द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -११)

Story About Human Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -११)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रॉबर्ट तर तिथून पळून जाण्याचा प्लॅन करत होता पण कैलासला त्याच्यापेक्षा जास्त ऋषभची काळजी वाटत होती. त्याने अभिषेकला जसं सांगितलं होतं की, त्याने त्या फॉर्म्युल्यामध्ये काहीतरी बदल केले होते ज्यामुळे ऋषभ जास्त हिंस्र होणार नाही हे नक्की यशस्वी झालंय का? याचा काहीच अंदाज त्याला लागत नव्हता.

'हा रॉबर्ट इथून चालला आहे ते बरंच आहे म्हणजे याला इतक्यात तरी काही समजणार नाही. फक्त आता मी याचा मागोवा कसा काढू? हेच कळत नाहीये.' कैलास मनातच विचार करत होता.

त्याला विचारात गढलेलं पाहून रॉबर्ट त्याच्यावर जोरात ओरडला; "तुला एवढा विचार करण्याची गरज नाही. जे काम दिलंय ते कर आणि त्या लोकांपैकी कोणी इथे आलं तरीही तोंड उघडायचं नाही. अर्थात इथे कोणी पोहोचू शकेल असं वाटतच नाहीये. लवकरच आता देशात आणीबाणी जाहीर होतेय की नाही बघ." रॉबर्ट एकदम कुत्सितपणे बोलून निघाला.
*******************************
इथे पूजा ठरल्याप्रमाणे तिची चाल खेळत होती. बाहेर पडल्यावर तिने त्या लोकांना संपर्क केला. आधी तर ती भारतात कधी? आणि कशी आली? याचीच ते लोक चौकशी करत होते पण तिने सगळं सावरुन घेतलं.

'पहिला टप्पा तरी पार पडला. आता त्यांच्यात सामील होऊन त्यांच्याच विरोधात पुरावे देखील गोळा करावे लागतील.' ती स्वतःशीच म्हणाली.

थोडा विचार करून आणि सी.आय.डी.ने ज्याप्रकारे प्लॅन आखला आहे त्याचा पुन्हा एकदा मनात सराव करून ती पुढे चालू लागली. चालत असतानाच तिला सध्या ते लोक कुठे आहेत? याचा पत्ता मेसेजद्वारे मिळाला. पत्ता बघून तिने दोन मिनिटं थांबून दीर्घ श्वास घेतला आणि ती पुढे चालू लागली. वाटेत जाताना तिला एक बाप्पाचं देऊळ दिसलं. सध्या तिला मनोबलाची देखील गरज होतीच. ती तिथे गेली पण वेळेचं भान ठेवून दोनच मिनिटात ती देवळातून बाहेर आली.

'हे सगळं करायला माझ्यात कसं आणि कुठून बळ येणार आहे हे त्यालाच माहीत. आपण कितीही विज्ञानात प्रगती केली तरीही ही परमेश्वरी शक्ती नाकारू शकत नाहीच. म्हणतात ना जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. बघूया आता काय काय होतंय. आता मला फक्त इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाहीये.' ती मनातच स्वतःशीच बोलत चालली होती.

तिला तिच्या इच्छित स्थळी पोहोचायला फारशी अशी काही अडचण येणार नव्हतीच कारण आजच्या तंत्रज्ञानाचा ती व्यवस्थित वापर करत होती. मोबाईलवरच रस्ता बघत बघत ती चालत होती तरीही तिच्या डोक्यात मात्र सी.आय.डी.ने सांगितलेला प्लॅनच घोळत होता.

'आता जसं सुयश सरांनी सांगितलं आहे तसं मी त्यांच्याशी बोलून सी.आय.डी.ला काही क्लू देण्याचा प्रयत्न करेन. सुशांत सर तर माझ्या मागावर आहेत आणि नंतर तेही माझ्या सोबत सामील होणार आहेत असं ठरलं आहे फक्त आता ते सामील होतील तेव्हा मला त्यांच्यावर कोणीही संशय घेणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी लागेल.' ती मनातच म्हणाली.

या विचारात असतानाच ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचली. एका सामसूम जागी असलेल्या हॉटेलात ते लोक थांबले होते. बाहेरून सगळं हॉटेल न्याहाळून पूजा कसलेतरी अंदाज बांधत होती.

'इथे कसे आले असतील हे लोक? दिसताना तर हे हॉटेल अगदी साधं आणि लहान वाटतंय. माझ्या माहितीप्रमाणे तरी त्यांनी भारतात कोणत्याही हॉटेलमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला होता. मग अचानक?' ती मनातच सगळा परिसर न्याहाळत म्हणाली आणि आत गेली.

एकच मजली असलेलं ते हॉटेल आतूनही जास्त मोठं नव्हतं. जेमतेम सहा ते आठ खोल्या असतील एवढंच ते होतं.

"हॅलो मॅम!" छोट्याश्या रिसेप्शनवर असलेल्या मुलाने तिचं स्वागत केलं.

तिनेही स्मित करून त्याला दाद दिली आणि सरळ मुद्द्याकडे वळणार तर तोच मुलगा बोलू लागला; "मॅडम तुमची काही गाडी वैगरे खराब झाली आहे का? आणि तुम्ही इथे राहण्याचा विचार करत असाल तर एकही रूम शिल्लक नाहीये."

"नाही तसं काहीच नाही. मला इथे काही लोक थांबले आहेत त्यांना भेटायचं आहे. हे बघा त्यांचे रूम नंबर." पूजा म्हणाली आणि त्याला रूम नंबर सांगितले.

तोवर सुशांतने आत एन्ट्री घेतली. त्याचा आत्ताचा वेश अगदी नवशिक्या असिस्टंटसारखा होता. तो पूजाच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याच्या हातात कसलीतरी सुटकेस आणि खांद्याला लॅपटॉप बॅग होती.

"बोला सर काय हवंय तुम्हाला?" त्या मुलाने विचारलं.

"तो माझ्यासोबत आहे. प्लीज तुम्ही लवकर सांगा ना कुठे आहे यांची रूम?" पूजा म्हणाली.

"हो सांगतोय. त्याआधी मला त्यांच्याशी एकदा बोलून घेऊ दे." तो मुलगा म्हणाला आणि त्याने इंटरकॉमवरून फोन लावला.

तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये त्याला बोलताना पाहून पूजानेच त्याच्याकडून फोन घेतला आणि ती तिथे पोहोचल्याची बातमी त्यांना दिली. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि तिने पुन्हा त्या मुलाला फोन दिला. त्याने "येस, येस" करत फोन ठेवला आणि पूजाला त्यांची रूम दाखवली.

"अजबच माणसं आहेत. आधी ती चार माणसं आली आणि सगळं हॉटेल बुक करून ठेवलं, आता हे ध्यान आलंय. आपल्याला काय वर्षभराची सगळी कमाई चार दिवसात मिळतेय." तो मुलगा स्वतःशीच पुटपुटला.

तो पुटपुटला असला तरीही सुशांतच्या कानावर ते शब्द पडले होते आणि त्याला या गोष्टीचं जराही आश्चर्य नव्हतं कारण सी.आय.डी. सगळ्यात आधी मोठमोठ्या हॉटेल्सवर त्यांचा शोध घेणार आणि कुठल्यातरी सी.सी.टीव्ही.मध्ये ते लोक दिसणार म्हणूनच त्यांनी हा पर्याय निवडला होता. पूजा पहिल्या माळ्यावर असलेल्या एका खोलीच्या बाहेर आली आणि रूमला असलेली बेल वाजवली. बेलचा आवाज ऐकून त्यातल्या एका माणसाने आय होलमधून बघून आधी खात्री करून घेतली आणि मगच दार उघडलं. सुशांत त्या लोकांना दिसणार नाही असाच आडोश्याला उभा होता. पूजा जशी खोलीत गेली तसा सुशांत देखील तिच्या मागून आत जाऊ लागला. त्या लोकांनी लगेचच त्याच्यावर गन रोखल्या. तोही खूप घाबरल्यासारखे आव आणून दोन्ही हात वर करून उभा होता.

"ही इज माय असिस्टंट." पूजा पटकन म्हणाली त्यामुळे त्यांनी गन खाली केली आणि त्याला आत ओढून घेऊन पटकन दार लावून घेतलं.

ते लोक आता पूजाशी चायनीजमध्ये काहीतरी बोलत होते. त्यांच्या आवाजावरून ते लोक चिडलेले आहेत हे समजत होतं.
***************************
निनादने जे बोलणं ऐकलं होतं ते लगेचच सुयश सरांना फोन करून सांगितलं. या केसमध्ये आता खूप जास्त ट्विस्ट येत होते आणि केस अजूनच किचकट होत होती. निनादने केलेल्या रिपोर्टमुळे आता देशावर खूप मोठं संकट घोंगावत आहे हे सगळ्यांना जाणवलं होतं. आता हे प्रकरण पार नरड्याशी आलं होतं.

"सर आता काय करायचं? देशात खूप मोठी दहशत पसरणार यामुळे." सोनाली म्हणाली.

"तोच विचार करतोय. आता हीच ती वेळ जनतेला विश्वासात घेण्याची. काही अघटीत होण्याआधी आपल्याला हालचाली कराव्या लागणार आहेत. मी आलोच." सुयश सर म्हणाले आणि ते त्यांच्या केबिनमध्ये फोन करायला गेले.

त्यांनी डी.सी.पी. सरांना याबद्दल सांगितलं आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. थोड्याच वेळात ते केबिन बाहेर आले.

"माझं वरिष्ठांशी बोलणं झालंय. सगळ्या यंत्रणा आता हाय अलर्टवर आहेत आणि थोड्याच वेळात देशात आणीबाणी जाहीर होणार आहे. पुढच्या पाच मिनिटात पंतप्रधान लाईव्ह येऊन देशाला संबोधन करणार आहेत." सुयश सर म्हणाले.

सध्या ऋषभ मुंबईतच आहे असं गृहीत धरून चाललं तरी त्याचा वेग आणि बळ बघता संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा विचार करून पूर्ण देशच सुरक्षित रहावा म्हणून हे पाऊल उचलण्याचा सरकारने निर्णय घेतला होता.

"सर पण तोवर ऋषभच काय? आपल्याला हेही माहिती नाहीये की, ऋषभ जर जास्तच आक्रमक झाला आणि त्याच्या हल्ल्यात जर कोणी जखमी झालं तर त्याचं रूपांतर डायनासोरमध्ये होणार नाही ना?" ईशा म्हणाली.

"ते सगळं आपण कैलासला विचारू. गणेश! तू डॉ. विजय आणि नियतीला अँटीडोट घेऊन लगेच इथे बोलावं." सुयश सर म्हणाले.

ब्युरोमध्ये आता सगळ्या हालचालींना खूप वेग आला होता.
***************************
इथे कंट्रोल सुटलेला ऋषभ त्याच्या मनात येईल त्या दिशेने पळत सुटला होता. वाटेत येणारी झाडं, खांब तर मुळासकट उपटून तो पुढे जात होता. नेमका तो सामसूम भाग संपला होता आणि आता एका लहानशा गावाबाहेर त्याने एन्ट्री केली होती. त्याच्या हिरव्या आणि लंबगोलाकार डोळ्यांनी तो आपलं सावज शोधत होता. गावकऱ्यांनी आपल्या शेळ्या, मेंढ्या तिथे चरायला सोडल्या होत्या त्यावरच त्याची नजर होती. सगळीकडे बघून त्याने एकेका प्राण्यावर झडप घालायला सुरुवात केली. प्राण्यांचे ओरडल्याचे कर्ण कर्कश्य आवाज ऐकून मेंढपाळ धावत आले आणि समोरचं भयानक दृश्य पाहून स्वतःचा जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळू लागले. आता ही बातमी पूर्ण देशभर व्हायला वेळ लागणार नव्हता.

क्रमशः....
*****************************
देशात तर आता आणीबाणी जाहीर होतेय पण सगळे घरात तरी सुरक्षित राहू शकतील का? सी.आय.डी. आता काय करेल? पूजा तिच्या प्लॅनमध्ये कितपत यशस्वी होतेय? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all