© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळ्या सी.आय.डी. टीमचा चहा, नाश्ता झाल्यावर सगळे तिथून उठले. आज तो मुलगा तिथे कुठेही दिसत नव्हता. सगळे आपल्याच धुंदीत असल्यासारखे एक सामसूम जागा बघून तिथे बसले.
***************************
सगळ्या सी.आय.डी. टीमचा चहा, नाश्ता झाल्यावर सगळे तिथून उठले. आज तो मुलगा तिथे कुठेही दिसत नव्हता. सगळे आपल्याच धुंदीत असल्यासारखे एक सामसूम जागा बघून तिथे बसले.
"त्या जंगलात एक लॅब उभारली आहे. त्या लॅबच्या एका खिडकीजवळ आम्हाला एक रिकामं पाकीट मिळालं. याच हॉटेलचं आहे ते." विक्रमने सगळ्यांना सांगितलं.
"म्हणजे सर तिथे माणूसच आहे आणि या हॉटेलमधला मुलगा त्यांना सामील आहे, हा संशय खरा आहे तर." अभिषेक म्हणाला.
"हो. आता आपल्याला हे पाकीट नीट बघायचं आहे. यात काहीतरी आकडे आणि अक्षरं यांची सरमिसळ करून काहीतरी लिहिलेलं आहे. नक्कीच काहीतरी क्लू आहे." विक्रम म्हणाला.
"सर, मला एक प्रश्न पडतोय. तिथे ज्याने कोणी हे पाकीट टाकलं असेल, त्याला खरंच आपल्याला मदत करायची असेल का? की आपली दिशाभूल?" निनादने विचारलं.
"आधी हे काय आहे याचा छडा लावू म्हणजे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळतील." विक्रम म्हणाला.
सगळेचजण ते पाकीट बघत होते. डॉ. विजयंच्या डोक्यात मात्र काहीतरी सुरू आहे असं जाणवत होतं. विक्रमने आधी सुयश सरांना फोन करून कालच्या त्यांच्या या मिशनबद्दल सगळं रिपोर्टिंग केलं.
"सर, तुम्ही थोडे संभ्रमित दिसत आहात. काय झालं?" विक्रमने विचारलं.
"विक्रम, मला वाटतंय हे डिटेल्स एखाद्या चीपचे आहेत." डॉ. विजय म्हणाले.
"म्हणजे? यातून आपल्याला नक्की काय हाती लागेल?" विक्रमने विचारलं.
"थांब. मी हे नियतीला पाठवून देतो ती सांगेल. इथे आपण काही करत बसलो आणि कोणी आपल्याला बघितलं तर लोकांना संशय येईल." डॉ. विजय म्हणाले.
लगेचच त्यांनी त्या पाकिटावर जे डिटेल्स होते ते नियतीला पाठवून दिले. आता त्या सगळ्यांनाच त्या लॅबमध्ये नक्की काय घडतंय? हे बघण्यासाठी निघायचं होतं. सगळे उठून कोणीही गावकरी तिथे नाही ना? हे बघून जंगलाच्या दिशेने जायला निघाले.
"एक मिनिट.. एक मिनिट.. लपा पटकन." विक्रम हळू आवजात घाईत सगळ्यांना म्हणाला.
एक आडोसा बघून सगळे तिथे लपले.
"काय झालं सर?" ईशाने विचारलं.
"समोरून रॉबर्ट येतोय." विक्रमने रॉबर्टला येताना बघितलं होतं आणि तेच सगळ्यांना दाखवलं.
"पण सर हा तर.." अभिषेक बोलता बोलता थांबला.
"हो, हा परदेशात जाणार होता. आधीपासूनच आपला याच्यावर संशय होता. आता तर पक्का झाला आहे." विक्रम म्हणाला आणि बोलता बोलता त्याने एक नंबर डायल केला.
सगळे गप्प राहून विक्रम काय करतोय? आणि रॉबर्ट कुठल्या दिशेने जातोय? हे बघत होते.
"हॅलो, मी सी.आय.डी. इन्स्पेक्टर विक्रम बोलतोय." विक्रमने फोनवर सांगितलं.
विक्रमने रॉबर्टलाच फोन केलेला त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव सगळेच जण बघत होते.
"हा बोला ना सर" रॉबर्ट कसंबसं म्हणाला.
"तुम्ही अजून परदेशात गेलेले दिसत नाहीत." विक्रम म्हणाला.
यामुळे रॉबर्ट एकदम गोंधळला आणि त्याला काय बोलावं हे सुचेना. त्याने सगळीकडे नजर फिरवली. त्याची उडालेली ही धांदल बघून सगळ्यांनाच गंमत वाटत होती.
"हॅलो... काय झालं सर? अहो, तुमचा तो इंटरनॅशनल नंबर लागला नाही, म्हणून विचारलं." विक्रम म्हणाला.
त्याच्या या वाक्याने रॉबर्टला जरा बरं वाटलं आणि कपाळावरचा घाम पुसत तो बोलू लागला; "हो. हो. सर. इथे अजून काही दिवस इथेच आहे. काम वाढलं आहे म्हणून थांबावं लागलं."
"बरं झालं. नाही म्हणजे आम्हाला जरा तुमची मदत हवी होती, तर तुम्ही त्याच हॉटेलमध्ये आहात ना? जरा माहिती हवी होती तर कोणालातरी इथून पाठवलं असतं." विक्रम म्हणाला.
"नाहीऽ नको, म्हणजे मी तिथून चेक आऊट केलं आहे. मी स्वतःच येतो ना दुपारपर्यंत ब्यूरोमध्ये." रॉबर्ट थोडा घाबरून म्हणाला.
त्याच्या आवाजातला हा बदल विक्रमला जाणवत होता.
"ओके. नाहीतर तुम्हाला वेळ नसेल तर नवीन हॉटेलचा पत्ता द्या. आम्ही स्वतःच येतो. शेवटी तुम्ही इतके मोठे वैज्ञानिक, तुमच्या मीटिंग असतील." विक्रम मुद्दाम म्हणाला.
"खरंच नको सर. मी येतो. तसंही माझं त्या बाजूला काम आहे तर येऊन जातो. माझ्या ऋषभसाठी मी एवढं करूच शकतो." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.
त्याच्याशी बोलून झाल्यावर विक्रमने लगेचच सुयश सरांना फोन करून याबद्दल सांगितलं.
"अभिषेक! तू या रॉबर्टच्या मागावर जा. बघ नक्की कुठे जातोय." विक्रम म्हणाला.
अभिषेक रॉबर्टच्या मागावर गेला आणि तेवढ्यात डॉ. विजयना नियतीचा फोन आला.
"हा बोल नियती" ते म्हणाले.
त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि लगेचच त्यांनी त्यांचा लॅपटॉप काढला.
"काय झालं सर?" विक्रमने विचारलं.
"माझा अंदाज खरा ठरला, ते डिटेल्स ट्रॅकिंग चीपचे होते." डॉ. विजय म्हणाले.
त्यांनी त्यांच्या लॅपटॉपवर लगेचच काहीतरी केलं.
"सर, हा रॉबर्ट तर आत्ता शहराच्या दिशेने गेला आहे आणि हे लोकेशन जंगलातील वाटतंय. म्हणजे नक्की काय असेल इथे?" निनादने विचारलं.
"कदाचित हा डायनासोर असण्याची शक्यता आहे. आपण जाऊन बघूया." डॉ. विजय म्हणाले.
"ओके. त्याआधी मी सुयश सरांना रिपोर्ट करून ठेवतो आपण तिथे चाललो आहोत." विक्रम म्हणाला आणि त्याने सुयश सरांना याबद्दल सांगितलं.
नंतर लगेच त्यांचा प्रवास जंगलाच्या दिशेने सुरू झाला. डॉ. विजयंनी जंगलातून जायचं म्हणजे सेफ्टी बाळगली पाहिजे, म्हणून त्यांच्या किटमध्ये हिंस्र प्राण्यांनी हल्ला केलाच तर तात्पुरतं बेशुद्ध करणारं इंजेक्शन आणि स्प्रे ठेवला होता. सगळ्यात पुढे डॉ. विजय आणि विक्रम चालत होते आणि बाकीचे सगळे त्यांच्या मागून. चारही बाजूंनी लक्ष ठेवून त्यांचा प्रवास सुरू होता. जंगलाच्या मध्य भागानंतर थोडं पुढे गेल्यावर सगळे एका जागी थबकलेच.
"सर..." सोनाली एकदम अवाक होऊन म्हणाली.
सगळे एका आडोश्याला उभे होते. समोरचं दृश्य बघून त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
"विक्रम! ही केस आता खूप घातक वळणावर गेली आहे. लवकर इथून चला, पूर्ण प्लॅन केल्याशिवाय आपल्याला काहीही करता येणार नाही." डॉ. विजय म्हणाले.
"हो." विक्रम म्हणाला आणि त्याने समोर दिसणाऱ्या दृश्याचे काही फोटो काढून घेतले.
परत माघारी फिरताना सुयश सरांना त्याने ते फोटो पाठवले.
*****************************
इथे सुयश सर आणि गणेश नियतीसोबत लॅबमध्ये होते. एवढ्यात विक्रमने पाठवलेले फोटो त्यांना मिळाले.
*****************************
इथे सुयश सर आणि गणेश नियतीसोबत लॅबमध्ये होते. एवढ्यात विक्रमने पाठवलेले फोटो त्यांना मिळाले.
"नियती! हे बघ." सुयश सरांनी तिला फोटो दाखवले.
"बापरे! सर, हे तर..." नियतीलाही ते पाहून धक्काच बसला.
"आता सगळी भिस्त तुझ्यावर आणि डॉ. विजयंवर आहे. काहीही करा आणि यातून आता मार्ग काढा." सुयश सर म्हणाले.
"सर, आम्ही प्रयत्न करू, पण हे प्रकरण आजवर घडलं नाही असं आहे. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. त्यात यावर अँटीडोट शोधणं हे त्यालाच शक्य आहे ज्याने हा फॉर्म्युला बनवला आहे. एवढ्या कमी वेळात आपण फॉर्म्युला शोधून अँटीडोट तयार करणं म्हणजे खूप वेळ खर्ची घालवणारे आहे." नियती म्हणाली.
"ओके. तरीही कामाला लाग लवकर." सुयश सर म्हणाले.
नियती तिचं काम करत होती आणि अभिषेक वेळोवेळी अपडेट्स देऊन सुयश सरांना रॉबर्टबद्दल सांगत होता. रॉबर्ट आता ब्यूरोमध्ये येईल म्हणून ते दोघं सी.आय.डी. ब्यूरोमध्ये गेले. विक्रमने जे पाठवलं होतं, ते बघून तर सुयश सरांच्या काळजीत भर पडली होती. पूर्ण टीम तिथे होती आणि सोबत डॉ. विजय. एकवेळ एखादा बॉम्ब असता तरीही चाललं असतं; असं म्हणायची वेळ आली होती. हे प्रकरण जगावेगळं असल्याने अचानक काही भलतंच झालं तर स्वसंरक्षणासाठी काय करायचं? हे कोणालाही माहित नव्हतं म्हणून जास्त काळजी त्यांना वाटत होती.
"सर, तुम्ही खूप काळजीत दिसताय." गणेश त्यांना अस्वस्थ बघून म्हणाला.
"हो रे! आपली टीम तिथे गेली आहे आणि आत्ताचे फोटो बघितले ना? खरंच तिथे डायनासोर आहे. त्यात हा जरा विचित्र दिसतोय. जणू माणसात बदल केलेले आहेत, म्हणून जास्त काळजी वाटतेय." सुयश सर म्हणाले.
"हो सर ते झालंच, पण नका काळजी करू. सगळे एकत्र आहेत तर काळजी घेतील." गणेश म्हणाला.
"ते झालंच रे. पण मला अजून एक काळजी वाटतेय." सुयश सर म्हणाले.
त्यांना आता अजून कसली काळजी वाटतेय म्हणून गणेशने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यांनी घसा खाखरुन बोलायला सुरुवात केली; "मला राहून राहून असं वाटतंय हा जो मानव डायनासोर आहे तो ऋषभ आहे."
त्यांच्या या बोलण्याने गणेशने त्यांच्याकडे चमकून पाहिलं. जर खरंच असं असेल तर त्याच्या आईवर कोणती परिस्थिती ओढवेल? याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती.
क्रमशः......
****************************
सी.आय.डी. टीमला आता ऋषभरुपी डायनासोर तर दिसला आहे, पण ते त्याला वाचवू शकतील का? रॉबर्टला सी.आय.डी.चा प्लॅन समजेल? कैलास तर यात विनाकारण गोवला जाणार नाही ना? विक्रम आता टीम सोबत कुठे जाईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.
****************************
सी.आय.डी. टीमला आता ऋषभरुपी डायनासोर तर दिसला आहे, पण ते त्याला वाचवू शकतील का? रॉबर्टला सी.आय.डी.चा प्लॅन समजेल? कैलास तर यात विनाकारण गोवला जाणार नाही ना? विक्रम आता टीम सोबत कुठे जाईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.