हळुवार भाग दहा अंतीम

Some Love Stories Never Ends


झाल्या प्रकारातून रमा अजूनही सावरली नव्हती. देव तिची हरप्रकारे मनधरणी करत होता, पण रमाच्या मनावरची जखम अजूनही ओली होती, त्यामुळे घरातली रोजची दैनंदिन काम करूनही रमा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. रमाची ही अवस्था देवला बघवत नव्हती. त्याला समजतही नव्हतं की, काय केल्याने रमाच्या चेहऱ्यावर परत स्मित फुलेल, हास्य उमटेल.

देव -"आई रमाची व्यवस्था मला बघवत नाही, मी काय करू म्हणजे मला माझी रमा परत मिळेल?"

आई -"देव झाल्या प्रकारातून बाहेर यायला रमाला जरा वेळ लागेल. रमाच्या मनावरची जखम भरून यायला जरा वेळ दयावा लागेल, तोपर्यंत केवळ वाट पाहणं आपल्या हातात आहे."

देव -"आई मी काय करू म्हणजे रमा त्या धक्क्यातून लवकर बाहेर येईल."

आई -"मला वाटते की, ती तीच्या आईकडे गेली म्हणजे माहेरी गेली, आपल्या हक्काच्या, जिव्हाळ्याच्या माणसांमधे गेली तर कदाचीत जागा बदलाने फरक पडू शकेल."

देव -"पण आई त्यामुळे आमच्या नात्यात अजूनच दुरावा आला तर?"

आई -"देव विरहाने प्रेम वाढते, अधिक फुलते! अनुभवाने सांगते आहे मी हे."

देव नाईलाजाने रमाला माहेरी पाठवायला तयार झाला. रमाची परीक्षाही अगदी तोंडावर आली होती. दुसऱ्या दिवशी रमाला घ्यायला तिचे वडील येणार होते.

देव -"रमा तु मला कधीच माफ करणार नाहीस का?"

रमा -"मी माफ करण्याचा प्रश्नच येत नाही."


देव -"मी खूप चुकीच वागलो, सारासार विचार न करता तुझ्यावर आरोप केले, तुझ्या चरित्र्यावर शिंतोडे उडवले. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे."

रमा -"मी काय शिक्षा देऊ? मी जरी तुम्हाला शिक्षा दिली तरी परत त्रास मलाच होणार आहे, मी जेव्हा त्रासात होते, तेव्हा तुम्हीही स्वतःला शिक्षा देतच होतात ना?"

देव -"मी तुझा अपराधी आहे. मी तुझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता."

रमा -"माझ्या आयुष्यात आता विश्वास हा शब्दच नाही आहे. ज्या आई-वडिलांनी मला जन्म दिला, लाडा-कोडात वाढवलं, माझे हट्ट पूर्ण केले, त्या माझ्या वडिलांनी, कोणी तरी बाहेरच्या व्यक्तीने काहीतरी माझ्या बद्दल सांगितलं म्हणून माझ्या आयुष्याचा एक मोठा निर्णय, माझा जराही विचार न करता घेऊन टाकला, आणि तुम्ही.. तुम्ही तर माझे जीवनसाथी आहात! स्वत:च्या बायकोवर विश्वास न ठेवता तुम्हाला फोन खरा वाटला,तिथेच माझे प्रेम हरले. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं, एखाद्या व्यक्तीची ओळख पटायला एक क्षणही पुरेसा असतो, नाहीतर संपूर्ण आयुष्य सोबत राहूनही त्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी अनोळखीच राहतात. रात्र फार झाली आहे
मला झोप येत आहे."

देव -"रमा माहेरी गेल्यावर मला विसरणार तर नाहीस ना?"

रमाने काहीच उत्तर दिले नाही. देव मात्र रात्रभर बिछान्यावर तळमळत होता. त्याला आता त्याच्या नात्याची काळजी वाटायला लागली होती. दुसऱ्या दिवशी रमा तिच्या वडिलांसोबत अमरावतीला जायला निघाली. देवला रमाला निरोप देणे जीवावर आले होते, पण त्याचा नाईलाज होता.

रमा घरून निघून तासभर झाला असेल नसेल, देवला फोन आला की, रमाच्या गाडीचा अपघात झाला आहे. देव लगेच अपघात स्थळी पोहोचला. रमाला फारच लागले होते. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. दोन्ही हातांची हाडं  मोडली होती. रमाला असं रक्ताच्या थारोळ्यात बघून देवचा संयम सुटला आणि तिथेच तो ओक्साबोक्षी रडू लागला. रमाला ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले. तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. हाताला फ्रॅक्चर असल्याने गळ्यातून सेंट्रल लाईन देऊन सलाईन लावण्यात आले होते. रमाची आई, मीनाताई, मीरा, आजी, सगळेच परमेश्वरा जवळ रमाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.

रमाच्या मेंदूवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण तिला महिनाभर इस्पितळात आय.सी.यु.त ठेवण्यात आले होते. महिनाभर रमाच्या वार्ड बाहेर देवने जागत पहारा दिला. रमासाठी त्याने देव पाण्यात ठेवले. महिनाभरा नंतर रमाला सुट्टी झाली. हाताचे हाड मोडल्याने रमा काहीच करू शकत नव्हती, तिला अशक्तपणा पण खूप आला होता.

देवने रमासाठी नर्स न लावता, तिची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. अगदी लहान मुलासारखी देव रमाची काळजी घेत होता. रमाचे मल- मुत्र स्वतः साफ करत होता. रमाच्या ऑपरेशनच्या वेळी देवने रमाला दोनदा रक्त दिले होते. देवने आपल्या प्रेमाने, त्यागाने, समर्पणाने रमाचे मन परत एकदा जिंकले होते.


 रमा आणि देव च्या वैवाहिक आयुष्य पुन्हा  नव्या उमेदीने सुरू झाले.


*********************************************


पती-पत्नीचं नातं हे केवळ एका शब्दात किंवा वाक्यात कोणीही सांगू शकणार नाही. या नात्याचे अनेक पदर असतात. हे नातं बहुरंगी, बहुढंगी असतं.  हळुवारपणे ते फुलत जातं. लग्न आयुष्यभराची कमिटमेंट असते. जीवनाच्या एखाद्या कठीण प्रसंगी पती-पत्नी एकमेकांना कशी साथ देतात? त्यावर या नात्याची सगळी भिस्त असते. केवळ एखादी घटना किंवा प्रसंग ते नातं मोडू शकत नाही.


समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all