द डी.एन्.ए. (भाग -१०)

CID Story. Suspense Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -१०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलास आता पुन्हा जोमाने कामाला लागला होता. काम सुरू करण्याआधी त्याने त्याच्या हातून काही चूक घडू नये आणि रॉबर्टच्या या पापात आपण सहभागी नसावे म्हणून देवाजवळ प्रार्थना केली.

'देवा! तुला तर सर्व ज्ञात आहेच. तू जगाचा पालनहार आहेस आणि तुझ्याच बालकांना तू काहीही ईजा होऊ देणार नाहीस याचीसुद्धा मला खात्री आहे. सगळं काही तुझ्या योजनेप्रमाणेच सुरू असतं, म्हणून हेही तू तुझ्या योजनेप्रमाणे करत आहेस हे मला ठाऊक आहे. नक्कीच यातून तू सगळ्यांचं रक्षण करशील याची मला खात्री आहेच. त्यासाठी आता मला फक्त अजून थोडं बळ हवं आहे. मला माहित आहे आता हे काही शेवटचे टप्पे बाकी आहेत आणि तू तुझ्या लीला दाखवायला सुरुवात करशील; फक्त हे सगळं सोसण्याची आणि तुझा आवाज जो भीतीपोटी अंतरंगात दबला जातोय तो ऐकण्याची क्षमता दे. मी आजवर माझं सगळं आयुष्य तुझ्याच स्वाधीन केलं सगळं काही तुझ्या इच्छेने होत आलं आणि पुढेही होवो. जिथे जिथे मी कमी पडेन तिथे तिथे तू स्वतः मला मदत करणार आहेसच त्यामुळे मी निश्चिंत आहे. आता हाच तो क्षण आला आहे जिथे माझे आत्ता पर्यंतचे सगळे ज्ञान पणाला लागणार आहे. तू मार्ग दाखवायला आहेसच, पण या सगळ्यात माझ्या हातून कोणती चूक होऊन त्याचा फायदा रॉबर्टला होणार नाही याची काळजी तू घे.' कैलासने प्रार्थना केली आणि तो दोन मिनिटं डोळे मिटून शांत बसून राहिला.

दोन मिनिटानंतर डोळ्यावरून हात फिरवून त्याने सावकाश डोळे उघडले आणि रॉबर्टची जर्नल घेऊन तो त्यातले बारकावे बघत होता. एवढ्यात त्याला अचानक त्या सेलची आठवण झाली, म्हणून तो त्या सेलजवळ गेला.

'बापरे! म्हणजे हा रॉबर्ट आज या बदलाबद्दल बोलत होता. हा... हा... तर सगळ्यात मोठा बदल झाला आहे. आता हे सगळं बघता लवकरच रॉबर्टच स्वप्न पूर्ण होणार आहे.' कैलास त्या सेलकडे डोळे विस्फारून बघत स्वतःशीच म्हणाला.

ऋषभमध्ये आता डायनासोरसारखे बरेच बदल झाले होते. आज त्याने अर्धे डोळेसुद्धा उघडले होते आणि त्या अर्ध्या डोळ्यातसुद्धा एक वेगळीच आग दिसत होती. काळया बुबुळा ऐवजी लंबगोल असे हिरवे बुबुळ दिसत होते आणि डोळे हलके लाल झाले होते. त्याच्या हातापायाची वाढसुद्धा आता पूर्ण झाली होती. हाताच्या जागी मगरी सारखे पंजे, पायसुद्धा तसेच आणि तीक्ष्ण टोक असलेली खवल्याची शेपूटसुद्धा त्याला आली होती. आधीपेक्षा आता त्याच्या श्वसनाची गतीसुद्धा वाढली होती. तोंडातून सतत घट्ट अशी लाळ गळत होती आणि त्यामुळे त्याचे तीक्ष्ण झालेले सुळे स्पष्ट दिसत होते. डोक्यावरच्या केसांची जागा आता काटेरी खवल्यांनी घेतली होती. कानसुद्धा बरेच मोठे झाले होते आणि पूर्ण शरीराचा रंगसुद्धा बदलायला लागला होता. कैलास हे सगळं दृश्य बघत होता तेव्हा मनातून त्याला लहानपणीचा ऋषभ आठवत होता. एवढे बदल होऊनसुद्धा हे बदल माणसात झाले आहेत इतपत तो ओळखू येत होता, पण तो ऋषभ आहे हे काही आता ओळखता येत नव्हतं. राहून राहून कैलास जुन्या आठवणीत जात होता. जेव्हाही ऋषभ त्याच्या बाबांसोबत लॅबमध्ये यायचा तेव्हा तो त्याच्याशी खेळायचा, भरपूर मस्ती करायचा हे त्याला आठवत होतं. फक्त चार ते पाच महिन्याच्या ओळखीत दोघांची चांगलीच गट्टी जमली होती.

'किती गोड आणि निरागस मुलगा होता हा. या रॉबर्टमुळे बिचाऱ्याचे पार हाल झाले. आत्ता हा सामान्य माणूस असता तर नक्कीच वैज्ञानिक होण्याच्या तयारीत स्वतःला झोकून दिलं असतं.' तो स्वतःशीच म्हणाला आणि डोळ्याच्या कडांतून ओघळणारे अश्रू पुसले.

एवढ्यात त्याचा फोन वाजला. रॉबर्टला तर या सगळ्याची घाईच झाली होती. तो शरीराने बाहेर गेला असला तरी मनाने मात्र इथेच तर होता.

"हॅलो कैलास! मी सांगितलं त्याप्रमाणे सगळं होतंय ना? तुला जराही काही शंका आली तरी लगेच मेल टाक मी फोन करतो आणि हो आता त्यात काय बदल झालेत हे मला मीटिंगमध्ये दाखवायचं आहे तर थोड्यावेळात मी व्हिडिओ कॉल करतोय सेलजवळ लॅपटॉप नेऊन ठेव." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर. सगळं काही तुम्ही सांगितलं तसंच होतंय. पण सर..." कैलास बोलता बोलता थांबला.

"अरे बोल ना लवकर! पण काय? काही गडबड आहे का? आत्ताच काय ते स्पष्ट सांग." रॉबर्टने जरा काळजीत विचारलं.

"पण सर तुम्ही जे इंजेक्शन मला तयार करायला घे सांगितलं त्याचा फॉर्म्युला काही लक्षात येत नाहीये. मला त्या जीवाचे काही सँपल लागतील." कैलासने जरा बिचकत सांगितलं.

"ठीक आहे. एवढंच आहे ना? त्या सेलला कोपऱ्यात एक बटण आहे ते प्रेस कर, त्यातून एक स्लॉट बाहेर येईल त्यात सिरिंज ठेव आणि माझ्या ड्रॉवरमध्ये एक रिमोट आहे त्याने ऑपरेट कर आणि घे सँपल." रॉबर्ट म्हणाला.

"ओके सर." कैलास म्हणाला.

"चल आता अर्ध्या तासात फोन करतोय तोवर सँपल घेऊन ठेव." रॉबर्ट म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

कैलासला आता काहीतरी हाती लागेल म्हणून थोडा आनंद झाला होता.

'खूप खूप धन्यवाद देवा. मला माहितेय तूच माझ्या तोंडून हे बोलून घेतलंस. मला तर काहीही माहीत नव्हतं. म्हणजे माझ्या ध्यानी मनी असं काहीही बोलायचं नसताना हे बोललं जाणं म्हणजे ही तुझीच लीला आहे. आता या रॉबर्टच काही खरं नाही.' तो त्याच्या टेबलावर असलेल्या प्रतिमेकडे कृतज्ञतेने पाहत हात जोडून म्हणाला.

देवाजवळ आभार मानून झाल्यावर तो लगेचच सँपल घ्यायला उठला. रॉबर्टने सांगितल्याप्रमाणे आधी त्याच्या ड्रॉवरमध्ये त्याने रिमोट शोधला आणि सेलकडे वळला.
***************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये जयश्री मॅडमना बोलवून घेतलं होतं आणि सुयश सर त्यांना जी क्लिप बाकीच्यांना दाखवली होती तीच दाखवत होते.

"मॅडम, ही क्लिप नीट बघा. यात हा माणूस कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल ना? आम्हाला याच्यावर संशय आहे." सुयश सरांनी व्हिडिओ चालू करून त्या माणसाबद्दल विचारलं.

"हो सर! सर या माणसाला मी कसं विसरेन? अहो आणि यांच्यावर तुम्ही अजिबात संशय घेऊ नका. हे रॉबर्ट सर आहेत यांनीच तर माझ्यावर नीट उपचार व्हावे म्हणून मला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. एवढंच नाही तर ऋषभ हरवला त्या दिवसापासून ते रोज आमच्या सोबत असायचे. ऋषभच्या बाबांची काळजीसुद्धा घ्यायचे. सगळीकडे धावपळ करतानासुद्धा हे सोबत असायचे. देव माणूस आहेत ओ हे." जयश्रीने सगळं सांगितलं.

"मॅडम तुम्ही नीट बघा. या व्हिडिओत तर ते देव माणूस वाटत नाहीयेत. डॉ. विद्यावर्धन कोसळत आहेत तेव्हा हे बघतायत तरीही काही करत नाहीयेत यांना तुम्ही देव माणूस म्हणता?" अभिषेक म्हणाला.

"सर नाही असं काही. अहो ऋषभ हरवला तेव्हा अगदी पोलीस स्टेशनमध्ये सोबत येणं, त्याच्या शाळेत स्वतः जाऊन चौकशी करणं, पूर्ण त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून छडा लावण्याचा प्रयत्न करणं इतकं केलं आहे त्यांनी. जर तेच गुन्हेगार असते तर त्यांनी एवढी मदत का केली असती? त्यांना ऋषभला त्रास देऊन काय मिळालं असतं? त्यांनी लग्न केलं नव्हतं म्हणून ते ऋषभला त्यांचा मुलगा मानायचे. तोसुद्धा त्यांच्या सोबत छान रमायचा. मग सर असं असताना ते कसे हे सगळं करतील?" जयश्री म्हणाली.

"मॅडम तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण आम्ही लॅबमध्ये जाऊन आलो तिथून असं समजलं की रॉबर्ट आणि विद्यावर्धन सरांमध्ये काही मतभेद होत होते. कोणत्या तरी सिक्रेट प्रोजेक्ट मुळे हे झालं होतं." सोनाली म्हणाली.

"हो मॅडम. मध्यंतरीच्या काळात काहीतरी झालं होतं दोघांत पण ते नंतर ठीक सुद्धा झालं होतं. मला याबद्दल इतकं काही माहीत नव्हतं, पण यांच्या बोलण्यातून एकदा त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर काही काळाने दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली होती. त्यांनतर कितीतरी वेळा रॉबर्ट सर घरी आले होते, आम्ही एकत्र जेवलो होतो, ऋषभसुद्धा छान खेळला होता त्यांच्या सोबत." जयश्रीने सांगितलं.

"ओके ठीक आहे. तुम्ही म्हणताय तसं आपण धरून चालू की रॉबर्ट निर्दोष आहे पण मग आता तुम्ही एवढ्या बऱ्या होऊन आला आहात आणि ही केस पुन्हा ओपन झाली आहे, एवढी चौकशी होतेय तर ते आहेत कुठे?" विक्रमने विचारलं.

"ते तर मलाही नाही माहीत. जेव्हा मी हॉस्पिटल मधून घरी यायला निघाले तेव्हा मी तिथे सगळी चौकशी केली होती तर त्यांनी सांगितलं की, मला भरती केलं तेव्हा रॉबर्ट सरांनी तिथे माझ्या ट्रीटमेंटसाठी अॅडवान्स दिला होता आणि मी बरी झाल्यावर मी त्यांच्याबद्दल विचारलं तर ते परदेशात गेले म्हणून सांगा असं सांगितलं होतं. बहुदा ते तिथेच स्थायिक झाले असावेत. मीही बरेच प्रयत्न केले त्यांच्याशी संपर्क करण्याचे पण काहीही हाती लागलं नाही. ते आम्हाला कुटुंबं मानायचे आणि आम्ही कोणीच आता त्यांच्या सोबत नव्हतो म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा." जयश्री म्हणाली.

"ठीक आहे. तुम्ही ही क्लिप बघा आणि तुम्हाला कोणावर संशय आहे का सांगा." सुयश सर म्हणाले.

अभिषेकने ती क्लिप पुन्हा लावली. जयश्री सगळं नीट बघत होती.

"नाही सर. अहो हे तर सगळे यांचेच ऑफिसमधले कलिग आहेत." जयश्री म्हणाली.

"ओके तुम्हाला काही आठवलं तर नक्की सांगा. त्याआधी एक सांगा डॉक्टर साहेबांना कसले धमकीचे फोन किंवा पत्र येत होती का? ते शेवट शेवटच्या काळात कोणत्या टेंशन मध्ये होते का?" सुयश सरांनी विचारलं.

"असं तर काही आठवत नाही. ते ऑफिसच काम ऑफिसमध्ये आणि घरचं घरी असं ठेवण्यात एकदम एक्स्पर्ट होते. त्यांनी कधीच ऑफिसमधलं टेंशन घरी आणलं नाही की घरचं ऑफिसमध्ये नेलं नाही. त्यांना जर असे काही फोन आले असतील तर त्यांनी हे फक्त रॉबर्ट सरांना सांगितलं असेल. मोस्टली ते एकाच टीममध्ये काम करायचे तर त्यांच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना माहीत असायच्या." जयश्रीने सांगितलं.

"बरं. मॅडम पण फोन आले असतील किंवा पत्र आली असतील तर तुमच्या कानावर काहीतरी पडलं असेल ना?" ईशाने विचारलं.

"असं तर काही झाल्याचं आठवत नाहीये. हा पण ऋषभ हरवण्याच्या आधी तो एकदम गप्प गप्प झाला होता. मला चांगलं आठवतंय त्यादिवशी शाळेत जायच्याआधी मला तो म्हणत होता तुला काहीतरी सांगायचं आहे आज मला शाळेत जायचं नाही, पण त्याचं काहीही ऐकून न घेता मी त्याला शाळेत पाठवलं आणि तेच माझं चुकलं." जयश्रीचे डोळे बोलता बोलता पाणावले.

क्रमशः......
****************************
ऋषभला तेव्हाच समजलं असेल का; की त्याचे रॉबर्ट काकाच त्याचं अपहरण करणार आहेत? आता रॉबर्ट तर त्याच्या प्लॅनच्या खूप जवळ जातोय काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all