द डी.एन्.ए. (भाग -२५)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळे ऑफिसर्स त्यांचे त्यांचे रोल नीट पार पाडत होते. अगदी कॉलेजच्या मुलांसारखे फॅशनेबल कपडे, कॅमेरा, सॅक आणि काहीतरी भन्नाट करून दाखवायचं आहे असे भाव चेहऱ्यावर आणून तिथे सगळे गेले होते. त्यांना बघितलेला गावकरी 'ही पोरं नक्कीच इथे पिकनिकला आली असणार' असा विचार करत ते लोक स्वतः काय बोलतात का? याची वाट पाहत त्यांच्याकडे बघत होता.

"काका, आम्ही इथे कॅम्प करायचा विचार करतोय." ईशा म्हणाली.

"मला वाटलंच होतं. करा की, काय करायचं ते करा, पण इथं गावकऱ्यांना तुमच्या त्या नाच गाण्याचा त्रास नाही झाला पाहिजे." तो म्हणाला.

"हो काका! डोन्ट वरी. आम्ही कोणालाही त्रास देणार नाही. इथे आम्ही फोटोशूट करायला आलो आहोत. आम्हाला गावचं राहणीमान आणि निसर्ग बघायचा आहे. कॉलेजमध्ये आम्हाला ते फोटो सबमिट करायचे आहेत. तुम्ही आमची मदत कराल का?" सोनाली म्हणाली.

"जे जमल ते करीन." तो म्हणाला.

"थँक्यू काका. आम्हाला त्या डोंगरावर असलेल्या जंगलात जायचं आहे. रस्ता सांगायला तुम्ही मदत कराल का?" अभिषेकने विचारलं.

"ते? ते जंगल? नाही. मी तर यात तुमची काहीही मदत नाही करू शकणार. उलट तुम्ही कोणीही तिथे जाऊ नका हे सांगून तुमची मदत करतो. चला येतो मी." तो गावकरी सरळ नाही म्हणून जरा घाबरून तिथून निघाला.

"काकाऽऽ, काकाऽ थांबा ना जरा." निनाद त्यांना थांबवत होता.

त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून त्याने तिथून काढता पाय घेतला होता.

"थांब निनाद! ते काका परत येणार नाहीत. आपला संशय खरा आहे. फक्त आता आपल्याला इथल्या कोणत्या गावकऱ्यांकडून काही माहिती मिळतेय का? बघायचंय. जे काही होतंय ते त्या जंगलात होतंय." विक्रम म्हणाला.

"हो सर. आता आपण मुद्दाम तिथे जायला निघालो की कोणी ना कोणी काहीतरी नक्कीच सांगेल." सोनाली म्हणाली.

"ठीक आहे. लागूया कामाला." डॉ. विजय म्हणाले.

सगळे मुद्दामच स्वतःच्या धुंदीत असल्यासारखे सगळ्या गावभर फोटो काढत फिरत होते.

"चला सगळेऽऽ, चहा पिऊन पुढे जाऊ." विक्रम एक चहाची टपरी बघून म्हणाला.

त्या टपरीवर बरीच माणसं होती आणि तिथे "जंगलात जायचं आहे" असं बोलल्यावर कोणी ना कोणी काहीतरी सांगेल, म्हणून खरंतर त्याने ही शक्कल लढवली होती. सगळे लगेच तिथे जाऊन बसले.

"काका, सहा स्पेशल टी द्या." निनाद ऑर्डर देऊन बसला.

"किती दिवसांनी आपल्याला कॅम्प करायला वेळ मिळाला आहे. नाहीतर असतातच सतत एक्सामस् किंवा असायमेंटस्." ईशा म्हणाली.

"हो यार. आता तर मस्त अॅडवेंचर करायचं." निनाद म्हणाला.

"त्यासाठीच तर आपण इथे आलो आहोत ना? यावेळी कॉलेजमध्ये बेस्ट फोटो आपल्याच ग्रुपचे असणार." विक्रम म्हणाला.

"ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही सगळे विसरू नका तुम्हाला गाईड करायची जबाबदारी माझी आहे. बेस्ट फोटो हवे असतील तर माझं ऐकायचं." डॉ. विजय म्हणाले.

"हो सर." अभिषेक म्हणाला.

"आपण त्या डोंगरी भागात जाऊन फोटो काढायचे. तिथे तुम्हाला बऱ्याच वनस्पती, प्राणी, पक्षी अभ्यासायला मिळतील." डॉ. विजय म्हणाले.

त्यांचं हे बोलणं चहावाला आणि बाकीचे गावकरीसुद्धा ऐकत होते. सगळ्यांनी त्यांचं लक्ष तिकडे नाहीये, असं जरी दाखवलं असलं तरी एक कान आणि एक डोळा ते लोक काय रिअॅक्ट करतायत? आणि काय बोलतायत? याकडे होतं.

"चालेल ना सर. तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही आमचे सिनियर आहात शिवाय सगळ्या कॉलेजमध्ये तुमचा गाईडन्स हवा म्हणून किती कॉम्पिटिशन झाली. तुमचा गाईडन्स आमच्या ग्रुपला लाभला आहे तर नक्कीच आम्ही त्याचं सोनं करू." विक्रम म्हणाला.

"गूड! आता आपण इथून थोडं पुढे जाऊन कॅम्प लावू, तिथे जरा आराम करू आणि मग पुढे जाऊ." डॉ. विजय म्हणाले.

"योऽऽ" सगळे एकदम उत्साहात म्हणाले.

त्यांचा उत्साह आणि त्या डोंगरी जंगलाविषयीची ओढ तिथे बसलेले लोक पाहत होते आणि आपापसात काहीतरी कुजबुज करू लागले. सगळ्यांचं याकडे बरोबर लक्ष होतं, पण कोणीही आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं आहे हे दाखवत नव्हतं. प्रत्येकजण तिथे आपल्याला काय काय बघायला मिळेल? कसले कसले आपण फोटो काढू शकतो? यावर चर्चा करत बसले.

"पोरांनो! तुम्ही बातम्या बघत नाही का?" एका सत्तरी पार केलेल्या माणसाने शेवटी न राहून विचारलंच.

सगळ्यांनी एकदम गोंधळून त्याच्याकडे बघितलं. त्यांना जे हवं होतं ते घडलं तर होतं फक्त ते चेहऱ्यावर न दाखवता एकदम गोंधळून सगळे त्याच्याकडे बघत होते.
*************************
इथे लॅबमध्ये कैलास त्याच्या विचारतच कामात मग्न होता.

'या रॉबर्टने आपल्याला मीटिंगमध्ये ऋषभवर जी ट्रॅकिंग चीप लावली आहे त्याचे डिटेल्स त्या लोकांना द्यायला सांगितले होते, पण का? त्या लोकांनी तर प्रत्यक्ष हे बघितलं होतं मग?' त्याचं विचारचक्र काही केल्या थांबत नव्हतं.

रॉबर्ट त्याला हाका मारत होता तरीही त्याचं त्याकडे लक्ष नव्हतं.

"कैलास! कैलासऽऽ" शेवटी रॉबर्ट त्याच्या डेस्कवर जर्नल आपटून त्याला मोठ्याने हाक मारू लागला.

"हा! बोला सर." कैलास एकदम दचकून म्हणाला.

"बोला काय बोला? लक्ष कुठे आहे?" रॉबर्ट जरा रागावून म्हणाला.

"सॉरी सर." कैलास एकदम हळू आवाजात म्हणाला.

"तुझं सॉरी तुझ्याकडेच ठेव. आजकाल जरा डोक्यावर परिणाम झाल्यासारखाच वागतोयस तू. बरं ते जाऊदे, तो डायनासोर आत्ता कुठल्या लोकेशनवर आहे बघ जरा." रॉबर्ट म्हणाला.

लगेचच कैलासने लोकेशन बघून त्याला सांगितलं.

"अजून हा जंगलातच? आता मलाच काहीतरी करावं लागेल. आण तो लॅपटॉप आण इकडे." रॉबर्ट म्हणाला.

कैलास त्याच्याकडे लॅपटॉप तर घेऊन गेला. पण त्याच्या मनात, 'आता याला काय करायचं आहे? काय गावात सगळा विध्वंस घडवून आणायचा प्लॅन आहे का?' असे विचार येत होते.

चेहऱ्यावर आपल्याला काहीही माहीत नाहीये, असे निर्विकार भाव आणून तो तिथेच उभा होता.

"माझं तोंड बघतच आता उभा राहणार आहेस का? जा ना काम कर." रॉबर्ट त्याच्यावर वसकन ओरडून म्हणाला.

"हो सर. त्याआधी एक विचारायचं होतं." कैलास बिचकत म्हणाला.

"हम्म." रॉबर्टने नाइच्छेनेच हुंकार भरला.

"सर अजून तो जंगलात आहे तर तुम्हाला ते पटलेलं दिसत नाहीये. उलट आपल्यासाठी बरं आहे ना? कोणाला संशय येणार नाही." कैलास म्हणाला.

"तू मूर्ख आहेस आणि मूर्खच राहणार. आता मला हे घडायला नकोय. मी हा प्रोजेक्ट काय लपवून ठेवायला केलेला नाहीये. आता हा सगळ्यांसमोर यायलाच हवा. कोणीही आता माझं काही करू शकत नाही. हा.. हा.. हा.." रॉबर्ट गर्वाने म्हणाला.

"ते बरोबर आहे सर. पण समजा, जर या अंड्यावर प्रक्रिया पूर्ण होण्याआधी जर ही बातमी बाहेर जाऊन कोणी पुन्हा यात आडकाठी घातली तर?" कैलास म्हणाला.

"असं होणं आता शक्य नाही. अंड्यांच काय घेऊन बसलास तू? जर या ऋषभने कोणाला साधी थोडी जरी जखम केली ना, तरी काही महिन्यात त्याचंही रूपांतर डायनासोरमध्येच होणार आहे. हा.. हा.. हा... त्यामुळे अगदी कोणत्याही सुरक्षा यंत्रणा मला अडवायला येऊ शकत नाहीत." रॉबर्ट म्हणाला.

त्याच्या या वाक्याने कैलासने त्याच्या आनंदात आनंद व्यक्त तर केला, पण मनातून आता त्याला खूपच भीती वाटत होती. जर असंच घडलं तर एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ असे सगळेच डायनासोर होत राहतील आणि मग देशाचं काय होणार? म्हणून त्याला चिंता वाटत होती.

"चल आता तू तुझं काम कर. मी याला बरोबर गावाच्या दिशेने वळवतो." रॉबर्ट म्हणाला.

त्याच्या या वाक्याने कैलासने त्याच्याकडे चमकून बघितलं.

"हो, हो! मी याला कंट्रोलसुद्धा करू शकतो. पण सध्या त्याच्यात आत्ता ताकद कमी आहे तोपर्यंतच. आणि मीच काय? आता माझे इन्वेस्टर्ससुद्धा याला कंट्रोल करतील." रॉबर्ट म्हणाला.

कैलास काहीही न बोलता त्याच्या कामाला लागला.

'त्या लोकांना जर फक्त या चिपच्या डिटेल्सवरून ऋषभला कंट्रोल करता येणार असेल आणि मी जर हे लोक कुठले असतील? याचा अंदाज बरोबर वर्तवला असेल, तर मग पुढे कसं होईल? वेळ आता हातातून निसटून जाणाऱ्या वाळूसारखा भराभर जातोय. काय करता येईल मला अजून? देवा आता तूच काहीतरी मदत पाठव.' कैलास मनोमन प्रार्थना करत होता.

क्रमशः......
*************************
सी.आय.डी.ने जो प्लॅन केला आहे, त्यामुळे ते रॉबर्टला थांबवू शकतील का? गावकऱ्यांची मदत ते लोक कसे घेतील? कैलास आता काय करेल? ऋषभ जर खरंच रॉबर्टने विचार केला आहे, तसा विध्वंस घडवत राहिला तर? याचा अँटीडोट निदान रॉबर्टकडे तरी असेल का? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all