द डी.एन्.ए. (भाग -८)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कामाच्या गडबडीत कैलास रात्रभर झोपलाच नव्हता. त्याच्या डोळ्यावर आता झोपेची प्रचंड झापड येत होती आणि सतत विचार करून, त्या केस स्टडी अभ्यासून त्याचा मेंदूसुद्धा फार थकला होता. शारीरिक मेहनतीपेक्षा मानसिक, बौद्धिक मेहनत घेतल्याने जास्तच त्याला दमायला झालं होतं. आता काही आपल्याला अजून दोन मिनिटंसुद्धा कामावर फोकस करता येणार नाही; हे जाणून तो त्याच्या टेबलावरच डोकं ठेवून झोपला. त्या लहानशा खिडकीतून मंद तरीही थंडगार वारा येत होता आणि त्यामुळे कैलास अगदी लगेचच डोळे मिटता क्षणी निद्रेच्या अधीन झाला. कामापेक्षा जास्त तो त्याच्या विचारात आणि पुढे नक्की काय होणार आहे? या भीतीच्या आहारी गेल्याने एवढा थकवा त्याला जाणवत होता. त्याची झोपमोड झाली ती त्याच्या फोनच्या रिंग मुळे. त्याने लगेच उठून आधी तोंडावरून हात फिरवला आणि फोन उचलला.

"हॅलो. गुड मॉर्निंग कैलास." समोरून अर्थातच रॉबर्ट बोलत होता.

"गुड मॉर्निंग सर." कैलास कसाबसा म्हणाला.

त्याच्या मनात 'कसली गुड मॉर्निंग? सकाळ सकाळ केला फोन डोकं खायला, जरा वाटलं होतं हा इथून गेल्यावर सुटकेचे चार श्वास घेता येतील पण कसलं काय?' हेच विचार चालू होते.

त्यात त्याची झोप अर्धवट झाल्याने जरा जास्तच चिडचिड होत होती, पण त्याला सगळा राग मनात दाबून ठेवण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

"मी यासाठी फोन केला होती की मी उद्या रात्री तिथे येईन. उद्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात असलेलं काम करायचं आहे. सगळी तयारी करून ठेव." रॉबर्ट म्हणाला तेव्हा कैलास भानावर आला.

"ओके सर. पण सर त्याला लागणारं सगळं भांडवल?" कैलासने थोडी माहिती मिळावी म्हणून अडखळत विचारलं.

"त्याची काळजी करण्याची गरज तुला नाही. जे सांगितलं आहे ते कर आणि आजकाल तू जरा जास्तच प्रश्न विचारायला लागला आहेस. नक्की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात?" रॉबर्टने आता जरा रागात आणि संशयात विचारलं.

"नाही... काही नाही सर. असं काही असतं तर तुम्ही इतकी वर्ष मधे मधे कामासाठी बाहेर जाता तेव्हाच मी काही केलं नसतं का? सर अहो तुमच्यामुळे मी आज इतर माझ्या सहकाऱ्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त श्रीमंत आहे, शिवाय आता तुमचा असिस्टंट म्हणून मी आता या प्रोजेक्टनंतर नावारूपालासुद्धा येणार आहे ना? मग मी असं काही का करेन?" कैलास एकदम भोळेपणाचा आव आणत म्हणाला.

"ठीक आहे. ठीक आहे. जे सांगितलं ते करून ठेव. आज संध्याकाळपर्यंत आपल्या प्रयोगात एकदम मोठा चेंज होणार आहे. मला लगेच याबद्दल माहिती मिळायला हवी." रॉबर्टने त्याला बजावलं आणि त्याचं काही ऐकून घेण्याआधी लगेच फोन ठेवला.

'आजच सगळ्यात मोठा बदल होणार आहे म्हणजे काय? आज हा शुद्धीत तर येणार नसेल? अरे देवा! लवकर आता पुन्हा कामाला लागलं पाहिजे.' तो स्वतःशीच म्हणाला.

पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी त्याने देवाला नमस्कार करून मनोमन प्रार्थना केली आणि रॉबर्टची जर्नल, पुस्तकं सगळं घेऊन पुन्हा तो अभ्यासाला लागला.
****************************
इथे शाळेत शिंदे मॅडमनी रमाकांत काका, गायकवाड सर आणि कांबळे सरांना प्युनकरवी बोलवून घेतलं होतं. विक्रम त्या तिघांना काही प्रश्न विचारून माहिती मिळतेय का बघत होता.

"हा फोटो बघा. हा ऋषभ आहे. डॉ. विद्यावर्धन यांचा मुलगा. साधारण तेरा वर्षांपूर्वी तो या शाळेतून हरवला होता. त्याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का?" विक्रमने फोटो दाखवून तिघांना विचारलं.

"हो सर. सर, अहो उभ्या आयुष्यात ही घटना आम्ही विसरणार नाही. आमच्या शाळेत एवढी सिक्युरिटी असतानासुद्धा हा इथून हरवला होता आणि त्यामुळे तेव्हा खूप अडचणींचा सामना आम्हाला करायला लागला होता." कांबळे सर म्हणाले.

"म्हणजे? जे काही आठवतंय ते सगळं एकदम सविस्तर सांगा. अगदी छोटी गोष्टसुद्धा." विक्रम म्हणाला.

"सर अहो तेव्हा मधलीसुट्टी झाली होती. नेहमीप्रमाणे सगळा स्टाफ टीचर रूममध्ये निघून गेला, मुलं खेळायला आणि कॅन्टीनमध्ये डबा खायला निघाली सगळं काही रोजच्यासारखं होतं. मधलीसुट्टी संपली. सगळे वर्गात आले तरीही ऋषभ आला नव्हता. त्याची बॅग मात्र वर्गात होती. बराच वेळ झाला तरी तो कसा येत नाहीये म्हणून आम्ही सगळे शोधाशोध करू लागलो. सगळी शाळा पिंजून काढली तरीही तो सापडला नाही मग डॉ. विद्यावर्धन यांना शाळेत बोलावून घेतलं." कांबळे सरांनी जे काही आठवलं ते सगळं सांगितलं.

"ओके. पण मला एक सांगा सगळी मुलं जेव्हा खेळायला आणि डबा खायला बाहेर पडली तेव्हा त्याचे मित्रसुद्धा असतील ना त्याच्यासोबत? त्यांच्यापैकी कोणाच्या कसं लक्षात आलं नाही ऋषभ आपल्या सोबत नाही ते?" ईशाने विचारलं.

"मॅडम बरोबर आहे तुमचं, पण ऋषभ फार अबोल होता. तो वर्गात सगळ्यांना सगळं काही समजावून सांगायचा, कोणाशी भांडण देखील करायचा नाही पण खेळण्यासाठी आणि भरपूर गप्पा मारण्यासाठी त्याला फक्त एकच मित्र होता आणि तेव्हा बहुदा तो आला नव्हता. तो नसला की ऋषभ एका झाडाखाली एकटाच बसून डबा खायचा, निसर्ग बघायचा किंवा एखादा पक्षी दिसला तर त्याचं नीट निरीक्षण करायचा आणि मधलीसुट्टी संपली की वर्गात येऊन बसायचा." गायकवाड सर म्हणाले.

"अच्छा. शाळेला तेव्हा सी.सी.टीव्ही असतील ना? पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना काही आढळलं होतं का त्यात? त्यांनी कोणावर संशय व्यक्त केल्याचं आठवतंय?" विक्रमने विचारलं.

"सर तेव्हा शाळेत सी.सी.टीव्ही.च काम चालू होतं. सगळं काम झालेलं नव्हतं आणि पोलिसांचं म्हणाल तर त्यांनी इथल्या सगळ्यांची कसून चौकशी केली होती. या प्रकरणानंतर शाळेचा गार्ड श्याम त्याची नोकरी गमावून बसला." कांबळे सरांनी सांगितलं.

"बरं. तेव्हा म्हणे डॉ. विद्यावर्धन कोणत्यातरी मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होते त्याबद्दल ऋषभ काही बोलला होता का?" विक्रमने विचारलं.

थोडावेळ जरा शांततेत गेला. तिघे विचार करत होते पण काहीही आठवत नव्हतं.

"नाही सर. एवढं काही आठवत नाहीये. ऋषभ सारखाच त्याच्या बाबांबद्दल सांगायचा त्यामुळे नक्की काही सांगता येत नाही." गायकवाड सर म्हणाले.

"ठीक आहे. रमाकांत काका तुम्हाला काही बोलायचं आहे का?" विक्रमने त्यांची होणारी चलबिचल पाहून विचारलं.

"हो. सर, ऋषभ तसा खूप गुणी मुलगा होता. एवढ्या लहान वयात त्याला खूप जाणीव होती. माझी बायको तेव्हा खूप आजारी पडली होती. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या आणि एवढे पैसे काही माझ्याकडे नव्हते. मी सतत चिंतेत असायचो हे त्याने बरोबर ओळखलं होतं आणि त्याच्या बाबांना सांगून माझी मदत केली होती. नंतर काही दिवस ती हॉस्पिटलमध्ये असताना तो रोज घरून डबा आणून मला द्यायचा. कोणीही इतका जीव लावला नव्हता तेवढा त्याने लावला. तेव्हा कदाचित माझीच एक चूक त्याच्यावर शेकली असं मला वाटतंय. पोलिसांनासुद्धा मी सांगितलं होतं पण त्यांनी मला शिक्षा केलीच नाही." रमाकांत काकांच्या डोळ्यात आता पाणी तरळल होतं.

"म्हणजे? सगळं नीट सांगा." विक्रम म्हणाला.

रमाकांत काका आता तेरा वर्षांपूर्वीच्या आठवणीत गेले.

"तेव्हा सर म्हणाले तशी नेहमीसारखी मधलीसुट्टी झाली होती. ऋषभ त्या दिवशी एकटाच होता. जरा जास्तच उदास वाटत होता तो. मी त्याच्याशी बोलायला गेलो एवढ्यात मला कोणीतरी बोलावलं कामासाठी, म्हणून त्याला मी इथेच बस म्हणून सांगून गेलो आणि आलो तेव्हा तो नव्हता. त्यादिवशी जर त्याला मी एकट्याला सोडलं नसतं तर कदाचित तो आज असता. त्याला मी एवढं दुःखात कधी बघितलं नव्हतं." रमाकांत काका म्हणाले.

"ओके. यात तुम्हाला शिक्षा करायचं मग काहीही कारण नाहीये. तुम्ही मनातून ही अपराधीपणाची भावना काढून टाका आणि या सगळ्यात एक आनंदाची बातमी म्हणजे कदाचित ऋषभ आजही आपल्यात आहे म्हणूनच हा तपास सुरू आहे." विक्रम म्हणाला.

"असं असेल तर बरं होईल. ते पोरगं खरंच खूप गुणी आहे." रमाकांत काका म्हणाले.

"ठीक आहे. आता आम्ही येतो. काही आठवलं किंवा काही सांगायचं असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि श्याम बद्दल माहिती द्या. म्हणजे तो कुठे राहतो? आणि त्याचा नंबर." विक्रम म्हणाला.

शिंदे मॅडमनी लगेच जुन्या रेकॉर्डमधून त्याचा पत्ता आणि तेव्हाचा नंबर दिला. तो नंबर आणि पत्ता आजही असेल की नाही हे माहीत नव्हतं तरीही एक धागा हाती लागला होता.

"ओके. थँक्यू तुम्ही एवढं सहकार्य केलं त्याबद्दल. आणि हो! इथल्या माजी मुख्याध्यापक आणि ऋषभच्या मित्राबद्दलसुद्धा काही माहिती लागेल, तीही द्या." विक्रम म्हणाला.

लगेचच शिंदे मॅडमनी रमाकांत काकांना ऑफिसर्सना जे हवं ते द्या म्हणून कामाला लावलं.

क्रमशः......
***************************
एक एक माहिती जमवत सी.आय.डी. या केसमध्ये पुढे तर जातेय पण तिथे रॉबर्टने भलताच घोळ घालून ठेवला आहे. ऋषभ जरी सापडला तरी तो यातून वाचू शकेल का? कैलास काही करू शकेल? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all