द डी.एन्.ए. (भाग -१९)

CID Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -१९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
ब्युरोमध्ये अचानक जयश्री आलेली पाहून सगळे जरा गोंधळलेच. 'अचानक यांचं येणं म्हणजे, काही सिरियस घडलं तर नसेल ना? किंवा ही केस ओपन केली म्हणून कोणी त्यांच्यावर दडपण तर आणत नसेल ना?' असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

"जयश्री मॅडम तुम्ही अचानक? काही प्रॉब्लेम आहे का?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही सर. काहीही प्रॉब्लेम नाही. मी ते..." जयश्री बोलत होती एवढ्यात तिचं लक्ष साहिल वर गेलं.

साहिलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. तो तिच्याकडे बघत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात तिला एक ओळख जाणवत होती. तो काही बोलणार एवढ्यात तीच बोलू लागली; "तू? तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय." जयश्री त्याला म्हणाली.

"अहो काकू, तुम्ही मला नाही ओळखलं का? मी साहिल. ऋषभचा मित्र." त्याने स्वतःची ओळख करून दिली.

एवढ्या वर्षाच्या काळामध्ये त्याच्यात बरेच बदल झाले होते, पण बघितल्यावर नक्कीच याला कुठेतरी बघितलं आहे हे जयश्रीला क्लिक झालं. साहिल मात्र ऋषभलाच काय त्याच्या घरच्या कोणालाही विसरला नव्हता. ऋषभचा बेस्ट फ्रेंड म्हणून सतत त्याचं त्याच्या घरी येणं - जाणं होतं. जयश्रीसुद्धा अगदी ऋषभप्रमाणे त्याचे लाड करायची, म्हणून फक्त तिच्या आवजानेच त्याने तिला ओळखलं होतं. डोक्यावर ताण देऊन आठवलं तेव्हा तिला साहिल आठवला.

"हा... हा... साहिल. ऋषभ आणि तू सतत एकत्र असायचा. ऋषभचा बेस्ट फ्रेंड." ती म्हणाली.

"हो काकू, मी ऋषभ गेल्यावर रोज हट्टाने तुमच्या घरी आईला घेऊन यायचो, पण कित्येक महिने आम्हाला कोणी भेटलंच नाही. नंतर समजलं की, तुम्हाला बरं नाही म्हणून उपचारासाठी पाठवलं आहे." साहिल म्हणाला.

"हो. तेव्हा माझी मानसिक स्थिती पूर्णपणे खचून गेली होती, पण आज तुला बघून आता पुन्हा ऋषभ भेटणार याची एक नवीन उमेद मनात जागी झाली आहे." जयश्री साश्रू नयनांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली.

साहिलमध्ये ती ऋषभला बघत होती आणि तो इथपर्यंत येऊन पोहोचला आहे म्हणजे सी.आय.डी. ऑफिसर्स त्यांचं काम एकदम चोख करत आहेत, लवकरच आपला मुलगा आपल्या जवळ असेल याची तिला खात्री झाली.

"काकू. अहो असं रडताय काय? ऋषभला तरी आवडलं असतं का तुमच्या डोळ्यात पाणी बघून? लवकरच सापडेल तो." साहिल तिचे डोळे पुसत म्हणाला.

"नाही अरे, रडत नाहीये. आता माझी खात्री झाली आहे ऋषभ मला लवरच भेटणार. आता माझे कान त्याचा आवाज ऐकायला खूप आतुर झाले आहेत, डोळ्यांना त्याला बघण्यासाठी धीर धरवत नाहीये आणि कधी एकदा हा हात मायेने त्याच्या डोक्यावरून, गालावरून फिरवते असं झालं आहे." जयश्री एकदम भावूक होऊन बोलत होती.

"मॅडम! आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोतच. लवकरच ऋषभ तुमच्या जवळ असेल. बरं! तुम्ही का आला होतात? काय झालं?" सुयश सरांनी विचारलं.

"हा सांगते. सर, अहो मी तुम्हाला मागे म्हणले होते बघा, रॉबर्ट सर असं काहीही करू शकत नाहीत. आज ते खरं ठरलं. ते आज घरी आले होते." जयश्रीने सांगितलं.

"काय? रॉबर्ट आलेला? मग तेव्हाच का फोन केला नाहीत आम्हाला?" सुयश सरांनी विचारलं.

"सर अहो तेव्हा काही सुचलंच नाही. ते आले, चौकशी केली थोडावेळ थांबले आणि काम होतं म्हणून गेले. त्यांच्या बोलण्यात मला आजही आपुलकी जाणवली. सर, ते यात नक्कीच नाहीत. ऋषभला त्यांनी किडनॅप केलेलं नाही." जयश्री म्हणाली.

"ते आम्ही शोधूच. पण रॉबर्ट जेव्हा आलेला तेव्हा काय बोलणं झालं? इतकी वर्ष तो कुठे गायब होता?" सुयश सरांनी विचारलं.

"ते परवाच भारतात आले म्हणाले. मला जेव्हा हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्यांना हे समजलं होतं, म्हणून घरीच भेटायला आले. थोडे दिवस इथे काहीतरी काम आहे म्हणून आलेत नंतर पुन्हा परदेशात जाणार आहेत." जयश्रीने सांगितलं.

"ओके. सध्या ते कुठे थांबले आहेत काही कल्पना? अजून काय बोलणं झालं तुमच्यात?" विक्रमने विचारलं.

"ते..... काय बरं नाव सांगितलं?... हा... हॉटेल हाय रेझमध्ये थांबले आहेत. मी त्यांना म्हणलं की एवढं मोठं घर आहे थांबा इथेच तरीही नाही म्हणाले. त्यांना ऋषभची केस पुन्हा ओपन झाली आहे हे मीच सांगितलं. ऋषभ आजही आपल्यात आहे हे ऐकून तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला होता. म्हणून तर म्हणलं ते असं काही करूच शकत नाहीत." जयश्रीने सगळं सांगितलं.

"ओके. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर तर घेतला असेल ना? तो द्या." विक्रम म्हणाला.

"बघा! हे असं होतं. अहो इतक्या वर्षांनी ते भेटले त्या नादात आणि ऋषभबद्दल बोलण्याच्या नादात मी नंबर घ्यायला विसरले. उद्या नक्की घेते." जयश्री म्हणाली.

"उद्या? म्हणजे तो उद्या येणार आहे?" विक्रमने विचारलं.

"हो सर. ते म्हणालेत तरी दुपारनंतर एकदा येतो. मीही माझ्यापरीने ऋषभचा छडा लावतो." जयश्री म्हणाली.

सी.आय.डी. ऑफिसर्सना आता प्रश्न पडला होता, जर खरंच रॉबर्ट या सगळ्या मागे नसेल तर कोण असेल? कोणाला अजूनही ऋषभला पकडून ठेवून फायदा होणार असेल? काहीही केलं तरी केस पुन्हा पुन्हा गोल गोल फिरून त्याच जागी येत होती.
***********************
इथे आता ऋषभला इंजेक्शन देऊन अर्धा तास झालेला होता. रॉबर्टचं बरोबर घड्याळावर लक्ष होतं. कैलास त्याच्याकडे एकदम बारीक लक्ष ठेवून होता. कैलासला माहीत होतं, याने हे इंजेक्शन इतक्या गुप्त पद्धतीने ठेवलं होतं म्हणजे नक्कीच त्यात विशेष काहीतरी असणार. तो जेवता जेवता सगळं बघत होता.

"सर, अजून अर्धा तास अवकाश आहे. तुम्हीसुद्धा जेवून घ्या ना." कैलास म्हणाला.

"तू जेव. मी आता डायरेक्ट पार्टीच करणार आहे. एकदा मला मी जे ठरवलं आहे तेवढं करून घेऊदे. तुझं जेवण झालं की बोलू. तुला पुढचं काम करायचं आहे." रॉबर्ट म्हणाला आणि पुन्हा सेलकडे बघत बसला.

'देवा! या माणसाच्या डोक्यात काय चालू आहे? तुलाच माहीत. जे काही घडणार असेल त्याचे तू उचित परिणाम घडवून आणशील यात शंका नाही, फक्त योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची मला ताकद दे. जे काही पुढे वाढून ठेवलं आहे त्यासाठी सहनशक्ति दे.' कैलास मनातच म्हणाला आणि त्याने त्याचं जेवण संपवून गोळ्या घेतल्या.

"तर कैलास, आता तुझं काम असेल शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना तू हा सेल बाहेर घेऊन जायचा आहेस आणि इथून साधारण पाचशे मीटर अंतरावर गेल्यावर सेलचा दरवाजा उघडून पुन्हा इथेच यायचं आहेस. जराही काही अती शहाणपणा करायचा प्रयत्न केलास तर जागीच तुझे छिन्न विच्छिन्न तुकडे होतील. एक ड्रोन सतत तुझ्यावर लक्ष ठेवून असेल आणि तू जरा जरी तुझी अक्कल चालवण्याचा प्रयत्न केलास तर तिथल्या तिथे तुझ्यावर बॉम्ब पडेल." रॉबर्टने जवळ जवळ त्याला धमकावत सांगितलं.

"सर मी नीट करेन काम. इतकी वर्ष मी तुमच्यासाठी काम करतोय आणि आता तुमचं स्वप्न पूर्ण होत आलं असताना मी का काही वेगळं करेन? अजूनही तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का?" कैलासने विचारलं.

"विश्वास आहे म्हणूनच काम दिलं आहे. पण मला आता शेवटच्या टप्प्यात जराही रिस्क घ्यायची नाहीये, म्हणून हे सगळं तुला सांगितलं." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर. सर, एक विचारायचं होतं...." कैलास जरा कचरत म्हणाला.

रॉबर्टने नुसतं त्याच्याकडे बघून हुंकार भरला.

"सर, आपण डायनासोरला असं मोकळं सोडून दिलं आणि तो कुठे दूर गेला तर आपण त्याला परत कसं आणायचं? किंवा कोणाच्या नजरेस पडला तर?" कैलासने विचारलं.

"तेच तर हवंय आता मला. बास झालं आता लपून लपून काम करणं. आता सगळीकडे फक्त माझं नाव गाजणार आणि मला कोणीही काहीही करू शकणार नाही. हा... हा.. हा... या इंजेक्शनमुळे बघच आता काय काय होईल ते. एकाअर्थी बरंच झालं आधीच्या इंजेक्शनचा प्रभाव पडला नाही. त्यामुळे निदान मला या सिक्रेट केमिकलची आठवण झाली आणि माझं पुढंच काम सोपं झालं. राहता राहिला प्रश्न डायनासोर कुठे आहे? हे समजण्याचा तर या प्रयोगाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच मी याच्यावर एक ट्रॅकिंग चीप लावली आहे. आता आपण फक्त जे होईल ते बघायचं आणि पैश्याच्या राशीत लोळायचं." रॉबर्ट म्हणाला.

त्याच्या या वाक्यावर कैलास कसंनुसं हसला.

क्रमशः.......
***************************
काय होणार असेल असं ऋषभला बाहेर सोडून? रॉबर्ट खरंच स्वतःवरचा गुन्हेगार असलेला शिक्का पुसण्यात यशस्वी झाला असेल का? सी.आय.डी.च पुढंच पाऊल काय असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all