पुस्तक रसग्रहण - मरुभूमीतील मृदगंध

Inspirational Story
पुस्तकाचे नाव - मरूभूमीतील मृदगंध

प्रस्तावना :-

वास्तवात कधी कधी एवढं काही मिळून जातं की जे आपण स्वप्नांतही पाहिलेलं नसतं..!

आज तुम्हाला मी एका अशा पुस्तकाचा प्रवास घडवणार आहे , जो एखाद्या परिकथेपेक्षा कमी नाही. ही कथा आहे एका वाळवंटातील अशा फुलाची जिणं मॉडेलिंगच्या दुनियेत साऱ्या जगावर राज्य केलं.

दुःख अन दुर्दैवानं गांजलेली एक तेरा वर्षाची मुलगी.सोमालियातून लंडनला गेली एक सामान्य मोलकरीण म्हणून आणि मॉडेलिंगच्या दुनियेत आपला स्वतःचा हक्काचा ठसा उमटवला. तीच वारीस डिअरी . वारीस ही अनंत अवकाशातील कृष्णविवरातुन निर्माण झालेला एक देदिप्यमान तारा असंच वाटतं. वारीसचा मोलकरीण ते मॉडेल असा प्रवास लेखकाने या पुस्तकात दर्शवलाय.त्याच बरोबर तिच्या बालपणातील परिस्थिती अन एका दर्दनाक अत्याचाराला बळी पडलेली ही सुपर मॉडेल याचं वास्तव सुंदर रीतीने मांडलय...!

लेखकाविषयी - डॉ श्रीकांत मुंदरगी हे कोल्हापुरात प्लास्टिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. कथासंग्रह , कादंबऱ्या ,चरित्र ,अशी तेवीस पुस्तके डॉक्टरांनी लिहलीत. त्याचं अशातच प्रकाशित झालेलं मधुबाला हे पुस्तक वाचनीय ठरलं आहे..!

मुखपृष्ठ - या पुस्तकाच्या मुखपृष्टाला वाळवंटाने वेढलयं आणि त्यावर वारीस (डेझर्ट फ्लॉवर म्हणजे वाळवंटातील फुल) हे ही उमलताना दिसतंय . या मुखपृष्ठावरील तिचा तो कृष्णवर्णीय निरागस चेहरा आयुष्यात आलेल्या परिस्थितीशी झुंजताना झालेला प्रवास याची प्रचिती देतो.!

तर चला घेऊन जातो एका अशा पुस्तकाच्या प्रवासात जो कदाचित स्वप्नासारखा वाटेल. ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिचा जन्म आफ्रिकेच्या वाळवंटातील एक मागासलेला देश सोमालियात झाला., जुनाट चाली रिती आणि परंपराच्या शृंखलात अडकलेला हा देश. एका झोपडीत ती जन्मली ,कृष्णवर्णीय जमातीत ते deserts flower म्हणजे वाळवंटातील फुल उगवलं , खायला चार घास अन्न नाही की अंग झाकायला धड कपडा ही नाय, आफ्रिकेच्या रुक्ष आणि खरखरीत वाळूवर तिची चिमुकली पावलं उमटत गेली. शिक्षणाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. शेळ्याची राखण करत करत ते वाळवंटातलं फुल मोठं होत होतं. अशा वातावरणात वाढलेल्या मुलीला कसलं आलंय उज्वल भविष्य ना..? पण नियतीने काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं.

हळूहळू ते लेकरू मोठं होत गेलं. तहानलेल्या शेळ्या मैलोनमैल पाण्यासाठी धावायच्या त्याच्या मागे वारीसही . ते लहानसं लेकरू जनावरांसारखं ओणवी होऊन पाणी प्यायचं .कुठंतरी एखादं झुडूप पाहून तापलेल्या वाळूत एखादा आडोसा शोधून ती आडवी व्हायची. शिणलेल्या त्या शरीराला झोपेचा विळखा एखाद्या अजगरासारखा बसायचा. वाळवंटातील या वातावरणाने वारीसला खूप काही शिकवलं.

कळीतलं रूपांतर नंतर फुलात होऊ लागलं.तिनं अलगत पौगंडावस्थेत पदार्पण केलं. आणि तिच्या वडिलांनी एक जर्जर झालेल्या वृद्ध व्यक्तीला वारीस द्यायचं ठरवलं. काही शेळ्या आणि ऊंट याच्या मोहापायी. वारीस तयार नव्हतीच आणि वारीसला ते वाळवंट सोडून जाण्याखेरीज दुसरा पर्याय ही नव्हता. आणि मग तीचं पलायन करण्यात मदत केली तिच्या आईने. आणि इथूनच सुरुवात झाली वारीसच्या उगवत्या भविष्याची.

वारीस सोमालियात आपल्या मावशीकडे मोलकरीण म्हणून काम करते. मावशीचे पती राजदूत असल्याने वारीसला मोलकरीण म्हणून लंडनला जाण्याची संधी मिळते. तिथे तिला गुरा ढोरा सारखं राबवून घेतलं जातं चार वर्ष अन नंतर राजदूताचा तो कार्यकाळ संपल्यानंतर परत मायदेशी परतायला आणि त्या अधोगतीच्या दुनियेत यायला वारीस नकार देते आणि मग लंडनला मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवते. असंच गांजलेलं आयुष्य पुढे सरकतं आणि एक फोटोग्राफर तिचे काही फोटो काढून घेतो . आणि ती सुपर मॉडेल बनते .अगदी काल पर्यंत एक छोटासा ब्रेड आणि दुधाचा कप आणि डोक्यात प्रश्न चिन्हांचा गोंगाट घेऊन वारीस वणवण भटकत होती. आणि आज..? रात्री झोपताना उशाशी अंधार घेऊन झोपलेली वारीस डोळे उघडताच प्रकाशाच प्रकाश. कधीही कुठल्याही शो मध्ये नसलेली , कुठल्याही जाहिरातीत न दिसलेली , कुणाच्या खिजगणतीतही नसेल अशा वारीसची पिल्लेरी कॅलेंडरच्या मुखपृष्ठवर छायाचित्रासाठी निवड झाली. हा \"फॅशन शो \" च्या दुनियेतला सर्वोच्च सन्मान समजला जातो. असा आगळा वेगळा सन्मान आपल्या वाट्याला येईल असं वारीसच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं. कारण ज्यावेळी तिची छायाचित्रे घेतली गेली. त्यावेळी तीचं नाव \" फॅशन शो\" च्या नकाशावर कुठेही नव्हतं. इतकंच काय त्या कृष्णवर्णीय तरुणीला कामावर ठेवायला ही कुणी राजी नव्हते.

वारीसनं इतकं दुःख सोसलं होतं की आयुष्यात कधी सुखाचे दिवस येतील असं तिला स्वप्नातही वाटलं नाही. तिचा सारा भूतकाळ अंधारानं काळवंडून गेलेला त्यामुळे प्रकाशाची स्वप्न पाहणंही तिला गुन्हा वाटू लागला होता.

चमकणाऱ्या चंद्राची काळी बाजू

वारीस यशाच्या पायऱ्या चढत होती , पैसा ,प्रतिष्ठा तिच्या पायाशी लोळण घेत होते , पण तरीही या कृष्णवर्णीय अप्सरेच्या भूतकाळातील एक काळी बाजू दडलेली होती , जी ती बालपणापासून हृदयाच्या कोपऱ्यात दफणून होती पण एक दिवस ती काळी बाजू वारीस जगासमोर मांडते आणि सारं जग हादरतं.

ती काळी बाजू आहे एक प्रथा ती आफ्रिकन वाळवंटातील प्रत्येक स्त्रीच्या चारित्र्याचा एक हिस्सा आहे अशीच समज आहे.! स्त्रीला तिथं हेटाळणीच्या दृष्टीनं पाहिलं जातं. कोण्या अज्ञात शक्तीनं स्त्रीला जन्म दिला आणि भुतलावर पापांची जणू खाणच जन्माला आली असा परंपरागत समज चालत आलेला होता. मुलगी पाच वर्षाची झाली की तिच्या लैंगिकतेवर क्रूर आणि कठोरपनांचे घाव घातले नाही तर त्या अज्ञात शक्तीचा आपल्यावर कोप होईल, तुरळक पाऊस पडायचा तो ही थांबेल , सूर्य काळवंडून जाईल , अन्नदशा होऊन सारी माणसे पटपट मरून जातील. असा त्यांचा समज होता. कुणी कधी त्यावर शंका व्यक्त केल्या नाही की उलट सुलट प्रश्न ही केला नाही.

फिमेल जेनायटय म्युटिलेशन - :

आज मी जे काही सांगणार आहे ते नुसतं ऐकणं देखील सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. मुलांची सुंता हा प्रकार सर्वाना माहीत असेलच पण मुलींची...? नाही ना..?
एक भयानक वास्तव ज्यातून वारीस नावाची सुप्रसिद्ध मॉडेल ही सुटली नाही. मुलगी पाच वर्षांची झाली की तिच्या योनी मार्गाची कत्तल, आणि ते काम तिथल्या फिरस्त्या जिप्सी स्त्रीया करायच्या . योनीच्या दोन्ही बाजूला असलेलं मांसल स्नायू हे संवेदनशील आणि संभोगक्रियेच्या वेळी आकुंचन प्रसरण पावतात आणि त्यामुळे त्यातील मज्जातंतू द्वारे सुखद संदेश स्त्रीच्या मेंदूपर्यंत पोहचत कामक्रिडेत आनंद देतात.आणि या कामक्रिडेतला आनंद स्त्रीला अधिक मिळतो. स्त्रीला हे सुख मिळू नये अशी या मागची भावना असावी. रानटी जमातील अडाणी आणि अज्ञानी पुरुषांना स्त्रीला मिळणारं हे सुख तिरस्करणीय आणि घृणास्पद वाटत असणार. हा वयाच्या पाचव्या वर्षीच केलेला अत्याच्यार आफ्रिकन वाळवंटातील जवळजवळ सर्वच स्त्रीच्या वाट्याला आला. यामध्ये स्त्री मुलांना जन्म तर देऊ शकते पण समागमाचं सुखाला ती मुकलेली असते. स्त्री ही केवळ मुलांना जन्माला घालणारं यंत्र अशीच यांची समज होती. असं म्हंटल तरी काही वावगं ठरणार नाही. वारीसनं जेव्हा ही तिच्या बालपणातील काळी बाजू जगासमोर मांडली आणि सारं जग हादरून गेलं. आणि याच फिमेल जेनायटल म्युटिलेशनच्या विरोधात ती लढली या प्रथेला बळी जाणाऱ्या किती तरी स्त्रीला ती आधार झाली...! आणि मॉडेलिंग नंतर वारीस आता समाजसेविकेत आपण जीवन अर्पित करतेय.!

पुस्तक - मरुभूमीतील मृदगंध
लेखक- डॉ श्रीकांत मुंदरगी
प्रकाशक- रिया पब्लिकेशन्स
किंमत- २६०
पानांची संख्या - २१६

©सुशांत शामराव भालेराव