द डी.एन्.ए. (भाग -११)

CID Story. Suspense Thriller Story. Story Of Experiment That Harm The World.


द डी.एन्.ए. (भाग -११)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
जयश्री ऋषभच्या आठवणीने पुन्हा व्याकुळ झाली होती. सोनालीने तिला शांत करून पाणी दिलं आणि थोडावेळ शांततेत गेला.

"मॅडम आम्ही समजू शकतो तुम्हाला काय त्रास होत असेल ते. इतक्या वर्षांपूर्वीची खपली पुन्हा काढली जातेय आणि ही जखम न भरण्यासारखी आहे, पण तुमच्या सहकार्याशिवाय आम्हीसुद्धा पुढे नाही ना जाऊ शकत?" विक्रम म्हणाला.

"हो सर. विचारा काय विचारायचं ते." जयश्री डोळे पुसून म्हणाली.

"रॉबर्टना काही कारणास्तव निलंबित केलं होतं ना? म्हणजे त्यांच्या प्रोजेक्टला सगळ्यात जास्त विरोध विद्यावर्धन सरांनी केला आणि म्हणून हे झालं होतं तर मग त्यांनीच हे केलं असेल आणि त्यांच्यावर संशय येऊ नये म्हणून तुमच्या मदतीला आले असतील तर?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही सर. त्यांना सस्पेंड केलं खरं आहे, पण एक मित्र त्याच्या मित्राचं चांगलंच बघणार ना? हे रॉबर्ट सरांना फोन करून समजावयाचे आणि एक दिवस समोरासमोर बसून दोघांनी त्यांच्यातले मतभेद संपवले होते. रॉबर्ट सरांना यांनी जे समजावलं ते पटलं होतं ते यांचे आभारही मानत होते." जयश्री म्हणाली.

"ओके. तुम्ही या आता. पुन्हा काही गरज लागली तर बोलावू." सुयश सर म्हणाले.

जयश्री तिथून गेली तोवर गणेश ब्युरोमध्ये आला.

"सर, श्यामचा काहीही पत्ता लागला नाही. आपल्याला जो त्याचा पत्ता मिळाला आहे तिथे पूर्वी काही कच्ची घरं होती, पण आता तिथे बिल्डिंग झाल्या आहेत. आजूबाजूच्या जुन्या दुकानात मी केली चौकशी पण कोणीही त्याला ओळखलं नाही. शेवटी एक खूप जुना पानवाला होता त्याने ओळखलं, पण त्याच्या सांगण्यानुसार त्याला जेव्हा कामावरून कमी केलं तेव्हाच तो गावी निघून गेला. त्याच्या डोक्यावर बराच परिणाम झाला होता या घटनेचा." गणेशने सगळं सविस्तर सांगितलं.

"बरं. तू सतत काही माहिती मिळतेय का त्याची? हे बघत रहा. म्हणजे तो कोणत्या गावचा आहे?, त्याच्या घरात कोण कोण होतं? किंवा आता असतं सगळी माहिती जमव आणि सांग." सुयश सर म्हणाले.

एवढ्यात विक्रमचा फोन वाजला म्हणून तो बाजूला गेला. गणेश पुन्हा त्याच्या काही माणसांना कामाला लावण्यासाठी गेला आणि बाकीचे त्यांचं त्यांचं काम करू लागले. ईशा मात्र अजूनही तिथेच उभी होती आणि तिचं मात्र या सगळ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. सोनालीने तिच्या डेस्कवरून हे बघितलं आणि हळूच येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा ती भानावर आली.

"काय? कुठे हरवलात मॅडम?" ती हळूच तिच्या कानात म्हणाली.

"काही नाही गं! चल, खूप कामं आहेत. ही केस जरा जास्तच किचकट होत चालली आहे ना? त्याचाच विचार करत होते." ती म्हणाली.

"अच्छा? ही केस का ती केस? आ?" सोनालीने हळूच तिच्या खांद्याला धक्का देत विक्रमकडे बघत विचारलं.

"गप गं! चल तू इथून आधी. मला काही डिटेल्स हवेत तुझ्याकडून." ती विषय टाळत म्हणाली.

सोनाली पुन्हा काही बोलणार एवढ्यात विक्रमच त्याचा फोन संपवून तिथे आला.

"काय झालं? तुम्ही दोघी अश्या का उभ्या आहात?" त्याने विचारलं.

"काही नाही सर. आम्ही ते केस बद्दलच बोलत होतो." ईशाने सारवा सारव केली.

"ओके. मी आलोच." विक्रम म्हणाला आणि तो सुयश सरांच्या केबिनकडे जाऊ लागला.

सोनाली पुन्हा काही बोलायच्या आत ईशाने तिथून पळ काढला आणि ती तिचं काम करू लागली.
*****************************
इथे रॉबर्टच्या प्लॅनप्रमाणेच सगळं होत होतं म्हणून तो खुश होता. तो ज्या मीटिंगसाठी गेला होता त्यातला आत्ता खरा महत्त्वाचा टप्पा आला होता. कैलासला फोन करून आता साधारण अर्धातास होत आला होता आणि त्याला त्याचा जगावेगळा प्रोजेक्ट मीटिंगमध्ये सगळ्यांना दाखवायचा होता. ठरल्याप्रमाणे कॉन्फरन्सरूममध्ये सगळे जमल्यावर त्याने व्हिडिओ कॉल लावला. कैलासने ती सगळी तयारी करून ठेवली होती आणि तो त्या जीवाचे जे सँपल घेतले होते त्यावर काहीतरी टेस्ट करत होता. कॉल आला तेव्हा ते नमुने कसल्यातरी केमिकलमध्ये घालून त्याने कॉल रिसिव्ह केला. आता या व्हिडिओ कॉलमध्ये तरी निदान काहीतरी दिसेल ज्यातून आपल्याला माहिती मिळेल, की हा माणूस नक्की कुठून फंडस् आणतोय? अशी आशा त्याला होती. मनात हे विचार करूनच त्याने फोन रिसिव्ह केला होता. पण रॉबर्ट त्याच्यापेक्षा जास्त विचार करणारा होता. त्या व्हिडिओ कॉलमध्ये कैलासला काहीही दिसणार नाही याची खबरदारी त्याने घेतली होती. स्वतःचा कॅमेरा बंद ठेवून तो बसला होता.

"गुड इविनिंग कैलास. चल आता माझ्या प्रोजेक्टचे नमुने आणि काय काय बदल झालेत ते सगळे एकदा दाखवून एक्स्प्लेन कर." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर!" कैलास एकदम निर्विकारपणे म्हणाला.

त्याने सेल जवळच्या कॅमेरामध्ये जे काही रेकॉर्डिंग झालं होतं त्यातलं मोजकं रेकॉर्डींग फास्टफॉरवर्ड करून सगळं काही सांगायला सुरुवात केली. अगदी यंत्राप्रमाणे त्याने सगळं सांगितलं.

"सर! सगळं काही सांगून आणि दाखवून झालं आहे. काही विचारायचं असेल तर विचारू शकता." तो म्हणाला.

आता निदान भाषा, बोलण्याचा टोन यावरून तरी आपल्याला काही अंदाज बांधता येईल म्हणून त्याने ही काही विचारायचं असेल तर विचारा म्हणून शक्कल लढवली होती, पण रॉबर्ट इथेही चलाखी करत होता. कैलासपर्यंत त्याने कसलाही आवाज आणि कोणाचंही नाव पोहोचू दिलं नाही आणि जे काही प्रश्न त्या फंडस् देणाऱ्यांना पडत होते ते स्वतः रॉबर्ट विचारत होता. सगळं होईपर्यंत साधारण तास निघून गेला आणि कैलासने तिथला सगळा सेटअप उचलला. आता जे झालं ते असं झालं असतं तर? किंवा का झालं असं? असा विचार करत वेळ नको घालवायला म्हणून तो पुन्हा कामाला लागला. एवढ्यात त्याला तो रिमोट पुन्हा रॉबर्टच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचं आठवलं आणि तो तेच करायला त्याच्या टेबलाजवळ गेला. रिमोट ठेवून परत येताना त्या अंड्याच्या बास्केटमध्ये त्याला काहीतरी दिसलं म्हणून तो त्याच्या जवळ गेला. एवढ्यात त्याचा फोन वाजला म्हणून दचकून त्याने हात मागे घेतला आणि फोन उचलला.

"हॅलो कैलास! मीटिंग एकदम छान झाली. मी उद्याच तिथे येतोय. एक खास तयारी आपल्याला करायची आहे. आता याची पूर्ण जबाबदारी तुझी असेल. पुढचे काही दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तू मात्र आता या दिवसात एकही दिवस तुझ्या गोळ्या मिस करू नकोस." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर. सर, आपल्याला जेवढा फंड लागणार होता तेवढा मिळतोय ना?" कैलासने जरा बिचकत विचारलं.

"होऽऽ होऽ त्यापेक्षा जरा जास्तच मिळतोय. मी उद्या आलो की बोलू. आता खऱ्या अर्थाने माझा हा प्रोजेक्ट शेवटचा टप्पा पार करणार आहे. आता सगळीकडे फक्त आणि फक्त या रॉबर्टचा बोलबाला असणार. हा... हा... हा..." रॉबर्ट एकदम गर्वाने म्हणाला आणि फोन ठेवला.

त्याचा गर्व दिवसेंदिवस वाढतच चालला होता आणि आपण हे जे काही करत आहोत ते खूपच महान आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. स्वतःच्या इतक्या जवळच्या मित्राच्या मुलाचं जो त्याच्याही मुलासारखा होता त्याचं अपहरण करून आपण त्याच्यावरच हे असले प्रयोग करतोय याचा काडीमात्र पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर नव्हता.

'कुठून या माणसाचा असिस्टंट होण्याची बुध्दी झाली आणि याच्याकडे कामाला लागलो काय माहीत? एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. काय तर म्हणे पुन्हा डायनासोर हवेत. अरे! काय लहान मुलं जसे घोडा घोडा खेळतात तसं वाटलं का हे?' कैलास स्वतःशीच जरा रागावून म्हणाला. 


नंतर डोळे मिटून त्याने स्वतःला शांत केलं आणि पुन्हा त्या अंडी ठेवलेल्या बास्केटकडे गेला. त्यात दोन मोठी अंडी होती. आकारावरून तरी ती डायनासोरचीच वाटत होती.


'ही अंडी याने कुठून आणली असतील? म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट नाकारला तेव्हा तर ही जप्त केली होती. नक्की खरी अंडी आहेत की..?' कैलास स्वतःशीच म्हणाला.

त्याने चेक करण्यासाठी म्हणून एका अंड्याला हात लावला तर त्याचा स्पर्श इतका थंडगार होता की जणू आपण बर्फाला हात लावला आहे असं त्याला वाटलं. पण नॉर्मल तापमान असणाऱ्या खोलीत अंडी इतकी थंड कशी झाली आहेत? याचंच कोडं आता त्याला उलगडत नव्हतं. त्या बास्केटमध्ये काहीतरी विचित्र वाटत तर होतं, पण काय? हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. आपल्याला यात असं काय वेगळं दिसलं? म्हणून आपण इथे आलो हे आता त्याला कळत नव्हतं.

'देवा! तूच मला एक एक मार्ग दाखवून देत आहेस. आत्तासुद्धा यात काहीतरी वेगळं आहे जे माझी मदत करेल असं वाटतंय. काय ते आता तूच दाखवून दे.' कैलासने मनापासून देवाची प्रार्थना केली.

पुन्हा तो ते बास्केट न्याहाळू लागला. सगळं बास्केट बघता बघता ते एक नॉर्मल बास्केट नसून त्यात जे काही ठेवलं जाईल ते अतीथंड राहण्यासाठी मदत होईल असं आहे हे त्याच्या लक्षात आलं. पण आता मूळ प्रश्न होता की या माणसाला ही एवढ्या करोडो वर्ष जुनी अंडी एकदम व्यवस्थित अवस्थेत कशी आणि कुठून मिळाली असतील? कैलास विचार करत करतच सगळं बघत होता.

क्रमशः.....
**************************
कैलासला नक्की काय मिळणार असेल त्यातून? रॉबर्टला कोण एवढे फंडस् देत असेल? सी.आय.डी.ला हे सत्य कधी समजू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all