द डी.एन्.ए. (भाग -४)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे कैलासने त्या सेलवर नीट लक्ष राहावं म्हणून एक कॅमेरा फिट केला आणि तो त्याचं काम करू लागला. त्या सेलमध्ये असलेल्या मुलात आता बरेच बदल होत होते. तो शुध्दीवर नव्हता म्हणून सगळं काही शांततेत होत होतं. त्या मुलाच्या शरीराने आता खूपच विचित्र बदल केले होते. अंगावर खवले येऊ लागले होते, शेपूट यायला सुरुवात झाली होती आणि चेहऱ्याने सुद्धा आता आकार बदलायला सुरुवात केली होती. हातापायाची नखं सुद्धा मोठी झाली होती. प्राणी आणि माणूस यांचा तो संगम आहे हे लक्षात येत असलं तरी तो जेव्हा शुध्दीवर येणार होता तेव्हाच नक्की काय घडलं आहे हे समजणार होतं.

'या माणसाने खरंच खूप विचित्र काहीतरी करून ठेवलं आहे. काय तर म्हणे आपण माणसात डायनासोरचे डी.एन्.ए. टाकून पुन्हा एकदा डायनासोरची फौज उभी करायची.' कैलास स्वतःशीच म्हणाला.

रॉबर्टचा हा प्रयोग जवळ जवळ पंधरा वर्ष आधी सुरक्षेच्या कारणास्तव नाकारला गेला होता पण याच्या डोक्यात जणू विकृतीच संचारली होती. त्याच्या सहाय्यक वैज्ञानिकांनी सुद्धा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ जात होतं. पुन्हा या प्रयोगाला परवानगी मिळावी म्हणून त्याने कितीतरी प्रयत्न केले. सतत अर्ज पाठवणे, आपला प्रयोग कसा जगावेगळा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे आणि सतत मीटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित करणे असे कितीतरी मार्ग अवलंबून आपल्याला परवानगी मिळावी म्हणून त्याने प्रयत्न केले. शेवटी त्याला परवानगी मिळाली नाहीच तर उलट सतत डिपार्टमेंटचा वेळ वाया घालवला आणि जगाला धोका असलेल्या प्रयोगावर काम करण्यासाठी एवढा भर टाकला म्हणून त्याला सहा महिन्यांसाठी सस्पेंड केले गेले. या सगळ्यात कैलास मात्र विनाकारण गोवला गेला.

'तेव्हा मी नवीनच जॉईन झालो होतो आणि नेमका हा विकृत माणूस माझा सिनियर. नेमका याचाच मी पर्सनल असिस्टंट. झाऽऽलं... याला सस्पेंड केलं तर माझंही तिथे काही काम नव्हतं. हा मला त्याच्या सोबत घरी कामाला बोलावू लागला आणि कधी याने याची सुरुवात केली याची साधी भनक पण लागू दिली नाही.' कैलासला सगळं आठवलं आणि तो स्वतःशीच म्हणाला.

सध्यातरी त्याचे हात दगडाखाली होते. या बंधिस्त लॅबमधून ना तो बाहेर जाऊ शकत होता ना कोणी आत येऊ शकत होतं. इतकी वर्ष होईल काहीतरी आणि आपण इथून निघू म्हणून त्याला आशा होती पण आता हा प्रयोग जवळ जवळ अंतिम टप्प्यात गेल्यावर त्याच्या आशा मावळत चालल्या होत्या; तरीही त्याचा त्याच्या देवावर मात्र ठाम विश्वास होता. नक्कीच तोच काहीतरी मार्ग यातून काढेल म्हणून स्वतःच्या चंचल मनाला समजावून आज तरी काहीतरी चमत्कार घडेल या आशेवर तो आला दिवस ढकलत होता. त्याचं काम इतक्या वर्षात यंत्रासारखं झालं होतं. विचार करताना सुद्धा तो त्याचं काम करत होता. एव्हाना दुपार झाली होती आणि त्याच्या जेवणाचे पार्सल त्या लहान खिडकीतून आत टाकले गेले होते. कैलासला चांगलीच भूक सुद्धा लागली होती.

'आज पुन्हा तेच. वीट आलाय मला रोज रोज पुलाव खाऊन.' तो पार्सल उघडून म्हणाला.

त्याला तिथे आणल्यापासून जवळ जवळ रोजच त्याच्या जेवणाची सोय म्हणजे पुलाव आणि रायता असायचा. त्यासोबत काही औषधांच्या गोळ्या सुद्धा जेवणासोबत त्याला मिळायच्या. शरीरात इतर व्हिटॅमिन, कॅल्शिअम, हिमोग्लोबिन नीट राहावं म्हणून या सप्लिमेंट त्याला दिल्या जात होत्या. आज तर त्याच्या घशाखाली एकही घास उतरत नव्हता. रोज रोज एकच चव, एकच पदार्थ खाऊन त्याला अन्न बघून पण किळस येत होती. पण नाही खाल्लं तरी रॉबर्ट त्याच्यावर जराही दया दाखवणार नाही याची त्याला खात्री होती म्हणून इतकी वर्ष त्याने हे सहन केलं. आजही स्वतःच्या पोटासाठी तो पहिला घास खाणार तर त्याला अचानक पोटात सगळं ढसमळल्यासारखं झालं आणि त्याने अन्नाला नमस्कार करून बाजूला ठेवून दिलं. एवढ्यात त्याचा फोन वाजला. अर्थात रॉबर्ट शिवाय अजून कोणीही त्याला फोन करणं शक्यच नव्हतं.

"हॅलो! बोला सर..." तो एकदम निर्विकार स्वरात म्हणाला.

"काम बरोबर चालू आहे ना? सगळं नीट काळजीपूर्वक करतोयस ना?" त्याने विचारलं.

"हो सर!" त्याने एकदम यांत्रिकिपणे उत्तर दिलं.

"गूड! आज संध्याकाळी मी एकदा तिथे येऊन जाईन. पुन्हा मग आपली भेट तीन दिवसांनी होईल म्हणून मला माझ्या डोळ्यांनी एकदा सगळं बघून घ्यायचं आहे आणि हो आज येताना तुझ्यासाठी खास सरप्राइज आहे ते घेऊन येतो." रॉबर्ट म्हणाला आणि फोन ठेवला.

सरप्राइज आहे हे ऐकल्यावर कैलासच्या काळजात तर धडकीच भरली. आता पुन्हा या माणसाची कोणती नवीन विकृती समोर येतेय म्हणून त्याने डोक्यावर हात मारला आणि न जेवता तसाच गोळ्या घेऊन कामाला लागला.
**************************
सी.आय.डी. ब्युरो मध्ये सोनाली फोटो एडिट करत होती. चेहरा, डोळे, कान, कपाळ सगळ्यात थोडे थोडे बदल होत होते आणि अंदाजे आत्ता तो कसा दिसत असता याचा रिझल्ट समोर येत होता. ईशा सुद्धा तिच्या मदतीला आलीच होती.

"ईशा! हे बघ.... अंदाजे ऋषभ आत्ता असा दिसत असावा." सोनालीने फोटो पूर्ण एडिट झाल्यावर तिला दाखवला.

"हम्म! एक काम कर प्रिंट घेऊन ठेव फोटोची." ईशा म्हणाली.

सोनालीने त्या फोटोची प्रिंट काढली आणि सुयश सरांना तो फोटो मेल सुद्धा करून ठेवला.
****************************
विक्रम आणि सुयश सर रिटायर इन्स्पेक्टर कांबळेंना भेटायला त्यांच्या घरी जायला निघाले होते. रहदारी पासून जरा दूर शांत ठिकाणी त्यांचं रॉ हाऊस होतं. त्यांनी कळत्या वयापासून स्वतःला देश सेवेत झोकून दिलं होतं. स्वतःच्या सुखाआधी त्यांनी देश सेवेसाठी प्राधान्य दिलं होतं आणि म्हणूनच आयुष्यभर फक्त देशासाठी जगायचं हा पण मनाशी बाळगून त्यांनी संसारात न पडण्याचा निर्णय घेतला होता. आता सुद्धा ते त्यांना जमेल तशी मदत पोलीस विभागांना करत होते. त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आणि देशाप्रती असलेली निष्ठा याचा फायदा केस सोडवायला होत होताच तर दुसरीकडे त्यांनी गरजू मुलांच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. घरातच ते पोलीस भरतीच्या परीक्षांची तयारी मुलांकडून करून घ्यायचे. ज्यांच्यात खरंच देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा आर्थिक अडचण असेल तर कांबळे सर त्यांची अडचण दूर करायचे. त्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी येऊन जाऊन असायचं त्यामुळे त्यांना एकटं असं कधी वाटलं नाहीच. आज मात्र त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांना सुट्टी दिली होती. विक्रमने त्यांना आधीच फोन करून सुयश सर आणि तो येतोय याची कल्पना दिली होती. कांबळे सर त्यांचीच वाट बघत बसले होते. थोड्याच वेळात ते दोघं तिथे पोहोचले.

"जय हिंद!" कांबळेंनी एक कडक सॅल्युट केला.

विक्रम आणि सुयश सरांनी सुद्धा "जय हिंद" म्हणून सॅल्युट केला आणि तिघे घरात गेले.

घराच्या भिंतीवर असलेले मेडल्स, सन्मानपत्र आणि त्यांचे फोटो त्यांच्या कडक शिस्तीचे आणि वीरतेचे प्रतीक दर्शवत होते. सुयश सर आणि विक्रम ते सगळं बघत बघत आत गेले.

"तुम्ही बसा. मी रघूला चहा टाकायला सांगतो." ते म्हणाले.

"नाही नको. आम्ही फक्त तुमच्याकडे काही माहिती घ्यायला आलो आहोत आणि तुम्हाला माहितेय ना ड्युटीवर असताना काहीही घ्यायचं नाही." सुयश सर म्हणाले.

"ओके. विचारा कोणती माहिती हवी आहे तुम्हाला?" कांबळेंनी विचारलं.

"सर, साधारण तेरा वर्षांपूर्वी एक मुलगा हरवल्याची तक्रार आली होती जी केस तुम्ही हॅण्डल करत होतात त्याची माहिती हवी आहे. ऋषभ! डॉ. विद्यावर्धन यांचा मुलगा. ते वैज्ञानिक होते. त्या केस बद्दल." विक्रमने सांगितलं.

"ती केस? सर पण तेव्हा त्या मुलाची बॉडी जळलेल्या अवस्थेत सापडली होती. मला जेवढं आठवतंय त्याप्रमाणे शहराबाहेर एक जंगल आहे त्या रस्त्याला एका झोपडी वजा घरात आग लागली होती आणि ती आग बघून रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने अग्निशमन आणि पोलिसांना बोलवून घेतलं होतं. त्यात तो मुलगा होता. पोस्टमॉर्टन मध्ये त्याला आधी गुंगीचं औषध देऊन तिथे बांधून ठेवण्यात आलं होतं म्हणून तो आगीपासून त्याचा बचाव करू शकला नाही असं सिद्ध झालं होतं." कांबळेंनी त्यांना आठवलं ते सांगितलं.

"अच्छा! पण सर आज ऋषभची आई जयश्री ब्युरो मध्ये आल्या होत्या. त्यांना पूर्ण खात्री आहे तो मुलगा त्यांचा ऋषभ नव्हता; म्हणूनच ही केस पुन्हा ओपन करावी लागणार आहे." सुयश सरांनी सांगितलं.

"सर पण त्या बॉडीची आणि त्याच्या आई - बाबांची डी.एन्.ए. टेस्ट सुद्धा करण्यात आली होती. रिपोर्ट मॅच झाले म्हणून तर आम्ही तो त्यांचाच मुलगा आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचलो." कांबळे म्हणाले.

क्रमशः.....
****************************
कांबळेंकडून काही माहिती हाती लागेल का? रॉबर्टने डायनासोरची फौज उभी करण्याचं स्वप्न पाहिलं आहे ते कैलास भंग करू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all