द डी.एन्.ए. (भाग -३०)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -३०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
विक्रमने डायनासोरचे फोटो सुयश सरांना पाठवल्यावर दबक्या पावलांनीच सगळे माघारी फिरले. एका मोठ्या दगडापाशी तो ऋषभरुपी डायनासोर झोपला होता. कसलाही आवाज न करता आता विक्रम पूर्ण टीमला ती लॅब जिथे उभारली होती, तिथे घेऊन गेला. कैलास लॅबमध्ये कामच करत होता, पण त्याचं लक्ष सी.सी.टीव्ही फुटेजवर गेलं आणि त्याने घाईत सगळी लेझर आणि बजर सिक्युरिटी बंद केली.

'हा तर तो कालचा माणूस दिसतोय. आज रॉबर्ट इथे नाहीये तर मला मदत मागता येईल.' कैलास मनोमन म्हणाला.

तोवर विक्रम सगळ्यांना त्या लहान खिडकीजवळ घेऊन गेला. सगळेच जण आतमध्ये कोण आहे का? हे बघण्याचा प्रयत्न करत होते. तोवर कैलासने येऊन ती लहान खिडकी उघडली. अचानक झालेल्या या कृतीमुळे विक्रमने त्याच्यावर गन रोखली. कैलास मात्र हे बघून अजिबात घाबरला नव्हता. एकदम शांतपणे त्याने दोन्ही हात वर केले होते. समोरून कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये म्हणल्यावर विक्रमने गन आत ठेवली.

"कोण आहेस तू?" विक्रमने विचारलं.

"मी कैलास. पण, तुम्ही कोण आहात?" कैलास एकदम शांतपणे म्हणाला.

"ते कळेल नंतर. आधी दार उघड." विक्रम म्हणाला.

"मला शक्य नाही. त्यावर सरांचे फिंगर प्रिंट आणि आय लॉक आहेत." कैलासने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं.

विक्रमने निनाद, सोनाली आणि ईशाला काहीतरी खूण केली आणि ते तिघे तिथे आत जाण्याचा कोणता दुसरा मार्ग आहे का? हे बघायला लॅबभोवती फिरू लागले.

"सर, आत येण्याचा किंवा बाहेर जाण्याचा काहीही मार्ग नाही. तुम्ही कोण आहात? काय हवंय तुम्हाला?" कैलासने विचारलं.

"आम्ही सी.आय.डी. मधून आहोत आणि आम्हाला तू हवा आहेस." विक्रम रागात म्हणाला.

"सी.आय.डी.? खरंच?" कैलासच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता.

"हा डोक्यावर पडलेला दिसतोय. एरवी गुन्हेगार सी.आय.डी.च नाव ऐकून थरथर कापतात आणि हा आनंदी होतोय." डॉ. विजय विक्रमच्या कानात पुटपुटले.

विक्रमसुद्धा यामुळे गोंधळला होता आणि त्याने हातानेच डॉ. विजयना थांबायला सांगितलं. तोवर निनाद, ईशा आणि सोनाली पूर्ण लॅब बाहेरून चेक करून आले होते.

"सर, कुठेही दुसरं दार किंवा खिडकी नाही." निनाद म्हणाला.

"तू नक्की कोण आहेस? आणि आम्हाला बघून आनंद का झालाय तुला? की ही सगळी नाटकं आहेत?" विक्रमने जरा संशयाने विचारलं.

"सर, इतकी वर्ष जो चमत्कार घडावा याची मी वाट बघत होतो तो आज घडला आहे, तर मला आनंद नाही का होणार?" कैलास म्हणाला.

"म्हणजे?" विक्रमने विचारलं.

कैलासने स्वतःची व्यवस्थित ओळख करून दिली आणि काल जे पाकीट त्याने बाहेर टाकलं होतं त्याबद्दल सुद्धा सांगितलं.

"म्हणजे तुला इथे इतकी वर्ष मनाविरुद्ध काम करायला लागलं आहे? मग इतक्या वर्षात एकदाही आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का नाही केलास?" निनादने विचारलं.

"सर अहो, हे बघा.. हा फोन! यावर फक्त इन्कमिंग कॉल्स येतात. सतत तो रॉबर्ट माझ्यावर नजर ठेवून असतो, मेल्स नेहमी तो त्याच्या लॅपटॉप वरून चेक करत राहतो. मग तुम्हीच सांगा मी कसा कॉन्टॅक्ट करणार बाहेर?" कैलास म्हणाला.

"एक, एक मिनिट. काय म्हणालास? रॉबर्ट? म्हणजे या सगळ्या मागे रॉबर्ट आहे?" विक्रमने विचारलं.

"हो सर. खूप विक्षिप्त माणूस आहे हो तो." कैलास म्हणाला.

एवढ्यात त्याचा फोन वाजला. अर्थात रॉबर्ट शिवाय कोणाचाही फोन येणं शक्य नव्हतं.

"हॅलो, बोला सर." कैलास फोन स्पीकरवर ठेवून बोलत होता.

सगळे एकदम शांत राहून सगळं ऐकत होते.

"कैलास! तुझं कामात लक्ष नसतं का? अरे लॅब जवळचे सगळे सी.सी.टीव्ही. बंद पडले आहेत. जरा बघ. मला आत्ताच्या आत्ता फुटेज हवं आहे." रॉबर्ट चिडून म्हणाला.

"ओके. ओके. सर बघतो काय झालंय ते." कैलास म्हणाला आणि सगळ्यांना खुणेनेच इथून जा म्हणून सांगितलं आणि विक्रमच्या हातात काहीतरी दिलं.

विक्रमने तिथे पडलेल्या पानावर, "आम्हाला अजून बरीच माहिती हवी आहे. पुन्हा येऊ." असं लिहून खिडकीत ठेवलं आणि सगळे पटकन तिथून निघाले.
*****************************
रॉबर्टचा कैलासला फोन करून झाल्यावर तो कॅब बुक करून कॅबची वाट बघत असताना त्याचा फोन वाजला.

"हॅलो. आय एम ऑन द वे सर." रॉबर्ट फोन उचलल्या उचलल्या म्हणाला.

त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि एवढ्यात त्याची कॅब आली. तो कॅबमध्ये बसला आणि त्याचा प्रवास सुरू झाला.

"सर, तुम्हाला गाणी ऐकायची आहेत का?" कॅब ड्रायव्हरने विचारलं.

रॉबर्टने जरा तिरसट नजरेने बघून; "नकोय" म्हणलं.

पुन्हा काहीही न बोलता एकदम शांततेत त्यांचा प्रवास सुरू होता. एका निर्जन ठिकाणी गाडी आल्यावर रॉबर्टने त्याला गाडी थांबवायला लावली.

"सर, तुमचं डेस्टिनेशन अजून पुढे आहे." ड्रायव्हर म्हणाला.

तरीही काहीही न ऐकता त्याने त्याला तिथेच थांबवलं. रॉबर्ट उतरला आणि अचानक तिथून चार माणसं आली. काही कळायच्या आतच त्या माणसांनी कॅबला घेरा घालून ड्रायव्हरला खाली उतरवले. रॉबर्ट तिथेच उभा राहून सगळं बघत होता.

"सर, सर.. हे काय चाललंय?" तो गयावया करत म्हणाला.

"गप! तुला काय वाटलं तुला मी ओळखणार नाही?" रॉबर्ट म्हणाला.

तो कॅब ड्रायव्हर दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक होता आणि तो त्याच्या मागावर आहे, हे त्याला रस्त्यात आलेल्या फोन वरून समजलं होतं.

"तुला काय वाटलं तुम्ही सी.आय.डी.वाले मिळून कट कराल आणि मला समजणारसुद्धा नाही?" रॉबर्ट गर्वाने चिडून म्हणाला.

"सर, काय बोलताय तुम्ही? मी आणि सी.आय.डी.चा माणूस?" अभिषेक स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

त्या बरोबर रॉबर्टने त्याने लावलेली खोटी दाढी, मिशी काढली. आता आपली ओळख फुटलीच आहे तर चार हात करावेच लागणार आहेत हे ओळखून त्याने त्याला धरून ठेवलेल्या दोन माणसांना जोरात धक्का देऊन पाडलं आणि गन काढून आडोसा घेऊन लपला. एका हाताने फायरिंग करता करता सुयश सरांना त्याने व्हॉईस मेसेज टाकून ठेवला. रेंज आली की निदान मेसेज बघून सरांना परिस्थितीचा अंदाज येईल म्हणून त्याने हे केलं. ते चार गुंडसुद्धा फायरींग करत होते. एका पॉइंट नंतर एका गुंडाने त्याला मागून येऊन डोक्यात वार करून बेशुद्ध केलं आणि तिथून ओढत दुसरीकडे घेऊन गेला.
****************************
सी.आय.डी. ब्यूरोमध्ये सुयश सर काळजीत होते. विक्रमने त्यांना कैलासने जे काही सांगितलं होतं ते सगळं सांगितलं होतं. त्यात अभिषेकचा फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया येत होता. रॉबर्टचासुद्धा फोन लागत नव्हता.

"गणेश! अभिषेक आत्तापर्यंत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होता. आता त्याचा फोन लागत नाहीये, त्यात त्या रॉबर्टचासुद्धा. अभिषेक टॅक्सी ड्रायव्हर होऊन त्याचा पाठलाग करणार होता. त्याला संशय आला असण्याची मला शक्यता वाटतेय. एक काम कर, मोबाईल कंपनीला विचार त्याचं लास्ट लोकेशन काय आहे?" सुयश सर म्हणाले.

एवढ्यात सुयश सरांचाच फोन वाजला. रॉबर्टचा फोन होता.

"गणेश! थांब रॉबर्टचाच फोन आहे." सुयश सर फोन बघून म्हणाले आणि त्यांनी फोन उचलला.

"तुम्हाला काय वाटलं? हा रॉबर्ट इतकी वर्ष जी मेहनत घेत होता, त्यावर असंच पाणी फिरू देईल? हा.. हा.. हा.." रॉबर्ट हसत म्हणाला.

"काय? काय झालंय नक्की?" सुयश सर गोंधळून म्हणाले.

"उगाच काहीही माहीत नसल्याचा आव आणण्याची गरज नाही. तुमचा माणूस माझ्या ताब्यात आहे. आता जोवर माझं ध्येय पूर्ण होत नाही तोवर त्याला विसरा. हा.. हा.. हा..." रॉबर्ट कुत्सित हसत म्हणाला.

सुयश सर बोलायला जात होते तर त्यांना मध्येच टोकत रॉबर्ट बोलू लागला; "आता फक्त ऐकायचं. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही लोक डायनासोर कुठे आहे हे शोधून मला पकडाल? तर ते स्वप्नातसुद्धा शक्य नाही. तो डायनासोर कुठे आहे? हे माझ्या शिवाय कोणालाही माहित नाही. आता तुम्ही हा जो अती शहाणपणा केला आहे ना, त्याची किंमत मोजायला तयार राहा. हा.. हा.. हा..." रॉबर्ट म्हणाला आणि लगेचच फोन ठेवला.

"हॅलो... हॅलो..." सुयश सर बोलत होते पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं टेंशन बघून गणेश तिथे आला. सुयश सर पुन्हा त्याच नंबरवर फोन करत होते, पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता.

"सर, काय झालंय?" गणेशने विचारलं.

"अरे तो रॉबर्टच या सगळ्या मागचा सूत्रधार आहे. त्याने अभिषेकला पकडलं आहे. लवकर त्याचं लोकेशन कुठे आहे? हे बघ. आपल्याला लवकर निघावं लागेल." सुयश सर घाईत म्हणाले आणि लगेचच ते दोघे निघाले.

जाता जाता त्यांनी विक्रमला फोन करून रॉबर्टबद्दल सांगितलं. अचानक आता त्यांच्या प्लॅनमध्ये मोठा बदल होणार होता. ज्याअर्थी रॉबर्टने "तुम्हाला किंमत मोजावी लागेल" असं सांगितलं होतं त्याअर्थी नक्कीच तो त्याचा काहीतरी गैरवापर करणार हे त्यांनी ओळखलं होतं.
*****************************
इथे रॉबर्ट त्याला ज्या माणसाला भेटायचं होतं तिथे पोहोचला होता.

"वेलकम. वेलकम सर." रॉबर्ट त्याला बघूनच म्हणाला.

एका निर्जन ठिकाणी असलेल्या बंद गोडाऊनमध्ये त्यांची मीटिंग ठरलेली होती.

"रॉबर्ट! टुडे वी जस्ट सेव्ह अवर प्रोजेक्ट." तो माणूस जरा वैतागून म्हणाला.

"येस सर, आय नो. नाऊ आय विल टेक केअर." रॉबर्ट म्हणाला.

"दॅट्स बेटर. सम मोअर टाईम, देन धीस वर्ल्ड बेकेम अ समथिंग डिफ्रंड." तो माणूस म्हणाला.

त्याबरोबर दोघं हसू लागले.

"बाय द वे थँक्यू सर. जस्ट बिकॉज ऑफ यू आय कॅन रीच अॅट धिस पॉइंट अँड जस्ट बिकॉज ऑफ यू आय कॅन एबल टू सेव्ह धिस प्रोजेक्ट." रॉबर्ट म्हणाला.

त्या माणसाने फक्त मंद स्मित केलं आणि ते दोघं आणि त्या माणसासोबत अजून जी माणसं होती ते सगळे तिथून निघाले. रॉबर्टला आता लवकरात लवकर डायनासोर त्या लोकांना दाखवून त्यांच्या हवाली करून त्याचा त्याचा वाटा घेऊन त्याला दुसरीकडे जायचं होतं. रस्त्याने जाता जाता त्याने पुन्हा कैलासला फोन लावला.

"हॅलो कैलास, मी लॅबमध्ये येतोय. मोठी माणसं येतायत. सगळे प्रेझेंटेशन तयार ठेव, डायनासोर ट्रॅक कर. का ट्रॅक होत नव्हता तो? ते सॉर्ट केलं आहे." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर." कैलास म्हणाला.

"आणि हो, अजून ते फुटेज मला पाठवलं नाहीस लगेच पाठव." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

कैलासने मनातच काहीतरी हिशोब केला आणि मग लॅपटॉप वरून फुटेज पाठवून दिलं.

क्रमशः......
******************************
रॉबर्टला आता अभिषेक सापडला आहे आणि त्याला त्यांचा प्लॅन समजला आहे. त्याला विक्रम आणि कैलासबद्दल सुद्धा समजलं असेल का? सी.आय.डी. आता काय करेल? कैलासने विक्रमकडे काय दिलं असेल? लवकरच पाहूया पुढच्या पर्वात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all