द डी.एन्.ए. (भाग -६)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm World.


द डी.एन्.ए. (भाग -६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सरांच्या सांगण्यावरून अभिषेकने पुन्हा क्लिप चालू केली. इतक्या वर्षांपूर्वीची तीच घटना पुन्हा पुन्हा बघून स्वतःच्या भावनांवर ताबा असलेले ऑफिसर्ससुद्धा इमोशनल झाले होते. फक्त माणुसकीच्या नात्याने एवढा त्रास आपल्याला होतोय, तर त्या माऊलीला किती त्रास झाला असेल याची कल्पनासुद्धा करवत नव्हती.

"अभिषेक, थोडं रिवाइंड कर आणि मग पॉज कर." विक्रम अचानक म्हणाला.

अभिषेकने व्हिडिओ रिवाइंड केला आणि थोडा प्ले केल्यावर विक्रमने त्याला सांगितलं तिथे पॉज केला.

"सर, इथे बघा. जयश्री मॅडम म्हणतात तसं या मुलाची पायाची करंगळी खोटी वाटतेय." विक्रमने सगळ्यांना दाखवलं.

अभिषेकने त्याच्या पायावर झूम केलं आणि सगळ्यांनाच आता तसं वाटत होतं. त्यांची केस आता थोड्या अंशी पुढे सरकली होती आणि जयश्री म्हणतेय ते खरं आहे असे प्रथमदर्शनी पुरावे तरी हाती आले होते.

"ओके. आता आपण जयश्री मॅडम म्हणाल्या त्याची खात्री तरी करून घेतली आहे; आता त्या फाईल चा अभ्यास करुया. अभिषेक तू व्हिडिओ आणि पेपरातली न्यूज पुन्हा बघ, त्यावेळी तिथे कोण कोण होतं आणि कोणाच्या हालचाली संशयास्पद वाटतायत का ते चेक कर." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." अभिषेक म्हणाला.

"गणेश! निनाद आणि तू जी फाईल घेऊन आला आहात ती आण." सुयश सर म्हणाले.

गणेश लगेच ती फाईल घेऊन आला. इतक्या वर्षांमध्ये ती फाईल धूळ खात पडली होती त्यामुळे त्याच्यात असणाऱ्या कागदांवरची शाई फिस्कटली होती.

"सर, यात फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा जोडलेला आहे." निनाद म्हणाला.

सुयश सर ती फाईल बघू लागले. २००८ मध्ये केस फाईल झाली होती. इन्स्पेक्टर कांबळे या केसचे हेड होते आणि कंप्लेंट करायला स्वतः डॉ. विद्यावर्धन गेले होते, हे तिथे त्यांच्या असणाऱ्या सहीमुळे समजलं. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार ऋषभ शाळेत गेला होता आणि तिथूनच तो हरवला आहे असं लिहिलेलं होतं. त्यांच्या घरापासून पंधरा मिनिटावर असणाऱ्या सी.बी.एस.सी. शाळेत तो जात होता. सगळी माहिती सुयश सरांनी वाचली.

"विक्रम, ईशा! तुम्ही दोघं ऋषभच्या शाळेत चौकशी करायला जा. कदाचित तेव्हा कोणीतरी काहीतरी पाहिलं असेल पण भीतीने बोललं नसेल तर आत्ता समजेल." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." ईशा, विक्रम म्हणाले आणि ते निघाले.

"सोनाली, निनाद तुम्ही दोघं डॉ. विद्यावर्धन ज्या लॅबमध्ये काम करत होते तिथे चौकशीला जा." सुयश सरांनी सांगितलं.

ते दोघंही लगेच त्यांच्या कामाला लागले.
**************************
इथे कैलासकडे आता फार कमी वेळ उरला होता. त्या मुलाच्या शरीरात आता पूर्ण डायनासोरसारखे बदल झाले होते; फक्त त्याचा चेहरा माणसाचा आहे हे लक्षात येत होतं. हात पाय डायनासोर सारखे बळकट आणि मोठी नखं यामध्ये रूपांतरित झाले होते. शेपूट पूर्णपणे विकसित होऊन त्यावर तीक्ष्ण काट्यासारखे खवले होते आणि जबडा रुंद होऊन त्यात अती तीक्ष्ण दात आलेले होते. अजूनही तो मुलगा शुद्धीत नव्हता म्हणून त्याच्या डोळ्यात झालेले बदल दिसत नव्हते; पण एकंदरीत सकाळपेक्षा खूपच जास्त भयानक रूप आत्ता त्याचं दिसत होतं. एव्हाना रात्रीचे नऊ वाजून गेले होते. कैलास त्याच्या सवयीप्रमाणे उपासनेला बसला. दिवसभरात कितीही त्रास झाला, कितीही वाईट घडलं तरी त्याचा मात्र त्याच्या देवावर पूर्ण विश्वास होता. तो सगळं काही त्याला सांगत असे आणि म्हणूनच त्याच्या आशीर्वादानेच त्याला या विचित्र संकटाचा सामना करायला बळ मिळत होतं. साधारण अर्धा तास त्याने उपासना केली. मनोमन नेहमीसारखी 'देवा! तूच आता यातून मार्ग दाखव. जगाला वाचवणं तुझ्या हातात आहे.' अशी प्रार्थना करून त्याने डोळे उघडले आणि तो त्या लहान खिडकी जवळ गेला. बाहेर मिट्ट अंधार पसरला होता. जंगलातील झाडं एकदम विचित्र आकारात दिसत होती आणि आज जरा भयाण शांतता वातावरणात जाणवत होती. कैलासला आज राहून राहून चुटपुट लागत होती. काहीतरी घडतंय पण कळत नाहीये असं वाटत होतं. इतक्यात त्याचा फोन वाजला म्हणून तो त्याच्या टेबलाजवळ आला.

"हॅलो सर बोला." तो फोन न बघताच म्हणाला.

"एव्हाना त्या मुलात बरेच बदल झाले असतील, सगळीकडे लक्ष ठेव आणि माझ्या केस स्टडी वाचल्यास का?" रॉबर्टने विचारलं.

'काय जगाची घाई आहे या माणसाला?' सारखं तेच तेच सांगतोय. असा विचार कैलासच्या मनात आला. मनातून त्याची फार तगमग होत होती. तो काहीही न बोलता त्याच्याच विचारात होता.

"हॅलोऽऽ कैलासऽऽ आर यू देअर?" रॉबर्ट तो काहीही बोलत नाही पाहून म्हणाला.

"येस! येस, सर." कैलासने भानावर येत उत्तर दिलं.

"सगळं काम नीट करून ठेव. मी पुढचा सगळा प्लॅन केला आहे त्यानुसारच झालं पाहिजे सगळं. जर काही गडबड झाली तर तुला माहितेय तुझं काय होईल ते." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

कैलास डोक्याला हात लावून तिथेच बसला. त्याला आता काय करावं हेच सुचत नव्हतं. 'रॉबर्ट इथे नसला तरी आपण इथून बाहेर पडू शकणार नाही किंवा इथे कोणी येण्याचे सुद्धा चांसेस नाहीत तर काय करुया?' म्हणून त्याचा विचार चालू होता. एवढ्यात त्याचं रात्रीचं जेवण आत आलेलं त्याने बघितलं. ते जेवणसुद्धा त्याला ड्रोनच्या माध्यमातून मिळत होतं आणि त्याला कॅमेरा सुद्धा होता त्यामुळे आपोआप रॉबर्टला सगळ्या बातम्या मिळतात हे त्याला ठाऊक होतं. पण इतकी वर्ष काय करू? या विचारात वेळ घालवला असला तरी आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे तर काहीतरी डोकं चालवलं पाहिजे म्हणून तो पुन्हा विचारात गढला. त्याच विचारा - विचारात लक्ष न देता त्याने जेवण केलं. पुन्हा तेच! पुलाव होता. पण जे मिळतंय ते खाण्यावाचून त्याच्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नव्हता. त्याचं जेवण झालं आणि अचानक त्याच्या डोळ्यात एक चमक आली.

'येसऽऽ आपण कसं विसरलो? रॉबर्टने स्वतः आपल्याला त्याच्या टेबलावर असणारी जर्नल घ्यायला सांगितली आहे. हीच संधी आहे त्यात त्याने काय काय करून ठेवलं आहे हे शोधण्याची. कदाचित काहीतरी हाती लागेल ज्यातून या विकृत माणसाला कोण फंडस् देतंय हे तरी समजेल. लगेच बघतो.' तो मनाशी म्हणाला.

लगेचच त्याने तिथे असलेली जर्नल घेतली आणि त्या टेबलावर अजून काय काय आहे हे बघू लागला. डायनासोरबद्दल माहिती असणारी एन्सायक्लोपिडिया, फोटो आणि बाकी काही कामाचं सामान तिथे होतं. कैलासने ती जर्नल उघडली. त्यात रॉबर्टने बऱ्याच रिसर्च बद्दल लिहिलेलं होतं. त्यातच मुलात कोणते बदल होणे अपेक्षित आहे याची केस स्टडी सुद्धा होती. पूर्ण विकसित झाल्यावर त्या मुलाची वागणूक कशी असेल, तो पुन्हा त्याच्या सारख्या जीवांना निर्माण करण्यात सक्षम असेल का? याबद्दल विविध बाजूंनी विचार करून अगदी डीपमध्ये माहिती लिहिलेली होती.

'बापरे! या माणसाने किती तयारी केली आहे. अभ्यास तर खूपच जास्त आहे हा. म्हणूनच कदाचित याला पूर्ण खात्री आहे हा प्रयोग यशस्वी होणारच आहे. याच बळावर तो कुठूनतरी फंडस् आणतोय. नक्कीच याला फंडस् देणाऱ्या लोकांमध्ये यातला ज्ञानी माणूस असला पाहिजे.' कैलास त्या जर्नलची एक एक पानं उलटत स्वतःशीच म्हणाला.

त्यात अगदी आकृत्यांसह अत्यंत अभ्यापूर्ण विश्लेषण बघून कैलासला आश्चर्य वाटत होतं. इतकी वर्ष आपण याला हलक्यात घेऊन चूक करत होतो; तेव्हाच जर काहीतरी मार्ग काढून याच्याकडून काही माहिती काढून घ्यायचा प्रयत्न केला असता, तर आज हा क्षण आलाच नसता किंवा आपल्या आटोक्यात असता असा त्याच्या मनात विचार सुरू होता.

'फक्त आता विचार करून काहीही होणार नाहीये. आता या जर्नलचा काहीतरी सदुपयोग झालाच पाहिजे. एवढ्या डिटेल मध्ये अभ्यासाची सवय आपल्याला तेव्हाच लागायला हवी होती. असो! अजूनही वेळ आहे. आता बघच रॉबर्ट मी काय करतो ते.' कैलास म्हणाला.

त्याला आता आशेची एक नवीन पालवी दिसत होती. तो त्याच्या डेस्कवर ती जर्नल घेऊन आला आणि त्याने स्वतःची जर्नल बाहेर काढली. हे काम करत असतानासुद्धा त्याचं त्या सेलवर लक्ष होतंच.

क्रमशः.....
**************************
सी.आय.डी. टीमच्या हाती काही लागेल का? कैलासने नक्की काय ठरवलं असेल? तो कशी ही बातमी बाहेर कोणाला सांगू शकेल? रॉबर्ट कुठे गेला असेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all