द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१२)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे ब्युरोमध्ये सुयश सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉ. विजय आणि नियती आले होते. अभिषेकची सतत फोनाफोनी सुरू होती आणि विक्रम देखील त्यातच व्यस्त होता.

"काय झालं? इतक्या अर्जंट का बोलावलं?" डॉ. विजयनी आल्या आल्या विचारलं.

"ऋषभवरचा ताबा सुटल्याने तो आता सगळीकडे मोकळेपणाने फिरतोय. पुढच्या दोन मिनिटात आता पंतप्रधान लाईव्ह येणार आहेत. देशात आणीबाणी जाहीर होणार आहे आणि जास्त नुकसान होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला लगेचच ऋषभचा पत्ता लावून त्याला विध्वंस करण्यापासून थांबवायचं आहे." सुयश सर हातातलं घड्याळ बघून म्हणाले.

"पण सर आपण त्याला शोधायचं कुठे?" नियतीने विचारलं.

एवढ्यात ब्यूरो मधला फोन वाजला. सोनालीने जाऊन तो उचलला.

"हॅलो, सी.आय.डी. ब्यूरो." ती म्हणाली.

समोरून कोणीतरी घाबरलेल्या आवाजात बोलत होतं. आवाज इतका कापरा होता की काहीही स्पष्ट कळत नव्हतं.

"हॅलो कोण बोलतंय? प्लीज तुम्ही आधी शांत व्हा आणि नीट सांगा." सोनाली समजावू लागली आणि सगळेच तिच्या भोवती गोळा झाले.

तिने फोन स्पिकरवर टाकला. काही सेकंद कसलाच आवाज आला नाही पण आता समोरचा माणूस सावरला असावा असं वाटत होतं. त्या माणसाच्या श्वासांचा आवाज अगदी स्पष्ट येत होता.

"हॅलो कोण बोलतंय?" सोनालीने पुन्हा विचारलं.

"हॅ..लो.. इथे.. इथे.. विचित्र प्राणी... वाचवाऽ" तो माणूस म्हणाला आणि अचानक फोन कट झाला.

"हॅलोऽ हॅलोऽ" सोनाली बोलत होती पण काहीच उपयोग झाला नाही.

"सर नक्कीच ऋषभ तिथे पोहोचला असणार." सोनाली रीसिवर पुन्हा नीट ठेवत म्हणाली.

"लगेच आलेल्या नंबरचे डिटेल्स मागव. डॉ. विजय आम्हाला तो अँटीडोट द्या." सुयश सर म्हणाले.

सोनाली तिला सांगितलेलं काम करू लागली आणि नियती त्या अँटीडोटची लहान सुटकेस सुयश सरांना देणार एवढ्यात डॉ. विजयनी ती तिच्या हातातून घेतली.

"काय करताय हे? आपल्याकडे वेळ कमी आहे." विक्रम म्हणाला.

"माहितेय म्हणूनच मी पण येणार आहे तुमच्या सोबत." डॉ. विजय म्हणाले.

सुयश सरांनी जेव्हा त्यांच्याकडे अँटीडोट मागितला तेव्हाच त्यांना अंदाज आला होता की, सी.आय.डी. आपल्याला तिथे घेऊन जाणार नाही म्हणूनच त्यांनी असं केलं होतं.

"तिथे धोका आहे आणि आम्ही तुमचा जीव असा धोक्यात नाही घालू शकत." सुयश सर म्हणाले आणि त्यांनी हळूच विक्रमला काहीतरी खूण केली.

ते बोलत असतानाच विक्रमने त्यांच्या हातातून सुटकेस घेतली आणि सगळे ताबडतोब तिथून निघाले.

"थांबा सगळे! आम्हीही सी.आय.डी.साठी काम करतो त्यामुळे आम्हीही येणार." नियती एकदम ठामपणे म्हणाली आणि कोणाला काही कळायच्या आत ते दोघं सी.आय.डी. ऑफिसर्सच्या मागे मागे गेले.

एवढ्यात सोनालीला तो कॉल कुठून आलेला याचं लोकेशन समजलं होतं आणि विक्रमने ताबडतोब तिकडे जायला गाडी काढली. सुयश सरांचं गाडीत बसल्या बसल्या देखील वरिष्ठांशी बोलणं सुरू होतं. तर दुसरीकडे पंतप्रधान लाईव्ह येऊन देशाला संबोधन करत होते.
*****************************
इथे त्या हॉटेलमध्ये ती चायनीज लोकं टीव्ही लावूनच बसली होती. पंतप्रधान देशात आणीबाणी जाहीर करतायत हे बघून त्यांना असुरी आनंद होत होता. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर न कळत उमटलेली चिंतेची लकेर या लोकांना आत्मिक समाधान देत होती तर पूजा आणि सुशांतचा त्या लोकांना बघून तिळपापड होत होता. सुशांतला तर आत्ताच या लोकांच्या मुसक्या आवळू असं वाटत होतं पण ऋषभ आणि बाकी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून तो संयम राखून होता.

'आत्ता हसा काय हसायचं आहे ते मग बघा माझा हा देश काय आणि कसं करतोय ते. कायमचं हसायला विसराल.' सुशांत मनातच चिडून म्हणाला.

त्याने कसाबसा स्वतःचा राग कंट्रोल केला होता. पूजाने त्याच्याकडे बघितलं आणि तिलाही सुशांतला किती राग आलाय याचा अंदाज होताच. तिने हळूच डोळ्यांनीच त्याला शांत होण्याची खूण केली.

"व्हॉट नेक्स्ट?" पूजाने घसा खाखरून त्या लोकांना विचारलं.

तिच्या या अचानक काहीतरी विचारण्यामुळे ते लोक भानावर आले आणि एकंदर परिस्थितीचा आता अंदाज आल्याने टीव्ही बंद करून पुढच्या प्लॅनसाठी सज्ज झाले. आता पूजा आणि त्या लोकांमध्ये संपूर्ण चायनीजमध्ये बोलणं होत होतं. सगळे बोलण्यात गुंतलेले पाहून सुशांतने हळूच मिशनसाठी घेतलेल्या मोबाईल वरून विक्रमला सिक्रेट कोडद्वारे काहीतरी मेसेज केला आणि तो पुन्हा एखाद्या घुम्यासारखा त्या लोकांची तोंड बघत बसला.

"हे यू गाय! यू इव्हन नो व्हॉट आर गोईंग इन युअर कंट्री?" त्या माणसाने कुत्सितपणे विचारलं.

त्याच्या या बोलण्याने सुशांतला खरंतर खूप चीड आलेली पण कसंबसं स्वतःला सावरुन तो मुद्दाम मराठीत बोलू लागला; "हो माहितेय. तुम्हीच बघा आता काय होईल."

"व्हॉट? व्हॉट आर यू सेयींग?" त्या माणसाने विचारलं.

"आय सेड येस आय नो. नाऊ इंडियन्स विल नो द पॉवर ऑफ डेव्हलप कंट्री." सुशांत वाक्य फिरवून म्हणाला.

त्याबरोबर ते लोक जोरात हसले आणि त्यातला दुसरा माणूस सुशांतकडे कुत्सित बघत चायनीजमध्ये काहीतरी बोलला. सुशांत जरी त्याला चायनीज कळत नाहीये असं दाखवत असला तरीही त्याला ते समजत होतं. सुशांतला आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा अनुभव असल्याने त्याला बऱ्याच भाषांचं ज्ञान होतं आणि याची कल्पना पूजाला देखील नव्हती. तिलाही सुशांतला चायनीज समजत नाहीये असंच वाटत होतं.

'मला चायनीज येत नाही असं समजून आमच्याच देशात येऊन आमच्याच देशाची बदनामी माझ्या समोर करताय काय? आत्ता काय बोलला रे तू? भारतात ही अशी लोकं आहेत म्हणूनच आपल्या सारख्यांना फायदा होतो? अरे कोणताही सच्चा भारतीय आपल्या मातृभूमीच्या विरोधात जात नाही. जे जातात ते मुळी भारतीय नसतातच. अजून थोडावेळ रे मग बघ आधीच हे बारीक असलेले डोळे अजून बारीक कसे करतो ते. टीव्ही काय पण स्वतःला आरश्यात पण बघायच्या लायकीचा ठेवत नाही.' सुशांत मनातच चडफडत म्हणाला.

तो त्या माणसाकडे एकटक बघत हा विचार करत होता. तो माणूस काही बोलायला जाणार एवढ्यात त्याचा फोन वाजला म्हणून तो बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. त्याच्या सोबत असलेली माणसं देखील त्याच्या मागे मागे गेली. रूम तशी लहानच असल्याने त्याचा आवाज स्पष्ट येत होता. त्याचं फोनवर बोलणं सुरु असताना पूजाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते पण सुशांत मात्र इकडे तिकडे बघत नुसता उभा होता.
******************************
इथे निनादमुळे कैलासला देखील बाहेर काय सुरू आहे याची बातमी मिळाली होती आणि तोही आता काळजीत होता.

"सर काहीतरी करा कारण मी पूर्ण खात्रीने नाही सांगू शकत माझा प्रयोग यशस्वी झालाय की नाही ते. जर ऋषभ आक्रमक झाला तर बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जातील." कैलास काळजीत म्हणाला.

"हो रे. आमचे प्रयत्न सुरूच आहेत. त्याआधी आता आम्हाला तुझी मदत लागणार आहे त्यासाठी तुला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. तुला इथून बाहेर काढण्याचा कोणता मार्ग आहे सांग." निनाद म्हणाला.

"सर ही लॅब साधीसुधी नाहीये. इथे दार उघडायला तर रॉबर्टचे फिंगरप्रिंट आणि आय प्रिंट लागतात. एकवेळ त्याचे फिंगरप्रिंट मॅनेज होतील पण आय लॉकसाठी काय करणार?" कैलास म्हणाला.

"काहीतरी विचार कर ना. तू आता सगळं इथवर केलं आहेस तर अजून थोडं. म्हणजे आपल्याला दार उघडूनच तुला बाहेर काढलं पाहिजे असं नाहीये तर आपण ते तोडू पण शकतो. फक्त कसं हे सांग. बाकी बंदोबस्त मी करतो." निनाद म्हणाला.

"सर हे दार तोडणं शक्य नाही होणार. ही टेक्नॉलॉजी वेगळी आहे. आपण दार तोडायला गेलो तर बजर वाजायला सुरुवात होईल, रॉबर्ट आणि त्याच्या साथीदारांना देखील याची खबर लागेल आणि मग ते लॅब तिथून देखील उडवू शकतात." कैलास म्हणाला.

"काहीतरी लूप होल असेलच ना? कैलास अरे कोणतीच गोष्ट परफेक्ट नसते. बघ ना विचार कर." निनाद म्हणाला.

त्याबरोबर कैलास विचार करू लागला. त्याला तिथे ज्या दिवसापासून आणलं अगदी त्या दिवसा पासून रॉबर्ट आणि त्याच्यात काही बोलणं झालंय का? हे तो डोक्यावर जोर देऊन आठवू लागला. शेवटी त्याला तिथे येऊन बरीच वर्ष झाली होती आणि रॉबर्ट सतत त्याच्यावर ओरडण्या शिवाय काहीच करत नव्हता त्यामुळे त्याला थोडावेळ लागत होता.

'देवा! या जगात तुझ्या शिवाय काहीच परफेक्ट नाहीये. आत्ता पर्यंत मार्ग दाखवत आलास ना आता यापुढेही काय करू ते सुचव. काहीतरी आहे जे मला आठवायला हवंय. काहीतरी मार्ग नक्कीच आहे पण लक्षात येत नाहीये. आता तुझ्या या बाळाची काळजी तुलाच घ्यायची आहे. तूच आता मला इथून बाहेर काढ.' कैलास मनातच बोलत होता.

"आठवतंय का काही? कुठेतरी एखादी एमर्जन्सी एक्झिट खिडकी, काहीतरी बटण किंवा एखादं गुप्त दार असं काही आहे का?" निनादने विचारलं.

त्याच्या बोलण्याने कैलासची तंद्री तुटली.

क्रमशः....
******************************
ऋषभला आता सगळे कसे रोखतील? तो यातून वाचेल का? त्या चिनी लोकांचा काय प्लॅन असेल? कैलास लॅबमधून बाहेर पडू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all