाय ना आपल्या सगळ्यांचा बाप तोच मार्ग दाखवेल." कैलास एकदम विश्वासाने त्याच्या डेस्कवर असलेल्या देवाच्या प्रतीमेकडे बोट दाखवून म्हणाला आणि वॉश रूमकडे जाऊ लागला.

निनाद फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. त्याचेही हात न कळत देवाच्या प्रतिमेकडे बघून जोडले गेले होते. त्याला विश्वास बसतच नव्हता की इतकी वर्ष असा एकाच जागी अडकून पडलेला माणूस एवढा सकारात्मक राहिला तरी कसा शिवाय तो इतकी वर्ष बंदिस्त राहून देखील मानसिक स्थिती देखील अगदी उत्तम कशी? पण त्याचं उत्तर तर त्याच्या समोरच होतं.

'खरंच आपण वैज्ञानिक प्रगती म्हणतो आणि परमेश्वराचे अस्तित्व नाकारतो! अश्या काळात समजते परमेश्वरी ताकद. कैलास तर एवढा मोठा वैज्ञानिक आहे तरीही त्याची देवावरची श्रद्धा किती दृढ आहे. आपण नको त्या चक्रात अडकतो आणि स्वतःच्या हातानेच आयुष्य किचकट बनवतो. कैलासकडून मात्र खूप काही शिकण्यासारखं आहे.' तो मनातच म्हणाला.

एवढ्यात कैलास पुन्हा खिडकी जवळ आला.

"सर तिथे कोणतंच बटण नाहीये." कैलास म्हणाला.

"अरे असं कसं? तुला नक्की आठवतंय का की तू बेसिनच्या खालीच बटण बघितलं होतं?" निनादने विचारलं.

"हो सर. नक्की." कैलास म्हणाला.

"अरे पण असं काही क्षणात एवढी मोठी सिस्टीम चेंज करणं तर शक्य नाहीच ना? आणि कोणी वॉश बेसिन खाली तर बल्ब किंवा इतर कसलं बटण लावणार नाही. नक्कीच काहीतरी वेगळं होतं त्या बटणामध्ये." निनाद म्हणाला.

"हो सर ते मलाही कळतंय. मी पुन्हा एकदा चेक करून येतो." कैलास म्हणाला आणि तो जात असताना त्याच्या डेस्कवर असलेल्या पुस्तकांना धक्का लागून ती पुस्तकं खाली पडली.

"अरे सावकाश." निनाद म्हणाला.

कैलासने फक्त हातानेच खूण करून तो ठीक असल्याचं सांगितलं आणि तो ती पुस्तकं उचलून पुढे जाणार तर त्याला तिथे काहीतरी दिसलं म्हणून तो तिथेच एकदम थबकला.

"काय झालं? काही आहे का तिथे?" निनादने त्याला असं एकदम थांबलेलं पाहून विचारलं.

"बहुतेक." कैलास म्हणाला आणि खाली वाकला.

त्याला त्या पुस्तकांच्या गठ्ठ्यातून एक लहान डायरी खाली पडलेली दिसली आणि तीच त्याने उचलली. त्याला काहीतरी आठवत होतं पण पटकन लक्षात येत नव्हतं अशी काहीतरी त्याची अवस्था झाली होती. त्याने आता त्या डायरीची एक एक पानं उघडायला सुरुवात केली. ती डायरी खूप जुनी आणि बरेच वर्ष हात न लावल्याने पानं एकमेकांना चिकटली होती आणि रंग देखील पिवळसर झाला होता.

'ही तर माझीच डायरी आहे. मला त्या रॉबर्टने इथे आणल्या पासून मी यात माझी दिनचर्या एका ओळीत लिहीत होतो. बरीच वर्ष ही डायरी सापडलीच नव्हती आणि मग मीही विसरून गेलो. पण आत्ता इथे कशी आली ही?' कैलास मनातच विचार करत ती डायरी चाळत होता.

त्या डायरीच्या प्रत्येक पानावर अगदी एका वाक्यात त्याने त्याचा दिवस कसा गेला हे लिहिलं होतं. साधारण दहा ते अकरा महिनेच त्याने ती लिहिली होती आणि नंतर त्याला डायरी न सापडल्याने आणि सतत रॉबर्टची नजर त्याच्यावर असल्याने त्याने ते सोडून दिलं होतं. कैलासला आता काही गोष्टी हळूहळू आठवत होत्या.

'मला तेव्हा खूप जास्त राग यायचा आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी ते लिहून काढायचो पुन्हा कधीही न वाचण्यासाठी. म्हणूनच या डायरीमध्ये मी एका पानावर लिहिलं आहे तर दुसरं कोरं सोडलं आहे.' कैलास मनातच म्हणाला.

तो अजूनही विचारातच होता आणि त्याला असं बघून शेवटी निनादनेच त्याला हाक मारली.

"कैलास अरे काय आहे एवढं त्यात? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे." तो म्हणाला.

"अम्? हो. सर यात नक्की काहीतरी असेल एक मिनिट." कैलासची एकदम तंद्री तुटली आणि तो म्हणाला.

त्याने लगेचच टेबलावर थोडी जागा करून तिथे पाण्याचे काही थेंब टाकले आणि त्या डायरीची पानं उघडून बघू लागला. निनाद बाहेरूनच सगळं बघत होता. कैलास त्या डायरीमध्ये रॉबर्ट कधी काही बोलला असेल आणि आपण लिहून ठेवलं असेल या आशेने व्यवस्थित ती बघत होता.

'मुळात ही डायरी या पुस्तकाच्या गठ्ठ्यात आलीच कशी हे कळत नाहीये आणि असं का वाटतंय यात काहीतरी असेल म्हणून?' कैलास मनातच म्हणाला आणि पटापट पानं पलटू लागला.

काही मिनिटं यातच गेली आणि अचानक तो एका पानावर थबकला. त्याने दोन तीन वेळा खात्री करून घेतली आणि पुन्हा त्या खिडकी जवळ गेला.

"सर! हे बघा. ही माझी तेव्हाची डायरी आहे. यात मी जेव्हा इथे नुकताच आलो होतो तेव्हाची दिनचर्या लिहिली आहे पण यात बघा एक गडबड आहे. इथे मी दहा मे तारीख टाकली आहे त्यांनतर डायरेक्ट पंधरा मे आहे. याचाच अर्थ चार दिवस गायब आहेत." कैलास निनादला ती डायरी दाखवत म्हणाला.

"म्हणजे? काहीतरी कळेल असं सांग." निनाद म्हणाला.

"सर अहो तेव्हा मी एकही दिवस यात खंड पडू दिला नव्हता. पुढे सगळ्या तारखा नीट आहेत. बरं असं म्हणावं की पानं फाटली असतील तर पेज नंबर पण बरोबर आहेत. याचाच अर्थ या चार दिवसात काहीतरी झालंय. माझ्या आयुष्यातून हे चार दिवस डिलीट कसे झाले हे शोधायला हवं." कैलास म्हणाला.

"अरे यार तू काय बोलतोयस अजिबात कळत नाहीये." निनाद पुन्हा गोंधळून म्हणाला.

क्रमशः.....
*****************************
सुशांतने तर सी.आय.डी.ला काही मेसेज पाठवले आहेत आणि नियतीने पूजाला जे डिव्हाईस लावलं आहे त्यातून सी.आय.डी.ला देखील त्या लोकांचं बोलणं समजणार आहे पण या सगळं असून देखील टीम ऋषभला कशी वाचवेल? कैलास निनादला काय सांगू पाहतोय? ऋषभच्या आईला जेव्हा तिच्या मुलाची अवस्था समजेल तेव्हा काय होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all