द डी.एन्.ए. (भाग -२७)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
टीमचे टेंट तर लावून झाले होते. सगळे बाहेर कॅम्प फायर करून तिथे बसले होते. अजूनही म्हणावा तेवढा अंधार झालेला नव्हता, म्हणून सगळे पूर्ण गाव सामसूम होण्याची वाट बघत होते. गावची हवा असल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. मस्त कॅम्प फायर जवळ बसून सगळे गप्पा मारत होते.

"ट्रेनिंगचे दिवस आठवले. तेव्हाही अश्याच टेंटमध्ये राहून मस्त सगळ्यांसोबत एन्जॉय केलं होतं." सोनाली म्हणाली.

"हो. आपली सी.आय.डी. ऑफीसर होण्याची ट्रेनिंग तर एकत्रच झाली. सुयश सर, गणेश आणि आपण सगळे किती धम्माल करायचो ना? सुयश सर आपल्या सोबत एरवी किती फ्रीली वागतात. जराही दडपण येत नाही." ईशा म्हणाली.

"हो. आणि विक्रम सरसुद्धा." सोनाली हळूच तिला डोळा मारून म्हणाली.

तिच्या या वाक्याने विक्रमने चमकून दोघींकडे बघितलं. सोनालीशिवाय बाकी कोणालाही याबद्दल माहीत नव्हतं म्हणून त्यांनी इन जनरल हे वाक्य घेऊन सहमती दर्शवली.

"चला, चला आता बास. थोडावेळ काहीतरी टाईमपास करतोय असं दाखवून कामाला लागायचे आहे." विक्रम म्हणाला.

थोडावेळ बसल्या बसल्या अंताक्षरी, दमशेराज असं काहीतरी खेळून त्यांनी वेळ घालवला. तोवर आता मध्यरात्र झालीच होती.

"चला, चला.. आता बास. आता कामावर फोकस करायचा." विक्रम घड्याळ बघून म्हणाला.

कित्येक दिवसांनी सगळ्यांनी असा मोकळा वेळ अनुभवला होता, म्हणून सगळेच जरा फ्रेश झाले होते. पुन्हा नव्याने काम करण्यासाठी जणू त्यांच्यात एक नवीन ऊर्जा आली होती.

"तर, आता ठरल्याप्रमाणे मी आणि निनाद जंगलच्या दिशेने जातोय. आम्ही दोघं जर दोन तासात परत आलो नाही तरंच तुम्ही आत या." विक्रम म्हणाला.

"सर, त्यापेक्षा सगळेच जाऊया. तिथे काही धोका असेल तर पूर्ण टीम असलेली बरी." ईशा काळजीने म्हणाली.

"नाही. एक सिनियर म्हणून मी सगळ्याच टीमचा जीव एकदम धोक्यात घालू शकत नाही. धोका असेल तरी आम्ही बघू. समजा इन केस काही झालं तर टीमपैकी कोणीतरी हवं सुयश सरांना कळवायला." विक्रम म्हणाला.

त्याचा निश्चय तर ठाम होता. ईशाने काहीही दाखवलं नसलं तरी त्याच्या; "इन केस काही झालं तर.." या वाक्याने तिचं मन खूप काळजी करू लागलं होतं.

"अरे विक्रम, निदान मी तरी येतो तुमच्या सोबत. तुम्हाला तिथे काही गरज पडली तर?" डॉ. विजय म्हणाले.

"नको सर. आत्ता आम्ही दोघं फक्त पाहणी करून येणार आहोत. उद्या आपण सगळेच तिथे जाऊ. एकतर आत्ता खूप रात्र झाली आहे, तुमचा जीव आम्ही धोक्यात नाही घालू शकत." विक्रम म्हणाला.

"ओके. आम्ही इथेच आहोत. तुम्ही वेळोवेळी अपडेट्स द्या आणि हो, तिथे नेटवर्क नसेल तर म्हणून मी हे हॅम रेडिओ आणले आहेत. आपण यातून संपर्कात राहू." डॉ. विजय त्या दोघांना हॅम रेडिओ देत म्हणाले.

"थँक्यू. आम्ही येतोच. आपलं हे पहिलंच मिशन नाहीये. कितीतरी जीवघेणी मिशन आपण फत्ते केली आहेत, हेही करू. आपली ड्युटी अशीच आहे. कोणीही विनाकारण काळजी करू नका." विक्रम तिरकस नजरेने ईशाकडे बघून म्हणाला आणि लगेचच ते दोघं जंगलाच्या दिशेने निघाले.

सोनाली, ईशा, अभिषेक आणि डॉ. विजय तिथेच होते. विक्रम आणि निनाद आता जंगलात पोहोचले होते.

"सर, तो ड्रोन वायव्य दिशेने जात होता." निनाद म्हणाला.

दोघं कंपासच्या मदतीने हळूहळू चालत होते. आधीच बरीच रात्र झाली होती त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. बॅटरीच्या उजेडात चाचपडत पुढे जायला जरा वेळ लागत होता. सगळीकडे मिट्ट अंधार आणि फक्त रातकिड्यांचा आणि मध्येच घुबडाचा आवाज येत होता. पायाखाली नक्की पानं आणि जमीनच आहे की, कोणत्या सरपटणाऱ्या प्राण्यावर आपण पाय दिला आहे? हेही कळत नव्हतं. शक्य तेवढी शांतता राखून दोघं चालत होते. थोडं अंतर पार केल्यावर थोडा उजेड त्यांना दिसला.

"जंगलाच्या मधोमध उजेड? काहीतरी गडबड आहे." विक्रम निनादला एकदम हळू आवाजात म्हणाला.

काहीही आवाज न करता हातात गन घेऊन दोघं झाडांच्या आडोशाने त्या उजेडाच्या दिशेने जात होते.
***************************
इथे लॅबमध्ये कैलास रॉबर्टने दिलेल्या नवीन प्रमाणानुसार त्या अंड्यांवर प्रक्रिया करत होता. रॉबर्टसुद्धा त्या चीपच्या मदतीने ऋषभला कंट्रोल करायला बघत होता. रॉबर्ट त्याच्याकडे असलेल्या लॅपटॉपवर हे करत होता तर कैलासकडे लॅपटॉप होता त्यात सी.सी.टीव्ही.च फुटेज चालू होतं. काम करता करता त्याचं लक्ष तिथे गेलं आणि त्याने लॅब बाहेर कोणीतरी आलं आहे हे बघितलं.

\"जर रॉबर्टला याबद्दल समजलं तर काही खरं नाही. त्याचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून काहीतरी करावं लागेल.\" त्याने मनातच विचार केला आणि रॉबर्ट काय करतोय? हे बघितलं.

रॉबर्ट ऋषभला कंट्रोल करायच्या प्रयत्नातच राहिला होता, पण काही केल्या त्याला काहीच सुचत नव्हतं. हे कैलासने बघितलं आणि स्वतःशीच स्मित केलं.

"सर, तुम्ही खूप टेंशनमध्ये दिसताय. तुम्हाला आरामाची गरज आहे." कैलास म्हणाला.

"असणारच ना टेंशनमध्ये? चीपचे डिटेल्स बरोबर टाकूनसुद्धा एरर येतंय." रॉबर्ट तणतणत म्हणाला.

"सर ऐका माझं. तुम्ही खूप दमले आहात म्हणून असं होतंय. सकाळी त्याला गावाच्या दिशेने सोडता येईलच ना? तसंही आत्ता खूप रात्र झाली आहे. डायनासोर कोणाच्या नजरेत येणार तर नाहीच आणि त्याची शक्ती जर कमी झाली तर काय उपयोग?" कैलास त्याला समजावत म्हणाला.

रॉबर्टला नाहीतरी बरीच झोप आलेली. डोळे मिटायला लागले होते, म्हणून त्यानेही काही आढेवेढे न घेता 'आत्ता आरामच करू' असा विचार केला.

'देवा! तूच काहीतरी घडवून आणलं आहेस. नाहीतर या रॉबर्टला अचानक एवढी झोप येणं आणि त्याने माझं ऐकणं शक्य नव्हतं. बाहेरही कोणीतरी दिसत आहे, नक्कीच ते गुंड वाटत नाहीयेत. तूच आता मदत कर रॉबर्टचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी.'  कैलास मनोमन प्रार्थना करत म्हणाला.

तोवर रॉबर्ट गाढ झोपेत गेला होता. कैलासचं आता लक्ष बाहेर होतं. हातात गन घेऊन एवढ्या प्रोफेशनल पद्धतीने चाल चालणाऱ्या या दोघांना बघून नक्कीच ही स्पेशल माणसं आहेत हे कैलासने ओळखलं होतं. 'आता नक्की यांना आपण मदत कशी मागायची?' याचा विचार कैलास करत होता.

रॉबर्टच्या न कळत त्याला सगळं करणं गरजेचं होतं. शिवाय आपण या प्रकरणात विनाकारण गोवले गेलो आहोत आणि आपला हेतू शुद्ध आहे हेही त्याला पटवून देणं गरजेचं होतं.

'आजच संधी आहे, आज नाही तर कधीच नाही.' कैलासने विचार केला आणि लॅबच्या त्या लहान खिडकीतून रात्री खाल्लेल्या पुलावाचे पाकीट हळूच बाहेर फेकले.

विक्रम आणि निनाद हळूहळू त्या लॅबजवळ येत होते.

"सर, इथे तर.." निनाद हळू आवाजात म्हणाला.

"हम्म. सावध राहा. सगळीकडे कॅमेरे आहेत. आपला चेहरा दिसणार नाही याची काळजी घे. आता लॅब चारही बाजूंनी आधी बघून घेऊ." विक्रम म्हणाला.

निनाद आणि विक्रम आता बॅटरी बंद करून त्यांचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेत चारही बाजूंनी लॅब बघत होते. सगळीकडे व्यवस्थित बघून झाल्यावर त्यांनी लॅबच्या अजून थोडं जवळ जाण्याचा निर्णय घेतला. त्याआधी विक्रमने हळूच एक लहान दगड लॅबच्या दिशेने फेकून बघितला आणि मग कसलाही आवाज न करता दोघं लॅबच्या एकदम जवळ पोहोचले.

"कशालाही हात लावू नकोस. लेझर सिक्युरिटी किंवा बजर असण्याची शक्यता आहे." विक्रम निनादला म्हणाला.

दोघं एकदम नीट लॅब न्याहाळत होते. दाराला असलेलं आय लॉक आणि फिंगर प्रिंट स्कॅनर बघून खूप काळजीपूर्वक ही लॅब बनवली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. दुसऱ्या बाजूला जी लहान खिडकी होती त्यातून कैलासने बाहेर फेकलेले पुलावाचे पार्सल निनादला दिसले. ते बघून त्याने कसलाही आवाज न करता विक्रमला ते दाखवलं आणि हातानेच त्या खिडकीजवळ इशारा केला. विक्रम देखील तिथे आला. इथे रॉबर्टने कुस बदलली आणि त्यामुळे कैलास सावध झाला आणि पुन्हा त्याच्या डेस्कवर कामाला लागला.

'देवा! आजची रात्र वैऱ्याची आहे. प्लीज मी दिलेला सिग्नल त्या लोकांना कळू दे. या रॉबर्टला अजून गाढ झोप लागू दे. इथे असलेली लेझर सिक्युरिटी तर मी बंद केली आहे. त्यामुळेच हे लोक आत येऊ शकले आहेत. रॉबर्टला जाग आली तर हे त्याला समजू शकतं. त्याला निद्रेच्या पूर्णपणे स्वाधीन कर.' कैलास मनोमन प्रार्थना करत होता.

विक्रम आणि निनाद त्या खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न करत होते, पण बाहेरून त्यांना आतलं काहीही दिसत नव्हतं. कैलासने त्यांना बघितलं आणि त्या खिडकीजवळ गेला.

"कैलासऽ काम करतोयस ना?" रॉबर्ट झोपतेच म्हणाला.

"होऽ हो सर." कैलास म्हणाला आणि पुन्हा डेस्कजवळ आला.

त्याच्या मनात 'ते पाकीट उचलून बघा.. प्लीज..' हेच विचार सुरू होते.

क्रमशः......
*************************
विक्रम आणि निनाद ते पाकीट उचलतील का? कैलासने काय क्लू दिला असेल त्यातून? सी.आय.डी.ला आता रॉबर्टबद्दल समजलं तरी ते ऋषभला वाचवू शकतील का? एका आईला तिचा मुलगा इतक्या वर्षांनी तरी सुखरूप मिळेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all