द डी.एन्.ए. (भाग -२०)

CID Story. Thriller Suspense Story.


द डी.एन्.ए. (भाग -२०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रॉबर्टचं एवढं परफेक्ट प्लॅनिंग आणि आता आपण बाहेर पडणार आहोत, तरीही काहीही करू शकणार नाही किंवा आत्तातरी असा कोणताच मार्ग समोर दिसत नाहीये, म्हणून कैलास त्याच्याच विचारात गढून गेला होता.

"कैलास! अरे लक्ष कुठे आहे? चल... चल.... आवर लवकर. तू इथे आल्यावर मला पुन्हा बाहेर जायचं आहे. चल...." रॉबर्ट घड्याळ बघून म्हणाला.

कैलास फक्त मान हलवून उठला आणि रॉबर्टने त्याच्याकडे सेल कंट्रोल करायला एक रिमोट दिला. पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने सेल चालणार होता, फक्त कैलासला तो इच्छित स्थळी घेऊन जाऊन रिमोट कंट्रोलनेच त्याचं दार उघडायचं होतं. कैलासने रॉबर्टकडून रिमोट घेतला. रॉबर्टने लगेचच त्या जागेचा नकाशा काढून त्याला कुठून कसं जायचं आहे?, कुठे गेल्यावर सेलचं दार उघडायचं? हे सगळं समजावून सांगितलं आणि तो लॅबचे दरवाजे उघडायला पुढे गेला.

'देवा! बाहेर पडण्याची कदाचित ही पहिली आणि शेवटची संधी आहे. काहीतरी घडवून आण. या रॉबर्टने नक्कीच दमदार प्लॅनिंग केलं आहे, पण तुझ्या योजनांपुढे कोणाचंही काहीही चालत नाही. नक्कीच हासुद्धा तुझ्याच योजनेचा भाग असणार. बळ दे आणि तू दिलेले संकेत ओळखण्याची क्षमता दे.' कैलास त्याच्या डेस्कवर असलेल्या देवाच्या प्रतिमेशी मनातलं बोलला.

एवढ्यात रॉबर्ट सगळे दरवाजे उघडून पुन्हा आत आला.

"हे काय? आता का तुला देव आठवतोय? बाहेर जाऊन काहीही प्लॅनपेक्षा वेगळं करायचा प्रयत्न केलास, तर परिणाम तुला माहीतच आहेत." रॉबर्ट त्याला देवासमोर हात जोडलेलं पाहून रागाने लाल बुंद होऊन म्हणाला.

शेवटी वाईट कामं करणाऱ्यांना मनात कुठे ना कुठे भीती ही असतेच आपण पकडले जाण्याची, सत्ता हातातून जाण्याची आणि त्यांचा "सो कॉल्ड इगो" दुखावण्याची. म्हणूनच रॉबर्टची अशी अवस्था झाली होती. इतकी वर्ष त्याने जगापासून लपून ही वाईट कर्म केली होती, ज्यामुळे सगळ्यांनाच धोका आहे हे त्याच्याही मनाला माहीत होतं, पण आपण हे कसं चांगलं करतोय? याची खोटी समजूत त्याने स्वतःच्या मनाची काढून हे काम चालू ठेवलं होतं, म्हणूनच कधीकधी त्याला कैलासवर संशय यायचा. शेवटी काहीही झालं तरी रॉबर्टसुद्धा एक सामान्य माणूसच. जिथे मोठ - मोठ्या असुरीशक्ती त्या दैवीशक्तींना घाबरतात तिथे हा रॉबर्ट तर फक्त अती सामान्य माणूस. म्हणूनच दिवसेंदिवस त्याच्या मनात भीती वाढत होती. कैलास हे ओळखून होता आणि मुद्दाम त्याच्या मनात भीती उत्पन्न होऊन त्याने काहीतरी चूक करावी जी आपल्या पथ्यावर पडेल या प्रयत्नात तो होता.

"सर! अहो मी का तुमचा विश्वासघात करेन? तुम्हाला माहीत आहेच, की मी कोणतंही काम करताना सगळ्यात आधी देवाला नमस्कार करतो. ही सगळी मानसिक अवस्था आहे. लहानपणापासून सवय आहे, म्हणून आत्ताही तेच अंगवळणी पडलं आहे. जर असा देव असता तर विज्ञानाची काय गरज पडली असती?" कैलास मनावर दगड ठेवून मुद्दाम काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

त्याच्या बोलण्याने रॉबर्टने हुंकार भरून दाराजवळ हात केला आणि इशाऱ्यानेच त्याला बाहेर जायला सांगितलं. कैलास मनोमन देवाचा धावा करत लॅबच्या मेन डोअरपर्यंत आला. आज कितीतरी वर्षांनी एवढी प्रखर सूर्याची किरणं तो अंगावर घेत होता. पहिल्यांदा दाराजवळ आल्यावर त्याचे डोळे मिटले गेले होते.

"हे घे, हे सन ग्लासेस घाल. खूप वर्षांनी बाहेर जातोयस म्हणून तुला थोडा त्रास वाटेल." रॉबर्ट त्याच्या हातात सन ग्लासेस देत म्हणाला.

"सर राहुदे. आज कित्येक वर्षांनी उन्हं अंगावर पडली आहेत. त्रास नाही होणार. रोज गोळ्या घेणं वेगळं आणि प्रत्यक्ष निसर्गाकडून शारीरिक व्याधी दूर करणं वेगळं." कैलास म्हणाला.

आता त्याचा डोळ्यांना सूर्याच्या किरणांची सवय झाली. बऱ्याच वर्षांनी त्याने हा प्रकाश अनुभवला होता; ज्यात त्याला अजूनच सकारात्मक ऊर्जा मिळत होती. रॉबर्ट काही बोलणार एवढ्यात तो पुढे जाऊ लागला. मोकळ्या हवेत श्वास घेताना आज त्याच्या सर्वांगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. कैलास नकाशाप्रमाणे चालत होता. त्याच्या डोक्यावर टेहाळणीसाठी ड्रोन होताच. आजूबाजूला एकदम गर्द झाडी होती. कित्येक वर्षे तिथे कोणीही माणूस आलेला नाही याच्या खुणासुद्धा दिसत होत्या. कैलासला ज्याप्रमाणे आठवत होतं, त्यानुसार त्याला रॉबर्टने जवळ जवळ किडनॅप करून इथे आणलं होतं, त्यामुळे नक्की आपण कोणत्या ठिकाणी आहोत? हेही त्याला माहित नव्हतं. फक्त रोज येणाऱ्या पुलावाच्या पॅकेटवर मुंबईचा पिनकोड होता, त्यामुळे आपण मुंबईत आहोत एवढंच तो जाणून होता.

'मुंबईत तर एवढं घनदाट जंगल असणं शक्य नाहीये. नक्कीच मुंबई बाहेर असणार हे, पण मग आजूबाजूला गावं तर असतीच. इतकी वर्ष इथे लॅब आहे हे कोणीतरी पाहिलं असेल ना? मग ही बातमी बाहेर कशी गेली नाही?' तो मनातच विचार करत होता.

विचारा विचारातच तो इच्छित स्थळी पोहोचला. रॉबर्टने दिलेल्या सूचनांनुसार त्याने सेलचं दार उघडलं. दार उघडताच एकदम भयाण आवाज करत ऋषभ त्यातून बाहेर आला. कैलासने पटकन प्रसंगावधान दाखवून तिथल्या झाडीत स्वतःला लपवून घेतलं. ऋषभ दोन पायांवर उभा असलेला मानव डायनासोर होता, त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहत होते जे विध्वंस करायला पुरेसे होते. कैलास लपून त्याच्याकडे बघत होता. ऋषभचे मोठे मोठे हिरवेगर्द डोळे काहीतरी सावज शोधतच होते. तिथे काहीही दिसलं नाही म्हणताना तो दुसरीकडे जाऊ लागला. मागे वळतानासुद्धा त्याच्या शेपटीचा धक्का एका झाडाला लागला आणि पूर्णपणे ते झाड खाली वाकलं गेलं.

'बापरे! याच्या शेपटीमध्येच एवढी ताकद आहे?' कैलास स्वतःशीच म्हणाला.

ऋषभ दूर गेलेला पाहून तो पुन्हा लॅबकडे येण्यासाठी वळला आणि त्याचा कशात तरी पाय अडखळून तो खाली पडला.
*************************
इथे सी.आय.डी. ब्युरोमधून जयश्री आणि साहिल त्यांचं काम करून पुन्हा त्यांच्या त्यांच्या घरी गेले होते. जयश्रीचं पुन्हा पुन्हा "रॉबर्ट हे करू शकत नाही" असं सांगणं केस अजूनच किचकट करत होतं.

"सोनाली! तू आणि अभिषेक हॉटेल हाय रेझमध्ये जाऊन रॉबर्ट खरंच तिथेच थांबला आहे का? आणि त्याच्या सोबत अजून कोणी तिथे आहे का? याची गुप्तपणे चौकशी करा. त्याला संशय येता कामा नये आपण त्याच्याबद्दल माहिती काढतोय आणि त्याच्या मागावर आहोत ते. या माणसाबद्दल जोवर आपल्याला खात्री होत नाही, तोवर कोणावरही विश्वास ठेवण्यात अर्थ नाहीये." सुयश सरांनी सांगितलं.

"ओके सर. आम्ही सगळी चौकशी करून येतो." सोनाली म्हणाली.

लगेचच सोनाली आणि अभिषेक त्यांच्या कामासाठी गेले.

"निनाद! आपले सगळे जुने क्रिमिनल रेकॉर्ड चेक कर. कोण कोण आहेत जे जेल मधून सुटले आहेत? आणि त्यांची शत्रू देशांशी हातमिळवणी आहे. जर काही स्मगल झालंच तर यांच्या मध्यस्ती शिवाय होणार नाही." सुयश सरांनी सांगितलं.

निनादसुद्धा लगेचच त्याच्या कामाला लागला. या केसमध्ये आता एक एक मिनिट महत्वाचा होता. गणेश सतत टोलनाके, बंदर, एअरपोर्ट, बँक आणि सायबर टीमच्या संपर्कात होताच.

"विक्रम! साहिलने ज्या जीपबद्दल सांगितलं आहे त्याबद्दल त्याला फोन करून अजून विचार काही आठवतंय का? जयश्री मॅडम इथे होत्या आणि उत्सुकतेपोटी त्यांनी रॉबर्टला काही सांगू नये, म्हणून मी त्यांच्या समोर त्याला काही विचारलं नाही. जर त्या जीपवाल्या काकांचा पत्ता लागला तर नक्कीच काहीतरी हाती लागेल." सुयश सर म्हणाले.

"ओके सर. मी बघतो. इतकी वर्ष आधीची घटना आहे म्हणजे जरा कठीण जाईल शोधणं पण अशक्य नाहीये." विक्रम म्हणाला आणि तो त्याच्या कामाला लागला.

सगळीच टीम ज्याचं त्याचं काम चोख करत होती. एकतर या घटना तेरा वर्षांपूर्वी घडल्या होत्या, म्हणून ती ती संबंधित माणसं शोधून त्यांना त्यावेळी काय घडलं? हे आठवायला लावून माहिती मिळवणं जरा वेळ खर्ची करणारं ठरत होतं. एकीकडे ऋषभला का गायब केलं असेल? हा प्रश्न होता तर दुसरीकडे विक्रमच्या खबऱ्याने दिलेला डायनासोरचा क्लू.

"सर, मला वाटतंय की नक्कीच रॉबर्टला कोणीतरी यात ओढण्याचा प्रयत्न करत असेल का? म्हणजे हा प्रयोग तेव्हा नाकारला गेला आणि तो रॉबर्टचा होता, म्हणजे आता असं काही झालं तर पहिला संशय त्याच्यावर जावा म्हणून तर हे असं होत नसेल?" ईशा म्हणाली.

"तेच तर खात्रीशीर पद्धतीने कळत नाहीये. बघ, जयश्री मॅडमच्या म्हणण्यानुसार रॉबर्ट आत्ता आत्ता भारतात आलाय. असं धरून चाललं की, यात रॉबर्टला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करतंय; तर त्यालाही हे माहीतच असेल ना तो इथे नाही. नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय." सुयश सर म्हणाले.

क्रमशः.......
*************************
कैलासचा पाय कशामुळे अडखळला असेल? ऋषभ आता सगळीकडे विध्वंस करत फिरेल तर त्याचा काय परिणाम होईल? हे सत्य सी.आय.डी.पर्यंत कसं पोहोचेल? खरंच रॉबर्टने जो प्लॅन केला असेल त्यामुळे तो यातून वाचेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all