द डी.एन्.ए. (भाग -१५)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -१५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे सी.आय.डी. ब्युरोमध्ये सगळे सुयश सरांची वाट बघत होते. डॉ. विजयसुद्धा आज ब्युरोमध्येच आले होते. डॉ. नायरांनी काल जे काही सांगितलं होतं, ते सगळं टीम सोबत बोलून पुढचा प्लॅन ठरणार होता. विक्रमलासुद्धा त्याच्या खबऱ्याने काय खबर दिली आहे? ती सांगायची होती. विक्रमच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ब्युरोमधलं वातावरण जरा तंगच होतं.

"सर! तुम्ही खूप काळजीत दिसताय, काय झालं?" गणेशने विचारलं.

"काळजीचंच कारण आहे. सर आल्यावर सांगतो." विक्रम म्हणाला आणि कॉम्प्युटरमध्ये डोकं खुपसून काहीतरी शोधू लागला.

सगळे त्याच्या मागे उभे राहून नक्की काय झालंय? म्हणून बघत होते. एवढ्यात सुयश सर आले.

"आज अचानक डी.सी.पी. साहेबांनी बोलवून घेतलं म्हणून उशीर झाला, पण काय रे? सगळे असे का उभे आहात?" सुयश सरांनी आत येता येताच विचारलं.

सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे बघितलं. विक्रम खुर्चीतून उठला आणि समोर येऊन उभा राहिला.

"सर, काल मला पक्की खबर मिळाली आहे देशात काहीतरी मोठं घडणार आहे. बॉम्बस्फोट नसेल याची खात्री आहे. काहीतरी नवीन कुरापत होणार आहे." विक्रमने सांगितलं.

"म्हणजे? सगळं सविस्तर सांग." सुयश सरांनी विचारलं.

"सर, मी काल माझ्या खबऱ्याला जाऊन भेटलो तेव्हा त्याने मला ही चिठ्ठी दिली. हे बघा." विक्रम ती चिठ्ठी सुयश सरांना देत म्हणाला.

त्या चिठ्ठीवर नकाशा काढलेला होता आणि सगळीकडे शत्रू देशाचे झेंडे दाखवले होते बाकी काही लिहिलेलं नव्हतं.

"बघितलं सर? हे काहीतरी नवीन आहे. कारण, माझ्या खबरीची आणि माझी बॉम्बस्फोटाची एक खूण ठरलेली आहे ती यात नाहीये म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे." विक्रम म्हणाला.

"हम्म. या नकाशावर शत्रू देशाचे झेंडे आहेत; म्हणजे त्यांना सगळीकडे स्वतःचं राज्य पसरवायचे आहे हे स्पष्ट होतंय, पण नक्की कशाचा आधार घेऊन? हे आपल्याला शोधावं लागेल." सुयश सर म्हणाले.

बोलता बोलता त्यांनी तो नकाशा स्कॅन करून प्रोजेक्टरवर लावला. सगळेजण आता नकाशा बघून विचार करत होते.

"सर, सायबर हल्ल्याचा तर कट नसेल ना?" सोनाली म्हणाली.

"वाटत तरी नाहीये. सायबर हल्ल्याचा कट असता, तर आपल्या सायबर डिपार्टमेंटला काहीतरी कुणकुण लागली असतीच." विक्रम म्हणाला.

"सर, काहीतरी स्मग्लींग किंवा युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचा काही प्लॅन?" ईशा म्हणाली.

"असू शकतं. आपण कोणतीही शक्यता नाकारू शकत नाही. विक्रम! तुझा खबरी कोणत्या पद्धतीने क्लू देतो हे तुलाच माहीत असेल. तूच सांग असं का केलं असेल त्याने?" सुयश सर म्हणाले.

"सर, तो दरवेळी चित्रातून जे काही सांगायचं असेल ते सांगतो. यावेळीसुद्धा तसंच काहीतरी असेल." विक्रम टेबलावर हात आपटत म्हणाला.

त्यामुळे टेबलावरच असलेल्या प्रोजेक्टरच्या रिमोटवर त्याचा हात पडला आणि त्याचा धक्का झूमच्या बटणाला लागला आणि झेंडे अजून स्पष्ट दिसू लागले. एकदम हाताला रिमोटचा स्पर्श झाल्याने आणि मागे पडद्यावर हालचाल जाणवल्याने एकदम त्याने मागे वळून बघितलं.

"सर! हे बघा, यात काही झेंड्यांचा रंग जरा वेगळ्या शेड मध्ये आहे." विक्रम निरखून बघत म्हणाला.

सगळेच जण आता ते झेंडे नीट बघू लागले. त्यातले काही झेंडे मूळ देशाच्या झेंड्यांपेक्षा जरा वेगळे होते. साध्या डोळ्यांना तर ते सारखे दिसत असले तरी नीट झूम करून बघितल्यावरच त्यातला फरक समजेल असे ते डिझाईन केले होते.

"तुझा खबरी हुशार आहे. कोणालाही पटकन कळणार नाही असा क्लू दिलाय." सुयश सर म्हणाले.

"हो, तो स्वतः डोकं लावून क्लू कसा द्यायचा? हे डिझाईन करतो. रोज जीव मुठीत घेऊन देशाच्या रक्षणासाठी झटत असतो." विक्रम म्हणाला.

"हम्म. देशाला अश्याच देशभक्तांची गरज आहे. या लोकांमुळेच आज आपण आपल्या मातृभूमीवर पडणाऱ्या वाईट नजरांना वेळीच ठेचू शकतोय." सुयश सर म्हणाले.

सी.आय.डी. ऑफीसर तर समोरासमोर शत्रूंना झुंज देत असतात, पण त्यांना वेळोवेळी शत्रूंच्या छुप्या हालचाली हेच खबरी देत असतात. शत्रूंना काहीही न कळू देता त्यांच्याच छावणीत राहून देशासाठी स्वतःला अर्पण करून हे काम करणं म्हणजे रोज डोक्यावर टांगती तलवार घेऊन फिरण्या सारखंच. ऑफिसर्सचा उजवा हात म्हणजेच त्यांचे खबरी. जे काम तर आपल्या देशासाठी करतात, पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा कधी चारचौघात सत्कारसुद्धा केला जात नाही. आजही विक्रमच्या खबरीने दिलेल्या माहितीमुळे सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटला. मनोमन सगळ्यांनीच आपापल्या खबऱ्यांचे आभार मानले आणि पुन्हा कामाला लागले. विक्रम ते वेगळे दिसणारे झेंडे लाल रंगाने तर सारखे दिसणारे झेंडे हिरव्या रंगाने जोडत होता. एक एक झेंडा बघून जोडून दोन रंगात एक आकृती तयार झाली.

"सर! हे तर....." निनाद गोंधळून म्हणाला.

"या केस इंटरकनेक्टेड आहेत. नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन शिजला आहे आणि कोणीतरी देशद्रोही यांना जाऊन मिळाला आहे." सुयश सर म्हणाले.

सगळेच गोंधळलेल्या अवस्थेत त्या प्रोजेक्टरवरची आकृती बघत होते. लाल रंगाने जोडलेले झेंडे अगदी डायनासोरसारखे दिसत होते. आधी फक्त ऋषभच्या अपहरणाची केस आणि नंतर समोर आलेली रोबर्टची केस यात काहीतरी कनेक्शन असावं असं सगळ्यांना वाटत होतं, पण आता त्यांची खात्रीच झाली होती.

"सर, जर आपण असं मानलं की; ऋषभला मुद्दाम कोणीतरी kidnap केलं आहे, कारण डॉ. विद्यावर्धन यांनी या प्रयोगाला मान्यता दिली नाही. पण मुद्दा असा आहे की, आता इतक्या वर्षानंतर त्यांनी ऋषभचं काय केलं असेल? जयश्री मॅडमना तर कोणतेही धमकीचे फोनही येत नाहीत. काय साध्य करायचं असेल या माणसाला?" ईशा म्हणाली.

"तेच तर सगळं कोडं आहे. बरं! डॉ. विजय तुम्ही काल डॉ. नायरांना भेटून आलात ना? काय झालं तिथे?" सुयश सरांनी विचारलं.
*******************************
इथे लॅबमध्ये नवीन केमिकल तयार झालं होतं. रॉबर्टला आता घाई झाली होती ती त्याचं स्वप्न पूर्ण होताना बघण्याची. त्याने या प्रोसेस दरम्यान कैलासला त्याचा प्लॅन समजावून सांगितला होता आणि तो ते केमिकल इंजेक्शनमध्ये भरून घेत होता.

"कैलास, मी जे सांगितलं आहे ते तंतोतंत पाळलं गेलंच पाहिजे. जराही तू तुझं डोकं चालवून या प्लॅनच्या बाहेर जाऊन केलंस तर तुझं काही खरं नाही." रॉबर्ट जवळ जवळ त्याला धमकी देत म्हणाला.

"हो सर. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या प्लॅननुसारच सगळं होईल. आपला हा एवढा मोठा प्रोजेक्ट आता यशस्वी झालाच आहे यात कोणतीही बाधा येणार नाही." कैलास म्हणाला.

"आपला नाहीऽ माझाऽ.... माझाऽ प्रोजेक्ट आहे हा. तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर." रॉबर्ट जरा रागावून म्हणाला.

कैलास फक्त खाली मान घालून उभा होता, पण त्याच्या मनातून मात्र त्याला खूप आनंद होत होता. इतकी वर्ष जे आपण सोसलं आहे ते आता थांबणार आणि काहीतरी हालचाल करता येणार म्हणून त्याला आनंद होत होता. रॉबर्ट त्याच्यावर असा सहजासहजी विश्वास ठेवणार नाही आणि यातही तो त्याच्या प्लॅनप्रमाणे वागतोय ना? हे बघण्यासाठी काहीतरी नक्कीच करणार याची त्याला खात्री होतीच आणि म्हणूनच त्याच्या डोक्यात रॉबर्टच्या डोळ्यात कशी धूळ फेकता येईल? याचे विचार चालले होते. तो त्याच्याच विचारात उभा होता.

"कैलासऽ कैलासऽ" रॉबर्ट जवळ जवळ ओरडला.

"काय सर?" कैलास एकदम भानावर येत म्हणाला.

"अरे लक्ष कुठे आहे? सेलचा रिमोट दे. जरा आता कामावर लक्ष द्या." रॉबर्ट तणतणत म्हणाला.

कैलासने काहीही न बोलता त्याच्या हातात सेलचा रिमोट दिला. रॉबर्ट ते इंजेक्शन घेऊन सेलजवळ गेला. जाडी सुई आणि तशीच मोठी सीरिंज असलेलं ते इंजेक्शन डायनासोरच्याच कातडीसाठी बनवलं आहे असं वाटत होतं. कैलास हे सगळं तिथेच उभं राहून बघत होता. त्याच्या डोळ्यासमोर लहानपणीचा ऋषभ येत होता. त्याची आत्ताची अवस्था आणि हे इंजेक्शन बघून तर त्याच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं.

"सर, हे एवढं मोठं इंजेक्शन? त्यापेक्षा लहान इंजेक्शनमधून एक आठवडा डोस देत राहिलो तरी काम होईलच ना?" कैलासने न राहून शेवटी विचारलंच.

"अजिबात नाही. अरे मुर्खा तुला काही कळतंय का? ही बातमी आधीच बाहेर गेली आहे. जर आपण आता घाई केली नाही ना, तर माझी तेरा वर्षांची मेहनत वाया जाईल ती वेगळी, पण आजवर जो मी त्या लोकांचा विश्वास संपादन केला आहे ना तोही जाईल." रॉबर्ट रागाच्या भरात बोलून गेला.

कैलास काही बोलायला जाणार एवढ्यात रॉबर्टने त्याला हातानेच थांबवलं आणि बोलू लागला; "तू माझा असिस्टंट आहेस आणि असिस्टंटच राहणार. जास्त डोकं चालवून उगाच मलाच अक्कल शिकवायला जायचं नाही. नाहीतर.... नाहीतर पुढच्या प्रयोगाच्यावेळी या ऋषभच्या जागी तू असशील."

कैलास फक्त "सॉरी सर" एवढंच म्हणाला आणि गप्प उभा राहिला.

'देवा! या माणसाची विकृती तर वाढत चालली आहे. तूच आता काहीतरी मार्ग दाखव मला.' कैलास मनात म्हणाला.

तोवर रॉबर्टचं त्या सेलमध्ये इंजेक्शन टाकून ऋषभला ते देऊनही झालं होतं.

"कैलास, चल आता बी क्विक. आता तुझी वेळ सुरू होतेय. पटापट सगळ्या हालचाली झाल्या पाहिजेत." रॉबर्ट सेलकडे बघतच म्हणाला.

क्रमशः......
*****************************
कैलासला रॉबर्टने कोणता प्लॅन सांगितला असेल? विक्रमच्या खबरीने डायनासोरची आकृती दिली आहे त्याचा क्लू लक्षात घेऊन सी.आय.डी. टीम रॉबर्टपर्यंत पोहोचू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all