द डी.एन्.ए. (भाग -१३)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -१३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये सगळ्यांचे चेहरे जरा तणाव आल्यासारखे झाले होते. डॉ. विजयनी हे ओळखलं होतं.

"काय रे? आज सगळ्यांना काय झालंय? सगळे का तोंड पाडून बसला आहात? आरशात बघा, एकेकाची तोंडं भूत बघितल्यासारखी झाली आहेत." डॉ. विजय मुद्दाम जरा मस्करी करत म्हणाले.

"काय सर? भूत नाही बघितलं, पण आता बहुतेक डायनासोर नक्की दिसणार आहे असं वाटतंय." विक्रम म्हणाला.

"सकाळ पासून कोणी मिळालं नाही का? काहीही काय?" डॉ. विजय हसण्यावारी नेत म्हणाले.

"नाहीऽऽ विक्रम खरं बोलतोय." सुयश सर त्यांच्या केबिनमधून बाहेर येत म्हणाले.

आता डॉ. विजयसुद्धा गंभीर होऊन सगळं ऐकत होते. निनाद आणि सोनालीने डॉ. शहांनी जी माहिती त्यांना दिली होती, ती डॉ. विजयना सांगितली.

"असं आहे तर सगळं? म्हणजे काही वर्षांपूर्वी मीही ऐकलं होतं असा काहीतरी प्रयोग होणार आहे, पण हा कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नव्हतं. कालांतराने मग याच्या काही बातम्या आल्या नाहीत." डॉ. विजय म्हणाले.

"हम्म. याचबद्दल माहिती विचारायला तुम्हाला इथे बोलावलं आहे. म्हणजे आजची परिस्थिती बघता या काळात डायनासोर येणं शक्य आहे का?" सुयश सरांनी विचारलं.

"या काळात डायनासोर निर्माण करणं तसं खूपच कठीण आहे, पण अशक्य नाहीये. जर असा प्रयोग एवढ्या वर्षांपूर्वी नाकारला गेला असूनसुद्धा कोणीतरी जर तेव्हापासून यावर काम करत असेल, तर हे येत्या काही काळात शक्य होईल. आजची परिस्थिती बघता डायनासोर जर पुन्हा आले तर सगळा विध्वंस हा होणारच आहे." डॉ. विजय म्हणाले.

"ओके. त्यासाठी मूळ डायनासोरचे काही अंश तर लागतील ना पण?" विक्रमने विचारलं.

"हो. आणि ते अंश असे सहजासहजी मिळणं तर शक्यच नाहीये." डॉ. विजय म्हणाले.

"पण सर डॉ. शहा आम्हाला म्हणाले होते की, रॉबर्टने कुठूनतरी डायनासोरची अंडी आणली होती. त्यातूनच काही घडलं असेल तर?" सोनालीने विचारलं.

"होऊ शकलं असतं, पण जेव्हाही कोणताही प्रोजेक्ट सुरक्षेच्या कारणास्तव नाकारला जातो तेव्हा त्यासाठी जे काही साहित्य वापरलं जात असतं तेही काढून घेतलं जातं. त्यामुळे ती अंडीसुद्धा नक्कीच जिथे डायनासोरचे सांगाडे आणि इतर गोष्टी ठेवल्या जातात त्या म्युझियममध्ये ठेवली गेली असतील. राहता राहिला प्रश्न त्यांनी हे सगळं व्हायच्या आधीच काही केलं असेल तर? तर, त्यांच्या एकूण प्रयोगाचा काळ बघता मला तर हे शक्य वाटत नाहीये. तरीही आपण तज्ज्ञांना जाऊन भेटूया." डॉ. विजय म्हणाले.

"ठीक आहे. अभिषेक, निनाद तुम्ही दोघं डॉ. विजय सोबत जाऊन या आणि तसंही तुम्हाला परत यायला उशीर होईल तर घरीच जा. उद्या आपण यावर डिटेल बोलूया." सुयश सर म्हणाले.

लगेचच तिघे त्यांच्या कामाला लागले. डॉ. विजयनी फोन करून बायोलॉजी एक्स्पर्ट डॉ. नायर यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आणि ते तिथेच जायला निघाले. बाकी सगळे त्यांचं काम करत होते. आज बऱ्याच उशिरापर्यंत सगळ्यांचं काम चालू होतं. जवळ जवळ रात्र झालीच होती. विक्रमला आता त्याच्या खबऱ्याला भेटायला जायचं होतं, म्हणून तो त्याच्याच विचारात काम करत होता. त्याने मनात काहीतरी विचार केला आणि ईशासोबत बोलायला म्हणून तिच्या डेस्क जवळ गेला. पण तोवर सोनाली दुसरीकडून येत होती.

"इशूऽऽ घरी जायला..." सोनाली तिथून तिला हाक मारत आली, पण विक्रमला बघून काहीही न बोलता तिथेच उभी राहिली.

"तुम्ही दोघी घरी निघालात का? कॅरी ऑन. मी जातोच आहे." विक्रम म्हणाला.

सोनालीने मनातच काहीतरी विचार केला आणि कपाळ खाजवून म्हणाली; "नाऽही. नाही सर. मी तिला तेच सांगायला आले होते, मला आज जरा दुसरीकडे काम आहे तर मी निघते."

"ओह! ठीक आहे तू जा. मी सोडतो तिला घरी." विक्रम म्हणाला.

सोनालीने फक्त ईशाकडे बघितलं आणि हळूच डोळा मारून तिथून गेली. विक्रमचं याकडे लक्ष नव्हतं.

"सरऽ मी जाईन. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? तुम्हाला वाट वाकडी करून यावं लागेल." ईशा म्हणाली.

"चालतं गं! तुला काही हरकत नसेल, तर आधी कॉफी घेऊया?" विक्रमने विचारलं.

"ओके सर." ईशा म्हणाली.

सगळेच आता घरी जायला निघाले. विक्रम आणि ईशा त्याच्या बाईक वरून गोल्डन कॅफेमध्ये जायला निघाले. वाटेत दोघं छान गप्पा मारता मारता जात होते. दोघं गोल्डन कॅफेजवळ पोहोचले.

"सर, तुमची हरकत नसेल तर आपण कॉफी ऐवजी त्या लहान ढाब्यावर जेवून घेऊया का? तसंही उशीर झाला आहे आणि एका लहान व्यापाऱ्याला तेवढाच हातभार." ईशा म्हणाली.

"हो चालेल ना. चल." विक्रम म्हणाला.

दोघं कॅफेसमोर असलेल्या लहान ढाब्यावर गेले. एक वृद्ध जोडपं तो ढाबा चालवत होते. जेवणाची ऑर्डर देऊन दोघं तिथे असलेल्या बाकावर बसले. चार बाक आणि दोन टेबल मांडून अगदी छोटेखानी ढाबा तयार केलेला होता. लहान असला तरी अगदी स्वच्छ आणि छान लाईट लावून सजवलेला होता तो. बाजूलाच असलेल्या रातराणीचा सुगंध संपूर्ण परिसरात पसरला होता आणि त्यामुळे अजूनच वातावरण आल्हाददायक झालं होतं. रात्रीची वेळ असूनही, एवढं काम करून थकलेलं मन इथे येऊन प्रसन्न झालं होतं. दोघं तिथल्या एवढ्या छान वातावरणात हरवून गेले होते एवढ्यात त्यांची ऑर्डर आली आणि बोलता बोलता दोघं जेवू लागले.

"अहाहा! किती छान आहे." विक्रम पहिला घास तोंडात टाकून म्हणाला.

"हो. खूपच छान चव आहे ना?" ईशासुद्धा म्हणाली.

चुलीवर केलेली भाकरी, वांग्याचे भरीत आणि कढी, खिचडी असं एकदम गावरान जेवण दोघांनी मस्त ताव मारून खाल्लं. एवढ्यात ईशाचा फोन वाजला.

"सर एक मिनिट हा. सोनालीचा फोन आहे. काही काम असेल तर?" ईशा फोन बघून म्हणाली.

"येस येस... घे ना." विक्रम म्हणाला.

"हॅलो, काय गं? एवढ्या उशिरा का फोन केलास? काय झालं?" ईशाने काळजीने विचारलं.

"आजच मस्त संधी आहे तू सरांशी बोल हेच सांगायला फोन केला." सोनाली म्हणाली.

हे ऐकून ईशाला ठसकाच लागला. विक्रमने तिला पाणी दिलं.

"थँक्यू सर. मी ठीक आहे." ईशा म्हणाली आणि ती "हॅलोऽऽ हॅलोऽऽ" करत जरा बाजूला आली.

"गप ना जरा. काहीही काय? बघू नंतर." ईशा म्हणाली आणि फोन कट करतच होती, की सोनाली काहीतरी बोलल्याचा आवाज तिला आला.

"आधी ऐकून घे. मी, तुम्ही दोघं ज्या ढाब्यावर आला आहात ना? त्याच्या मागच्या बाजूलाच आहे. जरा वळून बघ. मी येऊ का तुला मदत करायला?" सोनाली तिला चिडवत आणि हात दाखवत म्हणाली.

"ए तू? तू काय करतेय इथे? अगं प्लीज काही करू नकोस. मला अजून थोडा वेळ हवा आहे." ईशा दबक्या आवाजात म्हणाली.

"ठीक आहे चील, नाही येत मी तिथे. पण तू सरांशी बोलायचं आहेस." सोनाली म्हणाली.

ईशाने वेळ मारून न्यायला "हो.. हो" केलं आणि फोन ठेवला. ती पुन्हा विक्रमजवळ आली आणि सोनाली पुन्हा कुठे दिसतेय? हे बघत होती.

"काय गं? काय झालं? लक्ष कुठेय?" विक्रमने तिला अस्वस्थ बघून विचारलं.

"नाही. काही नाही. चला जेवण संपवूया." ईशा म्हणाली.

तिचं लक्ष सोनालीवर होतं. एवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला;

"नको टेंशन घेऊ. मी निघाले आहे. मस्त एन्जॉय करा." सोनालीचा मेसेज होता.

तो मेसेज वाचून ईशाला जरा बरं वाटलं आणि ती स्वतःशीच हसत होती.

"चला निघूया?" विक्रमने विचारलं, तशी ती भानावर आली.

"हो सर! चला." ईशा म्हणाली.

दोघं तिथून निघाले आणि थोडं अंतर पुढे गेल्यावर विक्रमने एका झाडाजवळ गाडी थांबवली.

"सर आपण इथे का थांबलो आहोत?" ईशाने विचारलं.

"ते बघ तिकडे. चल मटका कुल्फी खाऊनच जाऊया." विक्रम म्हणाला.

दोघं त्या कुल्फीवाल्याजवळ गेले. बराच उशीर झालेला तरीही त्याच्याकडे चार - पाच गिऱ्हाईकं होती.

"बोलो साहब, आपको और मॅडमजी को कौनसा फ्लेवर चाहिए?" त्याने विचारलं.

"स्पेशल कुल्फी देना. अगर पसंद आ गयी, तो सभी को तुम्हारी कुल्फी की खबर देंगे." विक्रम म्हणाला.

त्या कुल्फिवाल्याला जे समजायचं ते समजलं. त्याने लगेच दोन स्पेशल कुल्फी काढून त्याच्या हातात दिल्या. विक्रमने लगेच त्याला पैसे दिले आणि दोघं तिथून निघाले. बाईक जवळ येऊन दोघं कुल्फी खाऊ लागले.

"सर तुम्ही त्या कुल्फीवाल्याला जास्त पैसे दिले. म्हणजे जुन्या पन्नासच्या नोटीत बहुतेक पाचशेची नोट दुमडलेली होती. का? कोणी वेगळा माणूस होता का तो?" ईशाने विचारलं.

"हो! तुझं निरीक्षण एकदम बारीक आहे हा पण. मी त्याला याचे पैसे दिले." विक्रम कुल्फीमधून एक लहान पिशवी काढत म्हणाला.

"अच्छा." ईशा म्हणाली.

विक्रमने ती पिशवी रुमालात गुंडाळून खिशात ठेवली आणि दोघं कुल्फी संपवून निघाले. ईशासोबत वेळ घालवून त्यालाही खूप आनंद झाला होता आणि ईशालासुद्धा. पण कोणीही काहीही बोलत नव्हतं. एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते. विक्रमने ईशाला घरी सोडलं आणि तोही त्याच्या घरी निघून गेला.

क्रमशः......
***************************
विक्रमच्या खबऱ्याने काय खबर दिली असेल? सी.आय.डी.ला आता रॉबर्टच सत्य समजणार आहे का? पाहूया पुढच्या भागात. तोवर आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all