द डी.एन्.ए. (भाग -७)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm World.


द डी.एन्.ए. (भाग -७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सरांनी सगळ्यांना कामं वाटून दिली होती. कालचा दिवस तर सगळा माहिती शोधण्यातच गेला होता आणि विक्रम, ईशासुद्धा संध्याकाळ होऊन गेली होती त्यामुळे शाळेत जाऊन चौकशी करू शकले नव्हते. शाळेचं ऑफिस बंद झाल्याने आणि स्टाफसुद्धा नसल्याने त्यांना काल परत यावं लागलं होतं म्हणून ते दोघं आज तिथे गेले होते. आधीच शाळेच्या प्रिन्सिपल शिंदे मॅडमची त्यांनी अपॉईंटमेंट घेऊन ठेवली होती.

"नमस्कार. बोला काय काम आहे तुमचं?" त्यांनी विचारलं.

"नमस्कार. मॅडम तुम्ही किती वर्ष या शाळेत कामाला आहात?" ईशाने विचारलं.

"मागची वीस वर्ष झाली मी इथे कामाला आहे आणि चार वर्षांपूर्वी मी मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाले. पण तुम्ही हे सगळं का विचारत आहात?" शिंदे मॅडम म्हणाल्या.

"आम्ही तेरा वर्षांपूर्वी ऋषभ हरवला होता त्याबद्दल माहिती विचारायला आलो आहोत." विक्रम म्हणाला.

"तेरा वर्षांपूर्वी? एवढी जुनी माहिती आत्ता? मी समजले नाही." त्यांनी गोंधळून विचारलं.

"हो.... ऋषभ! डॉ. विद्यावर्धन यांचा मुलगा. काही कारणाने ती केस पुन्हा ओपन झाली आहे त्यामुळे माहिती हवी होती." ईशाने सांगितलं.

"ओके. मी नक्की माझ्या परीने सगळी मदत तुम्हाला करते पण मी खात्री नाही देत तुम्हाला जे हवं ते मिळेल याची. शेवटी इथे कितीतरी विद्यार्थी रोज येतात सगळ्यांना लक्षात ठेवणं कठीणच आहे ना? शिवाय ही तेरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे." शिंदे मॅडम म्हणाल्या.

"ग्रेट! तुम्ही आमची मदत करताय तर नक्कीच काहीतरी हाती लागेल." विक्रम म्हणाला.

"विचारा काय विचारायचं आहे?" त्या म्हणाल्या.

"मॅडम, मला सांगा तुम्हाला ऋषभ कोण हे नक्की आठवलं का? तुम्ही ओळखत होतात का त्याला?" ईशाने विचारलं.

शिंदे मॅडम विचार करत होत्या. शेवटी तेरा वर्षांपूर्वी काय घडलं होतं, कोणता विद्यार्थी हे आठवणं म्हणजे डोक्याला ताण देण्याचं काम होतं. त्या विचार करत होत्या. विक्रम आणि ईशाने एकमेकांकडे बघितलं आणि विक्रमने त्याच्या खिशातून एक फोटो काढला.

"मॅडम हा फोटो बघा. डॉ. विद्यावर्धन एक प्रसिद्ध वैज्ञानिक होते आणि त्यांचा हा मुलगा. आता काही आठवतंय का?" त्याने फोटो दाखवून विचारलं.

शिंदे मॅडम तो फोटो नीट बघत होत्या. अगदी बारकाईने त्या आठवण्याचा प्रयत्न करत होत्या.

"मी साधारण तेरा वर्षांपूर्वी सगळ्या तुकड्यांना इतिहास शिकवायचे. या मुलाला बघितल्यासारखं वाटतंय पण आठवत नाहीये काहीच." त्या म्हणाल्या.

"मॅडम प्लीज डोक्याला थोडा ताण देऊन आठवायचा प्रयत्न करा ना. मान्य आहे याला तेरा वर्ष झाली आहेत पण शाळेत अपहरण झालं असं तर दरवर्षी होत नाही ना? ऋषभ शाळेतून हरवला होता त्यासाठी इथे चौकशी पण झालीच असेल ना?" ईशा म्हणाली.

"हो मॅडम मला पटतंय तुमचं, पण तेव्हा माझं ऑपरेशन होतं त्यामुळे साधारण महिनाभर मी सुट्टीवर गेले होते आणि तेव्हाच हे घडलं असेल तर मला इतकं काही माहीत नाहीये." त्या म्हणाल्या.

त्याच्या शाळेतून काही हाती लागेल ही एक आशा होती तर तीही आता मावळत चालली होती. विक्रम आणि ईशा शिंदे मॅडमना ऋषभ बद्दल जे काही आठवतंय ते सांगा म्हणून सांगत होते.

"हा! एक आठवलं याचे बाबा वैज्ञानिक म्हणून याला सुद्धा विज्ञानात खूप रस होता. तो त्याच्या मित्रांना सारखा म्हणायचा मी पण माझ्या बाबांसारखा मोठा वैज्ञानिक होणार. शाळेत एकदा त्याने त्याच्या मित्रांना आणि सगळ्या स्टाफला त्याचे बाबा खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करतायत आणि लवकरच ते सगळीकडे प्रसिद्ध होणार आहेत आणि आम्ही सगळे मग परदेशात राहायला जाणार म्हणून सांगितलं होतं." शिंदे मॅडमनी आठवून सांगितलं.

"मोठ्या प्रोजेक्टवर? कोणता प्रोजेक्ट? तुम्हाला काही माहीत आहे का?" विक्रमने विचारलं.

"नाही सर. अहो तेव्हा ऋषभ जेमतेम दहा वर्षाचा होता त्याला कुठे एवढं काही माहीत असेल. तो आपला सगळ्यांना रोज हेच सांगत फिरायचा." शिंदे मॅडम म्हणाल्या.

"बरं. ज्या दिवशी तो हरवला त्या दिवशी तुम्ही इथे नसलात तरी आत्ता जो स्टाफ आहे त्यांच्यापैकी कोण तेव्हा कामाला होतं त्या सगळ्यांना जरा बोलवून घेता का?" विक्रम म्हणाला.

"हो एकच मिनिट. अजूनही दोन सर आणि एक शिपाई आहेत इथे ज्यांना या शाळेत पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना लगेच बोलावते." त्या म्हणाल्या.

लगेचच शिंदे मॅडमनी केबिन मधली बेल वाजवून बाहेर उभ्या असलेल्या पियूनला बोलवून घेतलं.

"जा जरा रमाकांत काका, कदम सर आणि गायकवाड सरांना बोलवून आण." त्यांनी त्याला सूचना केल्या.

"ओके मॅडम." तो म्हणाला आणि गेला.
***************************
इथे निनाद आणि सोनाली डॉ. विद्यावर्धन यांच्या लॅबमध्ये चौकशीसाठी आले होते. अगदी चकचकीत आणि सगळ्या अद्ययावत सोईंनी युक्त ती लॅब होती. मेन गेटवरच दोघांना सिक्युरिटी गार्डने अडवलं.

"कुठे जायचं आहे? असं कोणालाही आत जाता येत नाही." त्याने दोघांना हाताने अडवत विचारलं.

"आम्ही सी.आय.डी. मधून आहोत." सोनालीने आयकार्ड दाखवत त्याला सांगितलं.

"ओके. जय हिंद. तुम्ही आत जाऊ शकता.." सिक्युरिटी गार्डने दोघांना आत जायची परवानगी दिली.

दोघं आत गेले आणि रिसेप्शनवर थांबले.

"आम्ही सी.आय.डी. मधून आलो आहोत. आम्हाला इथल्या सिनियर डॉक्टरांशी बोलायचं आहे प्लीज जरा त्यांना बोलवा." निनादने सांगितलं.

"ओके सर. तुम्ही वेटींग एरियात बसा मी डॉ. शहांना बोलावते." रिसेप्शनिस्टने सांगितलं.

दोघं वेटींग एरियात थांबले. आता तरी काही हाती लागेल का? याचा विचार करत ते लॅब न्याहाळत होते. दोन मजल्यांची ती लॅब खूपच सुटसुटीत आणि दिसायला सुद्धा आकर्षक होती. रिसेप्शन एरिया नंतर काही केबिन होत्या आणि बहुदा वरच्या मजल्यांवर एक्सपिरिमेंट रूम्स असाव्यात असा अंदाज दोघांनी बांधला. आजच्या काळानुसार अगदी व्यवस्थित मेंटेन केलेली आणि काळानुसार सगळ्या अद्ययावत सोई असलेली ही लॅब असावी असं दिसत होतं. थोड्याच वेळात डॉ. शहा वरच्या मजल्यावरून खाली आले.

"नमस्कार. मी डॉ. शहा. बोला अचानक सी.आय.डी. च इथे काय काम आलं?" त्यांनी गोंधळून विचारलं.

"अचानक असं नाही पण साधारण तेरा वर्षांपूर्वीची एक केस ओपन झाली आहे त्याची माहिती हवी होती म्हणून आम्ही आलो आहोत." निनादने सांगितलं.

"ओके. या आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलूया." ते म्हणाले आणि त्यांनी हातानेच खूण केली.

तिघे त्यांच्या केबिन मध्ये गेले.

"बोला. अचानक तेरा वर्षापूर्वीची अशी काय माहिती हवी आहे तुम्हाला?" त्यांनी विचारलं.

"सर, इथे डॉ. विद्यावर्धन काम करत होते तेव्हा त्यांच्या मुलाचे, ऋषभचे अपहरण झाले होते; साधारण तेरा वर्षांपूर्वी त्या संदर्भातच आम्ही चौकशी करायला आलो आहोत." सोनालीने सांगितलं.

"अच्छा. पण एवढी जुनी केस आत्ता पुन्हा का ओपन झाली आहे? आणि ऋषभचा तर तेव्हाच मृत्यू झाला होता ना? मग हे सगळं पुन्हा? मी समजलो नाही." डॉ. शहा म्हणाले.

"हो पण त्याचा तेव्हा मृत्यू झाला नाहीये असा आम्हाला संशय आहे आणि म्हणूनच पुन्हा ही केस ओपन झाली आहे." निनाद म्हणाला.

"तसं असेल तर चांगलंच आहे. अहो ऋषभ अगदी त्याच्या बाबांसारखाच होता. त्याला नवनवीन माहिती आत्मसाद करायला आणि नवीन शिकायला फार आवडायचं. डॉ. विद्यावर्धन तर त्याने जे काही प्रश्न त्यांना विचारले किंवा काही प्रयोग करून दाखवले असतील ते खूप कौतुकाने इथे सांगायचे. इतक्या लहान वयातसुद्धा त्याचा कल संशोधनाकडे होता म्हणून आम्ही सगळे त्याला भेटूनसुद्धा आलो होतो." डॉ. शहा ऋषभच कौतुक करताना थकत नव्हते.

"मग हे असं का घडलं असेल तुम्हाला वाटतं?" निनादने विचारलं.

"एवढं काही नीट सांगता येणार नाही पण सर तेव्हा डॉ. विद्यावर्धन एका खूप महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होते. हा प्रोजेक्ट इतक्या सिक्रेटली आणि काळजीपूर्वक होत होता की याची खबर आजसुद्धा फक्त महत्वाच्या लोकांनाच आहे. मला हेच कारण वाटतंय." डॉ. शहा म्हणाले.

"म्हणूनच डॉ. विद्यावर्धन यांचे शत्रू ऋषभचेसुद्धा शत्रू बनले असणार. तुम्हाला कोणावर संशय होता का? कोणी केलं असेल हे असं?" सोनालीने विचारलं.

"नाही मॅडम. संशय तरी कोणावर घेणार? सगळे एकदम सिनियर मेंबर आणि तेही बरीच वर्ष एकत्र काम केलेले. यातलं कोणी असं केलं असतं तर तेव्हाच्या पोलिस तपासात उघड झालं असतं ना?" डॉ. शहा म्हणाले.

"ओके. त्यावेळी नक्की असा कोणता प्रोजेक्ट सुरू होता आणि कोणा - कोणाला याबद्दल माहिती आहे हे सांगू शकता का?" निनादने विचारलं.

क्रमशः......
***************************
विक्रम आणि ईशा शाळेत गेले आहेत त्यांच्या हाती काही लागेल का? निनाद, सोनालीला डॉ. शहा तेव्हाच्या प्रोजेक्टची माहिती देतील? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all