द डी.एन्.ए. (भाग -२८)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
विक्रम आणि निनाद जंगलात जाऊन दोन तास होऊन गेले होते. सगळ्यांना काळजी तर वाटत होती.

"मला वाटतंय आता आपण जाऊन बघायला हवं." ईशा म्हणाली.

"थांब. थांब. एवढी घाई करण्याची गरज नाही. त्या दोघांना हॅम रेडिओ दिले आहेत ना, जर काही संकट आलं असतं, तर त्यांनी कळवलं असतं." डॉ. विजय म्हणाले.

"हो ईशा. आपण अताताईपणा करून चालणार नाहीये. हे बघ, मी त्या दोघांचे फोन ट्रेस करत पण ठेवले आहेत. दोघं एकत्र आहेत शिवाय ते फोन पुढे पुढे जातायत, म्हणजे दोघं सुखरूप आहेत." सोनाली म्हणाली.

या सगळ्यांकडे वाट बघण्यावाचून काहीही पर्याय नव्हता. कोणत्याही संकटाची चाहूल लागलेली नसताना उगाच संपूर्ण टीमने तिथे जाऊन मिशनवर पाणी फेरण्यापेक्षा अजून थोडी वाट बघणं उचित होतं. सगळे जंगलाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. एवढ्यात डॉ. विजयना हॅमवर मेसेज आला.

"विक्रमने मेसेज केला आहे." ते म्हणाले.

लगेचच सगळे पुढे आले. हॅमचा मेसेज म्हणजे माॅर्स कोडमध्ये असणार हे सगळ्यांना माहीत होतं. लगेचच सगळ्यांनी मिळून मेसेज डी - कोड करून वाचला; "सेफ. प्रुफ"

"याचा अर्थ दोघं सुखरूप आहेत आणि त्यांना तिथे काहीतरी सापडलं आहे." अभिषेक म्हणाला.

"चला, एक काळजी मिटली. सर, तुम्ही आराम करा. आम्ही तिघे आहोत इथे." सोनाली म्हणाली.

"नको. मी ठीक आहे. एकदा दोघं आले की जीव भांड्यात पडेल. मग सगळेच आराम करू." डॉ. विजय म्हणाले.

थोडावेळ असाच गेला. एव्हाना तीन वाजून गेले होते. सगळे जण बसल्या बसल्या पेंगत होते. एवढ्यात समोरून दोन आकृत्या त्यांच्या जवळ येताना ईशाने बघितल्या.

"बहुतेक सर आणि निनाद आले." ती म्हणाली.

त्या दोघांना बघून त्यांची झोप कुठल्या कुठे उडून गेली.

"सर सगळं ठीक ना? तिथे तुम्हाला काही झालं नाही ना?" ईशाने काळजीने विचारलं.

"हो. हो. काही झालेलं दिसतंय का तुला?" विक्रम म्हणाला.

ईशाने मानेनेच नकार दिला आणि गप्प उभी राहिली. दोघं सुखरूप आलेले बघून सगळ्यांनाच बरं वाटत होतं.

"चला आता थोडा आराम करून घ्या. उद्या आपण बोलू. खूप मोठा कट रचला गेला आहे." विक्रम म्हणाला.

सगळ्यांना तसंही दिवसभराच्या मेहनतीने झोप आलेलीच होती. लगेचच सगळे टेंटमध्ये गेले. सोनाली, ईशा एका टेंटमध्ये, निनाद, अभिषेक दुसऱ्या आणि डॉ. विजय, विक्रम तिसऱ्या असे तीन टेंट होते. डॉ. विजय तर पडल्या पडल्या झोपले. सगळेच दमले असल्याने त्यांना लगेच झोप लागली, पण इथे ईशाला काही केल्या झोप येत नव्हती, म्हणून ती बाहेर कॅम्प फायर जवळ येऊन बसली.

'मला एवढी काळजी का वाटते विक्रम सरांबद्दल? सोनाली म्हणते तसं खरंच तर मी..? नाही.. नाही.. विक्रम सरांना काय वाटेल? आमची चांगली मैत्री आहे ती सुद्धा या कारणाने तुटायला नको.' ती मनातच विचार करत होती.

एवढ्यात विक्रमसुद्धा बाहेर आला. तिचं त्याकडे लक्षच नव्हतं. तो तिच्या समोर येऊन बसला तरीही तिला माहित नव्हतं.

"काय गं? इथे का बसली आहेस?" विक्रमने विचारलं. त्याच्या आवाजाने ती भानावर आली.

"काही नाही. असंच. झोपेची वेळ टळून गेली आहे त्यामुळे आता काही झोप नाही लागणार." ईशा म्हणाली.

"हम्म." विक्रम म्हणाला.

थोडावेळ असाच शांतेत गेला.

"सर, तुम्ही झोपा ना. जंगलातून आला आहात. खूप दमायला झालं असेल." ईशा म्हणाली.

"नाही. एवढं काही नाही झालं. आपल्याला खूप प्रयत्न करायला लागणार आहेत या केसवर." विक्रम म्हणाला.

"ते तर आहेच. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता ही अशी जगावेगळी केस समोर येईल." ईशा म्हणाली.

"हो. उद्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर काम करायचं आहे. जा जाऊन झोप. मीही थोडा आराम करतो. उद्या दिवसभर खूप धावपळ होणार आहे." विक्रम म्हणाला.
****************************
इथे लॅबमध्ये कैलास आता ब्राम्हमुहूर्तावर उपासनेला बसला होता.

'देवा! नक्कीच उद्याचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. फक्त एवढ्यात त्या रॉबर्टला मी चीपचे डिटेल्स हॅक करून बदलले आहेत हे कळायला नको. ऋषभला तर मी जंगलाच्या एका कोपऱ्यात ठेवलं आहे, पण त्याला अजून कितीवेळ कंट्रोल करता येईल सांगता येत नाही. लवकरात लवकर ते जे कोणी दोघं इथे आलेले त्यांना माझा क्लू समजून त्यांनी काहीतरी ऍक्शन घेऊ दे.' कैलास मनोमन देवाशी बोलत होता.

थोडावेळ असाच गेला आणि कैलास पुन्हा कामाला लागला. एव्हाना आता सूर्याची किरणं त्या लहान खिडकीतून आत येऊ लागली होती आणि त्यामुळेच रॉबर्टला जाग आली. कैलासचं मन प्रसन्न झालं होतं. त्याने रॉबर्टला उठलेलं बघितलं.

"गूड मॉर्निंग सर." कैलास म्हणाला.

"हम्म. गूड मॉर्निंग. झालं का काम?" त्याने उठल्या उठल्या विचारलं.

'हो चांगलंच झालंय. तुझ्यासाठी बॅड मॉर्निंग ठरणार आहे हे नक्की.' कैलास मनात म्हणाला.

"हो झालं ना सर. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळं झालं आहे." नंतर तो चेहऱ्यावर आनंद दाखवून म्हणाला.

"गूड, गूड. मी येतो फ्रेश होऊन मग बोलू." तो म्हणाला आणि तिथून गेला.

कैलासने लगेच तो गेलेला बघून लॅपटॉपवर काहीतरी केलं आणि पुन्हा त्याच्या कामाला लागला. थोड्याचवेळात तो आला तोवर कैलासचा चहा आणि बिस्कीटचा पुडा आलेला होता.

"चल दाखव काय काय केलं आहेस?" रॉबर्ट म्हणाला.

त्याने आधी त्याला सगळं काम दाखवलं आणि चहा घेतला. रॉबर्ट पुन्हा ऋषभला ट्रॅक करायला त्याच्या लॅपटॉपकडे वळला.

"ओह नो! जे घडायला नको होतं तेच झालं." रॉबर्ट डोक्याला हात लावून म्हणाला.

"काय झालं सर?" कैलासने मुद्दाम चेहऱ्यावर काळजीचे भाव आणून विचारलं.

"डायनासोरचा सगळा संपर्क तुटला आहे. आता त्याला शोधणं म्हणजे कठीण काम होणार आहे." रॉबर्ट म्हणाला.

"पण सर असं कसं होईल?" कैलासने मुद्दाम विचारलं.

"तेच तर कळत नाहीये. कामात काम वाढलं. चल मी जरा बाहेर जाऊन येतो." रॉबर्ट जरा काळजीत म्हणाला.

एवढ्यात त्याचा फोन वाजला म्हणून तो थांबला आणि बाजूला जाऊन त्याने फोन घेतला. कैलासचं त्याच्याकडे लक्ष होतंच.

"हॅलो. येस, येस. आय नो, टुडे यू आर व्हिझिटिंग इंडिया. व्हॉट? ओके. ओके." रॉबर्टची अशी काही वाक्य कैलासच्या कानावर पडली. आणि तो आता भलताच काळजीत आहे हे त्याच्या लक्षात आलं.

"काय झालं सर?" त्याने फोन ठेवल्यावर विचारलं.

"आजच्या आज इन्व्हेस्टर्सची माणसं माझा प्रयोग आणि स्पेशली डायनासोर बघायला येणार आहेत." रॉबर्ट म्हणाला.

"पण सर..." कैलास बोलत होता तर रॉबर्ट एकदम चिडला; "होऽऽ माहीत आहे तो कुठेतरी गायब झाला आहे. तुला त्याची काळजी करण्याची गरज नाही. मी बघतो काय करायचं."

कैलास काहीही बोलला नाही. लगेचच रॉबर्ट लॅबमधून बाहेर पडला.

'कोण असतील ही माणसं? कालची माणसं त्या रॉबर्टची नसतील ना? जर ती माणसं रॉबर्टची असतील तर माझं काही खरं नाही. देवा! प्लीज आता तूच यातून मार्ग दाखव. आजवर जे प्रयत्न मी केले आहेत त्यावर एका क्षणात पाणी फिरेल. मला आता कळेल कसं नक्की ती दोघं कोण होती?' कैलास मनातच विचार करत होता.

विचारा विचारातच त्याला काहीतरी कल्पना सुचली आणि तो लगेच लॅपटॉप घेऊन काहीतरी करू लागला. या कामात त्याचा थोडावेळ तर गेला पण त्याला जी माहिती हवी होती मिळाली आणि तो निश्चिंत झाला.
**************************
सी.आय.डी. टीम त्यांचं कॅम्पच सगळं सामान आवरून पुन्हा गावात फिरत होती. आज त्यांना खूप महत्त्वाच्या टप्प्यावर काम करायचं होतं. या सगळ्याचं मूळ त्या लहान हॉटेलवर होतं, म्हणून सगळे सकाळ सकाळी तिथेच जाऊन बसले होते. चहा, नाश्ता करता करता त्यांचं बाहेरसुद्धा लक्ष होतं.

"आज तो मुलगा इथे दिसत नाहीये." ईशा हळूच म्हणाली.

"हम्म. नीट लक्ष ठेवा. तो रोज ड्रोनने तिथे जेवण टाकतो म्हणजे चहा किंवा कॉफीसुद्धा टाकत असेल. डायनासोरला किंवा कोणत्याही प्राण्याला असं पार्सल का कोणी देईल? हे माणसाचं आहे एवढं नक्की." विक्रम म्हणाला.

"हो सर. काल आपल्याला तिथे पुलावाचं पाकीट पण तर मिळालं आहे." निनाद म्हणाला.

"हम्म. त्या पाकिटात काहीतरी वेगळं आहे. इथून थोड्यावेळात निघू आणि बघूया." विक्रम म्हणाला.

सगळे गप्पा मारत आहेत असं दाखवून चहा, नाश्ता करत होते.

क्रमशः......
****************************
विक्रमने आता प्लॅन केला असेल? आज शत्रू देशातले काही लोक रॉबर्टला भेटायला येणार आहेत याची टीप सी.आय.डी.ला मिळेल का? रॉबर्ट यातून निसटेल? कैलासने काय क्लू दिला असेल? ऋषभ सी.आय.डी.ला सापडेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all