द डी.एन्.ए. (भाग -५)

CiD Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये ईशा आणि सोनालीने तर त्यांचं काम चोख केलं होतं आणि आता त्या सुयश सर, विक्रम, निनाद आणि गणेशची वाट बघत होत्या. अभिषेक ऋषभ हरवला तेव्हाच्या बातम्यांचे क्लिप्स किंवा आर्टिकल मिळतायत का ते ऑनलाईन चेक करत होता.

"कसं असतं ना एखाद्याचं नशीब? आता या जयश्री मॅडमचच बघ ना, तेरा वर्षांपूर्वी मुलगा हरवला आणि पुढच्या तीन दिवसात त्यांनी दोघांना गमावलं. स्वतःची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडत गेली आणि आता त्यांना असं वाटतंय की त्यांचा मुलगा या जगात आहे पण जर असं काही नसेल तर? त्यांच्या मनावर पुन्हा एक मोठा आघात होणार आहे." ईशा म्हणाली.

"हो गं! तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आपण सुद्धा फक्त पुन्हा एकदा केस ओपन करून शोधू शकतो पुढे काय असेल, त्यांचा मुलगा असेल की नसेल हे सत्य आपण बदलू शकणार नाहीये." सोनाली म्हणाली.

"तुमचं पटतंय मॅडम. विचार करा त्या माऊलीने किती यातना सहन केल्या असतील त्यावेळी आणि आत्ताही करत असेल. आत्ता त्यांचा मुलगा असता तर तेवीस, चोवीस वर्षाचा असता. इतर मुलांसारखा आयुष्य मार्गाला लावत असता." गणेश म्हणाला.

"हम्म! आपल्याला असं भावनिक होऊन चालणार नाहीये. देव करो आणि त्या मॅडम म्हणतात तसं त्यांचा मुलगा सुखरूप असू दे. निदान त्यांच्या म्हातारपणी मुलाची तरी साथ असेल." सोनाली म्हणाली.

एवढ्यात अभिषेकला काहीतरी मिळालं म्हणून त्याने सगळ्यांना बोलावलं.
*************************
आता दुपार अस्ताला चालली होती आणि रॉबर्ट कोणत्याही क्षणी लॅबमध्ये येणार होता. कैलास त्याने फोनवर काहीतरी सरप्राइज आहे हे सांगितल्या पासून मनातून जरा बिथरला होता. या विकृत माणसाच्या डोक्यात काय येईल आणि हा काय करेल याची खात्री देता येत नाही म्हणून त्याचं टेंशन जरा जास्तच वाढलं होतं. संध्याकाळचे चार वाजून गेले होते. खरंतर ही वेळ त्याच्या चहाची होती. त्या लहान खिडकीतून रोज यावेळी चहा आणि बिस्कीटचा लहान पूडा यायचा. हीच एक गोष्ट होती ज्याचा त्याला कंटाळा आला नव्हता. आज जेवण सुद्धा न केल्याने पोटात कावळे ओरडत होते. तरीही तो त्याकडे दुर्लक्ष करून त्याचं काम करत होता. अचानक त्याला रॉबर्ट आल्याची चाहूल लागली आणि त्याने त्याची जर्नल ठेवून त्या सेल जवळ जाऊन उभा राहिला.

"आवडलं आपल्याला. असाच मन लावून काम कर." रॉबर्ट म्हणाला.

कैलास ने कसंनुसं स्मित केलं आणि आता हा पुढे काय करायला सांगतोय म्हणून गप्प उभा राहिला.

"आज दुपारी तू जेवला नाहीस हे मला समजलं आणि तू माझ्या मनासारखं करतोयस म्हणून खास एक सरप्राइज आणलं आहे तुझ्यासाठी." रॉबर्ट म्हणाला.

त्याच्या या बोलण्याने कैलास जरा चक्रावला आणि याला कधीपासून माणुसकीची जाणीव व्हायला लागली म्हणून विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर हे आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.

"एवढं आश्चर्य वाटून घ्यायचं काहीच कारण नाहीये. इतकी वर्ष तू पुलाव खाल्ला पण आज हा माझा प्रयोग यशस्वी होतोय म्हणून मी खुश आहे आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे गुलाबजाम आणलेत. इतक्या वर्षात चहा शिवाय काहीही दुसरं गोड तुला मिळालं नाही. आज खा." रॉबर्ट त्याच्या हातात त्याने आणलेल्या गुलाबजामचा डबा देत म्हणाला.

कैलासने फक्त तो डबा घेऊन टेबलावर ठेवला आणि पुन्हा त्याच्या कामाला लागला.

"अरे! तुझ्यासाठी खास तोंड गोड करायला आणले ना, खाऊन तर बघ." रॉबर्ट म्हणाला.

"नको सर आत्ता रात्री खाईन. थँक्यू." कैलास म्हणाला.

"बरं जाऊदे. मीच तुझं तोंड गोड करतो." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने स्वतः त्याला भरवलं.

कैलासने कसाबसा तो गुलाबजाम खाल्ला. त्याला खरंतर या असल्या प्रयोगासाठी काय गोड खाऊन आनंद व्यक्त करायचा असं झालं होतं पण रॉबर्ट समोर ना तो काही बोलू शकत होता ना त्याला या गोष्टीची जाणीव करून देऊ शकत होता. त्याने कसाबसा तो तोंडातला घास संपवला आणि औपचारिकता म्हणून रॉबर्ट ला सुद्धा गुलाबजाम खायला लावला.

"बरं... आपल्या कामाचं कुठवर आलं आहे? साधारण आता सकाळपासून आठ ते नऊ तास झालेत या मुलाच्या शरीराने बदल करायला सुरुवात होऊन. तुला काही त्रुटी जाणवल्या असतील तर त्याही सांग." रॉबर्टने विचारलं.

"सर मी सगळं लिहून घेतलं आहे आणि बदलांचं निरीक्षण करायला कॅमेरा पण लावला आहे. सर, पण मला एवढ्या वेळात एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे या मुलात शारीरिक बदल होताना दिसत आहेत पण त्याची हालचाल काहीच नाहिये शिवाय तो अजून शुध्दीवर सुद्धा आला नाहीये." कैलास त्याच्या मनात होतं ते बोलला आणि रॉबर्ट नक्की यावर कसा रियॅक्ट करतो हे बघायला जरावेळ थांबला.

"हम्म! बरोबर आहे तुझं निरीक्षण. पण तुला काय वाटतंय? का असावं असं?" रॉबर्टने त्यालाच विचारलं.

कैलास जरा विचारात पडला आणि थोड्यावेळाने बोलू लागला; "सर, सॉरी टू से... पण..... हा मुलगा वाचेल ना? की हातातोंडाशी आलेला घास जाईल...." त्याने अडखळत त्याचं वाक्य पूर्ण केलं.

"शट अप! पुन्हा असं काही बोललास ना तर दुसरा प्रयोगाचा बेडूक तू असशील; असं काही नाहीये. कितीवेळा सांगितलं इतक्या वर्षात हा प्रयोग यशस्वी होणारच! यात अपयश येऊन चालणार सुद्धा नाहीये." रॉबर्ट जरा संतापून म्हणाला.

"सॉरी सर! मला तसं नव्हतं म्हणायचं पण मला तुम्ही केलेल्या इतक्या वर्षांच्या कष्टाची, तुमच्या वेळेची आणि तुम्ही यात गुंतवलेल्या भांडवलाची काळजी वाटली म्हणून...." कैलासने सारवासारव करायला काहीतरी उत्तर दिलं.

"त्याची काळजी करायची गरज तुला नाही. अजून अभ्यास कर जरा आणि हो माझ्या त्या टेबल वर एक जर्नल आहे त्यात काही केस स्टडी लिहिलेल्या आहेत त्याचा पण अभ्यास कर. मी आता निघतोय माझी फ्लाईट आहे." रॉबर्ट त्याला सगळं समजावून जायला निघाला.

कैलासने फक्त मान डोलावली आणि पुन्हा तो होता त्याच प्रश्नावर अडकला हा माणूस नक्की कुठे जातोय आणि याला फंडस् कोण देतंय.
*************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये विक्रम आणि सुयश सर सुद्धा परतले होते. गणेश आणि निनादसुद्धा ती जुनी १३ वर्षांपूर्वीची फाईल घेऊन आले होते. सोनालीने एडिट केलेला फोटो आणि अभिषेकने शोधलेली माहिती याचा सगळेच जण बारकाव्याने अभ्यास करत होते. अभिषेकला काही जुन्या क्लिप्स मिळाल्या होत्या त्या सगळे नीट बघत होते. खरंच जयश्रीने सांगितलं तसं त्या डेड बॉडीचं एक बोट खोटं आहे का? आणि ते कॅमेरा मध्ये कॅप्चर झालंय का? म्हणून सगळ्यांचं बारीक लक्ष होतं. अभिषेकने ती क्लिप सुरू केली.

नाही म्हणली तरी बरीच गर्दी तिथे होती. रिपोर्टर तर बॉडी आणायच्या आधीपासून तिथे येऊन थांबले होते. जयश्री आणि डॉ. विद्यावर्धन "आपला मुलगा जिवंत आहे त्याची बॉडी येणारच नाही." असंच म्हणत होते आणि अचानक बॉडी आलेली पाहून विद्यावर्धन तिथेच कोसळले. कोणाला काही कळायच्या आतच त्यांनी हे जग सोडलं होतं. एकाच वेळी मुलगा आणि नवऱ्याचं प्रेत समोर बघून जयश्री एकदम तुटून गेली आणि तिथेच नुसती एकटक बघत बसली. डॉ. विद्यावर्धन यांचे सह वैज्ञानिक आणि शेजारी तिला सावरायला जात होते पण तिला जगाचं भानच उरलं नव्हतं. तिच्या डोळ्यातून पाण्याचा एकही थेंब येत नव्हता आणि आपल्या आजूबाजूला काही घडतंय हे सुध्दा तिला जाणवत नव्हतं. सगळे रिपोर्टर तिला बोलतं करायचा प्रयत्न करत होते पण सगळं व्यर्थ जात होतं. शेवटी डॉ. विद्यावर्धन आणि त्यांच्या मुलाचे अंतिम संस्कार त्यांच्या सह वैज्ञानिकांनी केले. एवढं घडून गेलं तरीही जयश्री अजून भानावर नव्हती.

"सर किती भयानक प्रसंग असेल ओ हा जयश्री मॅडम साठी." गणेश म्हणाला.

"हो रे! त्यांचं दुःखं साहजिक आहे. कोणत्या आई - बापाला स्वप्नात सुद्धा वाटणार नाही आपलं मुल एवढ्या लहान वयात जाईल ते." विक्रम म्हणाला.

"हम्म. खरंच त्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असेल. आता त्यांना त्यांचा मुलगा आहे असं वाटतंय तर देव करो आणि तसंच असू दे." ईशा म्हणाली.

"मला कळतायात तुमच्या भावना पण आत्ता आपल्याला नीट प्रॅक्टिकली विचार करून काम करायला हवं. अभिषेक पुन्हा क्लिप लाव." सुयश सर म्हणाले.

क्रमशः....
***************************
या क्लिप मधून आणि सगळ्यांनी काढलेल्या माहितीतून काही साध्य होईल का? रॉबर्ट कोणासोबत मीटिंग करत असेल? कोण पुरवत असेल त्याला एवढे फंडस्? पाहूया पुढच्या भागात. तोवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all