द डी.एन्.ए. (भाग -२६)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलासकडे आत्ता सध्यातरी काहीही मार्ग नव्हता. दिवसेंदिवस हा रॉबर्ट त्याच्या समोर नवीन नवीन गोष्टी उलगडत होता, तेव्हा त्याला अजून आपण किती अज्ञानात आहोत? याची जाणीव होत होती. आजही रॉबर्टने खरंच जर ऋषभला गावाच्या दिशेने वळवलं तर काही खरं नाही हे तो जाणून होता.

'हा रॉबर्ट कुठे बाहेर गेला तर खरंच बरं होईल. चीपचे डिटेल्स तर आहेत माझ्याकडे. मग माझ्याकडच्या ज्ञानाचा कसा वापर करायचा? हे मला चांगलंच माहित आहे.' कैलास मनातच विचार करत होता.

"अजून किती वेळ असा उभा राहणार आहेस?" रॉबर्ट ओरडून म्हणाला.

त्याच्या आवाजाने कैलास भानावर आला आणि त्याच्या डेस्कजवळ गेला. तो त्याचं काम करतच होता की, अचानक त्याला कसलीतरी हालचाल जाणवली, म्हणून त्याने एकदम सगळीकडे बघितलं तर त्या बास्केटमध्ये असलेल्या एका अंड्याची हालचाल होतेय असं त्याला दिसलं.

"सरऽऽ, सरऽ" तो जवळ जवळ ओरडत म्हणाला.

"काय झालंय एवढं ओरडायला?" रॉबर्ट आधीच चिडलेला असल्याने अजूनच चिडला.

"सर, हे अंडं!" कैलास त्या अंड्याकडे बोट दाखवून म्हणाला.

"मुर्खा! लवकर बास्केटला प्लग लाव." रॉबर्ट जवळ जवळ ओरडून म्हणाला आणि धावतच तिथे आला.

कैलासने पटकन त्या बास्केटला प्लग लावलं आणि रॉबर्टने त्या बास्केटच्या कोपऱ्यात असलेल्या रेग्युलेटरने त्याचा फास्ट मोड केला.

"सर काय झालं? त्यातून पिल्लू बाहेर आलं असतं ना?" कैलासने विचारलं.

"नाही. या अंड्यावर नक्कीच केमिकलची मात्रा जास्त पडली आहे. जर वेळीच त्याला थंड करत ठेवलं नसतं तर ते खराब झालं असतं." रॉबर्ट म्हणाला.

"सर, पण मी तुम्ही जसं सांगितलं आहे अगदी तसंच केलं आहे." कैलास म्हणाला.

"तुला सांगायची गरज नाही. जे काही खरं, खोटं असेल ते मी बघतो." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने कैलाससाठी लिहून ठेवलेल्या कागदावर सगळं चेक करू लागला.

कैलास पाठमोऱ्या रॉबर्टकडे बघत एकदम छद्मी हसत होता. जणू त्याला माहीत होतं हे असं घडणार आहे.

'देवा! आता मनातून सारखं वाटतंय काहीतरी चांगलं घडतंय. नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे जाणवतंय. तू काहीतरी चक्र फिरवून मदत करणार आहेस असं वाटतंय. ती मदत ओळखण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची बुध्दी मला दे.' कैलास मनात प्रार्थना करत रॉबर्टच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला.
**************************
इथे सी.आय.डी. टीम त्या आजोबांनी त्यांना मध्येच का टोकलं असेल? असे भाव चेहऱ्यावर आणून त्यांच्याकडे बघत होती. इतकावेळ चाललेली त्यांची दंगा, मस्ती आणि हसण्या - खिदळण्याचे आवाज एकदम बंद झाले होते.

"काय झालं आजोबा? तुम्ही असं का विचारताय?" विक्रमने विचारलं.

"पोरांनो, नका जाऊ तिथं त्या जंगलात. आजवर तिथं जे कोणी गेलं ते परत आलं नाही. इतकी वर्ष आम्ही इथं राहतो, आम्हाला अनुभव आहे. आजतर बातम्यांमध्येसुद्धा दाखवलं." आजोबा म्हणाले.

"काय?" सोनालीने काहीही माहीत नसल्याचा आव आणून विचारलं.

"अगं पोरी, तिथं भला मोठा जीव राहतो. आम्ही सगळे गावकरी त्याला राक्षस म्हणतो. अाजतर टीव्हीवर पण दाखवला म्हणे तो जीव." ते आजोबा म्हणाले.

सी.आय.डी. टीम आपल्याला काहीही माहीत नसल्याचा आव आणून एकमेकांकडे बघू लागली.

"त्यांना डायनासोर म्हणायचं आहे." चहावाला मध्येच म्हणाला.

"काय? डायनासोर? हा.. हा.. हा.. काय काका? सकाळ सकाळी कोणी सापडलं नाही का तुम्हाला? अहो, डायनासोर तर कितीतरी कोटी वर्ष आधी लुप्त झाले." निनाद हसत हसत म्हणाला.

"खरंच. खोटं वाटत असेल तर इथल्या बारक्या पोरांना विचारा. त्यांना पण आता माहीत झालं आहे." चहावाला म्हणाला.

"एक... एक.. मिनिट. अहो, आजोबा आम्ही मेडिकल स्टुडंट्स. आम्हाला कसा विश्वास बसेल यावर? याकाळात डायनासोर येणं शक्य तरी आहे का?" डॉ. विजय म्हणाले.

"तुम्हा सर्वांना सावध करणं माझं काम होतं, मी केलं. पुढं जे करायचं ते करा. फक्त एकदा गावच्या एकदम शेवटच्या अंगाला एक छोटं हॉटेल आहे तिथं जाऊन बघा." आजोबा म्हणाले.

"का? काय आहे तिथे?" ईशाने विचारलं.

"त्या बिचाऱ्या भूप्यामुळेच तर गाव शाबूत आहे. तो रोज न चुकता जंगलात जेवणाचं पार्सल टाकतो, म्हणून आजवर तरी आम्ही सगळे सुखरूप आहोत. पण हा जे कोणी तिथं काय आहे? हे बघायला गेले ते परत आलेच नाहीत. नक्कीच तिथं काहीतरी आहे." आजोबा म्हणाले.

"अच्छा. पण मग ते काका जेवण तिथे टाकायला जातात त्यांना कसं काही झालं नाही?" निनादने विचारलं.

"तो स्वतः जात नाही. त्याच्याकडे काम करणाऱ्या एका मुलाला ते खेळण्यातलं विमान उडवता येतं त्याला लावून टाकतो." आजोबा म्हणाले.

"ड्रोन म्हणायचं आहे का तुम्हाला?" अभिषेक म्हणाला.

"तेच ते. आता तरी विश्वास ठेवा अन् तिथं जाऊ नका. जे काही फोटो काढायचे ते इथे काढा आणि जा आपापल्या घरी." आजोबा एकदम पोटतिडकीने बोलत होते.

"ठीक आहे आजोबा. आम्ही नाही जाणार." विक्रम म्हणाला.

सगळ्यांनी चहा पिला आणि उठून गावभर फिरू लागले.

"सर, आता काय करायचं? दिवसा गेलो तर कोणी ना कोणी आपल्याला बघेलच." ईशा म्हणाली.

"आपण तिथे रात्री जाणार आहोत. त्याआधी आजोबांनी ज्या हॉटेलबद्दल सांगितलं तिथे जाऊन बघितलं पाहिजे." विक्रम म्हणाला.

सगळे आपण पिकनिकसाठी म्हणूनच आलो आहोत असं दाखवत सगळ्या गावाचं निरीक्षण करत होते.

"सर, तुम्हाला काय वाटतंय तो तिथे काम करणारा मुलगा यात सामील असेल का?" अभिषेकने विचारलं.

"वाटतंय तरी तसंच. बघूया तिथे जाऊन. हा फक्त तिथे आपण नक्की काय शोधायला आलो आहोत? हे कळू द्यायचं नाही. ड्रोनने पार्सल तिथे जातंय म्हणजे कॅमेरा, ऑडियो रेकॉर्डर, स्पीकर असं सगळं असेल त्याला. जर यात रॉबर्टचा हात असेल, तर तो आपल्याला ओळखू शकेल." विक्रम म्हणाला.

"येस सर." सगळे हळू आवाजात म्हणाले.

सगळीकडे फोटो काढता काढता हळूहळू ते त्या हॉटेलच्या दिशेने जात होते. कोणालाही आपल्यावर संशय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊनच त्यांचं मिशन सुरू होतं. थोड्याचवेळात सगळे त्या हॉटेलजवळ पोहोचले. एव्हाना दुपार झालीच होती. साधारण चार टेबलं मांडून छोटंसं हॉटेल तयार केलेलं होतं.

"तुमच्या इथे जे फेमस असेल ते द्या. " विक्रम म्हणाला.

"आमच्या इथला बिर्याणी पुलाव प्रसिद्ध आहे. देऊ का?" मालकाने विचारलं.

"हो चालेल." सगळे म्हणाले.

मालक तिथून गेला आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलाला त्याने गाठलं.

"ते बघ तिथे ते साहेब, मॅडम लोक आहेत त्यांना हवं नको ते बघ." तो म्हणाला.

सगळे आपापल्या गप्पांमध्ये गुंग होते, तरीही त्याच्यावर बरोबर लक्ष ठेवून होते.

"हो. फक्त ते पार्सल तिथे पाठवतो." मुलगा म्हणाला.

लगेचच त्याने एक पार्सल घेतलं आणि बाहेर जायला निघाला. विक्रमने निनादला खूण केली ती ओळखून निनाद उठला.

"काका, इथे वॉशरूम कुठे आहे?" त्याने विचारलं.

"बाहेर मागच्या बाजूला." त्यांनी सांगितलं.

निनादला आता आयती संधीच मिळाली होती बाहेर जायची. तो हळूच बाहेर गेला आणि आडोसा घेऊन बघत होता. त्याने एका ड्रोनला पाकिटात पुलाव आणि कसल्यातरी गोळ्या लावून ड्रोन उडवला. निनाद हे सगळं लपून बघत होताच.

'डायनासोरला गोळ्या? नक्कीच तिथे जे कोणी हे काम करत असेल त्याने स्वतःसाठी हे अन्न आणि गोळ्या मागवलेल्या असणार.' निनाद मनात विचार करत होता.

त्याने अंदाजे तो ड्रोन कुठल्या दिशेला जातो? हे बघून ठेवलं आणि तो मुलगा मागे वळून आत येणार हे बघताच निनाद आत गेला. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने सगळे एकत्र आले तेव्हा हळूच एकदम थोडक्यात त्याने जे बघितलं ते विक्रमच्या कानात सांगितलं. तोवर त्यांची ऑर्डर आली. सगळ्यांनी फोटो काढत काढत मस्त जेवण करून घेतलं आणि तिथून बाहेर पडले.

"माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे." विक्रम म्हणाला आणि चालता चालता त्याने सगळ्यांना त्याचा प्लॅन सांगितला.

त्यांचा सगळा दिवस गावात फिरण्यात आणि कोण संशयास्पद आढळतंय का? हे बघण्यात गेला. रात्री एक सामसूम जागा बघून सगळ्यांनी तिथे टेंट लावले.

क्रमशः...
************************
विक्रमने काय प्लॅन केला असेल? कैलासपर्यंत जर सी.आय.डी. टीम पोहोचली तर त्याच्यावरच संशय येणार नाही ना? कैलास त्यांना पटवून देऊ शकेल का? की, तो त्यांची मदत करणार आहे. कैलासने त्या अंड्यावर नक्की काय प्रक्रिया केली असेल, ज्यामुळे रॉबर्ट एवढा वैतागला? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all