द डी.एन्.ए. (भाग -९)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
निनाद आणि सोनाली डॉ. विद्यावर्धन यांच्या लॅबमध्ये चौकशी करत होते आणि डॉ. शहांनी त्यांना कोणत्या तरी सिक्रेट प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं. डॉ. शहांना निनादने त्या प्रोजेक्टबद्दल काही सांगू शकाल का? म्हणून विचारलं होतं त्यामुळे जरा ते विचारात पडले होते.

"सर, काय झालं? सांगताय ना? कदाचित या माहितीमुळे आम्ही केसमध्ये एक पाऊल पुढे जाऊ." सोनाली म्हणाली.

"हम्म. ठीक आहे. मी सांगतो. जर माझ्या एका माहितीमुळे ऋषभबद्दल काही समजणार असेल तर नक्कीच सांगतो. पण माझी एक अट आहे, मी तुम्हाला आत्ता जे काही सांगेन याची वाच्यता बाहेर कुठेही करू नका." डॉ. शहा म्हणाले.

"ओके. तसंही आम्ही ही माहिती फक्त आमच्या ऑफिसर आणि संबंधित लोकांमध्येच ठेवणार आहोत. तुम्ही सांगा आणि यात तुमचं नाव कुठेही येणार नाही याचीसुद्धा काळजी घेऊ." निनाद म्हणाला.

"ओके. थँक्यू सर." डॉ. शहा म्हणाले आणि दोन मिनिटं थांबून घसा खाकरून त्यांनी बोलायला सुरुवात केली; "साधारण चौदा, पंधरा वर्षांपूर्वी एक कॉन्सेप्ट इथल्या एका सिनिअर वैज्ञानिकांनी मांडली होती. रॉबर्ट... हो रॉबर्ट सर! त्यांनी कुठूनतरी डायनासोरची अंडी आणली होती. त्यांनी पुन्हा एकदा डायनासोर पृथ्वीतलावर आणून त्यावर रिसर्च करू आणि त्या प्रजातींचा फायदा आपल्याला करून घेऊ अशी संकल्पना सगळ्यांसमोर मांडली. प्रत्येकाला ते पटलं. त्यांनी पूर्ण अभ्यास करून कसा आपल्याला डायनासोरचा उपयोग होईल हेसुद्धा स्पष्ट केलं होतं. काही जनुकीय बदल करून त्यांची साईझ आपण आपल्या सोईनुसार कमी ठेवूया असंही त्यांनी सांगितलं. सगळ्या प्रोसिजर पूर्ण झाल्या, वैज्ञानिकांची एक टीम बनली ज्यात रॉबर्ट सर आणि डॉ. विद्यावर्धन हे सिनियर होते. ते दोघं सगळ्यांना लीड करणार होते. एक दोन वर्ष सगळं काही नीट सुरू होतं, पण या काळात रॉबर्ट सर आणि डॉ. विद्यावर्धन सर यांच्यात मतभेद होऊ लागले. विद्यावर्धन सरांनी खूप प्रयत्न करून या प्रोजेक्टसाठी मिळणारे फंडस् थांबवून त्याची परवानगीसुद्धा काढून घेतली. रॉबर्ट सर मात्र तेव्हा खूप थयथयाट करत होते. परिणामी त्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केलं. तेव्हा त्यांचा एक पर्सनल असिस्टंट होता जो नव्याने रुजू झाला होता त्यालाही ते घेऊन गेले. त्यानंतर मग बरेच महिने जरा शांततेत गेले. रॉबर्ट सरसुद्धा एकदम नॉर्मल झाले होते आणि तेही नंतर विद्यावर्धन सरांना जाऊन भेटले, त्यांची माफी मागितली आणि त्यांना थँक्यू सुद्धा म्हणाले होते. सगळं काही आता पुन्हा पूर्ववत झालं असं वाटलं होतं तोवर काही दिवसात ऋषभबद्दल समजलं आणि विद्यावर्धन सरही हे जग सोडून गेले."

"नक्की असं काय झालं म्हणून डॉ. विद्यावर्धन असे वागले याबद्दल काही सांगू शकता का?" निनादने विचारलं.

"इतकं खोलात काही माहीत नाहीये, पण बहुतेक रॉबर्ट सरांचा प्रोजेक्ट नंतर फार भयानक वळण घेणार होता; कदाचित यामुळे सगळीकडे विध्वंस घडला असता, म्हणून त्यांनी हे थांबवलं. त्यात आपल्या देशात काहीतरी मोठा रिसर्च होतोय हे माध्यमांना समजलं होतं सतत त्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या त्यामुळे रॉबर्ट सर आणि विद्यावर्धन सरांना नेहमी फोन यायचे नक्की कोणता रिसर्च सुरू आहे? त्यांच्यावर मेंटल प्रेशर फार वाढत होतं." डॉ. शहांनी जे आठवलं ते सगळं सांगितलं.

"ओके. पण या सगळ्यात डॉ. विद्यावर्धन यांनी हा प्रोजेक्ट थांबवला त्याचं काही वेगळं कारण नव्हतं ना? म्हणजे त्यांना धमकीचे फोन वगैरे?" सोनालीने विचारलं.

"नाही माहीत. प्रोजेक्ट अर्ध्यावर स्थगित केल्यावर सगळं नॉर्मल वाटत होतं. विद्यावर्धन सर थोडे उशिरा कामाला यायचे पण त्यांनी असं काही कधी सांगितलं नाही." डॉ. शहा म्हणाले.

"ओके. थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल. आम्ही आता येतो. पुन्हा काही मदत लागली तर त्रास देऊ." निनाद म्हणाला आणि दोघं पुन्हा सी.आय.डी. ब्युरोमध्ये यायला निघाले.
***************************
विक्रम आणि ईशासुद्धा शाळेतून सगळी माहिती घेऊन सी.आय.डी. ब्युरोमध्ये यायला निघाले होते. भर दुपारच्यावेळी दोघं बाईक वरून चालले होते.

"ईशा! दुपार झालीच आहे काहीतरी पटकन खाऊन मग जाऊया का?" विक्रमने विचारलं.

"चालेल सर. इथे पुढच्या टर्निंगला मस्त तवा पुलाव मिळतो तो खाऊया. पटकन जाता येईल म्हणजे." ईशा म्हणाली.

"तेच तर नकोय." विक्रम तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

ईशाला काहीही ऐकायला गेलं नाही म्हणून तिने त्यांना "काही म्हणालात का?" विचारलं.

"नाही. काही नाही. जाऊया तिथे." विक्रम म्हणाला.

दोनच मिनिटात दोघं त्या स्टॉलवर पोहोचले. मस्तपैकी गरमागरम तवा पुलावची ऑर्डर देऊन तिथे असलेल्या टेबल खुर्चीवर दोघं बसले. एक मिनिटभर शांततेत गेला. ईशा सगळीकडे बघत होती, पण विक्रम मात्र तिच्याकडेच बघत होता.

'किती छान आणि मनमिळावू आहे ही. आज बोलू का माझ्या मनातलं? की नको? तिला काय वाटेल? नाही नकोच. आज नको.' तो त्याच्याच विचारात होता.

एवढ्यात त्यांचा तवा पुलाव आला आणि ईशाने त्याच्यासमोर टिचकी वाजवून त्याला भानावर आणलं.

"सर! अहो लक्ष कुठे आहे? चला पटकन खाऊन घेऊ आणि निघू. सगळे वाट बघत असतील." ईशा म्हणाली.

"हो." विक्रम म्हणाला.

दोघं खाऊ लागले पण त्याच्या मनात सारखं 'आज बोलूया का?' म्हणून विचार येतच होते. आज निदान कुठूनतरी सुरुवात करुया म्हणून त्याने विचार केला आणि बोलू लागला; "ईशा! तुला कशी गं ही जागा माहीत? म्हणजे तू याआधी इथे तवा पुलाव खाल्ला आहेस का?" त्याने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.

"हो सर! सर, अहो कॉलेजमध्ये असताना आम्ही इथला तवा पुलाव खाल्ला नाहीये तर अक्षरशः हाणला आहे. आम्ही सगळे मित्रमैत्रिणी मिळून नेहमी इथे खायला यायचो." ईशा म्हणाली.

"अच्छा." विक्रम म्हणाला.

ईशाच्या बोलण्यावरून विक्रमला आपण बोलावं की नाही याचा काहीही अंदाज येत नव्हता. तो पुन्हा विचार करता करता खाऊ लागला आणि त्याला ठसका लागला.

"सरऽऽ अहो जरा सावकाश. हे घ्या पाणी." ईशाने त्यांना पाणी दिलं.

विक्रमला जरा बरं वाटलं तेव्हा ती बोलू लागली; "सर तुम्हाला काही बोलायचं आहे का? मगाच पासून मला जाणवतंय."

"अम्? नाही. काही नाही. चल तुझं झालं असेल तर निघुया." तो म्हणाला आणि दोघं निघाले.

सी.आय.डी. ब्युरोमध्ये सोनाली आणि निनादसुद्धा पोहोचले होतेच आणि या दोघांचीच सगळे वाट बघत होते. आधी निनाद आणि सोनालीने त्यांच्या हाती जी माहिती लागली ती सांगितली.

"ठीक आहे. जयश्री मॅडमना इथे बोलवून घेऊया आणि डॉ. विद्यावर्धन शेवटी शेवटी काळजीत असायचे का? किंवा त्यांच्या घरी कधी धमकीचे फोन आलेत का? याची चौकशी करुया." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." सोनाली म्हणाली.

नंतर विक्रम आणि ईशाने त्यांना जी माहिती मिळाली ती सांगितली.

"बरं. त्या श्यामच्या पत्त्यावर गणेश तू जाऊन ये. जर तो तिथेच भेटला तर आण उचलून त्याला." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." गणेश म्हणाला आणि लगेचच तो बाहेर गेला.

"बरं विक्रम माजी मुख्याध्यापकांबद्दल काही समजलं? आणि ऋषभचा मित्र?" सुयश सरांनी विचारलं.

"सर शाळेतून बाहेर पडताना मी त्यांना फोन केला होता, माजी प्रिन्सिपल जाधव सर आता हयात नाहीत. ते रिटायर झाल्यावर त्यांच्या मुलाकडे परदेशात गेले होते आणि वर्षभरापूर्वीच ते हे जग सोडून गेले असं समजलं. ऋषभच्या मित्राबद्दल म्हणाल तर त्यावेळी तो एका चाळीत राहत होता आज ती चाळ अस्तित्वात नाहीये. मी माझ्या खबरीला कामाला लावलं आहे. म्हणजे त्यावेळी त्या चाळीत कोण कोण राहत होतं? आणि आता सगळे कुठे कुठे शिफ्ट झालेत? हे तो सांगेल लवकरच." विक्रमने सांगितलं.

"ओके गुड. आम्हा दोघांना या क्लिपमध्ये एक गोष्ट राहून राहून खटकते आहे ती बघा." सुयश सर म्हणाले आणि त्यांनी अभिषेकला ती क्लिप लावायला सांगितली.

अभिषेकने ती क्लिप मोठ्या प्रोजेक्टरवर लावली.

"हे बघा. इथे ऋषभची बॉडी आणली. ती ठेवेपर्यंत डॉ. विद्यावर्धनना काहीतरी त्रास होऊ लागला आहे. त्यांना घाम येतोय आणि ते हात सारखा छाती जवळ नेतायत. हा इथे डाव्या बाजूला माणूस आहे तो मात्र सगळं बघतोय पण काहीही करत नाहीये. डॉक्टर आता कोसळले आणि यानेच जाऊन त्यांना धरलं. नाडी तपासली आणि तेही आता या जगात नाहीत हे सांगितलं. पण याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य दिसतंय. याला हवं तेच घडलं असे काहीसे भाव याच्या चेहऱ्यावर उमटले आहेत. जयश्री मॅडम तर या सगळ्यात भानावर नाहीयेत. हाच माणूस पुढे होऊन सगळं करतोय. आपल्याला याच माणसाबद्दल आता काही माहिती मिळतेय का? हे बघायचं आहे. नक्की इथे काहीतरी पाणी मुरतंय." सुयश सरांनी सगळं सविस्तर सांगितलं.

क्रमशः......
**************************
सी.आय.डी. रॉबर्टच्या जवळ पोहचत तर आहे पण वेळीच हे सगळं त्यांना समजेल का? पुढचा काय अनर्थ असणार आहे? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all