द डी.एन्.ए. (भाग - १)

Story Of Experiment. CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्. ए. (भाग -१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
"युरेका! युरेका! येसऽऽ इतक्या वर्षांची मेहनत आज पूर्णत्वाला गेली. येसऽ‌ऽ येसऽऽ" एका सामसूम जागी उभारलेल्या लॅबमध्ये वैज्ञानिक रॉबर्ट जवळ जवळ उड्या मारत मारत ओरडत त्याच्या स्पेशल रूम बाहेर आला.

"काय झालं सर?" त्याच्या असिस्टंट कैलासने विचारलं.

"अरेऽऽ आहेस कुठे? इतके वर्ष जो प्रयत्न मी करत होतो तो आज यशस्वी झाला. ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो आज आला आणि आता अजून फक्त थोडा वेळ गेला की माझं सगळं स्वप्न पूर्ण होणार. येसऽऽ येस!" तो आनंदातच म्हणाला.

कैलासच्या चेहऱ्यावर गोंधळ, भीती आणि उत्सुकता असे भाव उमटले होते. तो फक्त रॉबर्टकडे बघत होता.

"चल... तुला आज दाखवतो.... इतके वर्ष माझ्यासाठी काम केलंस, पण तुला मी या केबिनमध्ये येऊ दिलं नव्हतं पण आज तुला माझं स्वप्न खरं होताना दाखवतो." रॉबर्ट म्हणाला आणि तो कैलासला घेऊन त्या स्पेशल रूममध्ये गेला.

साधारण दहा बाय दहाच्या खोली एवढी ती जागा होती. एका कोपऱ्यात सगळं रिसर्च आणि कसलं कसलं केमिकल बनवण्याचं सामान टेबलावर पडलं होतं, एकीकडे बर्नरवर काहीतरी गरम होत होतं, एका बास्केटमध्ये अगदी काळजीपूर्वक ठेवलेलं काहीतरी अंड्यासारखं होतं आणि दुसऱ्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक अंडासेलसारखं काहीतरी होतं पण ते पारदर्शक होतं. कैलास हे सगळं बघत होता. रॉबर्टने तिथेच दाराजवळ असलेल्या स्वीचच बटण दाबून अंडासेलच्या इथला लहान बल्ब लावला. कैलासची नजर तिथे गेली आणि तो चपापलाच.

"हे... हे... सर म्हणजे...." तो चाचपडत म्हणाला.

"हो! हो! हे खरं झालंय. इतक्या वर्षांची मेहनत आता आकार घेतेय. बघ... बघ..." तो आनंदात कैलासला त्या सेलजवळ नेत म्हणाला.

कैलासचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याला जी भीती वाटत होती ती आज खरी ठरत होती. इतकी वर्ष आपण जे घडू नये त्यासाठी प्रयत्न केले ते आज नेमकं कसं घडतंय? आता नक्की करायचं काय? एक ना एक दिवस होणार होतं पण तो दिवस इतक्यात येईल असं वाटलं नाही. आता पुढे काय प्लॅन असेल या माणसाचा? हे विचारचक्र डोक्यात सुरू असताना तो त्या सेलला न्याहाळत होता.

"बघ तुझा विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. आता बघ आपण पैश्याच्या राशीत कसे लोळतो ते." रॉबर्ट त्याचा आश्चर्यकारक चेहरा बघत म्हणाला.

"हो सर! हे... हे.. खूप भन्नाट आहे. कोणी असा प्रयत्न करायचा विचारसुद्धा केला नसेल, पण तुम्ही हे खरं करून दाखवलंय." तो मुद्दाम आनंदी असल्याचा आव आणत म्हणाला.

"येस.... आता आपल्याला खूप वेगाने पुढची कामं करायला लागतील; ही फक्त सुरुवात आहे. अजून आपला प्रयोग म्हणावा तेवढा पूर्णत्वाला गेला नाहीये." रॉबर्ट म्हणाला.

"येस सर!" कैलास अगदी निर्विकारपणे म्हणाला.

थोडावेळ जरा शांततेत गेला. कैलास तिथलं वातावरण बघण्यात गुंग होता. त्याचं लक्ष त्या सेलवरून काही केल्या हलत नव्हतं. त्या सेलमध्ये असलेली आकृती तो बराच वेळ बघत होता. त्याचं हे असं तंद्री लावून बघणं रॉबर्टने बघितलं आणि घसा खाकरला. त्यामुळे कैलास भानावर आला.

"सॉरी सर!" तो म्हणाला.

"नो! सॉरीची गरज नाही. आज तुला मी या रूममध्ये का आणलं माहीत आहे?" त्याने विचारलं.

कैलासने फक्त नकारार्थी मान हलवली आणि मनात म्हणाला; \"हे असले विचित्र आणि भयंकर प्रयोग दाखवायला अजून काय? आता पुन्हा स्वतःच्या फिंगर प्रिंट आणि आय लॉकनी केबिन लॉक करशील आणि जाशील मला इथेच अडकवून.\"

त्याला पुन्हा विचारात गढलेलं पाहून रॉबर्ट स्वतःच बोलू लागला; "मीच सांगतो! आता तू या सेलवर लक्ष ठेवायचं; यात होणाऱ्या प्रत्येक सेकंदाच्या हालचाली, बदल सगळं सगळं नीट बघायचं त्यानुसार आपलं पुढचं काम चालू होणार आहे."

हे ऐकून कैलासला जरा आश्चर्यच वाटलं. \"इतकी वर्ष तर या माणसाने मला इथे हे असं काही करून ठेवलं आहे हे सुद्धा सांगितलं नाही आणि अचानक आता माझ्यावर एवढा विश्वास कसा टाकतोय? मी हे काम करायचं?\" हा विचार त्याच्या मनात सुरू असताना रॉबर्टने त्याच्या चेहऱ्यावरचे हे आश्चर्याचे भाव ओळखले.

"एवढं आश्चर्य वाटून घ्यायचं काहीच कारण नाहीये. इतकी वर्ष तू माझ्यासाठी काम केलं आहेस. मी कधी इथे नसलो तरी तुझ्यावर माझी बरोबर नजर असायची, त्यामुळे आता माझा तुझ्यावर इतका विश्वास तर बसला आहे की तुला मी हे काम देऊ शकतो. आता तर आपल्याला खूप वेगाने कामाला सुरुवात करायला हवी. याची पूर्ण वाढ व्हायच्या आत आपल्याला अजून एक इंजेक्शन तयार करायचं आहे. त्याची सुरुवात आज पासूनच करावी लागेल." रॉबर्टने सांगितलं.

"ओके सर!" कैलास म्हणाला.

"आता ते केमिकल नक्की काय असेल? त्याचा फॉर्म्युला काय असेल सगळं सगळं तुला शोधायचं आहे. म्हणून आज पासून तू सुद्धा या रूममध्ये येऊन काम करू शकतोस. हा पण काम करताना सेलवर लक्ष ठेवायला विसरायचं नाही. बाकी माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहेच." तो म्हणाला.

"हो सर! तुम्ही एवढा मोठा प्रयोग जवळ जवळ यशस्वी केला आहे तर मी यात खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. ट्रस्ट मी!" तो अगदी आत्मविश्वासाने म्हणाला.

"Good! तेव्हाही तूच एक होतास ज्याने माझी कायम साथ दिली आणि आत्ताही देतोय. बघ तुझं सगळं भविष्य कसं उज्वल करतो ते." रॉबर्ट जरा गर्वाने म्हणाला.

"हो सर! सर, एक विचारायचं होतं विचारू का?" कैलासने विचारलं.

"हम्म... विचार..." रॉबर्ट म्हणाला.

"सर, आता तुम्ही म्हणताय तसा हा प्रयोग अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. पण आता खरं काम सुरू होईल आणि त्यासाठी अजून फंडस् लागतील त्याचं...." कैलास बोलत होता.

"त्याची काळजी तुला करायची गरज नाही. इतकी वर्ष झालं ना सगळं मॅनेज? आत्ताही होईल." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर." कैलास वरवर म्हणाला पण त्याच्या मनात \"हा माणूस या सगळ्या रिसर्चला लागणारा एवढा कोट्यावधी रुपयांचा निधी कुठून आणतोय?\" हा प्रश्न होताच.

"मी जरा काही दिवस बाहेर जातोय. या दिवसात तुला इथलं सगळं मॅनेज करावं लागेल. मी येईन तेव्हा मला आउटपुट हवेत. मेन डोअरला नेहमीप्रमाणे माझे फींगर प्रिंट आणि आय लॉक असेल. त्या छोट्या खिडकीतून तुला तुझं जेवण, औषधं सगळं काही मिळत राहील. ही रूम ओपन असेल तुला इथेच बसून सगळं काम करायचं आहे." रॉबर्ट म्हणाला.

"हो सर!" कैलास म्हणाला.

"मला उद्याच निघायचं आहे. आज तू मी सांगतो तशी मला मदत कर. मी पुन्हा पुन्हा सांगतोय आता एक एक सेकंद, मिनिट खूप महत्त्वाचा आहे. याची पूर्ण वाढ झाली की आपल्याला ते इंजेक्शन याला द्यावं लागेल." रॉबर्ट म्हणाला.

"हो सर. आय नो!" कैलास म्हणाला आणि पुन्हा बाहेर जाऊ लागला.

"अरे बाहेर कुठे? इथेच काम करायचं आहे तुला. ते त्या सेलच्या बरोबर समोर टेबल ठेवलं आहे ते तुझ्याचसाठी आहे." रॉबर्ट तिथे असलेल्या टेबल खुर्ची कडे बोट दाखवून म्हणाला.

"हो सर! माझी जर्नल आणि काही पुस्तकं घेऊन येतो." तो म्हणाला आणि बाहेरच्या खोलीत आला.

त्याने त्याच्या टेबलावर असलेली त्याच्या कामाची पुस्तकं, जर्नल आणि एक देवाचा फोटो घेत असताना तो मनात म्हणाला; \"देवा! मला माफ कर. इतकी वर्ष हे असं चुकीचं काम करतोय... कधी ना कधी यातून बाहेर पडेन असं वाटत होतं पण आज खूप मोठं घडलं आहे. तुला तर सगळं माहीत आहेच! तूच आता काय ते करू शकतोस... जेव्हा जेव्हा पृथ्वीवर वाईट गोष्टी वाढायला लागल्या तेव्हा तेव्हा तूच हस्तक्षेप करून सगळं सुरळीत केलंस. यावेळीही तूच करशील माझा विश्वास आहे. हे संकट किती मोठं आहे? हे तुझ्याशिवाय अजून कोणाला माहित असणार? तूच आता सगळं सुरळीत कर.\"

"काय रे? इतका वेळ लागतो का सगळं घेऊन यायला?" रॉबर्ट बाहेर येऊन म्हणाला.

"नाही सर! सॉरी." तो सगळं हातात नीट धरत म्हणाला.

"बरं बरं.. चल आता" तो म्हणाला आणि पुन्हा आत जायला वळला तर त्याला काहीतरी दिसलं म्हणून पुन्हा मागे आला.

"हे काय? अजूनही तुझा देव देव करायचा स्वभाव आहेच का? अरे एवढा मोठा वैज्ञानिक ना तू?" रॉबर्ट म्हणाला.

"हो सर! मला देवाची आराधना करायला आवडतं. सकाळची सुरुवात जर देवाच्या दर्शनाने नाही झाली तर मला काहीच काम सुचत नाही." कैलास म्हणाला.

"बरं बरं... तुला जे कामावर जास्त लक्ष केंद्रित करायला मदत करत असेल ते कर, पण आता हे जे शेवटच्या टप्प्यात काम आलं आहे त्यावर पाणी फिरू देऊ नकोस." रॉबर्ट एकदम उडवाउडवीच्या स्वरात म्हणाला आणि आत गेला.

क्रमशः.......
**************************
हा रॉबर्ट एवढा कसला रिसर्च करत असेल? कैलासला हे सगळं पटत नाहीये, पण तो बाहेरून मदत कशी घेईल? काय असेल त्या सेलमध्ये? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all