द डी.एन्.ए. (भाग -२२)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
ठरल्याप्रमाणे सगळे आपापल्या कामाला गेले. एवढ्यात पुन्हा सुयश सरांना फोन आला.

"हॅलो सर..." ते बोलता बोलता बाजूला गेले.

साधारण एक पाच मिनिटं बोलणं झाल्यावर फोन ठेवून ते आले.

"डी.सी.पी. सरांचा फोन होता. वरून आता या प्रकरणाचं खूप प्रेशर आहे. फोटोमधली जागा ओळखून, हे खरं आहे की खोटं? हे सिद्ध करण्यासाठी तरुणाई पुढे यायला लागली आहे. काही दिवस कोणत्याही वनक्षेत्रात जाण्यासाठी परवानगी नाहीये. आपल्याला आता मैदानात उतरावं लागणार आहे. सामान्य जनतेला आणि स्पेशली मीडियाला या बातमीबद्दल कळता कामा नये. आपल्या प्लॅनमध्ये आता आपण थोडा बदल करतोय. ईशा! सोनाली आणि अभिषेकला परत बोलावून घे." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." ईशा म्हणाली आणि ती फोन करायला बाजूला गेली.

"सर, नक्की आता आपण करायचं काय?" निनादने विचारलं.

"सांगतो. आता आपण.." सुयश सर बोलत होते एवढ्यात ब्युरोमध्ये जयश्री आली.

"मॅडम तुम्ही आत्ता?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर. सर, मगाशी रॉबर्ट सर येऊन गेले." जयश्री म्हणाली.

"ओके. मग काय बोलणं झालं तुमच्यात?" विक्रमने विचारलं.

"ते म्हणत होते की, आता त्यांचं इथलं काम झालं आहे. उद्या संध्याकाळच्या फ्लाईटने ते पुन्हा परदेशात जाणार आहेत." जयश्री म्हणाली.

"तुम्ही त्यांना ऋषभबद्दल एवढं सांगितलं असताना पण? त्यांनी थांबणं अपेक्षित होतं ना?" सुयश सर जरा संशयाने म्हणाले.

"बरोबर आहे सर तुमचं, पण ते तिथे सिनियर वैज्ञानिक म्हणून काम करतात. ते म्हणत होतेच की; मी रजा टाकून इथे राहतो, पण मीच त्यांना म्हणलं नको. आधीच त्यांनी आमच्या कुटुंबासाठी एवढं केलं आहे, आता अजून नको. त्यात ऋषभ कधी सापडेल? याची शाश्वती नाही. उगाच का त्यांच्या कामात अडथळा आणायचा?" जयश्री म्हणाली.

"बरं. तुम्हाला त्यांचा नंबर घ्यायला सांगितलेला. घेतला का?" सुयश सरांनी विचारलं.

"हो. त्यांनी स्वतःहूनच दिला. हे घ्या." जयश्री त्यांना नंबर देत म्हणाली.

निनादने नंबर नोट करून घेतला आणि जयश्री जायला निघणार एवढ्यात तिथे रॉबर्ट स्वतःच आला.

"रॉबर्ट सर तुम्ही?" जयश्री म्हणाली.

तिच्या बोलण्याने सगळ्यांचं लक्ष तिथे गेलं.

"हॅलो सर, मी रॉबर्ट." त्याने स्वतःची जुजबी ओळख करून दिली.

"हम्म. या" सुयश सर म्हणाले.

रॉबर्ट येऊन खुर्चीवर बसला. सुयश सरांनी निनादला काहीतरी खूण केली होती आणि म्हणूनच निनाद जरा बाजूला गेला. रॉबर्टवर संशय असताना अचानक त्याचच ब्युरोमध्ये येणं जरा सगळ्यांना चक्रावून टाकत होतं.

"सर, मला ऋषभबद्दल समजलं आणि तुम्ही त्या चौदा - पंधरा वर्ष जुन्या प्रयोगामुळे मला संशयित ठरवलं आहे हेही समजलं; म्हणूनच मी स्वतः आलो. सर, मी तुमच्या कोणत्याही कामात व्यत्यय आणणार नाही. तुम्हाला जे विचारायचं असेल किंवा जी चौकशी करायची असेल ती करा." रॉबर्ट एकदम नम्रपणे सगळं बोलत होता.

"हो. आम्ही तुमच्यावर संशय घेतला हे खरं आहे कारण, आम्हाला चौकशी दरम्यान सगळे पुरावे तुमच्याच विरोधात मिळाले आहेत." सुयश सर म्हणाले.

"हे बघा सर. हा माझा पासपोर्ट, व्हिसा आणि इतकी वर्ष मी परदेशात राहतोय त्याचं नागरिकत्व प्राप्त केलेलं प्रमाणपत्र." रॉबर्ट एक एक करून सगळे पुरावे सुयश सरांसमोर ठेवत बोलत होता.

तो बोलत होता तेव्हाच सुयश सरांनी सगळे डॉक्युमेंट्स तपासून बघितले. रॉबर्ट इतकी वर्ष कसा तो भारताबाहेर आहे? हे पटवून देत होता एवढ्यात सोनाली आणि अभिषेक आले.

"तुम्हाला तर आता माहीत आहेच की, ऋषभ आपल्यात असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाला इतकी वर्ष झाली तरीही त्याला कोणी आणि का पकडून ठेवलं असेल? तुमचा कोणावर संशय?" विक्रमने विचारलं.

रॉबर्ट काहीतरी विचार करू लागला. थोडावेळ विचार करून काहीतरी आठवल्यासारखं दाखवून त्याने बोलायला सुरुवात केली; "सर, मला कोणावर संशय तरी नाहीये, पण एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे."

"काय?" सुयश सरांनी विचारलं.

"सर जेव्हा हा प्रोजेक्ट विद्यावर्धनने बंद करायला लावला आणि नंतर सगळं सुरळीत झालं, त्यांनतर त्याला धमकीचे फोन येत होते. आमच्यात तसं बोलणंसुद्धा झालं होतं." रॉबर्टने सांगितलं.

"कोणाचे फोन यायचे काही माहीत आहे का?" विक्रमने विचारलं.

"नाही सर. दरवेळी वेगळे नंबर असायचे. एकदा फोन झाला की तो नंबर पुन्हा लागायचा नाही. जवळ जवळ सात ते आठ वेगळे नंबर होते. त्यावेळी पोलिसांनासुद्धा मी हे सांगितलं होतं, पण नंतर ऋषभची बॉडी मिळाली आणि केसच बंद झाली, त्यामुळे हे फोन कोणी केले होते? हे शेवटपर्यंत समजलं नाही." रॉबर्टने सांगितलं.

"बरं. मला एक सांगा तो तुमचा प्रयोग इतकी वर्ष आधी बंद झाला, पण त्याचे फॉर्मुले, प्रोसेस तुम्ही तिसऱ्याच कोणत्या व्यक्ती सोबत शेअर केले होते का? आज टीव्हीवर सतत डायनासोर दिसला अश्याच बातम्या येतायत." सुयश सरांनी मुद्दाम त्याला विचारलं.

"नाही सर. मी, विद्यावर्धन आणि माझा असिस्टंट कैलास त्यालाच हे माहीत होतं. शिवाय तेव्हा सगळं प्रोसेसमध्ये होतं, त्यामुळे कैलासला एवढं काही समजलेलं नव्हतं. त्यामुळे तो हे करण्याचा प्रश्न नाही. बहुतेक टीव्हीवर जे काही दाखवलं आहे ते मला फोटो एडिटिंग वाटतंय. हॉटेलमधून निघण्याच्या आधी मीही ती बातमी बघून आलोय." रॉबर्ट म्हणाला.

"ठीक आहे तुम्ही येऊ शकता. हो पण तुमची जेव्हाही गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला त्रास देऊ." सुयश सर म्हणाले.

"सर अहो त्रास कसला? जर आजही ऋषभ असेल, तर तो सापडलाच पाहिजे. मी नक्की तुम्हाला सहकार्य करेन. हा माझा नंबर घेऊन ठेवा." रॉबर्ट त्याचं कार्ड देऊन म्हणाला.

निनादने कार्ड घेतलं. त्यावर त्याचा भारतातला आणि बाहेरचा नंबरसुद्धा होताच.

"सर ऋषभ कधी पर्यंत सापडेल? मला आता तो लवकरात लवकर माझ्या जवळ हवाय." जयश्री रडत रडत म्हणाली.

"मॅडम आम्ही आमचं काम करतोच आहोत. लवकरच त्याला शोधू आम्ही आणि ज्याने कोणी हे केलं असेल त्याला कडक शिक्षासुद्धा मिळवून देऊ." विक्रम तिरकस नजरेने रॉबर्टकडे बघत म्हणाला.

रॉबर्टचं याकडे लक्ष नव्हतं. जयश्री आणि रॉबर्ट तिथून निघाले.

"सर, मला या रॉबर्टवरच संशय आहे. बातमी दाखवली ती वेळ आणि हा ब्युरोमध्ये आला ती वेळ बघता नक्कीच हा खोटं बोलला आहे." विक्रम म्हणाला.

"हो, माझाही याच्यावरचा संशय आता वाढत चालला आहे. गणेश! जा हा नक्की कुठे जातोय? हे त्याला न कळू देता बघ आणि कळव. तोवर आपण त्या बातमीच्या मागे लागू." सुयश सर म्हणाले.

गणेश लगेच रॉबर्टच्या मागावर गेला.
***********************
लॅबमध्ये कैलासने त्या बास्केटमध्ये ठेवलेल्या अंड्यांवर प्रक्रिया करायला घेतली होती आणि ऋषभवर लावलेल्या ट्रॅकिंग चीपच्या मदतीने तो कुठे कुठे जातोय? यावरही तो लक्ष ठेवून होता. अजूनतरी तो त्या घनदाट जंगलात होता म्हणून एवढी काळजी नव्हती, पण एकदा तो जंगलाबाहेर गावात गेला, की खूप हाहाकार उडणार याची कल्पना कैलासला आली होती. तो त्याच सगळ्या विचारात काम करत होता एवढ्यात त्याचा फोन वाजला.

"हॅलो सर." कैलास म्हणाला.

"मला यायला थोडा उशीर होईल. थोड्यावेळात तुला व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करायची आहे तिथे ऋषभच्या ट्रॅकिंग चीपचे डिटेल्स तू शेअर करायचे आहेत. माझ्या डायरीत ते डिटेल्स लिहिलेले आहेत. एकदा का त्या लोकांची खात्री पटली, की अजून फंडस् येणार आहेत ज्याने माझा हा प्रयोग अजून एका पुढच्या टप्प्यात पोहोचेल." रॉबर्टने त्याला सगळं समजावून सांगितलं.

"ओके सर. सर, पण तुम्ही लवकर या. मला तुमचा गाईडन्स हवाय" कैलास म्हणाला.

"होऽऽ होऽ येतोय. चल फोन ठेव आता." रॉबर्ट जरा तणतणत म्हणाला.

त्याच्या अचानक अश्या तणतणत बोलण्यामुळे नक्कीच काहीतरी प्लॅनपेक्षा वेगळं घडलं आहे किंवा काहीतरी टेंशन आहे, हे त्याच्या लक्षात आलं आणि मनातून त्याला आनंद होत होता.

'देवा! खूप खूप आभार. तू हाक ऐकलीस. आता नक्कीच या रॉबर्टरुपी सैतानाचा अंत तू करणार आहेस. कदाचित तू त्याला सुधारण्यासाठी आजवर संधी देत आला असशीलच आणि त्याने तरीही या चुकीच्या मार्गाचाच अवलंब केल्यामुळे आता ही वेळ आली असणार याची मला खात्री आहे. देवा! या कामासाठी तू माझी निवड केली आहेस आणि त्यासाठी मी कायम ऋणी राहीन; फक्त आता काहीतरी मार्ग दाखव. मी कुठे कमी पडत असेन किंवा माझ्या हातून काही चूक होत असेल तर तूच ती माझ्याकडून दुरुस्त करून घे.' कैलास मनःपूर्वक प्रार्थना करत देवाशी बोलत होता.

काम करताना देवाशी बोलत बोलत काम केलं, की त्याला खूप आधार वाटायचा आणि म्हणूनच त्याने हीच सवय स्वतःला लावून घेतली होती. इतकी वर्ष तो तिथे एकटा होता, पण त्याला आजवर कधी एकटेपणा जाणवला नाही.

क्रमशः......
*************************
रॉबर्ट ब्युरोमध्ये येऊन ऑफिसर्सना भेटला खरा, पण त्यांचा संशय अजून गेलेला नाही. तो घालवण्यासाठी हा काही नवीन खेळी खेळणार असेल का? ऋषभ यातून वाचू शकेल? कैलास बंद लॅबमध्ये राहून काय करू शकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all