द डी.एन्.ए. (भाग -१७)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -१७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
देशावर मोठं संकट येणार आहे याची खात्री त्यांना झालीच होती. त्यामुळे कोणतेही चूक होऊन आता चालणार नव्हतं. सगळ्या टीमने पटापट हालचाली करायला सुरुवात केली होती.

"सर! मी सगळ्या एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, टोलनाके आणि बंदरावर कोणालाही काहीही जरा जरी संशयास्पद वाटलं तरी त्याची माहिती द्यायला अलर्ट केलं आहे. शिवाय सगळ्या बँक, खाजगी वित्त संस्था यांनासुद्धा अचानक मोठे मोठे ट्रान्सऍक्शन झाले तर कळवायला सांगितलं आहे." गणेश म्हणाला.

"गुड. ज्याअर्थी या नकाशावर शत्रू देशाचे झेंडे आहेत, त्याअर्थी यात त्या लोकांचा हात असू शकतो. काही केमिकल किंवा डायनासोरचे अंश, अंडी स्मगल होण्याचे चान्सेस आहेत." विक्रम म्हणाला.

"सर, हे स्मगल आधीच झालं असेल किंवा त्या लोकांनी सगळे व्यवहार जर क्रिप्टोकरन्सीमध्ये केले तर?" अभिषेकने त्याची शंका बोलून दाखवली.

"तेही समजेल. आपण सायबर डिपार्टमेंटला अलर्ट केलं आहे. मागच्या पूर्ण महिन्याभराचे आपण रेकॉर्डसुद्धा चेक करतोय त्यामुळे या आधीच काही उलाढाली झाल्या असतील तर नक्कीच समोर येतील आणि राहिला प्रश्न आधीच जर काही स्मगल झाले असेल तर?, तर त्यासाठी आपण मागच्या एक महिन्यात कोणी कोणी संवेदनशील गोष्टी आयात - निर्यात केल्या आहेत? त्याबद्दल माहिती काढायची आहे. गणेश! तू आणि निनाद जाऊन सगळं चेक करा." सुयश सर म्हणाले.

गणेश आणि निनाद "येस सर." म्हणून तिथून गेले. एवढ्यात विक्रमचा फोन वाजला म्हणून तो बाजूला गेला. ईशा त्याच्याकडेच बघत होती. सोनालीने हे बघितलं आणि हळूच तिला कोपराने धक्का दिला त्याबरोबर ती सावरली. एवढ्यात विक्रम त्याचं फोनवरच बोलणं संपवून आला.

"सर, त्या ऋषभच्या मित्राचा पत्ता लागला आहे. साहिल नाव त्याचं. हे बघा, आलाच त्याचा पत्ता आणि नंबर." विक्रम सुयश सरांना त्याचा पत्ता दाखवून म्हणाला.

"ठीक आहे. त्याला फोन करून इथेच बोलवून घे. बघूया काही हाती लागतंय का?" सुयश सर म्हणाले.

विक्रमने लगेच त्या नंबरवर फोन करून त्याला ब्युरोमध्ये येण्यासाठी सांगितलं. साधारण तासाभरात तो घाई घाईत ब्युरोमध्ये आला.

"नमस्कार, मी साहिल. मला का बोलावलं आहे? मी कोणताही गुन्हा केलेला नाहीये. अकाऊंटस् डिपार्टमेंटला कामाला आहे मी, पण आजवर एका पैश्याचाही फ्रॉड केला नाहीये. मग मला का बोलावलं?" त्याने घाबरून विचारलं.

"आधी तू शांत हो. बस इथे. पाणी घे." अभिषेक त्याला पाणी देत म्हणाला.

"सर, सांगा ना का बोलावलं? अहो आत्ता कुठे माझ्या करीयरची सुरुवात आहे. असं काय झालं आहे की मला इथे आणलं?" तो एकदम घाबरून बोलत होता.

"अरे आधी शांत हो. ऐकून तरी घे. तू काहीही केलं नाहीये हे आम्हाला माहीत आहे." सुयश सर त्याच्या समोर खुर्ची घेऊन बसत म्हणाले.

त्यांचं हे शांतपणे बोललेलं वाक्य ऐकून तो जरा शांत झाला आणि पाणी पिऊन पुढे ऑफिसर्स काय म्हणतायत हे ऐकू लागला.

"तू सी.बी.एस.सी. शाळेत होतास ना?" विक्रमने विचारलं.

"हो. काय झालं?" साहिल म्हणाला.

"तुला जरा आता डोक्याला ताण देऊन तेरा वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवावी लागेल. तुझी आम्हाला खूप मदत होणार आहे." विक्रम म्हणाला.

"म्हणजे? काय झालंय नक्की?" साहिलने गडबडून विचारलं.

"तुला तुझा बेस्ट फ्रेंड ऋषभ आठवतोय का?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर, त्याला कसं विसरेन मी? अहो तो खूप छान मित्र होता माझा. आमच्या दोघांना एकमेकांचे सिक्रेट माहीत असायचे. आजही माझ्या मनातली त्याची जागा तशीच आहे. तो गेला तेव्हा आठवडाभर तरी मी शाळेत गेलो नव्हतो. मला सतत त्याची आठवण यायची, इतक्या चांगल्या मुलासोबत असं व्हायला नको होतं. आजही मी विचार करत असतो, जर आम्ही दोघं एकत्र असतो तर काय काय केलं असतं? त्याला त्याच्या बाबांसारखं वैज्ञानिक व्हायचं होतं. तो मलाही म्हणत होता मी तुला सगळं काही शिकवीन, तुझा अभ्यास घेईन आपण एकत्र मोठं होऊन एकाच रिसर्च सेंटरमध्ये कामाला जायचं. जसे बाबा आणि रॉबर्ट काका काम करतात तसं आपण करायचं." साहिल ऋषभबद्दल बोलताना थकत नव्हता.

बोलता बोलता त्याच्या आठवणीत तो पूर्णपणे हरवून गेला होता. इतक्या वर्षांनीसुद्धा त्याच्या आठवणीत तो ऋषभला शोधत होता. मैत्री असतेच अशी की जणू आपल्याला आपलं कुटुंबच वाटते. कुठल्याही वयात मैत्री झाली तरी त्या माणसाची ओढ आपल्याला रक्ताच्या नात्याइतकी किंवा त्यापेक्षाही जास्त असते. एकवेळ आपण घरात सगळं काही शेअर करणार नाही, पण आपल्या या मैत्री नावाच्या कुटुंबात सगळं काही शेअर करतो. इथे आपल्याला एक खात्री असते कितीही काहीही झालं तरी रागावून, चिडून का होईना आपला मित्र आपली साथ सोडणार नाहीये. तसंच साहिल आणि ऋषभच होतं. बोलता बोलता तो ऋषभबद्दल एवढं काही सांगत होता जे त्याच्या शिक्षकांना आणि आईलासुद्धा माहीत नव्हतं. जणू आठवणींच्या जगात तो पुन्हा एकदा त्यांची मैत्री अनुभवत होता. जणू तो पुन्हा एकदा टाईम मशीनमधून त्याच्या शाळेत गेला होता. सगळं बोलून होईपर्यंत न कळत त्याच्या डोळ्यांच्या कडा भिजल्या होत्या. अभिषेकने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो भानावर आला.

"सॉरी! सॉरी सर. ऋषभच्या आठवणीत मी जरा जास्तच वाहवत गेलो." तो हलकेच डोळ्यांच्या कडा दाबून म्हणाला.

"इट्स ओके. ऋषभ तुझा एवढा चांगला मित्र होता, म्हणजे तुला त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहीत असेलच. ज्या दिवशी तो शाळेतून हरवला त्याच्याआधी तुमचं काही बोलणं झालं होतं का?" सुयश सरांनी विचारलं.

"सर काय होणार आहे त्याने? पुन्हा एकदा जखमेवरची खपली निघेल. ऋषभ तर आता परत येऊ शकणार नाही." साहिल दुःखी होऊन म्हणाला.

"कदाचित आजही ऋषभ जिवंत आहे. त्याच्याच शोधासाठी ही केस पुन्हा ओपन झाली आहे. मी तुझं दुःख समजू शकतो, पण तुझी छोट्यातली छोटी माहितीसुद्धा आम्हाला खूप महत्त्वाची ठरेल." सुयश सर म्हणाले.

त्यांचं "ऋषभ आजही आहे" हे बोलणं ऐकून साहिलला खूपच आनंद झाला होता. त्याचा बेस्ट फ्रेंड, गाईड आणि त्याला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगणारा, त्याच्या प्रत्येक सुखदुःखात सामील असणार ऋषभ पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात येणार, म्हणून इतकावेळ त्याच्या आठवणीत व्याकुळ झालेला त्याचा जीव आता प्रसन्न झाला होता.

"सर! मी सगळं काही सांगतो पण खरंच ऋषभ आता परत येईल? इतकी वर्ष कुठे असेल तो? आता मला तो ओळखेल का?" साहिल एकदम अधिरतेने बोलू लागला.

"हो... हो... आधी शांत हो. आमचा त्याला लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न चालूच आहे. तू सगळी माहिती दे आता." विक्रम म्हणाला.

"सर, ऋषभ हरवला तेव्हा तर मी शाळेत गेलो नव्हतो. पण त्याच्या काही दिवस आधी तो सारखा काळजीत असायचा. मी त्याला विचारलं होतं तू गप्प गप्प का असतोस? तर त्याने मला काहीतरी धमकीचं सांगितलं होतं." साहिल म्हणाला.

"धमकी? कसली धमकी? नीट आठवून सगळं सविस्तर सांग. ऋषभला कोणी शाळेत धमक्या देत होतं का?" विक्रमने विचारलं.

साहिल डोक्यावर जोर देऊन सगळं आठवण्याचा प्रयत्न करत होता.

"हा! आठवलं! सर, तो मला म्हणाला होता की, त्याने त्याच्या बाबांचं बोलणं एकदा ऐकलं होतं. ते कोणाशी तरी फोनवर बोलताना म्हणत होते, नाही माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाहीये तुम्ही त्यांना आपल्यामध्ये आणायची गरज नाही. जे काही आहे ते आपल्या कामासंबंधात आहे. माझ्या घरच्या कोणालाही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल." साहिलने जसं आठवलं तसं सांगितलं.

"ओके. म्हणजे ऋषभला हे त्याच्या आईलासुद्धा सांगायचं होतं, पण त्या आधीच तो कीडनॅप झाला. अजून काही सांगितलं होतं का त्याने?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही. मला तरी एवढंच आठवतंय. त्या दिवशी मी शाळेत गेलो असतो तर कदाचित तो हरवला नसता." साहिल म्हणाला.

"त्या दिवशी शाळेत का गेला नव्हतास तू? माहितेय ही खूप वर्ष आधीची गोष्ट आहे, पण काहीतरी आठवतंय का?" विक्रमने विचारलं.

साहिल पुन्हा तेरा वर्ष आधीच्या काळात गेला आणि आठवू लागला.

क्रमशः.....
*************************
साहिलने जे काही सांगितलं आहे त्याच्या आधारावर सी.आय.डी. ऑफिसर्स कसा शोध घेतील? साहिल त्या दिवशी शाळेत गेला नसेल? की कोणीतरी तो येऊ नये म्हणून तशी व्यवस्था केली असेल? रॉबर्ट आता काय करणार असेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all