द डी.एन्.ए. (भाग -१२)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -१२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये कामाला आता चांगलीच गती आली होती. विक्रमला त्याच्या खबरीचा फोन आला होता, त्याबद्दलच तो सुयश सरांना सांगायला त्यांच्या केबिनमध्ये गेला होता. ऋषभच्या मित्राची खबर काढता काढता त्याला काहीतरी वेगळीच खबर हाती लागली होती, म्हणून खरंतर बाहेर काहीही न बोलता सरळ तो सुयश सरांशीच जाऊन बोलत होता.

"सर! आत्ताच खबरीचा फोन आला होता, पण आपल्याला जी माहिती हवी होती त्यापेक्षा काहीतरी वेगळंच हाती आलंय." विक्रम म्हणाला.

"म्हणजे? असं कोड्यात नको बोलूस." सुयश सरांनी सांगितलं.

"सर म्हणजे त्याला मी ऋषभच्या मित्राबद्दल माहिती शोधायला सांगितली होती, पण ती शोधता शोधता त्याच्या असं लक्षात आलंय की काहीतरी मोठं कारस्थान देशाच्याविरोधात रचलं जातंय. नक्की काय? आणि कधी? काय घडणार आहे? याची अजून माहिती तो काढतोय; पण आपल्याला सावधानतेचा इशारा दिला आहे." विक्रमने सांगितलं.

"बातमी कन्फर्म आहे का?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर! याच्या बातम्या एक टक्कासुद्धा खोट्या निघत नाहीत. तो आजवर माझा खबरी आहे हे अंडरवर्ल्डला माहीत नाहीये. तो त्यांच्यात त्यांच्यातलाच एक माणूस म्हणून वावरतो आणि डाव फिस्कटला, की मोठ्या शिताफीने दुसऱ्यालाच यात अडकवून अजून त्या लोकांचा विश्वास संपादन करून घेतो. मला पूर्ण खात्री आहे सर त्याच्या बातमीवर." विक्रम आत्मविश्वासाने म्हणाला.

"ठीक आहे. तू बघ तो काय सांगतोय. त्यावर मग आपण पुढे काय करायचं? हे बघू. या बातमी बरोबरच त्याला ऋषभच्या मित्राबद्दलसुद्धा माहिती काढायला सांग. मला आतून वाटतंय या केस कनेक्टेड असणार आहेत. आपल्याला जी माहिती हाती लागली आहे त्यात सतत एक प्रोजेक्ट; जो सुरक्षेच्या कारणास्तव नाकारला गेला आहे त्याबद्दल जास्त समजतंय. मला यातच काहीतरी गोम वाटतेय." सुयश सरांनी त्यांचा संशय बोलून दाखवला.

"हो सर. मलाही जरा जरा तसंच वाटायला लागलं आहे. बघूया, आज मी रात्री त्या खबऱ्याला भेटायला जाणार आहे समजेल तेव्हा." विक्रम म्हणाला.

"ओके. बरं एक सांगायचं राहिलं. मी डॉ. विजयना इथे बोलावून घेतलं आहे त्यांच्याकडून आपल्याला जरा डायनासोरबद्दल माहिती घेता येईल. ते येतच असतील." सुयश सर म्हणाले.

"ओके सर. मी निनाद आणि सोनालीला सांगून ठेवतो. ते दोघं लॅबमध्ये गेले होते तर त्यांना व्यवस्थित डॉ. विजयना सगळी केस सांगून माहिती घेता येईल." विक्रम म्हणाला.

"हम्म. मीही येतोच आहे." सुयश सर म्हणाले.

विक्रम त्यांच्या केबिनमधून बाहेर आला आणि सगळ्यांना डॉ. विजय येतायत हे सांगितलं.

"निनाद, सोनाली! तुम्ही दोघं लॅबमध्ये गेला होतात तर डॉ. विजयना सगळं काही नीट सांगा. म्हणजे तिथे डॉ. शहा जे काही बोलले ते सगळं त्यांना सांगा." विक्रम म्हणाला.

"येस सर!" सोनाली आणि निनाद म्हणाले.

सगळे पुन्हा त्यांच्या कामाला लागले होते. थोड्याच वेळात तिथे डॉ. विजय आले.
***************************
इथे रॉबर्टने तयार केलेल्या लॅबमध्ये कैलास त्या अंड्याच्या बास्केटजवळच निरीक्षण करत होता. सगळं बास्केट बघून झाल्यावरही त्याच्या हाती काहीच लागलं नाही, म्हणून रागानेच त्याने ते बास्केट धरलं.

'शी! एवढं होऊनही काहीही हाती लागत नाहीये.' तो रागातच म्हणाला आणि हात मागे घेणार एवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी जाणवलं. काहीतरी खडबडीत हाताला लागलं, म्हणून त्याने पुन्हा ते बास्केट हातात घेतलं आणि बघू लागला. 


'ओह! असं आहे तर सगळं? म्हणजे इथून हा रॉबर्ट फंडस् आणतोय? यांच्या जीवावर उडतोय?' कैलास स्वतःशीच म्हणाला. 


त्याला त्या बास्केटवर एक क्लू मिळाला तर होता, पण अजून त्याची पूर्ण खात्री नव्हती. 'कदाचित फक्त ते बास्केट तिथलं असेल आणि दुसरीकडूनच त्याला फंडस् मिळत असतील तर?' असा विचारही त्याच्या मनाला शिवून गेला. 'काहीही हाती न लागण्यापेक्षा आत्ता हेच सत्य असावं असं मानून चालावं' असा विचार करून कैलास अजून काही मिळतंय का? हे बघू लागला. थोडावेळ शोधात गेला असेल एवढ्यात त्याचा फोन वाजला. 


'आत्ता मगाशीच तर फोन आला होता. आता पुन्हा काय आहे या रॉबर्टच?' तो जरा तणतणत म्हणाला.


त्याच्या डेस्कजवळ जाऊन त्याने रागातच फोन उचलला. तो काही बोलणार एवढ्यात समोरून रॉबर्टनेच बोलायला सुरुवात केली; "एक खबर लागली आहे, आपल्या प्रयोगाबद्दल बाहेर समजलं असल्याची शक्यता आहे; तर खूप सावधपणे आपल्याला पुढच्या हालचाली करायच्या आहेत आणि आता आधीपेक्षा खूप कमी वेळ आपल्या हातात आहे तर लवकर सगळं काम झालं पाहिजे."

"ओके सर. मी फॉर्मुल्यामध्ये काही बदल करून लवकर करायचा प्रयत्न करतो, पण ही बातमी बाहेर कशी जाईल? आपल्या दोघांशिवाय हे कोणालाही माहीत नाहीये." कैलासने विचारलं.

"तेच तर कळत नाहीये. आता मी उद्या तिथे आलो की सगळं बघतो. तू यात लक्ष नको घालू. तुला सावध करायचं म्हणून सांगितलं. आता वेगाने कामाला लाग." रॉबर्ट म्हणाला.

"हो सर." कैलास म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

कैलासला आता खूप आनंद होत होता. इतकी वर्ष आपण ही बातमी बाहेर पोहोचवण्याचा विचार करत होतो, कशी बाहेर बातमी जाईल? याच्या प्रयत्नात होतो तर आज अचानक हे घडलं. शेवटी आता या रॉबर्टचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारच आहे. म्हणून तो पुन्हा जोमाने त्याच्या खऱ्या कामाला लागणार त्याआधी त्याच्या डेस्कजवळच्या देवाच्या प्रतीमेसमोर गेला आणि अगदी कृतज्ञतेने हात जोडून प्रार्थना करू लागला;

'देवा! खरंच खूप खूप आभार. तू पुन्हा एकदा दाखवून दिलं आहेस तुझ्या लीला अगाद आहेत. योग्य वेळ आली, की तू सगळी चक्र फिरवून तुला हवं ते करून घेतोस. आता ही माहिती बाहेर कशी पोहोचली? हे तुलाच माहीत. पण आता सगळं काही नीट होणार आहे याची मला खात्री वाटतेय. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहेच. आता फक्त तूच माझ्या हातून योग्य ते कार्य घडवून घे.'

कैलासने डोळे मिटून अगदी मनापासून देवाचे आभार मानून प्रार्थना केली आणि दोन मिनिटं शांत बसला. डोळे उघडल्यावर आता त्याला एक नवीनच ऊर्जा जाणवत होती. आता सगळं काही सुरळीत होणार आहे यावर तो ठाम होता, तरीही त्याच्या मनात एक रुखरुख होती ती म्हणजे 'ऋषभच काय होणार? त्याला आपण वाचवू शकू का?' या विचारातच तो त्याच्या सेलजवळ गेला. आता तर ऋषभच रूप अजूनच भयंकर झालं होतं. त्याची पूर्ण वाढ झाली होती आणि डोळेसुद्धा आता पूर्ण उघडले होते. फक्त त्याच्यात कसलीच ताकद नव्हती म्हणून तो एका कोपऱ्यात निपचित पडून राहिला होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच आग जाणवत होती. अजिबात ताकद नसताना हे एवढं भयंकर रूप दिसत होतं, तर 'जेव्हा तो हालचाल करेल तेव्हा काय हाहाकार माजेल?' याची कल्पनासुद्धा कैलासला करवत नव्हती.

'किती गोड होता हा ऋषभ. आता तर काय अवस्था झाली आहे त्याची?' कैलास स्वतःशीच म्हणाला आणि डोळ्यांच्या कडांतून येणारं पाणी हळूच पुसलं.

कैलास त्याच्याकडे बघत होता तेव्हा तर ऋषभची नजर जणू त्याला खायलाच उठली होती. त्याच्या तोंडातून अजून जास्तच लाळ गळायला लागली होती. सगळ्या शरीरावर हिरवी - पिवळी पिसं, खवले आणि काटे आले होते. आकारसुद्धा आधीपेक्षा जरा वाढला होता. फक्त हा मानव डायनासोर दोन पायांवर चालू शकणार होता आणि म्हणूनच जास्त विध्वंस घडणार याची कैलासला भीती होती. त्याने थोडावेळ त्याचं निरीक्षण केलं आणि पुन्हा त्याच्या कामाला लागला.

'आता हा रॉबर्ट उद्या संध्याकाळी येतो म्हणाला आहे; म्हणजे त्याआधी आपलं काम करून घ्यावं लागेल. आता फॉर्म्युला बदलण्याची आयती संधी हाती आली आहे तर अजून जास्त वेळ लागेल असा बदल त्या फॉर्म्युलात करतो.' कैलास स्वतःशीच म्हणाला आणि रॉबर्टच्या डेस्कवरून त्याची एक जर्नल आणि काही पुस्तकं घेऊन स्वतःच्या डेस्कवर आला.

कैलासने जे डायनासोरचे सँपल अभ्यास करण्यासाठी केमिकलमध्ये टाकले होते त्याचा अभ्यास करत करत तो फॉर्म्युला बनवू लागला. सोबत रॉबर्टने कोणता फॉर्म्युला केला आहे? काय काय केस स्टडी लिहून ठेवल्या आहेत? हेसुद्धा तो बघत होता. त्यावरून तो अभ्यास करून आपण नक्की कोणते बदल करायचे आहेत? हे तो ठरवत होता. काम करता करता कधी रात्र झाली हे त्याला समजलंसुद्धा नाही. जेव्हा त्या लहान खिडकीतून ड्रोनने जेवण आणि गोळ्या टाकल्या तेव्हा तो त्या आवाजाने भानावर आला.

'बापरे! रात्र झालीसुद्धा? वेळ कसा गेला हे कळलंच नाही. भूक तर लागली आहे, पण पुन्हा पुलाव असेल.' कैलास स्वतःशीच तोंड वाकडं करून म्हणाला.

त्याच्याकडे दुसरा कोणता पर्यायसुद्धा नव्हता म्हणा. रॉबर्टने त्याला "आता गोळ्या चुकवू नको" म्हणून सांगितलं होतं म्हणजे नक्की काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा प्लॅन असावा हे कैलासने ओळखलं होतं आणि म्हणूनच कसंबसं त्याने जेवण पोटात ढकलून गोळ्या घेतल्या. पुन्हा थोडं काम करून मग तो नेहमीप्रमाणे त्याच्या उपासनेला बसला आणि आजची रात्र खूप महत्त्वाची आहे, म्हणून न झोपता पुन्हा कामाला लागला.
***************************
कैलासला त्या बास्केटवर काय मिळालं असेल? त्याने जे पाहिलं आहे तिथूनच त्याला फंडस् मिळत असतील का? रॉबर्टला कुठून समजलं असेल या प्रोजेक्टची माहिती बाहेर गेली आहे? सी.आय.डी. ऑफिसर्सना हे कधी समजेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all