द डी.एन्.ए. (भाग -२१)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -२१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सरांच्या सांगण्यानुसार सगळे कामाला लागले होते. अभिषेक आणि सोनाली हॉटेल हाय रेझच्या बाहेर आले.

"इथंपर्यंत तर आलो, आता रूम बुक करण्याच्या बहाण्याने चौकशी करुया." सोनाली म्हणाली.

"हो. चल." अभिषेक म्हणाला.

दोघं आत गेले. मस्त चकचकीत हॉटेल, त्याचं इंटिरियर, हॉटेलच्या आवारात असलेली लहान मोठी झाडं, कारंजं आणि काही झाडांचे केलेले छान छान आकार त्याचं सौंदर्य अजूनच खुलवत होते. सगळा परिसर बघत बघतच दोघं रिसेप्शनवर पोहोचले.

"हॅलो मॅम, हॅलो सर. वेलकम टू हॉटेल हाय रेझ." त्यांचं तिथे छान स्वागत झालं.

दोघांनी स्मित करून त्यांना दाद दिली आणि ते पुढच्या चौकशीसाठी पुढे सरसावले.

"बोला सर, कोणती रूम बुक करायची? किती दिवस?" रिसेप्शनिस्टने विचारलं.

"त्याआधी मला काहीतरी विचारायचं आहे." अभिषेक म्हणाला.

"हा, विचारा ना सर." रिसेप्शनिस्ट म्हणाली.

"रॉबर्ट इथेच थांबला आहे ना?" अभिषेकने विचारलं.

"सॉरी सर, पण आमच्या हॉटेलच्या पॉलिसीप्रमाणे आम्ही आमच्या गेस्टची माहिती अशी लीक करू शकत नाही." रिसेप्शनिस्ट म्हणाली.

अभिषेक आणि सोनालीने एकमेकांकडे बघितलं आणि सोनालीनेसुद्धा माहिती काढायचा प्रयत्न केला, पण तिने हॉटेलची पॉलिसी आपण प्रामाणिकपणे जपणार आहोत असं सांगितलं.

"ठीक आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत एकदम प्रोफेशनल आहात आणि माहिती देत नाही आहात, म्हणून आता आम्हाला आमची ओळख सांगावी लागेल." अभिषेक म्हणाला आणि त्याने त्याच्या खिशातून सी.आय.डी.च कार्ड काढून रिसेप्शनिस्ट समोर ठेवलं.

"सी.आय.डी.? सॉरी सर मी आधी तुमची ओळख करून घ्यायला हवी होती. एक मिनिट हा सर मी लगेच चेक करून सांगते." रिसेप्शनिस्ट म्हणाली आणि रेकॉर्डस् चेक करू लागली.

अभिषेक आणि सोनाली एकमेकांकडे बघत होते. नक्की हा रॉबर्ट इथे आहे? की नाही? इथपासून तयारी होती.

"येस सर. रॉबर्ट म्हणून एक व्यक्ती इथे थांबले आहेत. त्यांच्याकडे काम आहे का तुमचं?" रिसेप्शनिस्टने विचारलं.

"नाही. तुम्ही काळजी करू नका आम्ही सी.आय.डी. मधून जरी असलो तरी आम्ही त्याचे फ्रेंड्स आहोत. पठ्ठ्या परदेशात होता. तो इथे आला आहे हे समजलं; म्हणून त्याला सरप्राइज द्यायला आलो आम्ही. आहे का आत्ता तो रूमवर?" अभिषेक म्हणाला.

"सॉरी सर, पण ते आत्ता रूममध्ये नाहीयेत. बाहेर गेलेत." रिसेप्शनिस्ट म्हणाली.

"अच्छा, कधीपर्यंत येणार आहे काही माहीत आहे का?" सोनालीने विचारलं.

"नाही मॅम." रिसेप्शनिस्ट म्हणाली.

"ठीक आहे. मग आम्ही पुन्हा येऊ, पण त्याला काही सांगू नका. आम्हाला त्याला सरप्राइज द्यायचं आहे." अभिषेक म्हणाला.

रिसेप्शनिस्टने फक्त स्मित करून होकार दिला आणि दोघं तिथून निघाले.

"आता आपण बाहेर थांबून या रॉबर्टची वाट बघूया." सोनाली म्हणाली.

दोघं हॉटेल बाहेर आले आणि गाडीत जाऊन रॉबर्ट दिसतोय का? याची वाट बघू लागले. त्या जुन्या क्लिपमुळे साधारण रॉबर्ट कसा दिसत असेल याचा अंदाज त्यांना होता.
***************************
कैलासने आपला पाय कशात अडकला? हे बघण्यासाठी हळूच तिथली माती थोडी बाजूला सारली तेव्हा त्याला एक मानवी सांगाड्याचा थोडा भाग बाहेर आलेला दिसला, तो अजून खोदकाम करून बघणार एवढ्यात त्याच्या डोक्यावर असलेल्या ड्रोनची सावली त्याला तिथे दिसली आणि म्हणून ती जागा तशीच सोडून तो पुन्हा लॅबकडे येऊ लागला.

"काय रे? काय बघत होतास एवढं त्या जमिनीत?" रॉबर्टने त्याला आल्या आल्या विचारलं.

"कुठे काय? काही नाही. पाय अडखळला, म्हणून ठेच लागली नाही ना? बघत होतो." कैलास म्हणाला.

"हम्म, ते जाऊदे. ऋषभचं रूप बघितलं? झाला माझा प्रयोग यशस्वी. हा.. हा... हा..." रॉबर्ट गर्वात म्हणाला.

"हो सर, जेवढं इमॅजिन केलं नव्हतं तेवढं भयंकर आहे. एका क्षणाला तर असं वाटलं की, खरा डायनासोर आला आहे." कैलास त्याला मुद्दाम चण्याच्या झाडावर चढवत म्हणाला.

"चल आता पुढच्या तयारीला लाग. मी जरा बाहेर जाऊन येतोय." रॉबर्ट त्याचं काहीबाही सामान घेत म्हणाला.

"सरऽ आता तर झाला ना प्रयोग यशस्वी? आता काय करायचं आहे?" कैलासने विचारलं.

"आत्ता तुझी प्रशंसा केली ना? अरे मुर्खाऽ आत्ता हा एकच डायनासोर आहे. आपल्याला अशी फौज उभी करायची आहे. ही... ही... अंडी काय इथे आम्लेट करून खायला नाही आणलीत." रॉबर्ट जरा तणतणत म्हणाला.

"ओके.. ओके सर. मी करतो सगळी तयारी, पण सर तुम्ही कधीपर्यंत याल? मला तुमचा गाईडन्स लागेल." कैलास म्हणाला.

"येतोय तीन चार तासात. तुला काय काय करायचं आहे, ते तिथल्या बोर्ड वर लावलं आहे. कर त्याप्रमाणे काम." रॉबर्ट म्हणाला.

कैलास काही बोलायच्या आत तो लॅब लॉक करून तिथून निघून पण गेला.

'काय चालू आहे या माणसाच्या डोक्यात काय माहित? तो सांगाडा कुठून आला असेल? यानेच तर इथे येऊ पाहणाऱ्या माणसांना.....' कैलास स्वतःशीच म्हणाला.

हे प्रकरण जेवढं वरच्यावर दिसत होतं, त्यापेक्षा कितीतरी खोल आहे हे त्याला कळून चुकलं होतं. आता तर ऋषभ लॅबमधून बाहेर मोकाट सुटला होता. 'त्याच्या शेपटीमध्येच एवढी ताकद आहे, तर नक्की काय काय होईल?' या विचारानेच कैलासच्या अंगावर शहारा येत होता.

'बाहेर पडण्याची एक संधी मिळाली होती, पण त्यातही काही विशेष करता आलं नाही. देवा! आता या रॉबर्टचा अहंकार एवढा वाढव जेणेकरून तो स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणेल.' कैलास विनम्रपणे देवाच्या प्रतिमेशी बोलत होता.

थोडावेळ शांत राहून आता त्याला बरं वाटत होतं. लगेच तो रॉबर्टने काय काय करायला सांगितलं आहे? ते सगळं बघू लागला. त्या अंड्यांवर काय प्रक्रिया करायच्या आहेत?, किती वेळ कोणती प्रक्रिया केली पाहिजे? हे सगळं तिथे लिहिलं होतं आणि शेवटी ऋषभला मधे मधे ट्रॅक करत राहण्याचं कामसुद्धा होतंच.

कैलास त्या लिस्टप्रमाणे कामाला लागला.
***********************
ब्युरोमध्ये जे ते आपापली कामं करत होतं. साहिलच्या जीपवाल्या काकांचा तर काहीही पत्ता लागलाच नव्हता.

"सर! आपल्या रेकॉर्डस् नुसार दोन स्मगलर्स मागच्या वर्षी सुटले होते. या दोघांची माहिती काढून पुन्हा काळे धंदे चालू केलेत का? बघतो." निनाद म्हणाला.

"ठीक आहे. लवकरात लवकर माहिती काढ." सुयश सर म्हणाले.

एवढ्यात त्यांचा फोन वाजला.

"हॅलो, येस सर." ते फोनवर बोलता बोलता बाजूला गेले.

सुयश सरांच्या आवाजावरून नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि गंभीर आहे हे जाणून सगळे तिथे गोळा झाले. दोनच मिनिटात त्यांचं बोलणं झालं.

"सर, काही सिरियस?" विक्रमने विचारलं.

"हो. तुझ्या खबऱ्याची खबर खरी ठरली. शत्रू देशाकडून आपल्याला एक धमकी आली आहे, ज्यावर डायनासोरच चित्र आहे. आत्ता डी.सी.पी. सरांचाच फोन होता. सगळ्या यंत्रणांना अलर्ट केलं आहे आणि आपल्यालासुद्धा आता या प्रकरणाच्या तळाशी जायचं आहे. कसंही करून रॉबर्टला आता शोधलं पाहिजे." सुयश सर म्हणाले.

"ओके सर." सगळे म्हणाले.

एवढ्यात डॉ. विजय तिथे आले.

"अरे! टीव्ही लावून बघा बातम्यात काय सांगतायत? लवकर.." ते घाईतच म्हणाले.

निनादने लगेच टीव्ही चालू केला.

"या एकविसाव्या शतकात काय अशक्य आहे? जे काही आपण स्वप्न बघू ते सत्यात येतं याचं एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. आजवर आपण परग्रहवासी आहेत की नाही? यात साशंक असताना काही फोटोग्राफ्स मधून त्यांच्या उडत्या तबकड्या बघितल्या, पण आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्या वाचून राहणार नाही. हा फोटो बघा... हा फोटो कोणी काढला?, कुठला आहे? अद्याप स्पष्ट नाही, पण यात दिसणारी ही आकृती डायनासोरसारखी दिसत आहे, म्हणून हा फोटो सध्या चर्चेत आहे आणि इंटरनेटवर तुफान वायरल होतोय. बऱ्याच नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव करून ती जागा कुठली असेल? याचं भाकीत केलं आहे, तर काही नेटकरी याला एडिटिंग म्हणत आहेत, तर काहींच्या मते हा फक्त एक दृष्टी भ्रम आहे. नक्की आता हे काय प्रकरण आहे? याची माहिती आपल्याला एक्स्पर्ट देऊ शकतील." रिपोर्टर फोटो दाखवून बातम्या देत होता.

"सर म्हणजे....." विक्रम म्हणाला.

"हो विक्रम, तुझा संशय खरा आहे. लोकांना आत्ता ही गंमत आणि फोटो एडिटिंग वाटतंय तोवर आपल्याला हे प्रकरण गजाआड करावं लागेल. जेव्हा लोकांना हे खरं आहे असं समजेल तेव्हा त्यांची त्याजागी झुंबड पडेल आणि भीतीमुळे अफवा पसरायलासुद्धा वेळ लागणार नाही. जे करायचं आहे ते आता गुप्तरित्या सावध राहून." सुयश सर म्हणाले.

"सर, मला वाटतंय आपण डॉ. नायर, डॉ. शहा आणि या क्षेत्रात एक्स्पर्ट असलेल्या व्यक्तींसोबत सोबत एक मीटिंग करून पुढे काय होऊ शकतं? आणि काय उपाय करावा लागेल? यावर काम करू." डॉ. विजय म्हणाले.

"येस, तुम्ही या कामाला लागा.. तोवर आम्ही सगळे आता रॉबर्ट कुठल्या बिळात लपला आहे? त्याला उचलून आणतो." सुयश सर म्हणाले.

क्रमशः.....
*********************
रॉबर्ट कुठे गेला असेल? सी.आय.डी. या सगळ्यापर्यंत कशी पोहोचणार? कैलास या सगळ्यात टीमला मदत करू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all