द डी.एन्.ए. (भाग -१८)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -१८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे लॅबमध्ये रॉबर्टने कैलासला कसली कसली तयारी करून दिली आणि तो बाहेर पडायला दारापाशी गेला. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला म्हणून त्याने फोन बघितला.

'आत्ताच यांनापण फोन करायचा होता? काय सांगू आता?' तो मनात म्हणाला आणि फोन उचलला.

कैलास काम करता करता त्याच्यावर लक्ष ठेवून होताच. फोन आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग बघून त्याला अंदाज आलाच होता; नक्कीच याने ज्या माणसांकडून कोट्यावधी रुपये घेतले असतील त्या लोकांचाच हा फोन असणार. काम करता करता कैलास तिरकस नजरेने रॉबर्टकडे बघत होता आणि त्याचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. कैलास हे सगळं बघून छद्मी हसत होता. मनातून त्याला खूप बरं वाटत होतं की, या माणसाचे हे वाईट हेतू आता मोडीत निघणार आहेत. नक्कीच आता ज्यांनी याला प्रोजेक्टसाठी फंडस् पुरवले आहेत ते आता फंडस् देणं बंद करून याचा बरोबर काटा काढतील.

"येस, येस... वी आर व्हेरी क्लोज टू अवर ड्रीम." रॉबर्ट उसनं अवसान आणून बोलत होता.

नंतर बराच वेळ त्याने काहीतरी ऐकून घेतलं आणि काही बोलायला जाणार एवढ्यात फोन कट झालेला होता. असा काहीही ऐकून न घेता त्याचा फोन कट केल्यामुळे त्याचा इगो दुखावला गेला होता, पण सांगणार तरी कोणाला? तो तावातावाने कैलास जवळ आला.

"बघ... बघ.... मी आता या लोकांना काय उत्तर द्यायचं? माझ्यावर.... फक्त माझ्यावर विश्वास ठेवून त्या लोकांनी या प्रोजेक्टमध्ये कोट्यावधी रुपये घातले आहेत." रॉबर्ट सेलकडे बोट दाखवून म्हणाला.

कैलास काहीही न बोलता शांत उभा होता.

'फक्त तुझ्यावर विश्वास ठेवून म्हणे. जरा डोक्यावर पडला आहेस का? ती जी कोणी लोकं आहेत यात त्यांचा स्वार्थ असल्याशिवाय असं होईलच कसं? तुला फक्त प्यादं म्हणून वापरतील आणि नंतर दुधात पडलेली माशी जशी उडवून लावतात, तसं तुलाही उडवून लावतील तेव्हा समजेल.' कैलास मनात म्हणाला.

रॉबर्टची अस्वस्थता खूप वाढली होती. तावातावाने तो त्याच्या डेस्कजवळ गेला आणि खिशातून कसलीतरी चावी काढून एक सिक्रेट ड्रॉवर उघडलं. कैलास हे सगळं बघत होता. आता हा विकृत माणूस नक्की काय करतोय? याकडे त्याचं बारीक लक्ष होतं. रॉबर्टने त्या ड्रॉवरमधून कसलीतरी लहान कूपी काढली आणि तो कैलासच्या दिशेने येऊ लागला.

"मला माहित होतं, जर काही गडबड झालीच तर?, म्हणून मी हा शेवटचा प्लॅन केलेला होता. हे केमिकल यात मिक्स कर. हा पर्याय मला वापरायचा नव्हता; पण आता दुसरा कोणताही मार्ग नाहीये. घे." रॉबर्ट कैलासच्या हातात ती कूपी देत म्हणाला.

"सर कोणतं केमिकल आहे हे? काय होईल याने?" कैलास ते हातात घेत म्हणाला.

"परिणाम जेव्हा समोर येतील तेव्हा तुला दिसेलच. आत्ता सांगितलं आहे तेवढं कर. मी यायच्या आत इंजेक्शन तयार हवंय." रॉबर्ट त्याला ठणकावून म्हणाला आणि बाहेर गेला.

कैलास बराच वेळ ती कूपी बघत होता. 'नक्की याने अजून काय काय विचार करून बॅकअप प्लॅन केले आहेत?' या विचाराने त्याचं डोकं चक्रावलं होतं.

'देवा! आत्ता कुठे आशेचा किरण दिसत होता तर हे नवीन संकट आलंय. आता तूच यातून मार्ग काढ. मला नाही माहित यात काय आहे?, याचा काय परिणाम होणार आहे? पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझं नाम घेऊन मी हे यात मिक्स करतोय म्हणजे याचा तू काहीही वाईट प्रभाव होऊ देणार नाहीस याची मला खात्री आहे.' कैलास ती कूपी हातात धरुनच म्हणाला.

कैलासला खात्री होती की, जे होईल ते चांगल्यासाठीच. ही आपली देवावरच्या विश्वासाची, श्रध्देची परीक्षा आहे आणि आपल्याला यात पास व्हायला मदतसुद्धा तो अकारण कारुण्य असलेला देवच करणार आहे. याच पूर्ण विश्वासाने त्याने देवाला सगळं काही सांगितलं आणि त्याने जे केमिकल प्रोसेसिंगसाठी ठेवले होते ते झाल्यावर देवाचं नाव घेऊनच हे नवीन केमिकल त्यात टाकलं.

'देवा! मला माहित आहे तू खूप क्षमाशील आहेस. मला आजवर हे काम कोणत्या परिस्थितीत करावं लागतंय? आणि याचा मला खूप पश्चात्ताप आहे हे तुला माहीतच आहे. त्यामुळे तू मला माफ करशील याची खात्री आहेच आणि म्हणूनच या गोष्टीच्या ओझ्याखाली मी स्वतःला दबवून घेणार नाही. नक्कीच तूच या कामासाठी माझी निवड केली असावी, नाहीतर इतक्या वर्षात केव्हाच हार मानून मी या वाईट मार्गाला लागलो असतो. खरंच देवा! तुझे अनंत आभार. कायम फक्त आणि फक्त तुझ्या चरणांशी मला बांधून ठेव आणि जे काही माझ्या आयुष्यात घडवायचे आहे ते तूच घडव.' कैलासने मनोमन प्रार्थना केली.

त्याचं केमिकल प्रोसेसिंग, सगळ्या निरीक्षणाची नोंद करणे या सगळ्यात साधारण दोन तास गेले. कैलास त्या सेलजवळ जाऊन उभा होता. ऋषभरुपी डायनासोर दोन पायांवर उभा होता. संपूर्ण शरीरावर आलेले खवले, हिरवी, पिवळी पिसं, भलीमोठी तीक्ष्ण नखं त्याचं रूप खूप भयंकर करत होते. चेहऱ्यावर आलेले राठ खवले आणि तोंडातून बाहेर आलेली सापासारखी जीभ, तीक्ष्ण सुळे, हिरवी बुबुळे आणि डोळ्यात दिसणारी आग खूप भीतीदायक दिसत होती. कैलास नीट त्याला बघण्याच व्यस्त होता. एवढ्यात रॉबर्ट बाहेरून आला.

"तू इथे काय उभा आहेस? साडे तीन तास झालेत. इंजेक्शन तयार आहे का?" त्याने विचारलं.

"हो सर, हे घ्या." कैलासने ते इंजेक्शन त्याला दिलं.

"हा.. हा... हा.... आता मला कोणीही थांबवू शकत नाही. झालं! माझं स्वप्न पूर्ण झालं! हा.. हा.. हा.." रॉबर्ट एकदम कुत्सित हसत म्हणाला.

कैलास 'नक्की हा माणूस आता काय विचार करतोय?' या विचारात होता. त्यात हा बाहेरून आल्यापासून जरा जास्तच कॉन्फिडन्ट दिसत होता.

"सर तुम्ही आता एकदम टेंशन फ्री दिसत आहात. या इंजेक्शनमुळे असं काय होणार आहे?" कैलासने एकदम साळसूदपणाचा आव आणून त्याला विचारलं.

"सगळी कामं आता मी मार्गी लावून आलोय. आता आपल्याला या प्रोजेक्टमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. माझ्यावरचा संशय मी काढून आलोय, शिवाय या इंजेक्शनचं म्हणशील तर आता आपल्याला जरा मेहनत घ्यावी लागेल; पण बाकी जे मी स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण होणारच आहे." रॉबर्ट गर्वाने म्हणाला.

"ग्रेट सर! मग आता काय करायचं आहे मी?" कैलासने मुद्दाम आनंदी असल्यासारखा आव आणत विचारलं.

"मी हे इंजेक्शन याला दिलं की, बरोबर एक तासाने तुझं खरं काम चालू होईल. दुपार झालीच आहे आत्ता. तू पोटभर जेवून घे आणि गोळ्या घे मग सांगतो." रॉबर्ट म्हणाला.

कैलास 'आता नक्की काय करावं लागणार आहे?' या विचारात तिथेच उभा होता. रॉबर्टने ते इंजेक्शन सेलच्या स्लॉटमध्ये घातलं आणि इंजेक्शन ऋषभच्या पायात दिलं.
*************************
इथे सी.आय.डी. ब्युरोमध्ये साहिल शाळेत तेव्हा काय झालं होतं? हे पूर्ण मेंदूवर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होता.

"हा! हा! सर... एक आठवलं. त्या दिवशी मी शाळेत जायला तयार झालो होतो. मी जीपने शाळेत जायचो, पण त्यादिवशी जीप रस्त्यात बंद पडली. आम्ही सगळ्या मुलांनी एकच कल्ला केला होता. जीपवाले काका दुसरी व्यवस्था बघत होते, पण उशीर झालेला म्हणून सगळ्यांना पुन्हा घरी सोडलं. त्या दिवशी आमच्या जीपमधलं कोणीही शाळेत गेलं नव्हतं. सगळी लहान मुलंच, त्यामुळे एक दिवस शाळा बुडवली म्हणून विशेष असा फरक पडणार नव्हता." साहिलने जे आठवलं ते सांगितलं.

"अच्छा. नक्कीच हे ज्याने कोणी घडवून आणलं आहे त्याला ऋषभ आणि तू त्याचा बेस्टफ्रेंड म्हणून तुझीही माहिती असणार. नक्कीच त्याला हे माहीत असणार, तू ज्या दिवशी येत नाहीस त्या दिवशी तो एकटा राहतो आणि म्हणून त्याचं काम सोपं होणार होतं." विक्रम म्हणाला.

"पण सर असं कोण असेल?" साहिलने विचारलं.

"ते तूच सांगू शकतोस." सोनाली म्हणाली.

"मी? मॅडम मी कसं सांगणार? मला काय माहीत?" साहिल गडबडून म्हणाला.

"अरे गडबडून जाऊ नकोस. जरा आठवून बघ ना, म्हणजे ऋषभच्या आई - बाबांशिवाय त्याला दुसरं कोणी शाळेत घ्यायला यायचं का?" सुयश सरांनी विचारलं.

"त्याला ड्रायव्हर काका सोडायला आणि घेऊन जायला यायचे, त्याची आईसुद्धा यायची कधीतरी, पण अगदी कधीतरीच त्याचे बाबा यायचे तेव्हा रॉबर्ट काका पण असायचे. बाहेरचं असं कोणीच नसायचं." साहिल म्हणाला.

"बरं, यात रॉबर्ट तर बाहेरचा आहे. तुला काय वाटतं हे सगळं रॉबर्ट करू शकतो का?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही ओ सर. ते का असं करतील? ऋषभ किती छान बोलायचा त्यांच्याबद्दल. नाही.. नाही... त्यांनी हे केलं नसेल." साहिल म्हणाला.

एवढ्यात ब्युरोमध्ये जयश्री आली.

क्रमशः.....
**********************
रॉबर्ट नक्की काय करून आला असेल? त्याने दिलेल्या इंजेक्शनमुळे आता काय फरक पडणार असेल? जयश्री अचानक ब्युरोमध्ये का आली असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all