द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१०)

Story About Human Dinosaurs
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी. ऑफिसर्स आणि स्पेशल टीम सुयश सरांच्या केबिनमध्ये जाऊन काहीतरी प्लॅन करत होते. पूजा एकटीच बाहेर बसली होती आणि तिच्या प्रत्येक हालचालींवर सगळ्यांचं बारीक लक्ष होतं.

"सर आपण नक्की डोळेझाकपणे हिच्यावर कसा विश्वास ठेवायचा? जशी माहिती ती आपल्याला देत आहे तशीच त्यांनाही आपल्याबद्दलची माहिती देण्याचं काम ती करत असेल तर?" सुशांतने त्याची शंका बोलून दाखवली.

"मला तुझा रोख कळतोय. तुला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव आहे आणि म्हणूनच हे तुझ्या डोक्यात येणं साहजिक आहे. आपण तिची परीक्षा घेणार आहोत. तशी तर ती खूप जेन्युअन वाटतेय पण एवढ्या मोठ्या पातळीवर आपण रिस्क नाही घेऊ शकत." सुयश सर म्हणाले.

"म्हणजे आपण नक्की काय करायचं आहे?" विक्रमने विचारलं.

"आपल्याकडे दोन प्लॅन रेडी असतील. 'प्लॅन ए' आणि 'प्लॅन बी' तिला यातला एकच प्लॅन माहिती असेल आणि तोही अर्धाच. त्यावरून आपल्याला अंदाज येईल." सुयश सर त्यांच्या टेबलावर नकाशा अंथरून मुद्दाम त्यावर हात फिरवत बोलत होते.

पूजा जरी खऱ्या अर्थाने त्यांना मदत करायला आलेली असली तरीही सगळ्या देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव एकदम तिच्यावर विश्वास ठेवता येणार नव्हता. बराचवेळ त्यांचं प्लॅनबद्दल बोलणं झालं आणि सगळे बाहेर आले.

पूजा तिथे त्यांचीच वाट बघत होती. सुयश सरांनी तिला प्लॅन समजावून सांगितला. सी.आय.डी.ने ज्या पद्धतीने प्लॅन केला होता त्यानुसार आता पूजा तिच्या मिशनसाठी तयार झाली होती. ती आधीपासूनच त्या लोकांच्या प्लॅनचा भाग असल्याने तिला कधी आणि कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे हे माहिती होतं. ती तिच्या मिशनवर जायला निघणार एवढ्यात सुयश सरांनी तिला थांबवलं.

"पूजा तू आमची खूप मदत करत आहेस पण तरीही आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर डोळेझाकपणे विश्वास कसा ठेवायचा?" सुयश सरांनी अचानक विचारलं.

त्यांच्या या अश्या अचानक संशय घेण्यामुळे तिच्या चेहऱ्यावर कसे भाव उमटतात तेच त्यांना बघायचं होतं.

"सर मी खऱ्या अर्थाने आपल्या भारताच्या बाजूने आहे. जे सत्य मी इतकी वर्ष लपवलं आहे ते आता तुम्हाला दाखवायची वेळ आली आहे. एक मिनिट." पूजा तिच्या पर्समध्ये काहीतरी शोधत म्हणाली.

तिने तिच्या पर्समधून एक जुना फोटो काढला. तिच्या लहानपणीचा तो फोटो होता. जेमतेम दीड ते दोन वर्षांची असावी तेव्हा ती. त्या फोटोत ती संरक्षण दल प्रमुख कर्नल स्व. रॉय यांच्या कडेवर होती.

"हे तर…" विक्रम बोलत होता त्याला मध्येच तोडत पूजा बोलू लागली; "हे माझे पणजोबा! चीनबरोबरच्या एका चकमकीत त्यांना वीरमरण आलं."

"मग तुझं आडनाव आणि याचं?" अभिषेकने विचारलं.

"ती वेगळी स्टोरी आहे. आत्ता त्याला अजिबात वेळ नाहीये पण सर प्लीज ट्रस्ट मी." पूजा म्हणाली.

तिच्या बोलण्यात एक वेगळीच तळमळ आणि खरेपणाची भावना जाणवत होती. सुयश सरांनी फक्त अभिषेककडे बघितलं आणि डोळ्यांनीच हो म्हणलं. त्यांनतर ठरल्याप्रमाणे सी.आय.डी.ने पुन्हा एकदा त्यांचा प्लॅन पूजाला सांगितला. तिला तिचं काम व्यवस्थित समजावून सांगून तिची मानसिक तयारी आहे की नाही हेही बघितलं. त्यांनी प्लॅन एकदम परफेक्ट केलेला असला तरीही पूजाला काही होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.

"सर मी तयार आहे. मी आधीपासूनच त्या लोकांच्या प्लॅनचा भाग होते त्यामुळे काही गोष्टी मला माहिती आहेत. आता राहिला प्रश्न त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली असेल का? किंवा त्यांना माझ्यावर काही संशय आला तर? तर याचेही उत्तर आहे." पूजा म्हणाली.

आता ती एकदम आत्मविश्वासाने सगळं काही सांगत होती. दोन मिनिटांचा पॉज घेऊन तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

"तिथे माझं काम हे त्या लोकांना वेळोवेळी सावध करणं आणि इथल्या लोकांचा आणि त्यांचा वेळोवेळी संवाद घडवून आणणं हेच होतं त्यामुळे त्यांना माझ्यावर कोणताही संशय येणार नाही आणि आलाच तरीही ते सगळं मी मॅनेज करेन." पूजा म्हणाली.

"ठीक आहे. तुझ्या सेफ्टीसाठी आम्ही काही निर्णय घेतले आहेत. तुला त्या लोकांसमोर आम्हाला काहीही कॉन्टॅक्ट करता येणार नाही म्हणून एक पर्याय आहे." सुयश सर म्हणाले.

"कोणता?" पूजाने विचारलं.

"कळेलच. दोन मिनिटं फक्त." सुयश सर म्हणाले.

एवढ्यात नियती ब्यूरोमध्ये आली.

"सर तुम्ही सांगितलं ते डिव्हाईस आणलं आहे." ती आत येत येत म्हणाली.

"गूड. पूजाला ते सगळं समजावून सांग." सुयश सर म्हणाले.

नियतीने लगेचच पूजाच्या पाठीला तिच्या शर्टच्या कॉलर खाली ते छोटंसं डिव्हाईस लावलं. लहान टिकली सारखं दिसणारं ते डिव्हाईस सी.आय.डी.ची खूप मदत करणार होतं.

"सर हे नक्की काय काम करेल?" पूजाने विचारलं.

"हे एक ट्रेसिंग डिव्हाईस आहे. समजा तुझा फोन बंद झाला किंवा तुझी आणि आमची चुकामूक झाली तर यामुळे आम्ही तू कुठे आहेस हे शोधू शकतो." नियती म्हणाली.

"ओके. मग निघू मी?" पूजाने विचारलं.

"एक मिनिटं. हा मोबाईल तुझ्याकडे ठेव. तुला आता तुझा मोबाईल वापरता येणार नाहीये. त्या लोकांना जराही संशय यायला नकोय. या पुढे तू आम्हाला या मोबाईल वरून कॉन्टॅक्ट करायचा." सुयश सर तिच्या हातात दुसरा मोबाईल देत म्हणाले.

"ओके सर." पूजा म्हणाली.

सुयश सरांच्या ऑर्डर नंतर पूजा तिच्या मिशनवर जायला निघाली. पूजा सोबत सुशांत जाणार होता पण त्या लोकांना संशय येऊ नये म्हणून तिच्या नंतर तो काहीतरी बहाणा काढून त्या लोकांच्या गटात सामील होणार होता. सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं. या सगळ्यात अजून पाऊण तास होऊन गेला होता आणि तिथे ऋषभवरचा कंट्रोल सुटला आहे याची तिळमात्र कल्पना कोणालाही नव्हती.
********************************
इथे रॉबर्ट तर पळून पुन्हा त्याची लॅब उभारली होती तिथेच आलेला. निनादने त्याला त्या जंगलातून जाताना बघितलं होतं आणि त्याचा पाठलाग करत तो तिथवर आला होता. त्याने कैलासला विश्वासात घेऊन आधीच सी.सी.टीव्ही आणि बाकी सिक्युरिटीमध्ये छेडछाड करून ठेवली होती त्यामुळे रॉबर्टला तो दिसण्याची शक्यता कमी होती. रॉबर्ट पळत पळत लॅबमध्ये येऊन बसला होता. यामुळे त्याला चांगलीच धाप लागली होती.

"काय झालं सर? तुम्ही असे अचानक? कोणाला काही समजलं आहे का?" कैलासने माहिती काढण्यासाठी रॉबर्टची काळजी वाटतेय असे आव आणत त्याला विचारलं.

"जरा गप्प बस ना. दिसत नाहीये का मला धाप लागली आहे ते? पाणी दे आधी." रॉबर्ट त्याच्यावरच खेकसला.

कैलासने लगेच त्याला पाणी दिलं आणि काहीही न बोलता तो पुन्हा त्याचं काम करायला गेला.

'देवा आता नक्की काय घडलं आहे हे तुलाच माहीत पण त्या पोरावर आणि देशावर काहीही संकट येऊ देऊ नकोस.' कैलास मनातच म्हणाला.

एवढ्यात रॉबर्ट उठून तिथे आला.

"जरा ऋषभ ट्रेस होतोय का बघ." तो घाईत म्हणाला.

कैलास काही बोलायला जाणार एवढ्यात रॉबर्टनेच त्याच्या हातातून लॅपटॉप ओढून घेऊन काम करायला सुरुवात केली.

"सर नक्की काय घडलं आहे? तुम्ही एवढे टेंशनमध्ये का आहात?" कैलासने पुन्हा विचारलं.

याकडे रॉबर्टचं अजिबात लक्ष नव्हतं. तो त्याच्याच विचारत ऋषभचा काही पत्ता लागतोय का हे बघत होता.

"शी! माझा एवढा मोठा प्रोजेक्ट. कुठे गेला असेल हा? मला असं स्वस्थ बसून चालणारच नाहीये. काहीतरी केलं पाहिजे." रॉबर्ट म्हणाला.

कैलास फक्त त्याच्याकडे बघत होता. बाहेरून निनाद देखील हे सगळं ऐकत होता आणि नक्कीच काहीतरी मोठं घडलं आहे हे त्याला समजलं होतं फक्त पूर्ण माहिती मिळवून मगच बाकीच्यांना सांगू म्हणून तोही काय घडलं आहे हे कधी समजतंय याची वाट बघत होता.

"कैलास अरे ते लोक डायनासोरला घेऊन निघून जाणार होते पण त्याआधी त्यांना माझाच गेम करायचा होता. बरं मला आधीच संशय होता त्यामुळे मी ऋषभवर अजून एक चीप लावून ठेवली होती. त्या चीपने कंट्रोल करता करता माझाही त्याच्यावरचा ताबा सुटला आणि तो आता कुठे गेला आहे हे मला माहीत नाहीये." रॉबर्ट म्हणाला.

"क.. काय? मग आता?" कैलासने काळजीने विचारलं.

"आता काय? मी चाललो इथून थोड्या दिवसांनी पुन्हा येईन. तोवर तू ऋषभ ट्रेस होतोय का हे बघायचं." रॉबर्ट घाईत म्हणाला.

क्रमशः.......
**********************************
कैलास आता काय करेल? पूजा सी.आय.डी.ची कशी मदत करेल? त्यांचा प्लॅन काय असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all