द डी.एन्.ए. (भाग -२)

Suspence Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी. एन्. ए. (भाग -२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलास त्याला लागणारं सगळं सामान घेऊन त्या रूममध्ये गेला. त्याच्यासाठी ठेवलेल्या टेबलावर त्याने सगळं सामान लावलं. देवाचा फोटो तिथे ठेवला, त्याला नमस्कार केला आणि त्याची जर्नल उघडून तो बसला. त्याचं लक्ष मात्र त्या सेल वरून काही केल्या हटत नव्हतं. सतत त्याला तिथे कोणीतरी ओळखीचा चेहरा आहे असं वाटत होतं. रॉबर्ट त्याच्या टेबलाजवळ काहीतरी काम करत होता. त्याचं लक्ष कैलासकडे गेलं.

"मला माहितेय तुला काय वाटतंय! तू जे समजतोय तेच आहे." रॉबर्ट म्हणाला.

त्याच्या बोलण्यामुळे अचानक शांतता भंग झाली आणि कैलास भानावर आला. त्याने गोंधळून त्याच्याकडे बघितलं.

"हो! हाच तो डॉ. विद्यावर्धनचा मुलगा ज्याचं अपहरण झालं होतं." रॉबर्ट कुत्सित हसत म्हणाला.

"म्हणजे सर तेव्हा...." कैलास बोलता बोलता थांबला.

"हो! तेव्हा ते जे काही झालं होतं ते मीच घडवून आणलं होतं. आता त्या सगळ्या जुन्या गोष्टी उकरून वेळ वाया घालवू नकोसऽ... तू तुझ्या कामाशी काम ठेव." रॉबर्टने जरा रागातच त्याला सांगितलं.

कैलास काहीही न बोलता त्याचं काम करू लागला. त्याच्या डोक्यात मात्र इतकी वर्ष हा मुलगा इथे आहे तरी आपल्याला काहीच समजलं कसं नाही? हेच विचार चालू होते.

'आपण या माणसाच्या या विकृत प्रयोगाला अजून बराच वेळ लागेल म्हणून भ्रमात राहिलो. पण याने तर पूर्ण तयारी आधीच करून ठेवली होती. हे सगळं बघता आता जास्त वेळ हातात नाहीये.' तो मनात म्हणाला.

आता काय केल्याने हे सगळं काही अंशी तरी थांबवता येईल म्हणून त्याचं डोकं विचार करत होतं. 'रॉबर्ट कुठेतरी बाहेर जाणार असला तरी इथून मी कोणालाच फोन करू शकणार नाही फक्त इन्कमिंग कॉल्स यावर येतात तेही फक्त या रॉबर्टचे! मेल पाठवण्याची सोय नाही कारण रॉबर्ट त्याच्या डिव्हाईस वरून ते चेक करतो. बाहेर पडणं तर अशक्यच आहे. काय करू देवा? तूच आता काहीतरी घडवून आण... नाहीतर खूप मोठं संकट आकार घेतंय.' तो स्वतःशीच बोलत होता.

"कैलास! तू आत्ता नोटीस केलंस? आत्ता... आत्ता.. हालचाल जाणवली...." रॉबर्ट जवळ जवळ ओरडलाच!

"अं?.. हो.. हो.. सर." तो मुद्दाम काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

रॉबर्ट त्याच्या जवळ गेला आणि त्याला काही सूचना करू लागला. कैलास ते सगळं नीट स्वतःच्या जर्नल मध्ये लिहून घेत होता. बराच वेळ असाच कामात गेला.
****************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये आज सगळे रिपोर्ट्स बनवण्याच्या कामात व्यस्त होते. गेल्या महिनाभरात ज्या काही केस आल्या त्याचेच रिपोर्ट्स तयार करत सगळे बसले होते.

"गेल्या महिन्यात सगळ्यात मोठी केस आली ती हवेलीची! बाकी तर काय गैरसमजातून झालेल्या केस होत्या. तर काही फोन तर चक्क नुसते टाईम पास म्हणून होते..." ईशा म्हणाली.

"हो ना! लोकांना तर आपण मोकळे आहोत असंच वाटतं. आता परवा काय झालं माहितेय, मी घरी चाललो होतो. आमच्या बाजूच्या एरियात एक काका आहेत ते आले आणि मला म्हणे की कालच मी नवीन चप्पल घेतली एक चप्पल दारात आहे पण एक गायब आहे बहुतेक रस्त्यावरच्या कुत्र्याने नेली असेल जरा शोधून काढ." निनादने सांगितलं.

त्याचं हे बोलणं ऐकून बाकीच्यांना हसावं की रडावं हे कळत नव्हतं.

"मग? तू काय सांगितलं?" अभिषेकने हसू दाबत विचारलं.

"काय सांगणार? काही नाही... दिसली चप्पल कुठे तर देतो आणून म्हणालो आणि सटकलो तिथून! दुसऱ्या दिवशी मग त्यांना न कळत त्यांच्या दारात मी नवीन चप्पल ठेवून आलो. अरे ते काका बिचारे एकटे राहतात. कधी कधी त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नाही तर वेड्यासारखी बडबड करतात. मग त्यांना कुठे काय बोलत बसायचं." निनाद म्हणाला.

"हे एक चांगलं काम केलंस." विक्रम म्हणाला.

एवढ्यात ब्युरो मध्ये धावत धावत एक बाई आली. तिचा एकंदर चेहरा आणि बाकी अवतार बघता खूप काहीतरी मोठं घडलं आहे असं दिसत होतं. तिला बघून सोनालीने तिला बसायला खुर्ची दिली आणि ईशाने पटकन पाणी आणलं. बाहेरचा हा सगळा गोंधळ बघून सुयश सर सुद्धा त्यांच्या केबिन मधून बाहेर आले.

"सर... माझा मुलगा! त्याला तुम्हीच आता शोधून काढा..." ती रडत रडत हात जोडून म्हणाली.

"तुम्ही आधी शांत व्हा... हे पाणी घ्या..." ईशा तिला शांत करत पाणी देत म्हणाली.

तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन एका घोटात तिने पाणी संपवलं आणि पुन्हा तेच म्हणू लागली. ईशा आणि सोनालीने तिला शांत केलं.

"तुमचं नाव काय? तुमच्या मुलाचं नाव काय? सगळं नीट शांतपणे सांगा." सुयश सर म्हणाले.

आता ती बाई जरा शांत झाली होती. कोणीतरी आपलं ऐकून घेणार आहे म्हणून तिला बरं वाटलं आणि तिने डोळे मिटुन एक दीर्घ श्वास घेतला.

"सर मी जयश्री! माझा मुलगा... तो हरवला आहे.. मी आमच्या इथल्या पोलीस स्टेशन मध्ये कितीतरी वेळा गेले पण ते मला हेच सांगतात तो आता या जगात नाही म्हणून मी तुमच्याकडे आलीये... सर! तुम्हीच आता त्याला शोधा..." ती रडत रडत जसं आठवेल तसं बोलली.

"म्हणजे? नक्की काय घडलं आहे? तुम्ही कुठे राहता? कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार केली होती?" विक्रमने विचारलं.

"पुष्कराज नगर पोलीस स्टेशन! मी त्याच एरियात राहते. कितीतरी वेळा मी तिथे माझा मुलगा ऋषभ हरवल्याची तक्रार करायला गेले पण ते लोक माझं काही ऐकूनच घेत नाहीत." तिने रडत रडत सांगितलं.

ईशाने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत केलं.

"गणेश! पुष्कराज नगर पोलीस स्टेशन मध्ये फोन करून तिथल्या इन्स्पेक्टरना इथे बोलवून घे." सुयश सर म्हणाले.

लगेचच त्याने फोन लावून तिथल्या इन्स्पेक्टर लोखंडेंना बोलवून घेतलं. तोवर सगळे बाकीची चौकशी करत होते.

"मॅडम, तिथले इन्स्पेक्टर लोखंडे येतायत, तोवर जरा तुमच्या मुलाबद्दल अजून माहिती द्या." विक्रम म्हणाला.

"सर मी जयश्री! डॉ. विद्यावर्धन यांची मिसेस. ते शास्त्रज्ञ होते. साधारण १३ वर्षापूर्वी माझा मुलगा ऋषभ हरवला तेव्हाच ते गेले." तिने सांगितलं. बोलताना तिचा आवाज जड झाला होता. एकाच वेळी मुलगा आणि पती यांचं अचानक जाणं तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम करून गेला होता.

"काय? तेरा वर्षांपूर्वी? मग तुम्ही मुलगा हरवल्याची तक्रार आत्ता का करताय? इतकी वर्ष...." अभिषेक बोलत होता तर त्याला मध्येच तोडत ती बोलू लागली; "सर, मला माहितेय तुम्हाला वाटलं असेल मी इतकी वर्ष काय करत होते तर झालं असं होतं की, माझा मुलगा तेव्हा दहा वर्षाचा होता. एक दिवस अचानक तो शाळेतून गायब झाला आम्ही दोघांनी पोलिसात तक्रार केली तर तीन दिवसांनी त्यांनी एक पूर्णपणे जळालेली बॉडी आणली. त्यांचं म्हणणं होतं हा माझाच मुलगा आहे. त्यानुसार आमची DNA टेस्ट सुद्धा झाली ते रिपोर्ट पण मॅच होतात असं आलं आणि हे ऐकून तिथल्या तिथेच ऋषभच्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. पण मला खात्री होती ते रिपोर्ट चुकीचे आहेत. तो धक्का तेव्हा इतका मोठा होता की माझी मानसिक स्थिती काही बोलण्याची नव्हतीच. मी बोलायचा प्रयत्न करत होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आम्हाला जवळचे असे नातेवाईक कोणी नाही ह्यांच्या इतर वैज्ञानिक मित्रांनी माझी अवस्था बघून मला ट्रीटमेंट साठी हॉस्पिटल मध्ये भरती केलं. तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू होती पण मला सतत हेच डोळ्यासमोर दिसायचं... आता मी तिथून आले तशी पुन्हा त्या पोलीस स्टेशन मध्ये गेले पण तिथे माझं ऐकून घ्यायला कोणीच नाही." तिने सांगितलं.

तिचं बोलणं होई पर्यंत तिथे इन्स्पेक्टर लोखंडे आले.

क्रमशः.....
***************************
नक्की काय घडलं असेल तेव्हा? जयश्री इतक्या ठाम पणे कशी सांगतेय तिचा मुलगा जिवंत आहे? तिला रॉबर्ट बद्दल काही समजलं असेल का? रॉबर्टने नक्की ऋषभवर काय प्रयोग केले आहेत? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all