द डी.एन्.ए. (भाग -१६)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -१६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळ्यांचे कान आता डॉ. विजय काय सांगतायत? यासाठी टवकारले गेले. रोज एक एक नवीन गोष्टी डायनासोरच्याचजवळ घेऊन जातायत, म्हणून सगळ्यांच्या चिंतासुद्धा वाढल्या होत्या. डॉ. विजयंनी घसा खाकरून बोलायला सुरुवात केली; "आम्ही काल डॉ. नायरांना भेटलो आणि सगळं सांगितलं. अवघ्या सत्तावीस वर्षांचा त्यांना या कामाचा अनुभव आहे. त्यांच्या माहितीनुसार रॉबर्ट जेव्हा हा रिसर्च करत होता आणि त्याच्यावर जेव्हा बंधनं आणली, तेव्हा त्याने आणलेली डायनासोरची अंडी जप्त करण्यात आली. त्या अंड्यांची पूर्ण शहानिशा करून अगदी कडेकोट बंदोबस्त करून मगच ती सुरक्षित जागी ठेवण्यात आली आहेत. डॉ. नायर आणि त्या जागेच्या सिनियर लोकांना सोडून कोणालाही याबद्दल माहीत नाही."

"अच्छा. म्हणजे रॉबर्टने खऱ्या अंड्याच्या बदली खोटी अंडी ठेवली असतील याची शक्यताच संपल्यात जमा आहे." सुयश सर म्हणाले.

"हो. त्यांच्या रिपोर्टनुसार ती अंडी काही पुन्हा डायनासोर निर्माण करू शकतील अशी सक्षम नव्हती. रॉबर्टला त्या अंड्यांचा वापर करून त्यातून डायनासोर निर्माण करायचे होते. त्यासाठी आधी खऱ्या डायनासोरच्या काही अंशांची गरज लागणार होती. डॉ. नायर म्हणाले होते की, रॉबर्टने कुठूनतरी याचा बंदोबस्त केल्यात जमा होता, पण त्यासाठी अगदी करोडोमध्ये फंडस् लागणार होते; शिवाय हा प्रयोग यशस्वी होईल याची फक्त चार टक्केच खात्री होती. त्यावरचा सगळा अभ्यास करून, माहिती गोळा करून सगळे डिटल्स सबमिट होईपर्यंत काही हाती लागलं नाही आणि मग या प्रोजेक्टची परवानगीच काढून घेण्यात आली तर फंडस् देण्याचा प्रश्न नव्हता, म्हणून हे प्रकरण तेव्हा मिटलं. जर असे अंश खरंच मिळाले असते आणि तेव्हापासूनच जर या प्रयोगाची सुरुवात झाली असती, तर कदाचित आज आपल्याला डायनासोर दिसले असते. या गोष्टीला तेरा ते पंधरा वर्ष उलटून गेली आहेत आणि हा काळ या प्रयोगासाठी पुरेसा आहे." डॉ. विजयनी सांगितलं.

"ओके. सर, म्हणजे आपण असं धरून चालायचं का? की, हा प्रयोग तेव्हाच थांबला आहे तर डायनासोर आता येणं शक्य नाही?" विक्रमने विचारलं.

"अगदीच असं म्हणता येणार नाही. डॉ. नायर म्हणाले होते की, रॉबर्टने जर त्याच्या निलंबनानंतर काही प्रयत्न केले असतील आणि तेव्हा ते अंश मिळवले असतील तर जगावर खूप मोठ्या संकटाचं सावट आहे." डॉ. विजय म्हणाले.

"हो आणि त्यांनी हेही सांगितलं की, जेव्हा रॉबर्टला कामावरून कमी करण्यात आलं होतं तेव्हा तो त्यांना त्यांच्या बोलण्यात अडकवून या खोट्या वागण्यात त्यांची साथ मागत होता. जेव्हा त्यांनी त्याला पोलिसांची धमकी दिली आणि त्यांचं बोलणं रेकॉर्ड केलेलं होतं ते ऐकवलं तेव्हा तो तिथून निघून गेला आणि पुन्हा आला नाही." अभिषेक म्हणाला.

"म्हणजे? त्याला डॉ. नायरांकडून ती जप्त केलेली अंडी हवी होती का?" सोनालीने विचारलं.

"हो. इन्फॅक्ट रॉबर्ट त्यांना पैश्याचं आमिष दाखवून यात जवळ जवळ ओढायलाच बघत होता. डॉ. नायरांचा या सगळ्याचा अभ्यास आणि अनुभव त्याला खूप कामी आला असता, म्हणून तो त्यांना त्याच्या बाजूने वळवण्याच्या जास्तच प्रयत्नात होता." निनाद म्हणाला.

"असं आहे तर सगळं? हा रॉबर्ट वाटतोय तेवढा साधा नाहीये. नक्कीच त्याने काहीतरी केलं असणारच आहे. फक्त आता तो कुठे हे सगळे काळे धंदे करतोय?, कोणाला हाताशी घेतलं आहे?, कोण त्याला या सगळ्या साठी पैसा पुरवतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा हा प्रोजेक्ट कुठवर आला आहे? हे आपल्याला लवकरात लवकर शोधावं लागणार आहे." सुयश सर म्हणाले.

"हो. बरोबर आहे तुमचं. डॉ. नायरसुद्धा हेच म्हणत होते की, त्याने सगळं काही बंद केलं असल्याची शक्यता फक्त दहा टक्केच आहे. त्याला त्या डायनासोरचं वेडच लागलं होतं. काहीही करून अगदी कोणत्याही किमतीत त्याला त्याचा प्रोजेक्ट यशस्वी करायचा होताच." डॉ. विजय म्हणाले.

"हम्म. त्यात आपल्याला क्लूसुद्धा असाच मिळाला आहे. यावरून तरी आपण डायनासोरच्याच जवळ जातोय." ईशा म्हणाली.

सगळे पुन्हा तो नकाशा बघू लागले. एक एक बारकावे, ती डायनासोरची आकृती, झेंडे सगळं काही निरखून आणि काळजीपूर्वक पाहण्यात सगळे गुंग होते.
*****************************
इथे रॉबर्ट आता काही क्षणांत आपलं स्वप्न साकार होणार म्हणून अगदी तन्मयतेने त्या सेलकडे बघत होता. घड्याळावरसुद्धा त्याचं लक्ष होतंच. कैलास मात्र मनातल्या मनात देवाचा धावा करत होता. आता संपूर्ण पृथ्वीतलावर अस्थैर्य माजणार, म्हणून त्याच्या मनाची सतत घालमेल होत होती. स्वार्थी रॉबर्ट मात्र एकदा सेलकडे आणि एकदा स्वतःच्या घड्याळाकडे बघत होता.

"दहा..... नऊ..... आठ.... सात..... सहा....." त्याने शेवटची दहा सेकंद मोजायला घेतली.

काही क्षणांत दहा सेकंद झाली आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कुठेतरी गायब झाला.

"कैलासऽऽ....." तो खूप मोठ्याने ओरडला.

कैलास तिथेच उभा होता, पण त्याच्या अश्या अचानक ओरडण्यामुळे तो एकदम दचकला आणि मागे टेबलावर त्याचा धक्का लागला.

"का.. का..य झालं सर?" त्याने घाबरत विचारलं.

"वर तोंड करून मलाच विचार काय झालं. हे... हे... सगळं काय आहे? काय केलं आहेस तू? खरं खरं सांग नाहीतर.... नाहीतर....." रॉबर्ट तावातावाने बोलत होता आणि बोलता बोलता त्याने तिथलं एक इंजेक्शन घेतलं.

"या इंजेक्शनचा प्रयोग तुझ्यावर होईल." तो त्याला धमकावत म्हणाला.

"सर पण तुम्ही जो फॉर्म्युला दिला आहे, तुम्ही ज्या सूचना दिल्या आहेत त्यानुसारच मी काम केलं आहे. हे बघा." कैलास कसल्या कसल्या जर्नल्स त्याच्यापुढे करत म्हणाला.

रॉबर्टने रागानेच ते इंजेक्शन टेबलावर आपटलं आणि त्याच्या हातातून जर्नल्स हिसकावून घेऊन सगळं बघू लागला. थोडावेळ हे सगळं बघण्यात गेला आणि रागाने त्या जर्नल आपटून तो डोक्याला हात लावून खुर्चीवर बसला.

"सर...... सगळं बरोबर तर चालू आहे. तुम्ही का एवढं टेंशन घेताय?" कैलासने त्याला शांत झालेलं पाहून विचारलं.

"अरे! काय ठीक चालू आहे? आत्ता पर्यंत याने उठून हा सेल तोडायचा प्रयत्न करायला हवा होता. हा फक्त जागेवर उभा आहे." रॉबर्ट म्हणाला.

"इट्स ओके ना सर. म्हणजे तो अजून शक्ती एकवटण्यासाठी हे करत असेल तर? हा या इंजेक्शनमुळे उभा तरी राहिला आहे." कैलास म्हणाला.

"जाऊदे ते सगळं. मी बघतो काय करायचं. आता आधी माझ्या प्लॅननुसार सगळं करायला हवं. थोडक्यासाठी प्लॅनचा शेवटचा भाग बदलावा लागणार आहे आणि त्याची जबाबदारी तुझी असेल. या एका चुकीमुळे सगळ्या गोष्टींवर पाणी फिरायला नकोय मला. आहे माझ्या डोक्यात यासाठीसुद्धा सोल्युशन. मला वाटलं होतंच की, असं काही घडलं तर बॅकअप प्लॅन लागणार. त्यासाठी तयारी करण्याचीसुद्धा जबाबदारी तुझ्यावरच आहे. मी तुला सगळी तयारी करून देईन, पण माझ्या अपरोक्ष काम तुलाच बघायचं आहे." रॉबर्ट आता बऱ्यापैकी सावरला होता आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याच्या डोळ्यात आग दिसत होती.

लगेच त्याने त्याचा सगळा सविस्तर प्लॅन कैलासला सांगितला. कैलास तो प्लॅन ऐकतानासुद्धा देवाचा धावा करत होता. रॉबर्टची एवढी तयारी, जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती बघून कैलास भारावून गेला होता.

'सर, तुम्ही खूप हुशार आहात. खूप जिद्द आणि चिकाटी आहे तुमच्यात, पण हे सगळं ज्ञान तुम्ही असल्या प्रयोगाला लावण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं असतं तर?' कैलास मनात म्हणाला.

रॉबर्ट कसाही माणूस असला तरी त्याची हुशारी, जिद्द आणि कामासाठी असलेली निष्ठा एकदम उच्चतम होती. फक्त तो या सगळ्याचा वापर काहीतरी वाईट घडवायला करत होता. कैलासने आजवर त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या, त्याला कित्येक गोष्टीत आदर्श मानले होते, पण त्याच्या या चुकीच्या वागणुकीमुळे तो त्याच्या मनातून उतरत चालला होता.

"काय रे? लक्ष आहे ना? मी काय सांगितलं आहे समजलं ना सगळं?" रॉबर्ट म्हणाला.

"हो... हो... सर. तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच होईल सगळं. मी लगेच कामाला लागतो." कैलास म्हणाला.

पुन्हा एकदा रॉबर्टच्या चेहऱ्यावर असुरी आनंद फाकला होता. त्याला त्याच्या या प्लॅनवर पूर्ण विश्वास होता.

क्रमशः........
***************************
सी.आय.डी. टीम तर डायनासोरच्या जवळ पोहचत चालली आहे. त्यांना रॉबर्टबद्दल कधी समजेल? ऋषभने तो सेल तोडण्याचा का प्रयत्न केला नसेल? रॉबर्टने आता काय प्लॅन केला असेल? ऋषभ डायनासोररूपात तर आलाय, आता तो सगळीकडे विध्वंस घडवेल का? तेव्हाच सी.आय.डी.ला माहीत पडणार आहे का? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all