द डी.एन्.ए. (भाग -२४)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलासने विचार केलेला त्याप्रमाणे तरी काही झालं नाही, म्हणून त्याचं कशातच मन लागत नव्हतं. सतत आज त्याला 'आपणच दोषी आहोत आणि आपल्याच हातून हे पाप का घडतंय?' म्हणून वाईट वाटत होतं. त्याने काम करायला घेतलं तर होतं, पण सतत मनात जी सल येत होती ती त्याला टोचत होती. एक मन म्हणत होतं; 'यात आपली काहीही चूक नाहीये.' तर दुसरं मन म्हणत होतं; 'हो आपलीच चूक आहे.' या मनाच्या द्वंद्वात त्याला काहीही सुचत नव्हतं. त्याच्या मेंदूला कळत होतं यातून फक्त आणि फक्त नैराश्य उत्पन्न होणार आहे तरीही तो मनावर ताबा मिळवू शकत नव्हता. आता यातून बाहेर पडण्यासाठी त्याला उपासनेला बसणं गरजेचं होतं. प्रत्येकवेळी तो मनाच्या कात्रीत सापडला, की उपासनेला बसून स्वतःला शांत करायचा. आजही त्याने तोच विचार केला आणि डोळे मिटून शांत बसला.

'देवा! तुला सगळं माहीत आहे. आज मी माझ्याच मनाच्या द्वंद्वात सापडलो आहे. यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाहीये. माझ्या विचारांवर माझा ताबाच राहिला नाहीये. तूच आता माझ्या विचारचक्राचा स्वामी हो आणि योग्य ते विचार माझ्या मनी पेर.' कैलासने मनोमन प्रार्थना केली.

तो थोडावेळ तसाच डोळे मिटून बसून राहिला. मनाला शांत करण्यासाठी आणि मनात नको ते विचार येऊ न देण्यासाठी तो डोळे मिटून देवाची प्रतिमा डोळ्यासमोर दिसेपर्यंत डोळे बंद करून बसत होता आणि ज्याक्षणी दुसरे विचार मनात येऊन; त्याचं ध्यान भंग व्हायला सुरुवात होऊन प्रतिमा दिसेनाशी व्हायला लागली, की पुन्हा डोळे उघडून प्रतिमा डोळ्यात साठवून पुन्हा तेच करत होता. साधारण पाच मिनिटं असं केल्यावर त्याच्या मनाला आता खूप शांत वाटत होतं. मगाशी आपण कुठल्या कुठल्या विचारांनी उगाच त्रस्त झालो? आणि मनःशांती हरवून बसलो हे त्याच्या लक्षात आलं.

'मी आता ठीक आहे देवा. तूच मला तुझ्या मायेच्या नामस्मरणाने शांत केलंस. आता आपण कामाला लागू. माझ्या मदतीला ये.' कैलास हात जोडून मनात म्हणाला.

मगाशी एकदम खराब झालेला मूड आणि आता एकदम प्रसन्न चित्त या विरोधाभासाने त्याला पुन्हा एकदा देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. त्याने पुन्हा त्याची जर्नल काढून कामाला सुरुवात केली. एवढ्यात रॉबर्ट लॅबमध्ये आला.

"व्हेरी गूड कैलास! तू आज छान प्रेझेंटेशन दिलंस. आपला पुढचा मार्ग आता मोकळा झाला आहे." रॉबर्ट आनंदात बोलत होता.

"थँक्यू सर." कैलास कसंनुसं आनंदी असल्याचा आव आणत म्हणाला.

"चल... चल... आता पुढचं काम करायला घेऊ. मी जेवढं सांगून गेलो होतो तेवढं काम केलं आहेस ना?" रॉबर्टने विचारलं.

"हो सर." कैलास म्हणाला.

त्याच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न दिसत होते, त्याला नक्कीच काहीतरी विचारायचं आहे हे रॉबर्टने ओळखलं होतं. त्याला हेही माहीत होतं हा आता नक्की काय विचारणार आहे.

"मला माहित आहे तुला काय विचारायचं आहे? ते." रॉबर्ट त्याच्याकडे बघून म्हणाला.

कैलासला जरा आश्चर्यच वाटलं. 'या माणसाला कधीपासून इतर लोकांची मनं कळायला लागली?' तो मनातच म्हणाला.

तो अजूनही शांत आहे आणि काही बोलत नाही हे पाहून रॉबर्टच घसा खाखरून बोलायला लागला; "तुला ही अंडी आधी जरा लहान वाटत होती आणि नंतर त्याचा आकार वाढला आहे असं जाणवतंय ना? ही शेकडोवर्षे जुनी अंडी एकदम व्यवस्थित अवस्थेत कशी? हाही प्रश्न पडला असेल ना?" तो म्हणाला.

कैलासला अगदी हेच प्रश्न गेले कित्येक दिवस पडले होते. त्याने त्या अंड्यांवर प्रक्रिया करायला घेतल्यापासून त्याच्या मनात काही शंका निर्माण तर झाल्या होत्या आणि रॉबर्टला त्याला विचारायचं होतंच, पण गेल्या काही दिवसात रॉबर्ट सतत अस्वस्थ होता म्हणून त्याने काहीही विचारलं नव्हतं. 'आज ही आयती संधी आलीच आहे तर माहिती काढून घेऊ.' म्हणून कैलासने विचार केला.

"हो सर." कैलास म्हणाला.

"पहिली गोष्ट; ही अंडी खरी नाहीत. केमिकल प्रोसेसने मी तयार केलेली आहेत. तेरा वर्षांपूर्वी जेव्हा मी हा प्रयोग करायला घेतला होता तेव्हाच डायनासोरचे डी.एन्.ए. वापरून मी ही अंडी करायला घेतली होती. माझ्याशिवाय कोणालाही हे माहीत नव्हतं." रॉबर्ट म्हणाला.

"सर पण जेव्हा प्रयोगाची परवानगी रद्द केली तेव्हा तर सगळं साहित्य जप्त केलं होतं आणि त्यात अंडीसुद्धा होती. मग ती अंडी?" कैलासने विचारलं.

"ती अंडी खरी होती. एवढी वर्ष ती अंडी जमिनीखाली दबली गेली होती, त्यामुळे थोडीफार डॅमेज झालेली होती. त्यांच्यावर प्रक्रिया करून मी त्यांना पूर्वावस्थेत आणलं होतं. तरीही त्यातून पुर्ननिर्मितीची शक्यता यापेक्षा फार कमी होती." रॉबर्ट म्हणाला.

"अच्छा. म्हणून तुम्ही ही केमिकल प्रोसेसने अंडी बनवली? आणि म्हणूनच सुरुवातीला याचा आकार लहान वाटला तर नंतर मोठा?" कैलासने विचारलं.

"हो. त्याचा आकार ज्याक्षणी वाढायला लागला त्याच क्षणी माझी प्रोसेस बरोबर झाली आहे हे माझ्या लक्षात आलं." रॉबर्ट म्हणाला.

"सर मग या अंड्यांना थंड ठिकाणी का ठेवलं? जर त्यावेळीच उबेत ठेवलं असतं तर?" कैलासने विचारलं.

"असं नसतं. ते समजायला तुला अजून पुढचा जन्म घ्यावा लागेल. चल आता सांगितलं आहे ते काम कर." रॉबर्ट आता जरा चिडून म्हणाला.

कैलास काहीही न बोलता पुन्हा कामाला लागला.

'आजही ती माणसं कोण असतील? याचा काहीच अंदाज आला नाही. मी बास्केटवर जे बघितलं होतं तेच ठिकाण असण्याची मला दाट शक्यता वाटतेय.' कैलास मनात विचार करतच यंत्रासारखा काम करत होता.
************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये सगळे तयार होऊन सुयश सरांच्या प्लॅनप्रमाणे मिशनवर जाण्यासाठी तयार होते. त्यांच्या प्लॅननुसार सगळे ब्युरोमधून निघाले. डॉ. विजय, विक्रम, ईशा, सोनाली, अभिषेक आणि निनाद अशी पूर्ण एक टीम करून एकाच गाडीने चालले होते.

"सर या मिशनच्या निमित्ताने आपली एक पिकनिक होतेय असं म्हणायला हरकत नाही." सोनाली म्हणाली.

"हो. तसंही आपल्या कामाच्या व्यापात कधी फिरायला आणि स्वतःला वेळ देता येत नाही तर हीच काय ती पिकनिक समजायची." विक्रम म्हणाला.

"बाकी सुयश सरांनी प्लॅन एकदम भन्नाट केला आहे." ईशा म्हणाली.

"हो. हो. पण आता सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. जरी आपल्याला आपण पिकनिकला चाललो आहोत असं दाखवायचं असलं तरी सावध राहून सगळी कामंसुद्धा करायची आहेत." विक्रम म्हणाला.

"हो सर. आपण करूच सगळं नीट. कोणालाही संशय येणार नाही." अभिषेक म्हणाला.

बोलता बोलता सगळे एका गावापाशी पोहोचले. मुंबईपासून थोडं दूर स्थित ते गाव छान निसर्गाच्या सानिध्यात होतं. छान हिरवळ, मोकळे आणि स्वच्छ रस्ते, वातावरणातला गारवा आणि शुध्द हवा. यामुळे सगळ्यांना तिथे आल्या आल्या प्रसन्न वाटू लागलं होतं. आता त्या सगळ्यांचं खरं काम सुरू होणार होतं. विक्रमने एक व्यवस्थित जागा बघून तिथे गाडी लावली आणि सगळे गाडीतून उतरले.

"खूप छान ठिकाण आहे ना हे? ना कसली वर्दळ ना सतत गाड्यांच्या हॉर्नचा आवाज. खूप मस्त वाटतंय इथे." निनाद म्हणाला.

"हो. खूप दिवसांनी आपण फिरायला आलो आहोत आणि तेही यावेळी मस्त काहीतरी नवीन थीम मिळाल्यामुळे छान एन्जॉयसुद्धा करू." विक्रम म्हणाला.

एवढ्यात तिथून एक गावकरी जात असताना या सगळ्यांना बघून त्यांच्याकडे येऊ लागला.

"प्लॅन काम करायला लागला आहे." विक्रम एकदम हळू आवाजात तोंडातल्या तोंडात पुटपुटून सगळ्यांना म्हणाला.

सगळे त्यांचं त्या गावकऱ्याकडे लक्षच नाही असं दाखवून स्वतःच्याच गप्पांमध्ये दंग झाले होते. निनाद कॅमेरा हातात घेऊन झाडांचे, घरांचे फोटो काढण्यात मग्न होता.

"कोण तुम्ही? याआधी कधी गावात पाहिलं नाही." तो गावकरी त्यांना न्याहाळत म्हणाला.

"हॅलो, आम्ही इथे नवीन आहोत तर कसं बघणार तुम्ही आम्हाला? हा.. हा.. हा.." डॉ. विजय हसत म्हणाले.

'आता यात एवढं हसण्यासारखं काय?' असे भाव चेहऱ्यावर आणून तो गावकरी त्यांच्याकडे बघत होता.

डॉ. विजयंच्या हसण्यात सगळेच सामील झाले होते. पण आता हा गावकरी आपल्याला वेडं समजून इथून निघून जाण्याआधी त्यांना त्यांच्या प्लॅनप्रमाणे वागणं गरजेचं होतं.

"ते जस्ट जोक करतायत. सवय आहे त्यांची. तुम्ही नका लक्ष देऊ." विक्रम म्हणाला.

आता पुढे ही माणसं नक्की कोण आहेत? आणि कुठून? कशासाठी आली आहेत? हे विचारण्यासाठी तो गावकरी तिथेच थांबला.

क्रमशः....
*************************
कैलास आता त्या अंड्यांचं काय करेल? खरंच त्यातून अजून डायनासोरची निर्मिती झाली तर? ऋषभ जर गावात आला आणि सगळीकडे विध्वंस घडला तर? सी.आय.डी. गावात तर पोहोचली आहे, पण त्यांचा नक्की प्लॅन काय आहे? रॉबर्ट त्यांना ओळखेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all