द डी.एन्.ए. (भाग -१४)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -१४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलास मात्र इथे लॅबमध्ये मन लावून काम करण्यातच व्यग्र होता. रॉबर्ट यायच्या आधी त्याला बरीच माहिती आणि बाकी तयारी करायची होती. का? कोणास ठाऊक? पण त्याला मनातून वाटत होतं; 'रॉबर्ट संध्याकाळ ऐवजी दुपारी किंवा सकाळीच इथे येणार', म्हणून त्याने अजूनच पटापट कामं करायचं मनावर घेतलं. रॉबर्टच्या जर्नलचा वापर करून कैलास काहीतरी लिहीत होता.

'आता बघच रॉबर्ट, या फॉर्म्युल्यामध्ये असा बदल करतो; की पुढच्या प्रोसेसला कमी वेळ नाही, तर जास्तीत जास्त वेळ लागेल.' कैलास स्वतःशीच म्हणाला आणि केमिकलमध्ये असणारे ऋषभचे सँपल तपासू लागला.

बराच वेळ यात गेला आणि अथक प्रयत्नातून कैलासला फॉर्म्युला बदलणं शक्य झालं. त्याने लगेचच त्या फॉर्म्युल्यानुसार केमिकल बनवायला घेतलं. आता फक्त रॉबर्ट जे केमिकल सोबत आणेल त्यावर प्रक्रिया केली, की हा शेवटच्या टप्प्यात असलेला फॉर्म्युलासुद्धा तयारच होता.

'देवा! खरंच खूप खूप आभार. तू दिलेल्या बळामुळे हे शक्य झालं आहे. रॉबर्ट तर "ही बातमी बाहेर गेली आहे" असं म्हणत होता, आता हे कसं घडलं? हे तुलाच माहीत, पण लवकरात लवकर आता हे प्रकरण संपावं असं वाटतंय. तुझ्या कृपेने अजून तरी मी इथे तग धरून आहे, पण आता हे सगळं कुठेतरी थांबावं वाटतंय. जे जे उचित घडवून आणायचे असेल ते तू आणशील याची मला खात्री आहेच; फक्त आता मला अजून शक्ती दे. काहीही झालं तरीही तुझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस.' कैलासने तो फॉर्म्युला लिहिलेला कागद देवासमोर ठेवून प्रार्थना केली.

या सगळ्यात बराच उशीर तर झालाच होता आणि आता त्याला खूप शांतसुद्धा वाटत होतं. जवळ जवळ मध्यरात्र सरून पहाट होत आली होती. त्याला असं वाटत होतं; 'जणू सकाळच्या पहिल्या सूर्याच्या किरणाने पुन्हा नवीन उमेद येणार आहे, एक नवचैतन्य सगळीकडे संचार करणार आहे, नक्कीच काहीतरी छान होणार आहे, तो ज्या क्षणाची वाट बघतोय तो येणार आहे.' या विचारांनीच त्याचं मन प्रसन्न झालं होतं. इतकावेळ अचानक गेलेली त्याची मनःशांती पुन्हा आली होती. कैलासने एकदा त्या सेलकडे पाहिलं. डायनासोररुपी ऋषभ एका कोपऱ्यात डोळे मिटून झोपला होता. आता मात्र त्याच्या शेपटीची हालचाल होत होती, पण कैलासला विश्वास होता सगळं काही ठीक होणारच आहे. त्याने एकदा सेलजवळ जाऊन त्या काचेवरून हात फिरवला आणि तोही सगळं देवावर सोडून निश्चिंत मनाने झोपला. त्याच्या हातात मोजके काहीच तास आराम होता. दिवसभर केलेली दगदग आणि सतत केलेले काम यामुळे लगेचच त्याचा डोळा लागला.

'असं झोपून कसं चालेल? उठ. माहिती बाहेर पोहोचली असली तरी पूर्ण सत्य कोणालाही माहित नसेल. काहीतरी विचार कर, उठ.' कैलासने स्वतःलाच स्वप्नात पाहिलं आणि तो खाडकन् उठून बसला.

'साडे पाच? चला, आता उठलंच पाहिजे.' कैलासने घड्याळ बघितलं आणि तो उठला.

त्याची रोजची दिनचर्या आवरून तो सेलजवळ आला. ऋषभ शेपटीची हालचाल करत होताच; पण आता त्याचा प्रयत्न हातापायाची हालचाल करण्यासाठी चालू होता, पण तेवढी ताकद त्याच्यात नव्हती. आज त्याची त्वचा अजूनच जास्त राठ वाटत होती. त्याच्या त्वचेवर असलेल्या खवल्यांची आणि पिसांची वाढ पूर्ण झाली होती. कैलासने ते सगळं दृश्य बघितलं आणि तो त्या अंडी ठेवलेल्या बास्केटजवळ गेला.

'कालपेक्षा ही अंडी जरा मोठी वाटतायत. नक्की काय भानगड आहे?' तो स्वतःशीच म्हणाला.

कदाचित 'आपल्याला असं वाटत असेल' असा विचार करून त्याने आधी खात्री करण्यासाठी रॉबर्टच्या ड्रॉवरमधून त्याचं एक पुस्तक बाहेर काढलं आणि ते तो बघू लागला. एवढ्यात त्याला कसलातरी आवाज आला म्हणून त्याने पटकन ते पुस्तक जागीच ठेवलं आणि तो त्याच्या डेस्कजवळ आला. त्याचा संशय खरा ठरला होता. रॉबर्टच आला होता.

"गुड मॉर्निंग सर. सर, तुम्ही सकाळीच? म्हणजे संध्याकाळी येणार होतात ना?" कैलासने जरा अडखळत विचारलं.

"का? तुला काही प्रॉब्लेम? माझी लॅब आहे येईन मी कधीही." रॉबर्ट जरा तणतणत म्हणाला.

नक्कीच याला ही बातमी बाहेर गेली आहे यामुळे प्रेशर आलं आहे हे कैलासने ओळखलं आणि तो काहीही न बोलता मुद्दाम खाली मान घालून उभा राहिला.

"चल. आपल्याला आज खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. फॉर्म्युला दे." रॉबर्ट म्हणाला.

"सर, त्या फॉर्म्युल्यानुसार केमिकल तयार आहे; फक्त तुम्ही जे केमिकल आणलं आहे त्यावर प्रोसेसिंग केलं, की काम झालंच." कैलास म्हणाला.

"फर्स्ट आय वॉन्ट फॉर्म्युला. मला आता कोणत्याही चुका झालेल्या चालणार नाहीयेत. या शेवटच्या टप्प्यात जर काही चूक झाली, तर हातातोंडाशी आलेला घास जायला वेळ लागणार नाही." रॉबर्ट म्हणाला.

आता कैलासकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याने काल जो फॉर्म्युला बनवला होता तो त्याला दिला. रॉबर्ट एकदम नीट सगळं बघू लागला. त्याच्या इतक्या चिकित्सक नजरेने बघण्यामुळे कैलास विचारात पडला; 'जर याला खरं समजलं तर काहीही खैर नाही. देवा काहीतरी कर, पण याने सगळं पडताळून नको बघायला.' तो मनात म्हणत होता.

रॉबर्टने थोडावेळ काहीतरी बघितलं आणि तो फॉर्म्युला घेऊन त्याच्या डेस्कजवळ गेला.

"सर, काय झालं? काही चुकलं आहे का?" कैलासने मुद्दाम विचारलं.

"हे खूप महत्त्वाचं काम आहे, मला बघू दे कीप सायलेन्स." रॉबर्ट त्याच्याकडे जरा रागाने बघत म्हणाला.

'उगाच आपणच काहीतरी बोलून स्वतःला अडकवून घेण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं.' असा विचार करून तो शांत बसला. एवढ्यात रॉबर्टचा फोन वाजला. टेबलावरच फोन होता त्यामुळे कैलासने देखील बघितलं. मोबाईल वर इंटरनॅशनल नंबर फ्लॅश होताना दिसत होता, पण रॉबर्टने लगेचच फोन घेतल्यामुळे त्याला जास्त वेळ मिळाला नाही.

"हॅलो. येस येस, ऑल वर्क इज ऑलमोस्ट डन. टुडे इज द बिग डे फॉर अस." रॉबर्ट जरा गर्वाने म्हणाला.

त्याचं फोनवरचं एकंदरीत बोलणं ऐकून समोरून ज्यांनी कोणी फोन केला आहे, त्यांनासुद्धा हे काम लवकरात लवकर झालेलं हवंय हे लक्षात येत होतं. कैलासला आता खात्री पटत चालली होती, हा नक्कीच शत्रू देशाशी हातमिळवणी करून आला आहे. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती, पण या चार भिंतींच्याआत तो काहीही करू शकत नव्हता. रॉबर्टचं फोनवरचं बोलणं झालं आणि अचानक त्याने त्याची जर्नल, पुस्तकं सगळं तिथेच ठेवून, तो फॉर्म्युला घेऊन सरळ केमिकल प्रोसेससाठी वळला.

"कैलास! जा तिथे माझी स्पेशल लहान बॅग आहे ती घेऊन ये." रॉबर्ट म्हणाला.

रॉबर्टने आल्या आल्या ती बॅग बाहेर ठेवली होती ती कैलासने आत आणून त्याला दिली. पासवर्ड टाकून त्याने ती बॅग उघडली. स्पेशल केमिकल्स ने - आण करण्यासाठी ती बॅग डिझाईन केली होती. स्लॉट असलेल्या त्या बॅगेत तीन केमिकलच्या लहान बाटल्या आणि एक सिरींज बसेल एवढी जागा होती. रॉबर्टने ते सगळं बाहेर काढलं.

"केमिकल प्रोसेसची सगळी तयारी कर." तो कैलासला म्हणाला आणि स्वतः सेलजवळ गेला.

कैलास सगळी तयारी करत असतानासुद्धा त्याचं लक्ष रॉबर्टवर होतं. सेलजवळ उभ्या असलेल्या रॉबर्टच्या चेहऱ्यावर एक वेगळंच छद्मी हास्य होतं आणि जणू आता त्याने संपूर्ण जगावर ताबा मिळवला आहे, असे भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते.

"बी क्विक." रॉबर्ट म्हणाला.

"येसऽ येसऽ सर." कैलास म्हणाला आणि सगळी तयारी करून रॉबर्टला बोलावलं.

"तू काल बनवलेलं केमिकल दे." रॉबर्टने हात पुढे करून त्याच्याकडे केमिकल मागितलं.

कैलासने मनातच प्रार्थना करून त्याला ते केमिकल दिलं आणि रॉबर्टने एका परीक्षानळीत ड्रोपरच्या साहाय्याने मोजून थोडं केमिकल घातलं आणि आज आणलेलं केमिकल त्यात मिक्स करून बर्नरवर ठेवलं. कैलास मात्र आता सारखं सेलकडे बघत होता. नक्की हा रॉबर्ट करणार काय आहे? याचा अंदाज त्याला येत नव्हता. रॉबर्टची बरीच घाई गडबड चालू होती. तो कैलासला जे काही मागत होता ते तो अगदी यंत्रवत त्याला देत होता.

"कैलास! ते अंड्याचं बास्केट घेऊन ये." रॉबर्ट म्हणाला.

"अं?" कैलासने एकदम गोंधळून त्याच्याकडे बघितलं.

"अरेऽऽ ते बास्केट आण." रॉबर्ट पुन्हा म्हणाला.

कैलासने त्या बास्केटला असलेलं प्लग काढून ते बास्केट त्याला नेऊन दिलं.

"सर, ही अंडी? म्हणजे तुम्ही गेलात तेव्हा आकार लहान वाटत होता आणि आता जरा मोठी दिसतायत. शिवाय त्या बास्केटला हे प्लग का होतं?" कैलासने विचारलं.

"हासुद्धा माझ्या प्रोजेक्टचा भाग आहे. कळेल तुला लवकरच." रॉबर्ट म्हणाला.

या सगळ्या कामाच्या गडबडीत सकाळचे दहा वाजले होते. त्या लहान खिडकीतून कैलासचा नाश्ता आणि गोळ्या आल्या.

"चल, आधी खाऊन घेऊ. तोवर सगळी प्रोसेस होईलच." रॉबर्ट म्हणाला.

आज एक एक्स्ट्रा पार्सल त्याने मागवलं होतं. दोघांनी चहा, नाश्ता केला आणि थोडयावेळात कैलासने त्याच्या गोळ्यासुद्धा घेतल्या.

"कैलास, तू गोळ्यांचा एकही डोस चुकवला नाहीये ना?" रॉबर्टने विचारलं.

"नाही सर." कैलास एकदम निर्विकार स्वरात म्हणाला.

"गुड. आता सगळी जबाबदारी तुझी असेल. मी एक प्लॅन केला आहे, ज्यामुळे हे प्रकरण निवळेल आणि माझ्यावर काहीही शेकणार नाही." रॉबर्ट म्हणाला.

'आता पुन्हा याच्या तिरसट डोक्यात काय चालू झालं?' म्हणून कैलास विचारात पडला.

क्रमशः....
****************************
रॉबर्टने तर लगेचच हालचाली सुरू केल्या आहेत. कैलास हे सगळं कसं थांबवू शकेल? विक्रमला त्याच्या खबऱ्याकडून बरोबर माहिती मिळाली असेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all