द डी.एन्.ए. (भाग -२३)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे सी.आय.डी. ब्युरोमध्ये सगळे सुयश सर काय सांगतायत? आणि आता प्लॅनमध्ये काय बदल करायचा आहे? यावर चर्चा करत होते.

"बातम्यांमध्ये जी जागा दाखवली जातेय, ती मुंबई बाहेर असलेल्या जंगलाची आहे अशी माहिती मिळाली आहे. नक्कीच बाहेर असलेल्या गावात याची काहीतरी माहिती आपल्याला मिळू शकते." सुयश सर म्हणाले.

"हो सर, पण मग त्या गावात आपण जाऊन चौकशी केली तर, तिथे रॉबर्ट किंवा जे कोणी रॉबर्टचं नाव वापरून हे काम करत असेल ते सावध होण्याची शक्यता आहे ना?" निनाद म्हणाला.

"आपण डायरेक्ट चौकशी करायला जायचंच नाहीये. आता ऐका मी काय सांगतोय...." सुयश सर म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात जे सुरू होतं ते सगळं सांगितलं.

"ओके सर. लगेचच कामाला लागतो." विक्रम म्हणाला आणि सगळेच त्यांच्या प्लॅनप्रमाणे कामाला लागले.

तोवर गणेशचा फोन आला.

"सर, हा रॉबर्ट इथे हॉटेलवरच आला आहे. हा! फक्त रस्त्याने जाताना कोणाशी तरी हा फोनवर बोलला." गणेशने सगळे डिटेल्स सुयश सरांना दिले.

"ठीक आहे. तू परत इथे निघून ये. आपल्या जाळ्यात हा रॉबर्ट आता स्वतःहून अडकेल." सुयश सरांनी सांगितलं.

गणेश तिथून परत यायला निघाला. तोवर बाकी टीम सुयश सरांसमोर आली. सुयश सर तोंडावर हात ठेवून कसंबसं स्वतःचं हसू कंट्रोल करत होते.

"सर खूपच वाईट दिसतोय का आम्ही सगळे?" ईशाने अवघडून विचारलं.

"नाही नाही." पुन्हा सुयश सर हसू दाबत म्हणाले.

एवढ्यात डॉ. विजय तिथे आले. आत आल्या बरोबर त्यांचं लक्ष या सगळ्यांकडे गेलं. ते काहीही न बोलता एकदम अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होते.

"सर इतके वाईट दिसतोय का आम्ही?" अभिषेकने विचारलं.

"नाही. उलट खूप मस्त वेश बदलला आहे. तुझ्या आवाजावरून ओळखलं तुम्ही सगळेच आहात. नाहीतर एकदम परफेक्ट जमलं आहे सगळं. काय? प्लॅन काय आहे नक्की?" डॉ. विजयनी विचारलं.

सुयश सरांनी त्यांना सगळा प्लॅन समजावून सांगितला आणि यात त्यांची काय भूमिका असेल?, त्यांनी कशी तयारी करायची आहे? हेही नीट सांगितलं.

"ओके बॉस! लगेच लागतो कामाला. कॉलेजनंतर आता कुठे असं नाटक करायची संधी मिळाली आहे, तर वाया का घालवा?" डॉ. विजयना प्लॅन ऐकून एकदम उत्साह आला आणि तेही यासाठी तयार झाले.

"होऽ होऽ पण हे कॉलेजमधलं खोटं नाटक नाही हे लक्षात ठेवून, डोळे आणि कान उघडे ठेवून करायचं आहे." सुयश सर त्यांचा उत्साह बघून म्हणाले.

"हो नक्कीच. डोन्ट वरी. या नाटकामुळे शेवटी कोणालातरी त्यांचा मुलगा मिळणार आहे. मी माझे शंभर टक्के नक्की देणार." डॉ. विजय थोडे इमोशनल होऊन म्हणाले.

सुयश सरांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला आणि विषय बदलून म्हणाले; "पण आधी तुम्ही का आला होतात? ते तर सांगा."

"अरे हो ते राहिलंच. मी तज्ञांसोबत बोलून घेतलं आहे. सगळ्यांना ती बातमी दाखवली; त्यांच्या मते जर रॉबर्टच्या प्रोजेक्टवरच हे काम केलं असेल तर हे खरं आहे. तो फोटो बघून त्यांनी अजून थोडे तास तरी जास्त धोका नाही हे सांगितलं आहे, पण त्याचा आकार आणि एकंदर या प्रयोगाचा काळ बघता जसजशी त्याची भूक वाढत जाईल तसा जास्त उद्रेक होऊ शकतो असं सांगितलं आहे. आपल्याला लवकरात लवकर ही परिस्थिती आटोक्यात आणली पाहिजे." डॉ. विजयनी सांगितलं.

"ओके. तुम्ही या सगळ्यांसोबत प्लॅनप्रमाणे करा. मी आणि गणेश तुम्हाला नंतर जॉईन होऊ." सुयश सर म्हणाले.

"ओके. तुम्हाला फॉरेन्सिक कामासाठी अजून मदत लागली तर नियती आहे. ती आजच पुन्हा कामावर जॉईन झाली आहे, तिला या केसबद्दल सगळे डिटेल्स देऊनच मी आलो आहे." डॉ. विजय म्हणाले.

"ठीक आहे. मी तिच्याशी बोलून घेतो." सुयश सर म्हणाले.
************************
इथे लॅबमध्ये ठरल्याप्रमाणे कैलासने मीटिंगची तयारी करून ठेवली होती. त्याला चांगलीच कल्पना आली होती, ज्याअर्थी रॉबर्ट स्वतः या महत्त्वाच्या मीटिंगसाठी आला नाही त्याअर्थी त्याच्या डोक्यात दुसरंच काहीतरी सुरू आहे. त्याने रॉबर्टची डायरी, मीटिंगचा पूर्ण सेटअप आणि आत्ता अंड्यांवर करायला घेतलेली प्रक्रिया कुठवर आली? याचं प्रेझेंटेशन तयार करून ठेवलं तोवर त्याचा फोन वाजला.

"हॅलो, बोला सर." कैलास म्हणाला.

"बोला काय बोला? तूच बोल सगळी तयारी झाली का? मला एकदा प्रेझेंटेशन दाखव." रॉबर्ट जरा चिडून म्हणाला.

कैलास फक्त "ठीक आहे सर" म्हणाला आणि फोन ठेवून लॅपटॉपवर रॉबर्टला प्रेझेंटेशन दाखवण्याची तयारी करू लागला. लगेचच त्याने रॉबर्टला सगळं नीट एक्सप्लेन करून सांगायला सुरुवात केली. रॉबर्टदेखील अगदी नीट सगळं बघत होता. आता या शेवटच्या पण एकदम महत्त्वाच्या प्रसंगी त्याला एकही चूक नको होती, म्हणून अगदी डोळ्यात तेल घालून कैलासने सगळ्या मुद्यांची नीट मांडणी केली आहे ना? हे तो बघत होता.

"हम्म. सगळं नीट आहे. आता प्रेझेंटेशन देतानासुद्धा असाच छान बोल आणि सगळं नीट एक्स्प्लेन करून सांग." रॉबर्ट त्याच्यावर खूश होऊन म्हणाला.

"हो सर. सर, आत्ता तुम्ही व्हिडिओ कॉलवर आहातच तर विचारून घेतो. ही अंडी जी मगाच पासून प्रक्रिया करत ठेवली आहेत त्यात नक्की काय बदल होणार आहेत? याचा वापर आपण कसा करणार आहोत? नाही म्हणजे जर प्रेझेंटेशन देताना कोणी विचारलं तर मला सांगायला बरं पडेल ना, म्हणून." कैलास म्हणाला.

"आय लाईक युअर अॅप्रोच. बघ ती अंडी आहेत ती काही केमिकल प्रोसेसने तयार केलेली आहेत. त्यात खऱ्या डायनासोरचे डी.एन्.ए. आहेत जे आपण ऋषभमध्ये टाकले आहेत फक्त यात अजून जीव नाहीये, म्हणून आपल्याला जास्त मेहनत यावर घ्यावी लागणार आहे. एकदा प्रोसेस पूर्ण झाली, की कोंबडी जशी अंड्याला उबवते आणि मग त्यातून पिल्लू बाहेर येतं अगदी तसंच होणार आहे. आत्ता ही अंडी आपण थंड बास्केटमध्ये ठेवली आहेत ती नंतर गरम बास्केटमध्ये ठेवणार आहोत. मग बघ आपल्या कोणत्याही प्रोसेस शिवाय पुन्हा डायनासोरची उत्पत्ती सुरू होईल. हा.. हा.. हा.." रॉबर्ट गर्वाने सगळं सांगून एकदम विकृतपणे हसत होता.

"खूपच भन्नाट डोकं आहे हो सर तुमचं." कैलास त्याला मुद्दाम म्हणाला.

"ते मला माहित आहे. चल आता लाग कामाला. मी मीटिंग झाल्यावर मग येईन तिथे." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने लॉग आऊट केलं.

कैलासला मनातून जी शंका येत होती ती आता खात्रीत बदलली होती. त्याने घड्याळ बघितलं आणि कॉन्फरन्ससाठी अजून थोडा वेळ आहे बघून त्याची जर्नल काढून तो काहीतरी करु लागला.

'या रॉबर्टला तर हा सगळा पोरखेळ वाटतोय. काय मिळणार असेल याला आपल्याच देशाचं नुकसान करून? नुसता पैसा घेऊन जाणार तरी कुठे आहे? जेव्हा फक्त याच्या प्रयोगामुळे संपूर्ण जगच धोक्यात येईल तेव्हा कुठे लपणार हा पैसा घेऊन?' कैलास मनातच बोलत होता.

त्याने विचारा विचारतच काहीतरी केमिकल बनवायला घेतलं आणि त्याचं लक्ष ऋषभच्या ट्रॅकिंग डिव्हाईसवर गेलं. तो आता बाहेर गावाच्या दिशेने निघाला आहे हे त्यात दिसत होतं.

'देवा! सगळं सांभाळून घे. गावात जर हा डायनासोर कोणी बघितला तर खूप गदारोळ माजेल. या ऋषभरुपी डायनासोरमध्ये आता खूप शक्ती आली असेल. उगाच कोणा निष्पाप जीवाचा बळी नको जायला.' कैलासने मनापासून देवाच्या प्रतिमेसमोर प्रार्थना केली.

थोड्याचवेळात अगदी चमत्कार घडवा तसा ऋषभ गावाच्या दिशेने न जाता जंगलच्या दिशेने फिरला. कैलासने हे बघितलं आणि देवाचे आभार मानून तात्पुरता का होईना सुटकेचा निःश्वास सोडला. हे एवढं सगळं होईपर्यंत मीटिंगची वेळ झाली होती. ठरल्याप्रमाणे कैलासने मीटिंग अटेंड करून सगळं नीट प्रेझेंटेशन दिलं. या मीटिंगच्या वेळी तरी 'हे लोक नक्की कोणत्या भाषेत बोलतात? त्यांचा बोलण्याचा टोन किंवा काहीतरी खूण दिसली तरी अंदाज येईल नक्की हे लोक कुठले आहेत?' असा विचार तो करत होता; पण त्या लोकांनी स्वतःची ओळख फुटणार नाही याची बरोबर काळजी घेतली होती. आजही मीटिंग संपली तरी त्याच्या हाती काहीही लागलं नव्हतं. त्याने खिन्न मनानेच लॅपटॉप बंद करून पुन्हा कामाला सुरुवात केली.

क्रमशः....
*************************
कैलास नक्की यातून मार्ग तरी कसा काढेल? सुयश सरांनी काय प्लॅन केला असेल? सी.आय.डी. जर कैलासपर्यंत पोहोचली तर तोच तर त्यांचा संशयित ठरणार नाही ना? कैलास सी.आय.डी.पर्यंत ही बातमी पोहचवू शकेल? आणि जेव्हा जयश्रीला तिच्या मुलाबद्दल समजेल तेव्हा तिला काय वाटेल? कशी असेल तिची रिअॅक्शन? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all